एक्स्प्लोर
Advertisement
घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू
प्रेमचंद यांच्या 'रंगभूमी' कादंबरीतला संवाद.
भैरो सूरदासची झोपडी जाळतो, तेव्हा मिठुआ विचारतो -
मि. - आता आपण कुठे राहायचं?
सूर. - दुसरी झोपडी बांधू.
मि. - आणि जर पुन्हा कुणी अशीच आग लावली तर?
सूर. - तर पुन्हा बांधू.
मि. - आणि पुन्हा लावली तर?
सूर. - तरीदेखील, आपणही पुन्हा बांधू.
मि. - आणि कुणी हजारवेळा आग लावली तर?
सूर. - तर आपण हजारवेळा बांधू.
त्यांनी आता पुन्हा आग लावली आहे. ये, जरा छत शाकारुयात.
अग्नीचं हे दुसरं रूप. कदाचित त्यामुळेच अग्नीच्या चित्रात तो दोन मस्तकांचा दाखवला जात असावा. मुळात हा माणूस आणि देव यांच्यातला मध्यस्थ. अग्नी प्रत्येक देवाच्या मुखात नांदतो. अग्नीच्या द्वारे माणूस देवांपर्यंत हविर्द्रव्य पोहचवतो आणि देवांना यज्ञापर्यंत येण्यास भाग पाडतो. विश्वातली सर्व संपत्ती या ‘मध्यस्था’च्या ताब्यात असते असं म्हणतात. (निर्माता, विक्रेता आणि ग्राहक यांच्याहून अधिक संपत्ती मध्यस्थांकडे असण्याची परंपरा आजही सुरु आहेच.) जगातली सर्व रत्नं अग्नीपासून निर्माण झाली म्हणतात. हे त्याचं एक रुप आणि दुसरं रुप सर्वभक्षक असण्याचं.
त्याच्या ज्वालाही जिभांसारख्याच दिसतात. काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, धूम्रवर्णी, स्फुलिंगी आणि विश्वरुचि या त्याच्या सात जिभा. अग्नीशी निगडित ‘जिभां’च्या काही गोष्टी आहेत. बेडकाने अग्नी जलात(पाण्यात) कुठे लपला आहे ते देवतांना सांगितलं, त्यामुळे चिडलेल्या अग्नीने त्याला शाप दिला की, तुझी जीभ नष्ट होईल. तेव्हापासून बेडकांना जीभ नसते, पण देवांनी दिलेल्या वचनामुळे ते ध्वनी निर्माण करू शकतात. अग्नी जलातून निघून जंगलात जाऊन लपला. तिथं हत्तीने देवांना सांगितलं की, “अश्वत्थ हे अग्नीचं रूप आहे.” अग्नीने संतापून हत्तीची जीभ उलटी केली. मग पोपटाने अग्नी शमीच्या झाडात आहे असं सांगितलं; अग्नीच्या शापाने पोपटाची जीभदेखील उलटी बनली. देवांनी अग्नीला शमीवर गाठलं आणि तारकवध करण्यासाठी अग्नीची मदत मागितली. पुढची कथा निराळी आहे, तिचा इथं संदर्भ नाही.
थोडक्यात, सर्वभक्षक अग्नी काहीही खाऊ शकतो. त्यामुळे त्याला शांतनिळं ठेवणं आणि त्याचा उचित उपयोग करणं हे माणसाच्या हाती असतं.
अग्नीच्या दोन बायका आहेत – स्वाहा आणि स्वधा. त्यांची एक कथा आहे. एकदा अग्नी सप्तर्षींचे हविर्द्रव्य द्यायला गेला. परतताना त्याला त्यांच्या सात बायका दिसल्या. त्याला त्या इतक्या हव्याशा झाल्या की, त्यांना काहीही करून मिळवायचं या हेतूने तो त्यांच्या स्वयंपाकखोलीत बराच काळ दडून बसला. अनेक प्रयत्न करुनही त्या प्राप्त होईनात म्हणून तो स्वत:वरच संतापला आणि आत्महत्या करायला निघाला. स्वाहाला हे ध्यानात आलं. तिनं अग्नीला गाठलं आणि आपलं रुप बदलत सप्तर्षींच्या सहा बायकांची रुपं घेऊन त्याला भोग दिले. मात्र सातव्या अरुंधतीचं रुप काही तिला घेता आलं नाही. अग्नीला हे ध्यानात आल्यावर तो शांत झाला.
( पुलोमाचे अश्रू : वसुधारा )
त्याचं असंच नकारात्मक रूप दाखवणारी दुसरी गोष्ट पद्मपुराणात आहे. पुलोमा ही पुलोमन नामक राक्षसाची पत्नी होती. तिने दुसरा विवाह भृगू ऋषींशी केला. हे समजल्यावर पुलोमन तिला तिथून न्यायला आला. त्याने यज्ञातल्या अग्नीला विचारलं की, “ही कुणाची पत्नी आहे?” अग्नीने सत्य सांगितलं. पुलोमन तिला बळजबरीने घेऊन जाऊ लागला. तेव्हा तिची अकाली प्रसूति होऊन ‘च्यवन’ जन्मला आणि त्या तेजाने पुलोमन भस्म झाला. पुलोमाचे अश्रू वाहण्याचे थांबेनात. अखेर ब्रह्मदेवाने त्या अश्रूंमधून ‘वसुधारा’ नदीच निर्माण केली. अग्नीने चुगली केली म्हणून संतापलेल्या भृगू ऋषींनी त्याला “तू ‘सर्वभक्षी’ होशील” असा शाप दिला. त्यामुळे घाबरून अग्नीने आहुती घेणं बंद केलं आणि तो पाण्यात गुप्त झाला. यज्ञयाग बंद पडले. देवांना अग्नी सापडेना, तेव्हा माशांनी त्याचा अतापत्ता दिला. त्याची स्तुती करून देवांनी त्याला पाण्यातून बाहेर येणं भाग पाडलं. त्याचा प्राण्यांमधील उदरस्थ अग्नीचा अंश सर्वभक्षी असण्याच्या शापातून वगळला. त्यामुळे प्राणिमात्रांनी नि:श्वास सोडला.
(खांडववनातील युद्धाचे चित्रण करणारे हे शिल्प कंबोडियातील आहे.)
अग्नीचे आणि इंद्राचे वैर, अग्नीचे आणि ‘नागां’चे वैर देखील प्रसिद्ध आहेच. महर्षि वेद यांचा शिष्य उत्तंक याने शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा विचारली. गुरुपत्नीने पौष्यराजाच्या राणीची कुंडले मागितली. उत्तंकाने ती दान म्हणून मिळवली; मात्र राणीने तक्षक ती कुंडले पळवेल, म्हणून सावध रहा, असा इशारा दिला. वाटेत उत्तंक संध्येसाठी एका जलाशयाच्या काठावर थांबला, तेव्हा बाजूला ठेवलेली कुंडलं पळवून तक्षकाने ती पाताळात नेली. उत्तंकाने अग्नीला आवाहन केले आणि अग्नीने ती तक्षकाशी लढून परत मिळवून दिली. अग्नीचा दुसरा लढा खांडववनातला आहे. श्वेतकीच्या यज्ञात सतत हविर्द्रव्य भक्षील्यामुळे अग्नीला अपचन झाले. तेव्हा पाचक म्हणून खांडववन खा, असं त्याला ब्रह्मदेवाने सांगितलं. त्याचे खांडववन गिळंकृत करण्याचे सर्व प्रयत्न इंद्राने पुन:पुन्हा पाऊस पाडून व्यर्थ ठरवले. अखेर अग्नीने कृष्णार्जुनाची मदत मागितली. खांडववनाच्या बदल्यात अर्जुनाला रथ, अक्षय्य भाते आणि गांडीव धनुष्य दिले; कृष्णाला सुदर्शनचक्र आणि कौमोदकी गदा दिली. त्यांच्या संरक्षणात खांडववन मिळवलं.
बहुतेक उत्पत्तीकथांमध्ये प्रथम स्थान जलाचं आहे, उपनिषदांमध्ये ते अग्नीला दिलं गेलंय. सत् पासून अग्नी निर्माण झाला आणि अग्नीपासून जल व पृथ्वी. त्यामुळे जलात व पृथ्वीत अग्नी अनेक रुपांमध्ये दिसतो. अगदी जठराग्नी देखील त्याचंच एक रुप. दुसरीकडे त्याला ब्रह्मदेवाचा पुत्र, द्यावा – पृथ्वीचा पुत्र, बलाचा पुत्र असंही म्हणतात. ‘बला’चा पुत्र यासाठी की अग्नी निर्माण करण्यासाठी ‘बल’ आवश्यकच असे त्याकाळी. गारगोट्या, लाकडं एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करणं ही सोपी गोष्ट नव्हतीच.
पहिला वेद ऋग्वेद. त्यातला पहिला शब्द अग्नी! त्यामुळे विश्वसाहित्यातला पहिला शब्द अग्नी, अशीही एक समजूत आहे. जो नष्ट करण्याची क्षमता राखतो आणि निर्मितीची क्षमता राखतो तो अग्नी असा पहिला शब्द असणं याकडे प्रतीकात्म नजरेने पाहिलं तर शब्दाबाबत देखील काही नवं सापडू शकेल.
प्रेमचंद यांची कादंबरी जुनी झाली असली, तरी तिच्यातलं वास्तव अजून तेच आणि तसंच आहे. अत्याचार, विध्वंस यांच्यासाठी थोडकी सत्ताधीश माणसं अग्नीचा वापर करताहेत आणि त्यातूनही न हारता फिनिक्सप्रमाणे साधी माणसं पुन:पुन्हा उभारताहेत.
‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :
घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!
घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं
घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ
घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे
घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे
घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!
घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे
घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!
घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!
घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…
घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी
घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये
घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण
घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना
घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!
घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी
घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना
घुमक्कडी : (2) सीतेची तहान
घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement