Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde on Batenge to Katenge: सध्या भाजपकडून देण्यात येणारी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा गाजत आहे. यावर पंकजा मुंडेंचं परखड वक्तव्य
मुंबई: महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणेची गरज नाही. माझ्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. केवळ मी भाजपमध्ये (BJP) आहे म्हणून मी 'बटेंगे तो कटेंगे' (Batenge to Katenge) या घोषणेचे समर्थन करणार नाही, असे परखड वक्तव्य भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. पंकजा यांनी विधानसभेच्या (Maharashtra Vidan Sabha Election 2024) प्रचाराच्यानिमित्ताने नुकतीच एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली होती. या मुलाखतमीध्ये पंकजा मुंडे यांनी 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेबद्दल काहीशी नापसंती व्यक्त केली आहे.
कट्टर हिंदुत्त्वाचे आयकॉन असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपने सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरवले आहे. योगी आदित्यनाथ यांची अनेक प्रचारसभांमध्ये दिलेली 'बटेंगे तो कटेंगे' राजकीय वर्तुळ आणि सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या अनुषंगाने पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा पंकजा मुंडे यांनी म्हटले की, राज्यात अशा घोषणांची गरज नाही. त्याऐवजी विकासावर बोलायला पाहिजे. मी भाजपमध्ये आहे म्हणून 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेचे समर्थन करणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध केला होता. मात्र, आता पंकजा यांच्या निमित्ताने भाजपमधीलच नेत्याने 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
महाराष्ट्राचं राजकारण वेगळं, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
माझं राजकारण वेगळं आहे. महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'सारख्या घोषणांची गरज नाही. योगी आदित्यनाथांनी त्यांच्या राज्यात वेगळ्या संदर्भात ही घोषणा दिली होती. महाराष्ट्रात वेगळा अर्थ काढला जात आहे. या घोषणेचा अर्थ पंतप्रधान मोदीजी यांनी जात-धर्म न पाहता सवांना समान न्याय दिला असा आहे. योगायोगाने मोदींनी 'एक है तो सेफ है' घोषणा दिली आहे. त्याच घोषणेचा हा वेगळ्या पद्धतीने केलेला उल्लेख आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
आणखी वाचा