BLOG: गोविंदा – सण ते इव्हेंट
ढाक्कुमाकुम..ढाक्कुमाकुम.. गोविंदा रे गोपाळा या गाण्याची सुरावट आज संध्याकाळी उशिरा कानावर पडली आणि मनानेही त्या गाण्यासोबत फेर धरला. कोरोना काळात आरोग्य आणीबाणीमुळे साऱ्यांनीच संयम पाळला होता. यंदा निर्बंधमुक्त सण साजरे होत असल्याचा आनंद या गाण्यामधून जाणवत होता. गिरगावसारख्या सणासुदीच्या माहेरघरात हा उत्साह शिगेला पोहोचताना पाहून मन सुखावलं आणि थेट ज्येष्ठ सिने लेखक दिलीप ठाकूरांना फोन लावला. मूळ गिरगावकर असलेले दिलीप ठाकूरही याविषयासाठी गप्पा मारण्याकरता फोन केल्याने चांगलेच खुलून बोलले.
थेट त्यांच्या बालपणीचा गोविंदा त्यांनी समोर आणला. ते म्हणाले, 60-70 च्या दशकात गोविंदा म्हणजे देखावे अर्थात चित्ररथांची मेजवानी असे. ज्यात माणसं गेटअप करुन उभी असत. सामाजिक विषय, कला, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचा संदर्भ याला असे.
मला आठवतंय, भारताने पाकिस्तानविरुद्ध 71 साली जे युद्ध जिंकलं, त्याचा संदर्भ घेऊन तेव्हा अनेक गोविंदा मंडळांनी चित्ररथ साकारले. कच्छी बाजा हीदेखील गोविंदाची ओळख. दोन ढोल, ताशा आणि सनईच्या धूनवर नाचणाऱ्या नव्हे डोलणाऱ्या पिढ्यांमध्येच माझी पिढीही आहे. त्या काळापासून आजतागायत कच्छी बाजा वाजवणारे आणि आज सत्तरीत वय असलेले इब्राहिमभाई, तसंच ख्यातनाम ढोलकीसम्राट नटरंगफेम विजय चव्हाण यांचाही उत्साह उसळून येत असे. आजही त्यांच्या कलाकारीचे चाहते आपल्याला भेटतात. आजही त्यांची क्रेझ कायम आहे. अलबेला सिनेमातील भोली सूरत आणि शाम ढले...ही कच्छी बाजातील अधिक पसंतीची गाणी होती.
त्या काळातली आणखी एक परंपरा जी काळानुसार लुप्त झाली, ती म्हणजे श्रीकृष्णकथा सांगणे. आम्हाला आजी अशा कथा सांगत असे. इतकंच नव्हे, तर मुद्रित माध्यमांमध्ये अशा कथा छापून येत. तसंच रेडिओवरही अशा कथा सांगितल्या जात.
आपल्या सणसंस्कृतीचं दर्शन हे सिनेमामध्ये घडत असतं. तसंच ते गोविंदाचंही घडलंय.
60 च्या दशकात ब्लफ मास्टरमध्ये शम्मी कपूर दहीहंडीच्या गोविंदा आला रे आला या गाण्यावर थिरकला, ते गाणं आपल्या गिरगावात मंगलवाडी, बोरभाट लेनमध्ये शूट झालं होतं. त्या गाण्याची मोहिनी रसिकांच्या मनावर कायम आहे. या गाण्याबद्दल खास बात सांगायची म्हणजे गाण्याचे संगीतकार कल्याणजी-आनंदजी तसंच दिग्दर्शक मनमोहन देसाई हेही पूर्वाश्रमीचे गिरगावकरच.
पुढे बदला, खुद्दारसारख्या सिनेमांमध्ये शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ हेही हंडीच्या गाण्यांवर ताल धरताना पाहायला मिळाले. यातल्या बदला सिनेमातील गाण्याचं शूटिंग ग्रँट रोडनजीक असलेल्या नवजीवन सोसायटीमध्ये झालंय.
संजय दत्तच्या वास्तव आणि सलमानच्या हॅलो ब्रदरमधली दहीहंडी गीतं लोकप्रिय झाली. गिरगावकर राजेश खन्नाचंही दहीहंडीशी खास नातं होतं. तो स्टार झल्यानंतरही काही वर्षे इथल्या हंडीसाठी आर्थिक मदत करायचा. त्याच्या निधनानंतर त्याच्या या आपुलकीला वंदन करण्यासाठी ठाकुरद्वार नाक्यावर स्थानिक राजकीय नेते, दहीहंडी आयोजक पांडुरंग सकपाळ यांनी दहीहंडी बांधली होती.
पूर्वीच्या काळी पौराणिक हिंदी सिनेमे प्रदर्शित होण्याचा काळही आषाढ, श्रावण आणि भाद्रपद महिना असे. कृष्ण-सुदामा, बलराम-श्रीकृष्ण, श्रीकृष्ण लीला अशी काही नावं आज चटकन माझ्या ओठी येतात. असंही ठाकूर यांनी आवर्जून सांगितलं.
मराठी सिनेमांमध्ये देखील हा सण आपल्या भेटीला आलाय. महिला गोविंदा पथकांनी या सणात गेल्या काही वर्षात आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र मराठी सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री,निर्मात्या सुषमा शिरोमणी यांनी 1977 मध्ये ‘भिंगरी’ या सिनेमात महिला गोविंदा दहीहंडी फोडताना दाखवलाय.
तसंच ‘हमाल दे धमाल’च्या गोविंदा रे गोपाळा या गाण्याची जादूही आज कायम आहे. ज्येष्ठ गायक विनय मांडकेंनी हे गीत गायलंय. सिनेमाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे कुंभारवाडा परिसरातले त्यावेळचे रहिवासी. त्यांना इथली सणसंस्कृती पडद्यावर आणायचीच होती, ती त्यांनी या गीताच्या निमित्ताने आणली. पुढे अवधूत गुप्तेच्या ‘कान्हा’सारख्या सिनेमातूनही गोविंदा आला.
काळानुरुप या गोविंदामध्ये बदल झाले. वर्ष 2000 नंतर हा सण कॉर्पोरेटकडे झुकला. राजकीय नेत्यांची एन्ट्री झाली. लाखालाखांची बक्षिसं आली. हिंदी-मराठी तारे स्टेजवर ठेका धरु लागले. 24 तास झालेल्या वृत्तवाहिन्यांनी लाईव्ह कव्हरेज करत त्यात ग्लॅमर भरलं.
सणाचा इव्हेंट कधी झाला हे कळलंही नाही. आता याचं आणखी एक पाऊल पुढे गेलंय ते प्रो-दहीहंडीच्या रुपात. राज्य सरकारने हा खेळ म्हणून वर्षभर सुरु ठेवायचं ठरवलंय.
ठाकूरांशी झालेल्या या फोनगप्पांमधून दहीहंडीचे लागतात तसे आठवणींचे थर लागले. साठच्या दशकातून थेट आज २०२२ पर्यंत. या सणाचा, या गिरगावचा आपणही एक घटक आहोत, याची अभिमानास्पद भावना फोन ठेवताना दोघांच्याही मनात होती.