इलेक्शन डायरी : गोरखपूरचं समांतर सरकार- योगी आदित्यनाथ
योगी तो बहुत मूडी आदमी हैं. गोरखपूरमध्ये आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना भेटता येईल का असा प्रश्न स्थानिक पत्रकारांना विचारल्यावर त्यांनी या वाक्यानं सुरुवात करुन योगींच्या तऱ्हेवाईकपणाचे किस्से ऐकवायला सुरुवात केली. त्यातला एक तर फारच भारी. एका नामांकित न्यूज चॅनेलच्या स्पेशल मुलाखतीसाठी सेट अप लागलेला होता. तीन चार कॅमेरे सज्ज होते. सगळे योगींची वाट पाहत होते. ठरलेल्या वेळेनंतर अर्ध्या एक तासानं योगी आले. स्पेशल मुलाखत असल्यानं कॅमेरा लाईटसाठी अनेक ठिकाणी काळ्या कपड्याचा वापर करण्यात आला होता. ते जिथं बसणार त्याच्या मागेही काळा कपडा लावलेला होता. योगींनी आल्याबरोबर कपाळावर आठ्या आणून सुरुवात केली. ये काला कपडा क्यों लगाया हैं, इसको हटाओ यहाँ सें. काला तो अशुभ रंग हैं. आपने कैसे लगाया इसको यहां पें..झालं इतक्या मेहनतीनं सेट अप उभा केलेल्या सगळ्या टीमची तंतरली. न्यूज अँकरनं योगींना शांत करायचा प्रयत्न केला. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं काळ्या रंगाची काय गरज आहे ते सांगितलं. पण योगींचा पारा काही उतरला नाही. कपडाही लगाना हैं तो केशरिया लगा दिजीए...असं म्हणून त्यांनी भगवंच कापड लावायला सांगितलं. तर योगींच्या अशा मूडीपणाचे किस्से ऐकल्यानंतर त्यांना भेटायला जाताना काहीशी धास्तीच होती मनात. आदल्या दिवशी हा किस्सा ऐकूनही गोरखपूर मठाच्या दारात गेल्यावर लक्षात आलं की आज आपणही काळ्या रंगाच्या जवळ जाणारा करडया रंगाचा शर्ट घातलाय. त्यामुळे पुन्हा शंकेची पाल चुकचुकली.
गोरखपूरचं नाव ज्या गोरक्षनाथांच्या नावानं पडलंय, त्यांचं मोठं मंदिर या शहरात आहे. देशात सगळीकडे जो नाथ संप्रदाय पसरलेला आहे त्याचं हे आदिपीठ हे नवीच माहिती यनिमित्तानं कळाली. याच मठाचे योगी आदित्यनाथ हे मठाधिपती आहेत आणि गोरखपूरचे अनभिषक्त सम्राटही. सलग पाच वेळा लोकसभेत खासदार. 1998 सालापासून ते आजवर त्यांना निवडणुकीच्या मैदानात कुणीही हरवू शकलेलं नाहीय. इतकंच काय प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मतांची आकडेवारी ही वाढतच चाललीय. अर्थात गोरखपूरमध्ये प्रखर हिंदुत्वाचं राजकारण हाच त्यांच्या राजकारणाचा आत्मा आहे. मुस्लिमांच्या विरोधात सतत वादग्रस्त, बेधडक वक्तव्य केल्यानं ते सतत चर्चेतही असतात. गोरक्षनाथ मठाच्या आतमध्ये एका बाजूला त्यांचं कार्यालय. गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन आम्ही या कार्यालयात येऊन बसलो. कार्यालयात दोन खोल्या. दिवाण ए आम आणि दिवाण ए खाससारख्या. तर दिवाण ए आम म्हणजे सामान्य लोकांना जी भेटण्याची जी खोली त्या ठिकाणी एक लाकडी खुर्ची आणि टेबल. योगींच्या खुर्चीमागे एक मोठी अशोकस्तंभाची प्रतिकृती. राजदंड ठेवल्यासारखी. भिंतीवर योगींच्या वेगवेगळ्या मुद्रांमधल्या प्रतिमेचा कोलाज. खुर्चीच्या पायाला टेबलाच्या खाली एक छोटा लाकडी बॉक्सही ठेवलेला. योगींची उंची कमी असल्यानं पाय टेकवण्यासाठी ही व्यवस्था असणार हे नंतर लक्षात आलं.
सकाळी आठ साडेआठच्या वेळेस ते मठात भेटतील. असं सांगितल्यानं आम्ही ठरलेल्या वेळीच पोहचलो. पण नऊ वाजत आले तरी योगींच्या आगमनाची काही चिन्हं दिसत नव्हती. कार्यालयाच्या बाहेर एका दगडी चौथ-यावर सतरंजी टाकून दहा बारा लोक शांत मांडी घालून बसलेले होते. योगींकडे काही काम घेऊन आलेल्यांची ही रांग होती. शेजारी काही खुर्च्याही टाकलेल्या होत्या. कुणीही मोठ्या आवाजात बोलत नव्हतं. कार्यालयाच्या आत थोड्यावेळानं अगदी मुनीम शोभावेत अशाच प्रकृतीची आणि वेशभूषेची व्यक्ती येऊन बसली. त्यांनी आपल्यासमोरच्या लाकडी पेढीवर एक कागद काढून काहीतरी नोंदी करायला सुरुवात केली. शेजारी आजकाल दुर्मिळ झालेला टाईपरायटर ठेवलेला होता. त्यावर मुनीमांच्या आदेशानुसार काही टायपिंगही सुरु होतं.
माझ्या शेजारी हिंदू युवा वाहिनीचा मेरठमधला जिल्हाध्यक्ष बसलेला होता. भारत हे हिंदुराष्ट्र बनलंच पाहिजे, नेहरु कसे मुस्लिमच होते, गोरखपूरमध्ये योगींच्या आधी मुस्लिमांनी कसा उच्छाद मांडला होता या त्यांच्या अत्यंत पकाऊ आणि थापामिश्रित गप्पांनी मी वैतागलो होतो. पण योगींच्या मुलाखतीसाठी हे सगळं सहन करत होतो. त्याला कल्टी मारावी म्हणून लखनौचे दोन तीन पत्रकार योगींना भेटायला आले होते. त्यांच्याशी गप्पा सुरु केल्या. थोड्या वेळानं तिथंच महाराष्ट्रातून कुमार केतकर, अभिजीत ब्रम्हनाथकर आदी आपली पत्रकार मंडळीच आल्यानं सुटकेचा निश्वासच टाकला.
यूपी इलेक्शनबद्दल गप्पा सुरु असतानाच योगी आदित्यनाथ आले. आधी बाहेर बसलेल्या लोकांशी त्यांनी थोडक्यात निपटलं. आप कहां से आए हो असं म्हणत ते पत्रकारांसोबत गप्पा करायला आतल्या खोलीत आले. एकूण मूड चांगला दिसत होता. भाजप 260 जागा जिंकतेय असं ठाम आत्मविश्वासानं सांगत त्यांनी यूपीचं विश्लेषण सुरु केलं. यूपीची जनता सपाच्या कारभाराला कंटाळलीय, मायावतींनी पश्चिमी यूपीत बरी कामगिरी केली असली तरी त्यांना बहुमत काही मिळणार नाही, आमच्याकडे सीएम पदाचा उमेदवार नसला तरी काही फरक पडत नाही वगैरे वगैरे. बोलता बोलता पाचव्या टप्प्यानंतर मतदानाची टक्केवारी कमी होतेय असा विषय निघाला. तर यावर त्यांचं म्हणणं होतं की याचं कारण आहे की मुस्लिम महिलांना मतदान करुन दिलं जात नाहीय. मुस्लिम महिला भाजपच्या बाजूनं मतदान करतील म्हणून त्यांना बाहेर पडू दिलं जात नाहीय. स्वामींच्या या बोलण्याचा अर्थ ट्रिपल तलाकबद्दल भाजपनं घेतलेल्या भूमिकेची महिमा सांगणारा होता. अर्थात योगींच्या या दाव्यात काही फारसं तथ्य वाटत नाहीय. उलट भाजपनंच बुरखा घातलेल्या महिलांची नीट ओळख पटवली जात नसल्याचा आरोप करुन या महिलांची नाराजी ओढवलीय. तुम्ही खासदार आहात. त्यामुळे निकालानंतर दिल्लीत राहणंच पसंत करणार की यूपीमध्ये? या प्रश्नावर त्यांनी हसत हसत मैं तो भय्या गोरखपूर का आदमी हूं. गोरखपूर छोड को कैसे रह सकता हूं. प्रश्न आपल्याला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पाहणारा आहे हे पाहिल्यानं योगी काहीसे सुखावल्याचं दिसत होतं.
योगी आदित्यनाथ यांचं मूळ नाव अजयसिंह बिश्त. ते मूळचे उत्तराखंडमधले. अवघ्या 25 व्या वर्षी ते गोरखपूर मठाचे मठाधिपती बनले. 26 व्या वर्षी खासदारही. गोरखपूर मठ आणि राजकारण यांचा संबंध काही योगी आदित्यनाथ यांच्यापासूनच सुरु झालेला नाहीय. आदित्यनाथ यांच्याही आधी योगी अवैद्यनाथ यांनीही हिंदू महासभेकडून निवडणूक लढवलेली होती. हे योगी वैद्यनाथ अयोध्या जन्मभूमी आंदोलनातलंही मोठं नाव. त्यांनीच 25 व्या वर्षी योगी आदित्यनाथ यांना मठात आणलं. 1998 साली त्याला आपल्या जागी तिकीट देऊन 26 व्या वर्षी खासदार बनवलं. गोरखपूरच नव्हे तर पूर्वांचलच्या इतरही भागात आदित्यनाथ यांचा प्रभाव आहे. हिंदू युवा वाहिनी या एका कडव्या संघटनेचे ते संस्थापक आहेत. या संघटनेचे कधी भाजपशीही मतभेद होतात. योगा न मानणाऱ्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकलण्याची भाषा ते करतात. तर कधी नवरात्रीतल्या डीजे बंदीवरुन सरकारवर लांगुलचालनाचा आरोप करतात. ही संघटना म्हणजे गोरखपूरमधल्या दहशतीचं एक केंद्र बनल्याचंही काही स्थानिक भीत भीत का होईना मान्य करतात. गोरखपूरमध्ये त्यांनी योगी नावाचा एक समांतर दबदबा निर्माण केलाय. परवा गोरखपूरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत जो रोड शो झाला, त्यात त्याची झलकही पाहायला मिळाली. मुस्लिम वस्तीत आल्यावर गोरखपूर में रहना हैं, तो योगी योगी कहना होगा चे नारे दिले गेले. शिवाय मशीदीसमोर मोठ्या आवाजात जय श्रीराम जय श्रीराम च्या आरोळ्या. याबद्दल योगींना विचारलं तर योगी त्यांच्या नेहमीच्या बेफिकीरीनं...जय श्रीरामच्या घोषणांमध्ये कुणाला आक्षेप असेल तर ते लोक विकृतच म्हणायला हवेत. तर असे हे बेफिकीर योगी.
उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आलं तर योगी मुख्यमंत्री बनायला हवेत अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. किंबहुना पक्षानं केवळ योगींच्या नावाचा वापरच केला, त्यांना योग्य स्थान दिलं जात नाहीय अशीही काहींची तक्रार आहे. त्याचमुळे हिंदू युवा वाहिनीच्या काही उमेदवारांनी या निवडणुकीत बंडही केलंय. गोरखपूर आणि जवळच्या पट्ट्यात काही उमेदवार उभे आहेत. पण योगी आदित्यनाथ या उमेदवारांचा आणि आपला काही संबंध नाही, त्यांना संघटनेतून काढून टाकल्याचं सांगतात. विशेष म्हणजे या हिंदू युवा वाहिनीच्या बंडखोरांनी शिवसेनेनं पाठिंबा दिलाय, इतकंच नव्हे तर त्यांना आपलं अधिकृत निवडणूक चिन्हही दिलेलं आहे. अर्थात योगींचे समर्थक त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत असले तरीही त्यांच्या प्रभावाला काही मर्यादा आहेत. लोकसभा ते सलग पाचवेळा जिंकले असतीलही. पण त्यांना मागच्या विधानसभेला भाजपचे उमेदवार गोरखपूरमध्ये फारसे निवडून आणता आले नाहीयत. त्यामुळेच पक्ष त्यांच्याबद्दल जरा सावध भूमिका घेऊन आहे.
तर असे आहेत योगी आदित्यनाथ... त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो. तेव्हा एका हिंदी पत्रकारानं म्हटलेलं अरे आप महाराष्ट्र से हो न सर..तो बस यूं समझ लीजिए की ये पूर्वांचल का ठाकरे हैं.