एक्स्प्लोर
BLOG | आमच्या देशात रॉकस्टार का निर्माण होत नाहीत?
जिथे सिनेमा आणि त्यातील संगीत हे लोकांना वास्तवापासून दूर कल्पनेच्या जगात नेण्यासाठी असतं, तिथे लोकांना मुस्कटात मारून वास्तवात आणत वेगळी दृष्टी देणारा जॉन लेनन किंवा बॉब डिलन का जन्माला यावा?
भारतात रॉकबँड किंवा पॉपस्टार का निर्माण होत नाहीत यावर मी आज एका मैत्रिणीला माझं आकलन सांगत होतो. अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातही रॉकस्टार आणि पॉपस्टारचं एक जुनं कल्चर आहे. बीटल्स, पिंक फ्लॉयड, क्वीन, लिंकीन पार्क, U2, रोलिंग स्टोन्स, AC/DC सारखे बँड आणि मायकेल जॅक्सन, बॉब डीलन, एल्टन जॉन सारखे गीतकार/संगीतकार आणि गायक येथे जन्माला आले आणि जगभर गाजले. दक्षिण अमेरिकन देशांतही आणि दक्षिण कोरियातही पॉपची धूम आहे. K-पॉप मधल्या Gangnam Style या गाण्याने YouTube वर धुमाकूळ घातला, तीच धूम Despacito या लुई फॉंसीच्या लॅटिन गाण्याची! एनरीकेची स्पॅनिश गाणीही जगभर गाजली, ज्यातला एकही शब्द न कळता आम्ही ती 20 वर्षांपूर्वी ऐकत होतो.
भारतातही आलिशा चिनॉय, हरिहरन-लेसली, लकी अली, सिल्क रुट, युफोरिया, इंडियन ओशन वगैरे स्टार्सनी आणि बँडनी एक छोटा काळ गाजवला, पण त्यांच्यापैकी कुणालाही पाश्चिमात्य जगातल्या रॉकस्टार, पॉपस्टार लोकांच्या जवळपासही जाता आले नाही. पेल्यातल्या वादळासारखे ह्या लोकांचे काम इथेच मोजक्या संख्येच्या तरुण पिढीपर्यंत पोचले आणि विरून गेले. याला एक महत्वाचं कारण म्हणजे पाश्चिमात्य सिनेमात गाणी हा प्रकार अभावानेच असतो, तर भारतीय सिनेमा गाण्यांशिवाय बनूच शकत नाही. काही सिनेमे तर फक्त गाण्यांवरच चालतात, भले त्याला काही स्टोरी असो किंवा नसो. जिथे गाण्यांचा एवढा मोठा रतीब सिनेमे घालत असतील तिथे बाहेर कुणी कशाला वेगळी गाणी बनवायचा प्रयत्न करेल?
इंग्रजी, कोरियन किंवा लॅटिन पॉप आणि रॉक मध्ये जी गाणी जगभर गाजली आहेत त्यांच्यात तीन गोष्टी प्रकर्षाने समान आहेत...उत्कृष्ट संगीत, अर्थपूर्ण गीत आणि अप्रतिम नृत्य किंवा सादरीकरण. तिकडचा प्रत्येक बँड किंवा कलाकार स्वतःची संगीताची शैली, वेगळा आवाज आणि वाद्यकौशल्य बाळगून आहे. त्यामुळे तिकडे वेगवेगळे प्रयोग करायला वाव असतो आणि लोकांना सतत नवीन काहीतरी ऐकायला मिळते. याउलट आपल्याकडे एखाद्या संगीतकाराचे नाव झाले की मग तो आणि त्याचे नेहमीचे गायक, वादक परतपरत त्याच यशस्वी फॉर्म्युलातली गाणी लोकांच्या माथी मारत राहतात. आपल्या एकेका पिढीने अवघ्या 4-5 गायक किंवा गायिकांची गाणी ऐकत हयात घालवलेली आहे. जुन्या पिढीसाठी ही यादी रफी, किशोर, मुकेश, लता, आशा या गायकांवर थांबते. नवीन काही येणार कसं?
गीतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाश्चात्य गाण्यांचे गीतकार असंख्य विषयांना स्पर्श करून जातात. राजकीय व्यवस्था, युद्ध, जागतिक शांतता, मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता, समलैंगिकता, सेक्स, विश्वबंधुत्व, गुन्हेगारी, वर्णभेद, फेमिनिझम, शिक्षणव्यवस्था, कालानुरूप बदलते राहणीमान, बदलते नातेसंबंध यासारखे असंख्य धाडसी मुद्दे गीतांमधून मांडतात. Blowing in the wind, black or white, they don't really care about us, another brick in the wall, candle in the wind, Bohemian rhapsody या गाण्यांचे शब्द ऐकले तर आपल्याला आपल्या भारतीय गाण्यांच्या विषयाबद्दल दया येते. लोकांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी संबंधित एकही गाणे आपल्या देशात कुणी लिहीत नाही आणि म्हणतही नाही!
आमच्या देशातले सिनेमे प्रेम आणि देशभक्ती सोडून दुसऱ्या कुठल्याच विषयाला हात लावत नाहीत. आमचं प्रेम पण एकदम खानदानी आणि संस्कारी, त्यामुळे नटीला पटवणे, तिच्या सौंदर्याची तारीफ करणे किंवा ती सोडून गेल्यावर रडत बसणे हे तीन मूड सोडून चौथे काही गाणेच मिळतच नाही, कारण असे गाणे बनवायला कुठला सिनेमाचं इतर विषयांवर बनत नाही. आमच्या देशात रूढीपरंपराच्या विरुद्ध विद्रोह करणे हे गेले 70 वर्षे कुणाच्या रक्तातच नाही, त्यामुळे इथे कुणी कशाला त्यावर सिनेमा बनवेल, आणि त्यावर गाणे लिहील? आमच्या देशातला दळभद्री सिनेमा, त्यात दाखवले जाणारे भिकार रडके प्रेम आणि त्यास कसलीही कुरकुर न करता पाहणारे लोक हे सार्वकालिक सत्य आहे. जिथे सिनेमा आणि त्यातील संगीत हे लोकांना वास्तवापासून दूर कल्पनेच्या जगात नेण्यासाठी असतं, तिथे लोकांना मुस्कटात मारून वास्तवात आणत वेगळी दृष्टी देणारा जॉन लेनन किंवा बॉब डिलन का जन्माला यावा?
डॉ. विनय काटे यांचे अन्य काही ब्लॉग
BLOG | दिल्लीचा Serological Survey काय सांगतो?
भारतीय जनतेचं संज्ञान असंतुलन - 'मोदी व गांधी'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्राईम
Advertisement