BLOG: साधेपणाचा ‘राज’महल…!!!
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतल्या एका घराची जोरदार चर्चा सुरू आहे. किक्रेटर, कलाकार, कार्यकर्ते आणि राजकारण्यांना सुद्धा ‘या’ घराचा मोह कधी आवरता आला नाही. कधी कुणी जेवायला, तर कधी कुणी चहा प्यायला, असं काही ना काही निमित्तानं ‘या’ घरात कुणी ना कुणी येत जात आहे. हे सगळं पाहता मलाही ‘या’ घरात जावं वाटलं आणि सुदैवानं माझी ही इच्छा लगेचंच पूर्णही झाली.
खरंतर ‘या’ घरात जायचं म्हणजे सहाजिक दडपण मनावर आलं. पण मोठ्या हिंमतीनं, किंबहुना धाडसानंच म्हणूया, या घरात शिरलो. हिंमत किंवा धाडस असे शब्द वापरण्याचं कारण म्हणजे या घराचे मालक. ते खास ठेवणीतल्या आणि वारसाहक्कानं आलेल्या शैलीतल्या शब्दांनी काय प्रश्न विचारतील, याचा काही नेम नव्हता. त्यात त्यांचा भारदस्त आवाज, धडकी भरवणारा दरारा, कला-क्रीडा-साहित्य अशा नाना क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासाचा आवाक, हे सर्व पाहता त्यांच्या घरी जाणं म्हणजे ‘धाडस’च म्हणायला हवं. असं धाडस केलं खरं, पण आपण त्यांच्या शब्दांची शिकार बनू नये म्हणून हलक्या पावलानंच घरात शिरलो.
‘ही’ व्यक्ती म्हणजे प्रबोधनकारांचा नातू, बाळासाहेबांचा पुतण्या आणि ठाकरे शैलीचा वारसदार – ‘राज ठाकरे’. आणि ‘ते’ घर म्हणजे सत्ता असो वा नसो, तरीही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं केंद्र असलेलं – ‘शिवतीर्थ’.
राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर जे पाहिलं, ते भावणारं वातावरण होतं. अर्थात, ते विस्मयचकित करणारं नव्हतं. कारण राज ठाकरेंच्या आपुलकीच्या स्वभावाबद्दल याआधाही अनेकांकडून अनेक किस्से ऐकले होतेच. पण तरी महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांच्या मनावर गारूड असलेल्या या नेत्याला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून पाहणं हे नक्कीच वेगळं होतं. ते मला जवळून पाहता आलं.
‘शिवतीर्थ’चा कोपरा न् कोपरा राज ठाकरेंच्या सृजनशील नजरेतना उतरल्याचं पाहताक्षणी जाणवलं, भिंतींच्या रंगापासून, किचन, अन् टेरेसपर्यंत राज ठाकरेंचा ‘क्रिएटिव्ह’ टच दिसत होता. आपल्या कुटुंबीयांना काय हवंय, काय नकोय, हे सारं ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून राज ठाकरेंनी हेरलंय आणि घरातल्यांच्या सर्व स्वप्नांना सत्यात उतरवलेलं पाहिलं.
आयुष्यात प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की, आपलं एक आलिशान घर असावं. तेच राज ठाकरेंचं होतं. म्हणूनच वयाच्या 53 वर्षी राज ठाकरेंनी आपल्या स्वप्नातलं घर साकारलं. तेही जगभरात कीर्ती गाजवणाऱ्या खेळाडूंच्या पायाला ज्या मैदानाची लाल माती लागलीय, त्या शिवाजी पार्कात – अर्थात राज ठाकरेंच्या भाषेतच सांगायचं तर ‘शिवतीर्था’वर.
शिवाजी पार्कचा परिसर म्हणजे मराठमोळा. मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी लढणारा नेता आपल्याच माणसांमध्ये राहतो, यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट ती काय!
‘कृष्णकुंज’ म्हटल्यावर ‘राज ठाकरेंचं निवासस्थान’ असं समीकरण महाराष्ट्रासह देशातल्या जनतेला एव्हाना कळलं होतं. तिथं राज ठाकरे एका फ्लॅटमध्ये राहत असतं. राज ठाकरेंनी मनात आणलं असतं तर शिवतीर्थांच्या ठिकाणी 17 मजली इमारत बांधू शकले असते. किती, 17 मजली!! या इमरतीतले शेवटच्या मजल्यावरचे काही फ्लॅट्स स्वत:ला ठेऊन करोडो रुपये कमवू शकले असते. पण जागतेपणी पाहिलेल्या स्वप्नांच्या पलिकडे तरी काय? स्वप्ननगरीच्या पुढे राज ठाकरे कितीतरी पटीनं एफएसआय सोडून दिला आणि स्वप्नातल्या घराला पसंती देत शिवतीर्थाचा श्रीगणेशा केला. आयुष्यात एवढा एफएसआय सोडणं म्हणजे काय असतं? हे एका बिल्डरला जाऊन विचारा. पण राज ठाकरेंनी एफएसआयवर पाणी सोडलं आणि शिवतीर्थ उभं राहिलं.
शिवतीर्थावर पाय ठेवताच घर पाहण्यासाठी नजर भिरभरत होती. घरात शिरल्यानंतर गणेशाची सुंदर मूर्ती तुमचं मन प्रसन्न करून टाकते. राज ठाकरेचं घर आणि त्यांच्या घरातल्या वस्तू म्हणजे तुमच्या डोळ्यांसमोर ‘इम्पोर्टेड’ असं काहीतरी आलं असेल. पण हाच गैरसमज शिवतीर्थात गेल्यावर दूर होतो.
‘कृष्णकुंज’वरीलच सर्व साहित्य राज ठाकरेंनी शिवतीर्थावर आणलंय. कृष्णकुंजवरून निघताना जुन्या भेटवस्तू बाहेर काढल्या, त्यात 30 ते 40 गणपतीच्या मूर्ती होत्या. त्यापैकीच एक श्रीगणेशाची मूर्ती प्रवेश केल्यानंतर तुम्हाला आकर्षित करते. आधीच्याच जुन्या टेबल-खुर्च्यांना नवा साज चढवून त्यांनी नव्याने वापरात आणल्यात.
घर बाहेरून दिसायला जरी ‘लक्झरियस’ वाटत असलं, तरी हे घर आतून मात्र अस्सल महाराष्ट्रीय संस्कृतीच्या खुणा जोपासणारं आहे. आजकालच्या अलिशान फ्लॅट, बंगल्याच्या जमान्यात तुळशी वृंदावन गायब झालेली दिसतात. पण या घरात खास तुळशी वृंदावन बांधण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर घरातल्या महिला संध्याकाळी वृंदावनासमोर दिवा-बत्तीही करतात. तुम्हाला ऐकायल थोडं आश्चर्य वाटत असेल, पण हे सगळं आजही या शिवतीर्थात घडतंय. म्हणूनच या घरात महाराष्ट्राची संस्कृती नांदत असल्याचा भास होतो.
राज ठाकरेंचं घर म्हणजे महागडे मार्बल्स, एकदम भारीतली रंगरंगोटी, लाखो रुपयांचे झुंबर असं काहीसं चित्र डोळ्यांसमोर उभं राहू शकतं. पण प्रत्यक्षात तसं नाहीय. घरात जितका साधेपणा ठेवता येईल, तितका साधेपणा राज ठाकरेंनी शिवतीर्थवर ठेवलाय. कुठलंही इटालियन मार्बल वापरलं नाहीय, साध्या आपल्या काळ्या सफेद टाईल्सचा घराच्या भितींच्या रंगाप्रमाणे वापर केला गेलाय, बाहेरून वूडन लूक दिसतो, तिकडे पावसाचा धोका लक्षात घेता स्टिलचा वापर करून वूडन कलर देण्यात आलंय.
राज ठाकरे हे श्वानप्रेमी आहेत, हे आपल्याला ठाऊक आहेच. तर या श्वानांची आवड लक्षात घेता, घरांच्या खिडक्यांना पडद्यांचा वापर टाळण्यात आलाय. याचा अर्थ राज ठाकरे लॅव्हिश असं काही करू शकत नव्हते, असा नाही. जर त्यांना वाटलं असतं तर त्यांनी इटालियन मार्बल्स, ब्रॅण्डेड वस्तू, स्वीमिंग पूल, होम थिएटर, एकदम चकचकणारं अगदी अंबानींसारखं घर बांधू शकले. असते पण राज ठाकरेंमध्ये आजही साधेपणा दडलेला दिसतो. बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेल्या संस्कृतीचे दर्शन होते.
आपलं मराठीपण जोडलं जावं, कुटुंब एक राहावं, यासाठी जरी प्रत्येकाला वेगवेगळ्या खोल्या असल्या तरी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पाच मजली इमारतीत एकच डायनिंग टेबल ठेवण्यात आलाय. याच टेबलावर रोज रात्री सर्व एकत्र जेवायला बसतात, गप्पा मारतात आणि आपआपल्या खोलीत निघून जातात.
एक डायनिंगचा राज ठाकरेंचा हा विचार राजकारणापलिकडचा कुटुंबीयांची काळजी करणारा चेहरा, पडद्यामागे लपलेला एक बाप आणि एक पती यांचं दर्शन घडवतो. या माणसाच्या आयुष्यात जे काही व्हायलं नको होतं ते ते घडलं.
संघर्षाशी यांची जणू स्पर्धा सुरुच होती. एकामागोमाग एक संघर्ष सुरुच राहिला. मनसेचा पराभव, जवळचे नेते मंडळी पक्ष सोडून जाणं, अमित ठाकरेंचं आजारपण, उर्वशीचा गाडीवरून झालेले अपघात, शर्मिला ठाकरेंच्या चेहऱ्यावर कुत्रा चावणं, मनसेचे नगरसेवक शिवसेनेत जाणं... सगळं सगळं घडत राहिलं. पण कुठेही न डगमगता हा माणूस हिमालयासाराखा उभा राहिला.
या कसोटीच्या काळात राज ठाकरे प्रत्येक संकटाशी संघर्ष करत राहिले आणि अजूनही संघर्ष करतायेत. कुटुंबीयांसाठी एक ढाल बनून, अन् कार्यकर्त्यांसाठी आधार बनून ते कणखर बाण्याने उभे आहेत. कधी ना कधी या संघर्षाचं चीज होईल, तोवर राज ठाकरेंमधला लढवय्या बाणा संपणार नाही, याची जाणीव त्यांच्यातल्या लढाऊ वृत्तीकडे होते.
नव्या घरातून नव्या राजकारणाला सुरुवात झालीय. नव्या घरातली सकारात्मकता ही राज ठाकरेंच्या आयुष्यातल्या संघर्षाला संपवून नव्या पर्वाला सुरुवात करेल, असा आशावाद व्यक्त करणारा हा ‘शिवतीर्थ’.
अर्थात, साधेपणाचा ‘राज’महल आहे.
- वैभव परब, एबीपी माझा