एक्स्प्लोर
नवीनबाबू... राजकारणातल्या टायमिंगचा 'नायक'
नवीन पटनायक हे राजकारणात अचूक 'टायमिंग' साधणारे नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या 'टायमिंग'ने भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षालाही त्यांनी वठणीवर आणले. महाराष्ट्रात भाजपच्या मागे शिवसेना फरफटत जात असताना, नवीन पटनायक यांच्या 'टायमिंग'पासून त्यांना काही धडा घेता येईल का, असा अपरिहार्यपणे आपल्यासमोर उभा राहतो.
नवीन पटनायक हे राजकारणात 'अचूक टायमिंग' साधणारे नेते म्हणून ओळखले जातात. पटनायक यांच्या रणनीतींनी भल्या-भल्यांना घाम फुटतो. आपल्या 'टायमिंग'ने भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षालाही त्यांनी वठणीवर आणले. महाराष्ट्रात भाजपच्या मागे शिवसेना फरफटत जात असताना, नवीन पटनायक यांच्या 'टायमिंग'पासून त्यांना काही धडा घेता येईल का, असा प्रश्न अपरिहार्यपणे आपल्यासमोर उभा राहतो. पटनायक यांच्या 'अचूक टायमिंग'चा आढावा घेणारा हा लेख...
राजकारणात ‘टायमिंग’ला अत्यंत महत्त्वं आहे. ‘टायमिंग’ चांगलं असेल, तर तुमचा कुणीही पराभव करु शकत नाही, असे म्हटले जाते. आणि ते शंभर टक्के खरंय.
कुठल्या वेळेला काय निर्णय घ्यायचा, यात नवीन पटनायक यांचा तर हात कुणीच धरु शकणार नाही. पटनायक जेव्हापासून राजकारणात आलेत, तेव्हापासून सत्ता त्यांच्यासोबत आहे. दोन वर्षे ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते, आता गेल्या 18 वर्षांपासून ते ओदिशाचे मुख्यमंत्री आहेत... हे सारं केवळ राजकारणातील आपल्या अचूक ‘टायमिंग’मुळेच. भले त्यांना ओडिशी भाषा येत नसेल, मात्र तरी ओदिशातील नागरिकांच्या गळ्यातील ते ताईत आहेत.
दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही नवीन पटनायक यांच्या ‘टायमिंग’चे चाहते आहेत. विशेषत: पटनायक ज्याप्रमाणे आपल्या विरोधकांना गप्प करतात, त्याचं मोदींना फार कौतुक वाटतं. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी पटनायक यांच्या ‘टायमिंग’चं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अयशस्वीच ठरले.
नवीन पटनायक यांच्या ‘टायमिंग’चा फटका आता केंद्रपाड्यातून खासदार असलेल्या वैजयंत उर्फ जय पांडा यांना बसला आहे. दोनच दिवसांपूर्वी जय पांडा यांनी खासदारकीच्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या 10-12 वर्षांपासून जय पांडा हे पटनायक यांचे निकटवर्तीय राहिले आहेत. राज्यसभेतही ते बिजू जनता दलाचे खासदार होते. पांडा यांची पत्नी जागी मंगत या ओदिशातील ओटीव्ही या सर्वात लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या सर्वेसर्वा आहेत.
जय पांडा हे पटनायक यांच्या इतके जवळचे होते की, त्यांच्या घरी अनेकदा पटनायक डिनरसाठी येत-जात असत. एकंदरीत सर्वकाही सुरळीत सुरु होतं. मात्र गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पटनायक आणि पांडा यांच्यात काहीतरी फिस्कटलं. लोकसभा निवडणुकीआधी पांडा हे भाजपमध्ये जातील, अशा चर्चाही सुरु झाल्या होत्या. या चर्चा एकीकडे सुरु होत्या, त्याचवेली नवीन पटनायक यांनी पांडांना आपल्या पक्षातून निलंबित केले.
आता पांडा यांनी काय करावं? त्यांनी तर विचारही केला नव्हता की, पटनायक आपल्यावर इतक्या लवकर आणि टोकाची कारवाई करतील. त्यात झालंय असं की, पांडा यांना आपल्या पक्षात घेण्यात भाजपलाही फार रस दिसत नाही. त्यामुळे अपरिहार्यपणे जय पांडा यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.
ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या निधनानंतर त्यांच्याच नावाने नवीन पटनायक यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. नाव ठेवलं – बिजू जनता दल. 26 डिसेंबर 1997 ची ही गोष्ट... जनता दलापासून वेगळं होऊन बिजू जनता दलाने एनडीए सरकारसोबत घरोबा केला आणि पटनायक केंद्रात मंत्री झाले.
2000 साली ओदिशात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी बिजू जनता दलात (बीजेडी) विजय महापात्र हे सर्वात शक्तिशाली नेते होते. उमेदवारीच्या तिकिटंसुद्धा तेच वाटप करत होते. त्यावेळी नवीन पटनायक यांना सर्वच काहीसे अडाणी समजत होते. तेव्हा ते बीजेडीचे कार्यवाहक अध्यक्ष होते. मात्र सर्व निर्णय महापात्रच घेत होते.
महापात्र हे त्यावेळी केंद्रपाड्यातून निवडणूक लढवत असत. मात्र नवीन पटनायक यांनी आपल्या निकवर्तीय असलेल्या एका पत्रकाराला त्या जागेवरुन तिकीट दिले. निवडणूक जिंकले आणि नंतर पटनायक मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. आणि महापात्र त्यानंतर कधीच निवडणूक जिंकले नाहीत. एका फटक्यात पटनायक यांनी महापात्र यांची राजकीय कारकीर्दच संपवून टाकली. तेव्हा पहिल्यांदाच जनतेला नवीन पटनायक यांच्या ‘टायमिंग’चे महत्त्व कळले.
बिजू पटनायक यांचे सहकारी राहिलेले अनेक नेते नवीन पटनायक त्यावेळी आपले बॉस मानायला तयार नव्हते. पटनायक यांना ते सर्व अडाणी समजायचे. अर्थमंत्री राम कृष्ण पटनायक आणि शहर विकास मंत्री नलिनी मोहंती हे त्यातीलच काही नेते. मंत्रिमंडळाच्या बैठकीतच हे मंत्री नवीन पटनायक यांना उलट-सुलट बोलत असत. एकंदरीत हे सारे मंत्री पटनायक यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत. काही दिवस गेले आणि एके दिवशी बातमी आली की, रामकृष्ण आणि नलिनी यांच्यासह 5 मंत्र्यांना बरखास्त करण्यात आले आहे. यावेळी नवीन पटनायक मुख्यमंत्री बनून केवळ सहा महिनेच झाले होते. पाचही मंत्र्यांची राजकीय कारकीर्द पटनायक यांनी पार कोलमडवूनच टाकली. त्यानंतर बिजू जनता दलाचे सर्वच नेते पटनायक यांना एकप्रकारे शरणच गेले.
बीजेडी आणि भाजप यांच्यातील नात्यातही काहीसा तणाव होता. जागा वाटपावरुन दोन्ही पक्षात पेच निर्माण झाला होता. ही गोष्ट आहे 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळीची. नवीन पटनायक यांच्याशी चर्चेसाठी भाजप नेते चंदन मित्र पटनायक यांच्या घरी बसले होते. नवीन पटनायक हे दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडले आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपसोबतची युती तुटल्याची घोषणाच करुन टाकली.
पडद्यामागील बातमी अशी की, पटनायक यांना भाजप ओझं झालं होतं. भाजपपासून त्यांना मुक्ती हवी होती.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा ओदिशात एकही खासदार निवडून आला नाही आणि पटनायक यांचा निर्णय योग्य होता, यावर शिक्कामोर्तब झालं. त्यावेळी बिजू जनता दलाला 14 जागा मिळाल्या. एकंदरीत नवीन पटनायक यांच्या ‘टायमिंग’ने भाजपलाही चारी मुंड्या चित केले.
प्यारीमोहन महापात्र हे नवीन पटनायक यांचे राजकीय सल्लागार होते. ते आयएएस होते. ते बिजू पटनायक मुख्यमंत्री असताना प्रमुख सचिवही होते. नवीन पटनायक हे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्यारीमोहन पुन्हा शक्तिशाली झाले. म्हणजे मोदी सरकारमध्ये अमित शाह यांचा रुबाब ज्याप्रमाणे आहे, तसा प्यारीमोहन महापात्र यांचा होता.
प्रशासनातील अधिकारी ते मंत्र्यांपर्यंत सर्वकाही प्यारीमोहन यांच्या आदेशावर चालत होतं. 2004 मध्ये राज्यसभेचे खासदारही बनले. ओदिशात तर प्यारीमोहन यांना ‘सुपर सीएम’ म्हटले जाई. त्यांच्याशिवाय पक्षाचं आणि सरकारचं पानही हलत नव्हतं, असेही म्हटले जाई.
एकदा नवीन पटनायक पहिल्या परदेश दौऱ्यानिमित्त लंडनमध्ये होते, त्यावेळी प्यारीमोहन यांनी थेट पटनायक यांनाच सत्तेवरुन हटवण्याचा प्रयत्न केला. पटनायक यांना त्यावेळी लंडनचा दौऱ्या सोडून ओदिशात यावं लागलं. तेव्हाही मोठ्या चातुर्याने पटनायक यांनी प्यारीमोहन आणि त्यांच्या समर्थकांना वठणीवर आणलं. तसेच, प्यारीमोहन यांना त्यांनी बीजेडीतून बाहेरही काढलं.
नवीन पटनायक यांच्याबाबत ओदिशात म्हटले जाते की, “ज्यांना पटनायक समजले, त्यांना ब्रम्ह समजला”
पटनायक यांना जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत ते ओदिशावर राज्य करु शकतात, असेही अनेकजण म्हणततात. एकंदरीत, आपल्या अचूक ‘टायमिंग’ने नवीन पटनायक हे अजिंक्य बनले आहेत.
अनुवाद : नामदेव अंजना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement