एक्स्प्लोर

Nitin Desai : मिडास टच हरपला....

BLOG : माझा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने बुधवारची सकाळ तशी निवांतच होती. चहाचे घोट घेत, मी आणि बाबा पेपर चाळत बसलो होतो. 10 वाजताच्या सुमारास मोबाईल व्हायब्रेट झाला, असेल एखादा मेसेज असं म्हणून दुर्लक्ष केलं. पण मेसेजवर मेसेज येऊन पडत होते, म्हणून व्हॉट्सअप उघडून पाहिलं आणि मोठा धक्का बसला. बातमी होती नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची. पेपर तसाच गुंडाळून ठेवला आणि टीव्ही ऑन केला. चॅनलवर बातमी सुरु होती, आणि माझ्या मनात जुन्या दिवसांची धावाधावी सुरु झाली.

सहावीत होते तेव्हा नितीन चंद्रकात देसाई या नावाशी गट्टी जमली. निमित्त होतं राजा शिवछत्रपती मालिकेचं. स्टार प्रवाह वाहिनीही त्यावेळी नुकतीच सुरु झाली होती आणि तेव्हाच एक बिग बजेट, ऐतिहासिक मालिकेची घोषणा त्यांनी केली, ती मालिका म्हणजे राजा शिवछत्रपती. जय भवानी जय शिवाजी च्या गजरात 'नितीन चंद्रकांत देसाई' कृत राजा शिवछत्रपती असं टीव्हीवर दिसायचं आणि त्याच्यानंतर पुढचा अर्धा तास मन पूर्णतः शिवकालात रंगून जायचं. 

ही किमया जेवढी संवादांची, ही ताकद जेवढी अभिनयाची तेवढीच ही जादू होती समग्र शिवकाल आपल्या कला दिग्दर्शनातून साकारणाऱ्या नितीन चंद्रकांत देसाई नावाच्या कलंदर कलाकारची. 

त्यांच्या कलादिग्दर्शनाचा स्पर्श लाभलेल्या सिनेमांच्या नावांची यादी इथे देण्यात काही अर्थच नाही कारण ती जगविख्यात आहे. आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी यांसारख्या लार्जर दॅन लाईफ सिनेमाचं स्वप्न पाहाणाऱ्या दिग्दर्शकांच्या स्वप्नांना नितीन चंद्रकांत देसाई यांनी प्रत्यक्षात उतरवलं. जेवढं मोठं स्वप्न या दिग्दर्शकांनी पाहिलं त्याहून काकणभर भव्य असं काही या कलादिग्दर्शकाने उभारलं...स्वप्न सत्यात उतरू शकतात, आणि सत्यात उतरल्यानंतरही ती स्वप्नवत वाटू शकतात हे एनडींनी दाखवून दिलं.

एनडींना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी त्यांच्या कलेच्या माध्यमातून अनेकदा भेटले होते त्यांना. 

टेंभी नाक्यावरचा नवरात्रोत्सव म्हणजे ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय, गणेशोत्सव संपला की नवरात्रोत्सवाचा देखावा तयार करण्याचं काम सुरु होतं आणि यावेळी काय देखावा असेल याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असायची. एक वर्ष तिथे भव्यदिव्य असं गोपूर उभारण्यात आलं होतं. जे साकारलं होतं एन.डी. सरांनी. ते गोपुर पहाण्यासाठी माझी मान मला 180 च्या कोनात वर करावी लागली होती. ते बघताना भान हरपून गेलं होतं. मग काय पुढचे नऊ दिवस गर्दीची पर्वा न करता येण्याजाण्याचा रस्ता म्हणजे टेंभी नाका हे मी ठरवून टाकलं होतं. 

जेव्हा जेव्हा एनडींचं काम समोर पाहिलं, तेव्हा तेव्हा हरखून जाणं या वाक्प्रचाराचा अनुभव मी घेतलाय. त्यांचं कामाप्रती असलेलं हे वेड आणि त्यांच्या कामाने मला लावलेलं वेड एकदिवस मला त्यांच्या एन.डी. स्टुडिओ पर्यंत घेऊन गेलं. 

डोळे दिपवून टाकणारं वैभव, हेवा वाटावा अशा वास्तू, जिथे आवश्यक तिथे तेवढा साधेपणा आणि जिथे गरजेची तिथे वैभवाची मुक्त उधळण... कलाकारांची धावपळ, कामगारांची पळापळ, वर्तमानाशी हस्तांदोलन करत इतिहास समोर अवतरला असावा असा भास मला ठाई ठाई होत होता.

अशात माझी नजर गेली एका पाठमोऱ्या आकृतीकडे... एन. डी. उभे होते. एकावेळी अनेक प्रश्नांना उत्तरं देत, अनेकांना नाना सूचना करण्याचं काम ते करत होते. मी त्यांना हाक मारली आणि त्यांनी हसतमुख चेहऱ्याने वळून पाहिलं. कामाचा कोणताही ताण, थकवा त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. डोळ्यांत स्वप्नांची चमक होती, अंगात कर्तृत्वाची धमक होती.  कामात व्यग्र असतानाही पुढचा अर्धा तास ते माझ्याशी बोलत होते. तिथून निघताना त्यांनी फार मोलाचा सल्ला दिला... की प्रज्ञा...स्वप्नं कायम मोठी पाहायची, त्यासाठी झिजायचं!

त्यानंतर बीएमएमच्या तिसऱ्या वर्षात आमची इंटर्नल व्हिजिट ही एन.डी स्टुडिओ मध्ये गेली होती. तेव्हा मात्र तिथलं चैतन्य काहीसं ओसरल्याचं जाणवत होतं. मोजक्या काही मालिकांचं शूट तिथे सुरु होतं. माणसांचा उणावलेला वावर जाणवत होता. स्टुडिओतलं नैराश्य खुणावत होतं.

कोविडकाळात या स्टुडिओच्या दिमाखाला उतरती कळा लागली होती. दरम्यानच्या काळात स्टुडिओमध्ये आग लागल्याच्या बातम्या आल्या. त्याबद्दल अनेक वदंता ही कानावर आल्या. त्या खऱ्या असतील तर आपल्याच स्वप्नाला अशी चूड लावण्याची वेळ कोणत्याही कलाकारावर येऊ नये. मागच्या वर्षी माझ्याच एका कामासाठी स्टुडिओमध्ये जाणं झालं होतं. त्यावेळी पाहिलेला स्टुडिओ आणि पहिल्यांदा पाहिलेला स्टुडिओ यात जमीन आस्मानाचा फरक होता. जुन्या मालिकांच्या सेटचे भग्नावशेष, रंग उडालेल्या भिंती, जमलेली कोळीष्टकं, मोडकळीला आलेले खांब, बेसुमार वाढलेलं गवत, प्रॉपर्टीवर चढलेले धुळीचे थर, कोणेएकेकाळी वैभवसंपन्नता अनुभवलेला भग्न किल्ला इतिहाच्या अडकित्त्यात आठवणींची सुपारी कातरत बसावा अगदी तसा दिसत होता तो स्टुडिओ. सर नव्हतेच तिथे, आत्म्याविना अचेतन शरीराप्रमाणे स्टुडिओ भासत होता. अवघ्या एका मालिकेचं तिथे शूट सुरु होतं. सेटची ती अवस्था बघून डोळ्यात पाणी उभं राहिलं, मी माझं काम आवरलं आणि मागे वळून न बघता निघाले.

त्यानंतर सर माझा कट्ट्याच्या निमित्ताने ऑफिसमध्ये आले होते. त्यावेळी त्यांचं रुप हे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्यासारखं दिसत होतं. कलामहर्षींचं स्वप्न आणि परंपरा पुढे नेण्यासाठी हेच समर्थ खांदे आहेत हे त्यांनी अगदी वेळेवेळी सिद्धही केलं होतं. कट्ट्यावर बोलताना त्यांनी अनेकदा नव्याने सुरुवात करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, त्यासाठी स्वयंप्रेरणाही त्यांच्याकडे आहे हे जाणवत होतं. जिद्द दिसत होती...मिटलेल्या पंखात भरारीची ओढ होती... पण अवघ्या वर्षभरात ती इच्छा, प्रेरणा, जिद्द, सारं काही फिकं पडलं आणि गळफासाची गाठ घट्ट झाली. डोळ्यातल्या स्वप्नांना, मनगटातल्या कतृत्वाच्या आणि बोटांमधल्या कलेच्या जोरावर मूर्त रुप देणारा , इतिहास पुनरुज्जीवित करणारा, बॉलिवूडच्या स्वप्नांना आपल्या नजरेतली श्रीमंती बहाल करणारा, प्रेक्षकांचं भान हरपून जावं यासाठी भान हरपून काम करणारा, आपल्या मिडास टचने सिनेमाचं सोनं करणारा, सिनेसृष्टीच्या चंदेरी पडद्याला आपल्या कलादिग्दर्शनाची सोनेरी किनार बहाल करणारा, विश्वकर्म्याचा वरदहस्त डोक्यावर असलेला मनस्वी कलाकार काळाच्या उदरात लुप्त झाला. 

त्यांनी निवडलेला मार्ग आणि त्यांची ही अकाली एक्झिट कलारसिकांसह सिनेसृष्टीवर एक खूप मोठा आणि खोल ओरखडा ओढणारी आहे.

त्यांच्यावर किती कर्ज होतं? त्यांना कोणी फसवलं? एवढं कर्ज का झालं? बॉलिवूडमध्ये त्यांना कोणी त्रास देत होतं का? त्यांना कोणीच का मदत केली नाही? या सगळ्या तपशीलात मला जायचं नाही, कारण आता त्याबद्दल चर्चा होतच राहतील. पण सध्याच्या काळात प्रत्येकाने काळाची पावलं ओळखत आपली जीवनशैली आणि उपजीविकेचं माध्यम हे सतत अपडेट करत रहाणं, किंवा अर्थार्जनाच्या एकाच स्रोतावर अवलंबून न रहाणं हे अत्यंत गरजेचं आहे. ग्राफिक्स आणि व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा समर्पक वापर तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य करुन देतो हे बाहुबली सिनेमाने आपल्याला दाखवून दिलं. अशावेळी पारंपरिक सेट्च्या मागे न जाता गेल्या दशकभरात निर्माते आणि दिग्दर्शकांनी या तंत्राला आपली पसंती दिली. आणि आता जे ए.आय. नावाचं अस्र हाती आलंय ते नजीकच्या काळात जगाला कुठे घेऊन जाईल? आणि त्या रेट्यात आपला कुठे टिकाव लागेल? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” हे पु.लं.चं वाक्य मला कायम कलेचं महत्त्व अधोरेखित करणारं वाटायचं, पण पोटापाण्याचा व्यवसायही तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण तोच जगवतो हे काल पहिल्यांदा प्रकर्षाने जाणवलं. त्यामुळे जे आपल्या कलेलाच उपजीविकेचं साधन बनवू इच्छितात त्यांच्यासाठी कालची घटना ही डोळे उघडणारी आहे. कलेला उपजीविकेचं साधन बनवायचं असेलच तर त्या सोबतीने एखादा पूरक जोडधंदा करणं गरजेचं आहे कारण तोच तुम्हाला पडत्या काळात तारु शकतो. तसं झालं तर यशोशिखरावर असलेल्या कलाकाराचा पैशाअभावी करुण अंत होण्याची शक्यता टळू शकते.

आपल्या हाताने उभारलेला स्टुडिओ आपल्या हातातून जाण्यापूर्वी आपणच डोळे मिटावे या विचाराने कदाचित सरांनी आत्महत्या केली असावी. तो स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या हाती जाऊ न देता, तिथे कलाकारांसाठी भव्य कलामंच उभारा अशी शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. यात अनेक कायदेशीर बाबींचा अडथळा येऊ शकतो, पण महाराष्ट्राच्या मातीतल्या एका मराठी माणसाने पाहिलेलं, साकारलेलं एक स्वप्न लिलावाच्या भक्ष्यस्थानी पडू नये एवढी विनंती शासनाला आहे.

एन.डी. गेले...स्टुडिओ पोरका झाला... व्हिजनरी कला दिग्दर्शक गेला. डोळे दिपवणारा किमयागार गेला. सिनेसृष्टीचा मिडास टच हरपला.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Embed widget