(Source: Poll of Polls)
BLOG : गंदी है पर 'मंदी' है...
BLOG : दीर्घकाळापासून आर्थिक मंदीची चर्चा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या अनेक बड्या खासगी संस्थांनी अमेरिकेसह अनेक देश चालू आर्थिक वर्षात मंदीच्या गर्तेत असल्याचे जाहीर केले आहे. आता जागतिक बँकेनेही म्हटले आहे की 2023 मध्ये संपूर्ण जगात आर्थिक मंदी येऊ शकते. मंदीच्या या गोंगाटात हे जाणून घेणं गरजेचं आहे की मंदी आहे तरी काय? जागतिक आर्थिक मंदी आत्तापर्यंत कधी कधी आली आणि त्याचा काय परिणाम झाला?
सोप्या शब्दात, मंदी म्हणजे दीर्घकाळापर्यंत कोणत्याही गोष्टीचा वेग कमी करणे. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात असे म्हटले तर त्याला आर्थिक मंदी म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं तर जेव्हा अर्थव्यवस्थेतील GDP वाढ सलग दोन तिमाहीत घसरते तेव्हा त्याला आर्थिक मंदी म्हणतात. आर्थिक मंदीच्या परिस्थितीत अर्थव्यवस्था वाढण्याऐवजी घसरते. हे चक्र अनेक तिमाही चालू राहते. या स्थितीत महागाई आणि बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली आहे. लोकांचे उत्पन्न घटतं, शेअर बाजार घसरतो, मागणी खूपच कमकुवत होते असे अनेक परिणाम आजवर मंदीचे दिसले आहेत.
जागतिक मंदी कधी आली?
गेल्या 100 वर्षांचा विचार केला तर जगाने या काळात 5 वेळा या गंभीर आर्थिक संकटाचा सामना केला आहे. प्रत्येक वेळी आर्थिक मंदीची कारणे तीच होती असे नाही. कारणे वेगळी होती आणि परिणामही वेगळे दिसले होते. त्यामुळे जगावर आर्थिक मंदी कधी आणि कशी आली आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात कसा गोंधळ निर्माण झाला हे जाणून घेऊया.
1929-39 ची महामंदी
1929 मध्ये सुरू झालेल्या आणि 1939 पर्यंत टिकलेल्या मंदीला महामंदी म्हटलं जातं. 1929 च्या महामंदीची सुरुवात अमेरिकन शेअर बाजारात मोठ्या घसरणीने झाली. बघता बघता जवळपास अख्ख्या जगाला आपल्या तावडीत या महामंदीने घेतले. विशेष म्हणजे या मंदीचा रशियावर म्हणजे तेव्हाच्या तत्कालीन सोव्हिएत संघावर अजिबात परिणाम झाला नाही. या मंदीने संपूर्ण जगाला सावरायला बरीच वर्षे लागली.
या मंदीचे मोठे आर्थिक आणि राजकीय परिणाम झाले. त्यामुळे साम्यवाद आणि फॅसिझमचा प्रसार वाढला. या मंदीने दुसऱ्या महायुद्धाचा पाया घातला. मंदीमुळे जागतिक जीडीपी सुमारे 15 टक्क्यांनी घसरला. अमेरिकेत बेरोजगारीचा दर 23 टक्के होता. कृषी उत्पादनात 60 टक्क्यांनी घट झाली. जगभरात सुमारे 1 कोटी 30 लाख लोक बेरोजगार झाले. या मंदीच्या काळात 5 हजारांहून अधिक बँका बुडाल्या.
1975 ची आर्थिक मंदी
1973 च्या अरब-इस्रायल युद्धात इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल शिक्षा म्हणून तेल उत्पादक देशांच्या संघटनेने (OPEC) अमेरिकेसह काही देशांना तेल पुरवठ्यावर बंदी घातली. त्यामुळे तेलाच्या किमती 300 टक्क्यांनी वाढल्या होत्या. भारतालाही याचा मोठा फटका बसला. 1972-73 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर -0.3 होता. अमेरिकेसह जगातील 7 मोठ्या औद्योगिक देशांमध्ये महागाई खूप वाढली.
अमेरिकेची परिस्थिती सर्वात वाईट होती. 16 महिन्यांच्या या मंदीत अमेरिकेचा जीडीपी 3.4 टक्क्यांनी घसरला, त्यानंतर बेरोजगारीचा दर 8.8 टक्क्यांवर पोहोचला. 23 लाखांच्यावर लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. इंग्लंडच्या जीडीपीमध्येही या काळात 3.9 टक्के घट झाली. महागाई 20 टक्के झाली. इतके मोठे ऊर्जा संकट उद्भवले की ब्रिटनमध्ये आठवड्यातून फक्त तीन दिवस वीजपुरवठा केला जातो. ब्रिटनला मंदीतून सावरण्यासाठी 14 तिमाही इतका कार्यकाळ लागला होता.
1982 ची मंदी
1979 मधील इराणी क्रांतीने 1982 च्या मंदीचा पाया घातला. इराणच्या क्रांतीमुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला. 1979-80 मध्ये भारताचा जीडीपी वाढ -5.2 टक्के होता. जगभर महागाई खूप वाढली आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेसह काही मोठ्या देशांनी त्यांचे आर्थिक धोरण कडक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मागणीत मोठी घट झाली.काही लॅटिन अमेरिकन देशांमध्ये कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले. 1982 मधील जागतिक मंदीतून विकसित देश खूप लवकर सावरले, परंतु लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांवर त्याचा प्रभाव दीर्घकाळ दिसून आला.
1991 ची जागतिक मंदी...भारताने सोने गहाण ठेवले
1990-91 मध्ये आखाती युद्धानंतर हे आर्थिक संकट आले. यासाठी केवळ युद्ध जबाबदार नव्हते. अमेरिकन बँकांची वाईट स्थिती आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांच्या ढासळत्या बँकिंग प्रणालीनेही जगाला आर्थिक संकटात टाकण्यात मोठा हातभार लावला. त्याचा भारतावर खूप वाईट परिणाम झाला. 1991 मध्ये भारताच्या आर्थिक संकटाचे सर्वात मोठे कारण पेमेंटचे संकट होते. देशाचा व्यापार समतोल बिघडला. सरकार प्रचंड वित्तीय तुटीवर चालत होते. भारतीच्या परकीय चलन साठ्यात केवळ तीन आठवड्यांची आयात शिल्लक होती. सरकार कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत होते. जागतिक बँक आणि आयएमएफनेही त्यांची मदत बंद केली. पेमेंटमध्ये चूक होऊ नये म्हणून सरकारला देशाचे सोने गहाण ठेवावे लागले.
2008-09 मंदी
'द ग्रेट डिप्रेशन' नंतर जगातील सर्वात वाईट आर्थिक संकट आले. हे आर्थिक संकट सबप्राईम क्रायसिस या नावाने ओळखलं जातं. त्याची सुरुवात अमेरिकेच्या प्रॉपर्टी मार्केटपासून झाली. जेव्हा अमेरिकन मालमत्ता बाजाराचा फुगा फुटला तेव्हा त्याने अमेरिकन बँकिंग व्यवस्था आणि शेअर बाजार हादरला. अमेरिकेत आलेले हे संकट लवकरच जगातील बहुतांश देशांमध्ये पोहोचले. एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेली लेहमन ब्रदर्स बँक ही मंदी सहन करू शकली नाही आणि दिवाळखोर झाली. या मंदीमुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले, मागणीअभावी उत्पादन घटले आणि करोडो लोक बेरोजगार झाले.
मंदीचा तुमच्यावर काय परिणाम होतो?
आर्थिक मंदी ही महामारी किंवा भयंकर आपत्तीपेक्षा कमी नाही. त्याचा प्रभाव अनेक वर्षे टिकतो. यामुळे केवळ जीडीपीचा आकारच कमी होत नाही, तर दैनंदिन खर्चही त्यामुळे वाढतो. महागाईमुळे प्रत्येक वस्तूची मागणी कमी होते. मागणीचा परिणाम उत्पादनावर होतो. कमी उत्पादनामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढतात. मंदीमुळे महागाई आणि बेरोजगारी वाढते. लोकांचे व्यवसाय ठप्प होऊन त्यांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.