BLOG : उत्साहाचा पाऊस, इच्छाशक्तीचं टॉनिक
BLOG : 24 फेब्रुवारीची दुपार. दुपारचे साधारण अडीच वाजले होते. सूर्य डोक्यावर पूर्ण क्षमतेने तळपत होता..त्याच वेळी हास्याचा शीतल शिडकावा चेहऱ्यावर झळकणारे आजी-आजोबा. सुरकुतलेल्या हातांनी आम्हाला बायबाय करणारे. त्या सुरकुतलेल्या हातांमध्ये दुणावलेला उत्साह वाहत होता जणू.
निमित्त होतं ते आमच्या गिरगावातील श्याम सदनच्या गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित एका कार्यक्रमाचं. नागपाड्याच्या जेजे धर्मशाळा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ मंडळींना आम्ही वैद्यकीय मदत वाटप करायचं ठरवलं. त्यादृष्टीने नियोजन झालं आणि कार्यक्रमाचा दिवस आला. आमची एक टीम एक बस घेऊन त्यांना आणायला गेली होती. वृद्धाश्रमाच्या टीमसोबत 23 आजी-आजोबा कार्यक्रमाला आले. गिरगावच्या शारदासदन शाळेत त्यांची एन्ट्री झाली, तेव्हा आम्ही त्यांचं स्वागत गुलाबाच्या पाकळ्या उधळून केलं. त्यांचं औक्षण केलं आणि सर्वांना अत्तरही लावलं. आमचे नंतरचे तीन तास मात्र त्यांच्या सहवासाने सुगंधित झाले. वैद्यकीय मदत वाटप, मनोगत आणि त्यांच्यासाठी सूरताल ग्रुपचा संगीतमय कार्यक्रम, कार्यक्रमाच्या सांगतेला स्नेहभोजन, असं आटोपशीर नियोजन केलं होतं. कराओकेचा संगीतमय कार्यक्रम सुरु झाला आणि आजी-आजोबा त्या संगीतविश्वात रममाण झाले. 'गजानना श्रीगणराया'ने कार्यक्रम सुरु झाला, गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला. आजी-आजोबा लहान मुलांच्या उत्साहाने मोरया म्हणत होते. पुढे 'बदन पे सितारे' गाणं सादर झाल्यावर एक आजोबा मला म्हणाले, तुला माहिती आहे का? गाणं कोणत्या सिनेमातलं....सिनेमाचं नाव प्रिन्स, पडद्यावर शम्मी कपूर-वैजयंतीमाला.
हे फक्त एका गाण्याला नव्हे तर, पुढच्या जवळपास सर्वच गाण्यांच्या बाबतीत घडत होतं. आजी-आजोबा कॅसेटवरचे डीटेल्स पाठ असल्यासारखे तपशील सांगत होते. आपली हायटेक मेमरी कार्डही कधी कधी दगा देतात. इथे आजी-आजोबा मात्र फाईव्ह जीच्या वेगाने त्या काळात जाऊन ते क्षण पुन्हा एकदा मनसोक्त जगत होते. त्यांच्या स्मरणशक्तीला दाद देत आम्ही कार्यक्रम पुढे नेत होतो. कोळीगीत झालं. आजी-आजोबांनी मनसोक्त ताल धरला. पुढे एका आजींनी फर्माईश केली, मला कव्वालीवर नाचायचंय. मग जोहरजबी... झालं, शिर्डीवाले साईबाबाही हे गीतंही झालं. अलबेलाच्या 'भोली सूरत...'ने गाण्याच्या कार्यक्रमाची सांगता केली. गायक मंडळी म्हणालीदेखील आजी-आजोबा तुम्हाला नमस्कार आहे, आम्ही एकवेळ गाणी गाऊन थकून जाऊ पण, तुम्ही नाचून अजिबात थकणार नाही. एका आजींनी गाणं म्हटलं, तर एका आजोबांनी बाप्पांचं एक गीत सादर केलं.
एखाद्या घरगुती कार्यक्रमात आपण जेव्हा एकत्र येतो, तेव्हा असं काही सादर करायला पुढे येण्यासाठी आपणही काहीसे कचरतो. पण, या कार्यक्रमात आलेले आजी-आजोबा तरुणांच्या उत्साहाने पुढे येत होते, नाचत होते, गात होते. एका आजींनी आपलं छोटंसं मनोगतही व्यक्त केलं. गणेशगल्ली गणेशोत्सव मंडळाचे स्वप्निल परब कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तेही आजी-आजोबांच्या उत्साहाने भारावून गेले. कार्यक्रमाची सांगता झाली. जेवणही झालं. आता वेळ झाली परत निघण्याची. आजी-आजोबांना वृद्धाश्रमात परत घेऊन जाणारी बस आली. एकेक करत ही सर्व मंडळी बसमध्ये जाऊन बसली. खिडकीतून आम्हाला बाय-बाय करत होती, आम्हाला म्हणत होती, आम्हाला पुन्हा नक्की या भेटायला. आम्हीही त्यांच्यात आमचे आजी-आजोबाच पाहत होतो. अनुभवसंपन्नतेला निरागसतेची झालर लागलेले चेहरे दिसत होते. शरीर म्हातारपणाच्या खुणा दाखवत होतं, काही थोडेसे हळू चालत होते, काहींना हाताला आधार द्यावा लागत होता. पण, सर्वांचीच मनं सळसळत्या उत्साहाने काठोकाठ भरली होती जणू.
या ज्येष्ठांबद्दल अधिक माहिती घेतली तेव्हा कळलेलं, काही जण वैयक्तिक आयुष्यात अविवाहितच राहिल्याने एकेकटेच आहेत तर काहींना त्यांच्या मुलांनी इथे आणून ठेवलंय. कारणं काहीही असोत, असं असलं तरी कुणाच्याही चेहऱ्यावर निराशा, वेदनेचा लवलेशही नव्हता. भरभरून जगण्याची ऊर्मी, ऊर्जाच ओसंडून वाहत होती. बाहेर टळटळीत ऊन आणि आत आजी-आजोबांच्या प्रचंड उत्साहाचा पाऊस असं वातावरण होतं. सुरांच्या वर्षावात चिंब झालेले आजी-आजोबा परत निघाले, बस सुटली...गाडीची चाकं पुढे निघाली...पण, माझं मन त्या आजी-आजोबांच्या सकारात्मक क्षणांच्या प्रवासातच घुटमळत राहिलं. आजी-आजोबा जाताना आम्ही दिलेली औषधं घेऊन गेले आणि आम्हाला देऊन गेले 'इच्छाशक्ती' नावाचं टॉनिक.
या लेखकाचा हा ब्लॉग वाचा: