BLOG | खेळातलं 'राज'कारण आणि ठाकरी बाणा
राज ठाकरे आणि खेळांचं नातं तसं जुनं आहे. पण राज आणि त्यांचा लेक अमित या दोघांचा शिवाजी पार्क जिमखान्याच्या टेनिस कोर्टवरचा फोटो व्हॉट्सअॅपच्या जगात व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर एकच कल्ला झाला. कारण ठाकरे मंडळींच्या खेळाच्या दुनियेतल्या मुशाफिरीविषयी आजवर तसं फारच कमी बोललं आणि लिहिलंही गेलं आहे.
वयाच्या बावन्नाव्या वर्षी एखादा बाप आपल्या 28 वर्षांच्या तरण्याबांड लेकाशी खेळाच्या मैदानात दोन हात करायची हिंमत दाखवतो ना, त्यावेळी त्या बापाच्या रक्तात खेळाविषयीचं प्रेम किती मुरलंय, याची कल्पना येते. आणि त्या बापाचं नाव जर राज ठाकरे असेल, तर ते खेळासाठीचं निव्वळ वरवरचं प्रेम नसतं, तर ती प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याची खुमखुमी असते.
राज ठाकरे यांनी मळलेली वाट सोडून राजकारणात स्वत:ची वेगळी वाट चोखाळली, त्याला आज चौदा वर्षांहूनही अधिक काळ लोटला आहे. या चौदा वर्षांत ते कदाचित राजकारणाच्या खेळाचे चॅम्पियन झाले नसतील, पण खेळानं शिकवलेली संघर्षाची वृत्ती आजही त्यांच्या ठायी तितकीच धारदार आहे. म्हणूनच वयाच्या बावन्नाव्या वर्षीही खेळाच्या मैदानात नव्या पिढीशी दोन डाव खेळण्याची त्यांची तयारी असते.
राज ठाकरे आणि खेळांचं नातं तसं जुनं आहे. वास्तविक ठाकरे घराण्याला लाभलेला अष्टपैलुत्वाचा वारसा हा जन्मजात आहे. प्रबोधनकार, बाळासाहेब, श्रीकांतजी, उद्धव आणि राज यांचं समाजकारण आणि राजकारणाच्या पलीकडच्या आयुष्यात कलासक्त असणं हे उभ्या महाराष्ट्राला पाठ आहे. पण ठाकरेंच्या खेळाच्या दुनियेतल्या मुशाफिरीविषयी आजवर तसं फारच कमी बोललं आणि लिहिलंही गेलं आहे.
राज आणि त्यांचा लेक अमित या दोघांचा शिवाजी पार्क जिमखान्याच्या टेनिस कोर्टवरचा फोटो व्हॉट्सअॅपच्या जगात व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर एकच कल्ला झाला. वास्तविक लॉकडाऊनच्या काळात याआधीही मुंबईतल्या एका दैनिकानं राज ठाकरे यांची टेनिस खेळतानाची छायाचित्रं छापली होती. त्यावेळी अनेकांना वाटलं होतं की, राज त्यांचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मेहनत करत असावेत. तसं वाटणं चुकीचंही नव्हतं, कारण राज यांचं वाढलेलं वजन अलीकडच्या काळात खूपच जाणवत होतं. ते वजन कमी करण्यासाठी राज यांची मेहनत सुरु असली तरी त्यांचं खेळांवर जडलेलं प्रेम हे शर्मिला वहिनींच्या प्रेमात पडण्याच्या आधीपासूनचं आहे.
क्रिकेट हे राज यांचं पहिलं प्रेम राज ठाकरे यांचं जगाला दिसलेलं खेळांवरचं पहिलं प्रेम आहे ऐंशीच्या दशकातलं. त्या काळात ते स्वरराज या नावानं शिवाजी पार्कच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये शिकत होते. बुजुर्ग प्रशिक्षक अण्णा वैद्य यांच्या तालमीत त्यांच्यातला क्रिकेटर घडताना अनेकांनी पाहिला आहे. बाळासाहेबांनी दिलेल्या दोन उत्तम ब्रॅण्डच्या बॅट्स घेऊन राज नेट्सला यायचे.
पण म्हणतात ना, वळणाचं पाणी शेवटी वळणानंच जायचं. तसंच झालं. राज यांचा हात ठाकरे घराण्याला साजेशा व्यंगचित्रकलेत तरबेज झाला. आणि मग त्या हाताला जपण्यासाठी त्यांना लेदरबॉलच्या क्रिकेटवर पाणी सोडावं लागलं. पण तेच राज ठाकरे शिवाजी पार्कनजिकच्या पाटीलवाडीतल्या मैदानात टेनिस आणि रबरी चेंडूनं अंडरआर्म क्रिकेट गाजवू लागले. त्या काळात राज यांचा मुक्काम फॅमिली होम असलेल्या कदम मॅन्शनमध्ये होता. अवघ्या दोन पावलांचा स्टार्ट घेऊन 'रपाक्कन' चेंडू टाकणारे राज त्यांच्या सवंगड्यांना आजही आठवतात.
बॅडमिंटन हा राज-उद्धव यांच्यामधला दुवा क्रिकेट हे राज ठाकरे यांचं पहिलं प्रेम असेल तर बॅडमिंटन हे त्यांचं दुसरं प्रेम आहे. वयांच्या विशी-बाविशीत शिवाजी पार्कच्या मुंबई महापालिका जिमखान्यात त्यांच्यातला बॅडमिंटनपटू घडला. त्या काळात उद्धव आणि राज या दोन बंधूंना जोडणारा बॅडमिंटन हा दुवा होता. ते दोघंही पै सरांच्या तालमीत मुंबई महापालिका जिमखान्यावर कसून सराव करायचे आणि उत्त्तम खेळायचेही. पण वाढत्या वयात त्या दोघांनीही राजकारणाचं शिवधनुष्य उचललं आणि त्या दोघानांही बॅडमिंटनची रॅकेट पुन्हा भात्यात ठेवावी लागली.
उद्धव ठाकरे यांचं आयुष्य राजकारणात जसंजसं व्यस्त झालं, तसतसं त्यांना खेळांमधल्या वैयक्तिक सहभागापासून दूर जावं लागलं. पण राज यांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर टेनिसची रॅकेट उचलली. कदाचित 'ऑल टाइम ग्रेट' रॉजर फेडररचं आणि त्याच्या सातत्याचं फॅन बनणं त्यांना टेनिसकडे वळवण्यासाठी कारणीभूत ठरलं असावं.
2019 साली ऐन निवडणुकांच्या धामधुमीत राज यांनी टेनिसची रॅकेट उचलली आणि त्याच सुमारास त्यांना 'टेनिस एल्बो'चा त्रास सुरु झाला. 'टेनिस एल्बो'ची वेदना काय असते याची तुम्हाआम्हाला पहिल्यांदा कल्पना सचिन तेंडुलकरमुळं आली होती. राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर ती वेदना पुन्हा जाणवली. सचिनसारखीच राज यांनीही ती वेदना भोगली, पण त्या वेदनेतून सावरण्याची, कमबॅक करण्याची हिंमतही त्यांनी दाखवली.
मग लॉकडाऊनच्या काळात राज यांचं टेनिसवरचं प्रेम पुन्हा बहरलं. शिवाजी पार्क जिमखान्याच्या टेनिस कोर्टला त्यांचा खेळ पुन्हा पाहायला मिळू लागला.
बॉक्सिंगवरही राज यांचं प्रेम राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकारणातल्या उमेदीच्या वयात आणखी एका खेळावर मनापासून प्रेम केलं. तो खेळ म्हणजे बॉक्सिंग. एक घाव घ्यायचा, तर एक घाव द्यायचा या ठाकरी बाण्याशी नातं सांगणारा हा खेळ राज यांना न आवडतो तरच नवल. बॉक्सिंगमधल्या ठोशांची कॉम्बिनेशन्स कशी असतात याची त्यांना जाण आहे. लेफ्ट राइट खेळत प्रतिस्पर्ध्याला दूर कसा ठेवायचा आणि प्रतिस्पर्धी आपल्या आवाक्यात येताच राईट क्रॉस कसा काढायचा याचं तंत्रही त्यांनी घोटून घेतलं आहे.
राज ठाकरे यांनी बॉक्सिंग खेळावर इतकं कमालीचं प्रेम केलं की दिवंगत बॉक्सर जयवंत मोरे यांच्या गौरवनिधी सामन्यांना ते घरचं कार्य असल्यासारखे उपस्थित राहिले. किंबहुना त्यांच्यामुळंच या सामन्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उपस्थिती राखली होती.
खेळ आणि खेळाडूंविषयीची ही आपुलकी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच राज ठाकरे यांच्याकडे आली असावी. बाळासाहेबांनीही त्यांच्या तारुण्यात क्रिकेटच्या मैदानातील अनेक सवंगडी जोडले होते. ते 'फ्री प्रेस'मध्ये नोकरीला असताना माधव मंत्री, बापू नाडकर्णी, पॉली उम्रीगर, रमाकांत देसाई या कसोटीवीरांच्या संगतीत लोकलनं चर्चगेटला जात. त्यावेळी ही सारी क्रिकेटर मंडळी 'एसीसी'मध्ये नोकरीला होती. बाळासाहेबांनी शिवसेनाप्रमुख म्हणून राजकीय वलय निर्माण झाल्यानंतरही त्यांच्यासोबतचा दोस्ताना जपला होता. एकनाथ सोलकर, अजित वाडेकर आणि सुनील गावस्कर यांच्यावरही त्यांचा खास जीव होता.
बाळासाहेबांच्या क्रिकेट आणि क्रिकेटपटूंवरील प्रेमाला सीमेचंही बंधन नव्हतं. पाकिस्तान संघाला मुंबईत खेळू न देण्याचा त्यांनी कायम विरोध केला. पण त्याच पाकिस्तानच्या जावेद मियांदादनं भेटीची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांनी 'मातोश्री'ची दारं त्याच्यासाठी खुली केली होती.
ठाकरे घराण्यात खेळांचं प्रेम आलं कुठून? बाळासाहेबांसारखाच राज ठाकरे यांचा पेशा राजकारणाचा असला तरी त्यांचा स्वभाव एका दिलदार मित्राचा आहे. त्यामुळंच त्यांचा याराना हा राजकारणाच्या आखाड्यापासून नाट्यचित्रपटांच्या रंगिल्या दुनियेपर्यंत आणि उद्योगाच्या क्षेत्रापासून थेट खेळाच्या मैदानापर्यंत बहरलेला आहे. सचिन तेंडुलकर हा नव्या माणसांमध्ये चटकन मिसळत नाही, असं म्हणतात. पण राज यांच्या स्नेहपरिवारात तो अगदी सहज सामावून गेला आहे. सचिनइतकाच शेन वॉर्नही राज यांचा वीकपॉइंट आहे. त्यामुळं वॉर्न आणि ब्रायन लारा यांच्यासारखी मंडळीही आज त्यांच्या मैत्रीबंधात आहेत.
बाळासाहेब ठाकरे आणि राज यांच्याकडे खेळ आणि खेळाडूंविषयीची ही आपुलकी आली कुठून, या प्रश्नाचं उत्तर कबड्डीच्या मौखिक इतिहासात सापडतं. कबड्डी खेळातली जुनी मंडळी आजही सांगतात की, हुतूतू ते कबड्डी या ऐतिहासिक प्रवासाच्या संघर्षात तत्कालीन पदाधिकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं मोलाचं मार्गदर्शन व्हायचं. मग शिवसेनेची उभारणी झाली आणि बाळासाहेबांनीही कबड्डीला शाखाशाखांमधून आधार दिला.
शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्याच कारकीर्दीत मुंबई महापौर चषक कबड्डी आणि मग शिवशाही चषक कबड्डी सुरु झाली. त्यामागची प्रेरणा ही बाळासाहेबांकडून मिळाली असणार, यात शंका नाही.
बाळासाहेबांमधलं खेळ आणि खेळाडूंविषयीचं प्रेम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्येही झिरपलं आहे. 1990 साली ते दैनिक सामनाचे विश्वस्त म्हणून काम पाहात होते. पण बीजिंग एशियाडच्या काळात आपलं पद आणि मानमरातब विसरुन भारतीय पदकविजेत्यांची छायाचित्रं 'सामना'च्या क्रीडा विभागाला कशी मिळतील, यासाठी दररोज संध्याकाळी कार्यालयात येऊन ते स्वत: त्यात लक्ष घालायचे.
वास्तविक शिवसेनेचं मुखपत्र या नात्यानं 'सामना' हे एक राजकीय वर्तमानपत्र आहे. पण विश्वस्त या नात्यानं उद्धव ठाकरे यांनी खेळाच्या महत्त्वाच्या घटनांनाही 'सामना'च्या पहिल्या पानावर ठळक स्थान कसं मिळेल, हे पाहिलं. रमाधाम या वृद्धाश्रमाच्या मदतनिधीसाठी बाळासाहेबांनी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर एका सामन्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारानं प्रबोधन प्रकाशननं भारताकडून खेळलेल्या कसोटीवीरांची माहिती देणारं पुस्तक प्रकाशित केलं होतं.
ठाकरे घराण्याचं खेळांशी जुळलेलं हे नातं आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या रुपानं त्यांच्या चौथ्या पिढीतही कायम आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: एक क्रिकेटर आहेत. मुंबईतल्या गाईल्स आणि हॅरिस शिल्ड स्पर्धेत बॉम्बे स्कॉटिश स्कूलचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. आज ते मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे यांनाही फुटबॉल आणि टेनिस या दोन खेळांमध्ये रुची आणि गती आहे. अमित यांच्या सुदैवानं त्यांच्याइतकीच खेळांची आवड असलेला पिता आज राज ठाकरे यांच्या रुपानं त्यांच्या केवळ पाठीशीच नाही, तर चक्क त्यांच्यासोबत खेळतो आहे. आपल्या वडिलांसोबत खेळाच्या मैदानात दोन हात करण्याचा आमच्या पिढीनं कधी विचारही केला नाही. पण आज जग बदललं आहे. आणि आपल्याला लाभलेली ही संधी आजवर मोजक्याच भाग्यवंतांना लाभली असावी. तसंच त्यातून शिकण्यासारखंही खूप आहे, हे अमित ठाकरे आणि त्यांच्या पिढीनं ओळखायला हवं.
शेवटी बाप हा बाप असतो ना!
राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात रंगला अनोखा सामना, सोशल मीडियात फोटो व्हायरल