(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आला रे आला, वर्ल्ड कप आला...
विश्वचषकातल्या दहाही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला प्राथमिक साखळीत बाकीच्या नऊ संघांशी प्रत्येकी एकदा खेळण्याची संधी मिळेल. प्राथमिक साखळीत सर्वोत्तम ठरलेल्या चार संघांना बाद पद्धतीच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे.
>> विजय साळवी
इंग्लंडमधील आयसीसी विश्वचषकाचा पडदा उघडायला आता काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. यंदाच्या या विश्वचषकात सर्वोत्तम दहा संघ विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे येत्या 46 दिवसांत जगभरातल्या क्रिकेटरसिकांना 48 वन डे सामन्यांची अनोखी मेजवानी मिळणार आहे. आगामी विश्वचषकाचा फॉरमॅट आणि भारताच्या सामन्यांचं वेळापत्रक कसं आहे, ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.
इंग्लंडच्या रणांगणातलं आयसीसी विश्वचषकाचं महायुद्ध अगदी तोंडावर येऊन ठेपलं आहे. वन डे सामन्यांचा हा आयसीसी विश्वचषक म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जणू दिवाळी. कपिलदेवच्या भारतीय संघानं 1983 सालच्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मध्यबिंदू हा भारताच्या दिशेनं सरकला. त्यामुळे साहजिकच 1987 सालापासून विश्वचषकाची दिवाळी भारतीयांकडून भारतात आणि जगभरात अधिक जल्लोषात साजरी होऊ लागली. इंग्लंडमधील बारावा विश्वचषकही त्याला अपवाद नसणार आहे.
इंग्लंडमधला उन्हाळा आणि आयसीसीच्या आदेशानं बनवण्यात आलेल्या पाटा खेळपट्ट्या लक्षात घेता आगामी विश्वचषकात धावांचीही दिवाळी साजरी होण्याची चिन्हं आहेत. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं तर प्रेक्षकांसाठी पाचशे धावांची नोंद करता येऊ शकेल, अशी स्कोरकार्डस बनवून घेतली आहेत. त्यामुळे विश्वचषकाच्या 46 दिवसांत तुम्हा-आम्हाला धावांच्या आतषबाजीत न्हाऊन जाण्याची संधी मिळणार आहे
46 दिवस... दहा संघ... आणि 48 सामने... म्हणजे सर्वोच्च दर्जाच्या वन डे क्रिकेटची जणू मेजवानीच. त्यामुळे 46 दिवसांमधल्या त्या 48 सामन्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दिवाळी नाही, तर आणखी काय म्हणायचं?
इंग्लंडमधील आगामी विश्वचषकाचं वैशिष्ट्य म्हणजे या विश्वचषकात कसोटी क्रिकेटची मान्यता लाभलेल्या बारापैकी केवळ दहा संघांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे आयसीसीच्या सहसदस्य असलेल्या देशांना या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळालेली नाही. विश्वचषकातल्या दहाही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला प्राथमिक साखळीत बाकीच्या नऊ संघांशी प्रत्येकी एकदा खेळण्याची संधी मिळेल. प्राथमिक साखळीत सर्वोत्तम ठरलेल्या चार संघांना बाद पद्धतीच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आयसीसीच्या नव्या फॉरमॅटनुसार विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठायची, तर दहा फौजांच्या प्राथमिक साखळीत नऊपैकी किमान सहा सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.
आयसीसी विश्वचषकाचं आयोजन येत्या 30 मे ते 14 जुलै या कालावधीत करण्यात येणार आहे. पण टीम इंडियाचा सलामीचा सामना हा 5 जूनला खेळवण्यात येईल. पाहूयात टीम इंडियाच्या साखळी सामन्यांचं वेळापत्रक..
- 5 जून : भारत वि. दक्षिण आफ्रिका - 9 जून : भारत वि. ऑस्ट्रेलिया - 13 जून : भारत वि. न्यूझीलंड - 16 जून : भारत वि. पाकिस्तान - 22 जून : भारत वि. अफगाणिस्तान - 27 जून : भारत वि. वेस्ट इंडिज - 30 जून : भारत वि. इंग्लंड - 2 जुलै : भारत वि. बांगलादेश - 7 जुलै : भारत वि. श्रीलंका
आगामी विश्वचषकातल्या दहा संघांच्या प्राथमिक साखळीतून सर्वोत्तम चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या बाद फेरीतील दोन उपांत्य सामने अनुक्रमे 9 आणि 11 जुलैला, तर अंतिम सामना 14 जुलैला खेळवण्यात येईल.
विश्वचषकाचं यजमानपद इंग्लंडला मिळालं असलं तरी त्याच्या वेळापत्रकाची आखणी भारताला केंद्रबिंदू मानून करण्यात आली आहे. टीम इंडियाचे सारे साखळी आणि बाद फेरीचे सामने हे भारतीयांना सोयीस्कर वेळेत म्हणजे दुपारी तीन ते रात्री साडेदहा या वेळेत खेळवण्यात येतील. त्यामुळे यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या दिवाळीत टीम इंडिया विजयाचे फटाके फोडणार याविषयी भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.