BlOG | ऑक्सिजनसाठी, काय पण!
कोरोनाच्या या वैश्विक महामारीत सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे तो ऑक्सिजनचा ! देशातील अनेक भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ऑक्सिजन मिळविण्यासाठी आणि त्याच्या निर्मितीसाठी अख्या देशात प्रयत्न केले जात आहे. मिळेल त्या मार्गाने आणि पद्धतीने ऑक्सिजन मिळविण्यासाठी जंग जंग पछाडले जात आहेत. देशात आरोग्याची आणीबाणीची वेळ असताना ऑक्सिजन आणण्यासाठी हवाई वाहतूक , जल वाहतूक , रेल वाहतूक आणि रस्ते वाहतुक या मार्गाने ऑक्सिजन देशात आणून विविध राज्याला पुरविण्यासाठी देश झटत आहे. या भयावह संकटातून देश मार्गक्रमण करत असताना आजही ' राजकारण ' मात्र तितक्याच जोमाने सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिक मुकाट्याने हा सर्व प्रकार पाहत आहे. त्यांना या सर्व प्रकारची किळस वाटत आहे. त्यांना सध्या फक्त त्याच्या रुग्णांना वेळेत योग्य उपचार कसे मिळतील ? ह्या प्रश्नाने छळले आहे. तसेच या आजरातून सरंक्षित कसे राहता येईल यावर त्यांचा भर आहे. देशावर आलेल्या या संकटाचे रौद्र स्वरूप पाहता अजून किती दिवस ऑक्सिजनसाठी अन्य देशावर अवलंबून राहावे हे येणारा काळच ठरविणार आहे. ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट टाकून त्यातून ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. कधी कुणी स्वप्नात विचारही केला नसेल, की रुग्ण ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे मरतील. ऑक्सिजनला कायमच ' हलक्यात ' घेण्यात आले होते.
आरोग्य व्यवस्थेच्या पंखात बळ भरण्यासाठी सध्या ऑक्सिजनची नितांत गरज आहे. देशातील अनेक राज्यात ज्या ठिकाणी कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात आहे. तेथील रुग्णालये ऑक्सिजनच्या टँकरची चातकाप्रमाणे वाट बघत असतात. अनेक रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे दाखल करून घेतले जात नाही, तर दाखल असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. तर रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजनचे सिलेंडर शोधण्यासाठी वणवण करीत भटकत आहेत. एकंदरच विदारक चित्र निर्माण सध्या निर्माण झाले आहे. डॉक्टर रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना त्यांना मात्र उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे हतबल झाले आहेत. त्याच्या परीने ऑक्सिजनचा योग्य वापर रुग्णांसाठी दिला जात आहे. ऑक्सिजन रुग्णांना देताना गळती होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. डॉक्टरांना रुग्ण बरे करण्यात मोठे यश प्राप्त होत आहे, मात्र त्याचवेळी विषाणूचा संसर्ग इतका झपाट्याने पसरत आहे की मोठ्या संख्येने नवीन रुग्ण दिवसागणिक निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात उत्पादीत होणारा ऑक्सिजन रुग्णांच्या उपचारासाठी कमी पडत आहे. सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचे ऑडिट करावे, तसे झाल्यास ऑक्सिजनचा योग्य वापर होऊन बचत होऊ शकेल अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या कोविड आढावा बैठकीत खासदार अमोल कोल्हे बोलत होते.
देशाचे पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधातील युद्धात सैन्यदलानी सहभाग घ्यावा म्हणून सूचना केली होती. त्यानुसार नौदलाने या मोहिमेत युद्धनौका पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांड येथील पाच युद्धनौका आणि अन्य नौदल तळावरील दोन अशा साथ युद्धनौका बाहेरच्या देशातून ऑक्सिजन आणण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत. येत्या आठवडाभरात या सर्व युद्धनौका प्राणवायू घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहारीन, कतार या आखाती देशातून हा ऑक्सिजन आयात केला जाणार आहे. त्याशिवाय भारताला लागणाऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी मदतीचा हात पूढे केला आहे. युनिसेफच्या माध्यमातून हजारो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्यात येणार आहे. त्याशिवाय कोरोनाच्या उपचारात लागणारी काही उपकरणे देण्यात येणार आहे. या मोठ्या अडचणीच्या काळात विविध जगातील विविध देशातून भारताला मदत पुरविण्याचे काम सुरु आहे. या सगळ्या मदतीत विशेष करून ऑक्सिजन कसा मोठ्या पद्धतीने प्राप्त होईल यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायूची टंचाई असल्यामुळे रेल्वेची मदत घेऊन इतर राज्यातून लिक्विड ऑक्सिजनचे टॅंक आणण्यात आले आहेत , त्या गाडीला ऑक्सिजन एक्सप्रेस नावाने ओळखले जात असून देशातील अनेक भागात या ऑक्सिजन एक्सप्रेस तर्फे ऑक्सिजन पुरविण्याचे काम सुरु आहे.
त्याचप्रमाणे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजनच्या अनुषंगाने सामाजिक माध्यमाद्वारे केलेल्या ट्विट मध्ये, त्यांनी लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून नवीन तंत्रज्ञान विकसित मराठवाड्यात घनसावंगी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवणार, लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून ऑक्सिजन घेऊन त्याचे शुद्धीकरण करत 25 ते 100 खाटांच्या रुग्णालयासाठी वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. मराठवाड्यात घनसावंगी तालुक्यात हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये राबविण्यात येणार आहे.हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यात ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान म्हणजे मोठी उपलब्धी ठरणार आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी अत्यंत सोयीस्कर व कमी खर्चिक असल्याबरोबरच हव्या त्या ठिकाणी घेऊन जात उपयोगात आणता येणारे तंत्रज्ञान आहे.
जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार ऍक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15 % रुग्णांना कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजनची गरज भासत आहे. एस पी ओ 2, या चाचणीद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. या आणि अन्य मापदंडानुसार डॉक्टर रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यायचे कि नाही ते डॉक्टर ठरवतात. कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजरात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकाराना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील प्राणवायू घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम प्राणवायूची गरज भासते. कोरोनाबाधित काही प्रमाणातच रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागते. कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम माणसाच्या श्वसन संस्थेवर हल्लाबोल करतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता मंदावते, आणि श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांना कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. कोरोनाच्या आजारात ज्या रुग्णाला फुफ्फुसाच्या व्याधीची अडचण दूर होते तो रुग्ण अर्ध्यापेक्षा जास्त बरा झालेला असतो. वैद्यकीय तज्ञांसाठी रुग्णाच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष असते.
एप्रिल 15 ला, ' श्वासलाही ' गहिवर ' आला !' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले आहे. त्यामध्ये, सध्याच्या काळात 'ऑक्सिजन ' या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावणारा ऑक्सिजनची कमतरता भविष्यात भासू शकते. त्यामुळे त्याचे अगोदरच नियजोन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने युद्धपातळीवर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. इतर राज्यातील ऑक्सिजन लष्कराच्या, वायू दलाच्या मदतीने हवाई मार्गे आणण्यापासून ते हवेतून ऑक्सिजन घेण्याच्या नव्या तंत्रज्ञानाच्या शक्यता बाबत चाचपणी राज्यात घेतली जात आहे. गेल्या काही दिवसात राज्याची प्रकृती जरा जास्तच बिघडली आहे. काही दिवसापासून नवीन रुग्ण 50 हजाराच्या वर दिवसागणिक येत असून रुग्णांची संख्या वाढतच आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मृतांचा आकडा वाढला आहे. सध्या उपलब्ध परिस्थितीत आहे त्या साधनसामुग्रीत आरोग्य व्यवस्था काम करत आहे. मात्र रुग्णसंख्याच इतकी झपाट्याने वाढत आहे कि त्या व्यवस्थे समोर एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे. औषधांचा तुटवडा, ऑक्सिजन बेड्स मिळण्याकरिता करावी लागणारी धावपळ, त्यात लसीकरणाबाबत असणारी व्यथा कायम आहे, त्यातच लॉकडाउन मुळे ओढावलेलं नवीन संकट या हृदयद्रावक परिस्थितीमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ही सगळी विदारक स्थिती पाहून दुःखाचा गहिवर येतो आहे ..श्वास अडकतो आहे... जणू श्वासालाच गहिवर आला आहे.
सध्या राज्यात उत्पादित होत असलेला 100 टक्के ऑक्सिजनचा उपयोग वैद्यकीय कारणांसाठी होत आहे. 29 एप्रिल रोजी, महाराष्ट्रात एका दिवसात संपूर्ण राज्यात 1433.03 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर रुग्णांकरीता करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अन्न औषध प्रशासन तर्फे देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढतच आहे त्यापद्धतीने ऑक्सिजनचा हा वापर येत्या काही काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी देशात आणि राज्यात मोठे प्रयत्न केले जात आहे. उपचाराच्या नवीन पद्धती विकसित केल्या जात आहे. सर्वतोपरीने कोरोनाचा कहर आटोक्यात आणण्यासाठी नवनवीन उपाय योजनांचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. या अभूतपूर्व भीतीदायक वातावरणात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून ही लढाई जिंकण्यासाठी पाठबळ दिले पाहिजे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी जे प्रयत्न सरकार करीत आहे त्याला यश येणे ही सध्या काळाची गरज आहे.