गेली अनके महिने जगाच्या पाठीवर एकच चर्चा सुरु होती ती म्हणजे कोरोनाविरोधात लस बाजारात कधी येणार ? अनेक देश या कामांमध्ये जुंपले होते काही जण मानवी चाचण्यांच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे दावे करत होते. जणू काही जगामध्ये ही लस काढण्यावरून एक मोठी स्पर्धा सुरु झाली होती. त्यात आपला भारत देशही मागे नव्हता. मात्र या संसर्गजन्य आजारावरील कोरोनाविरोधात लस निर्माण करताना सगळे नियम पाळावेत अशी ओरड जगातील सगळ्याच तज्ज्ञांकडून होत आहे. लस निर्माण करण्याची एक शास्त्रीय पद्धत असते, अनेक कंपन्यांना एक लस बनविण्याकरिता खूप वर्ष खर्ची करावी लागत असल्याचा इतिहास आहे. या अशा परिस्थितीत काही महिन्यातच रशिया देशाने कोरोनाविरोधातील लस निर्माण केल्याचा दावा केला असून विशेष म्हणजे या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीने ही लस टोचून घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र लस निर्माण होण्याचा आनंद व्यक्त होत असतानाच या लसीची उपयुक्तता किती आहे ती बघूनच त्याचे अंदाज बांधणे योग्य ठरणार असल्याचे मत आपल्या देशातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साथ भारतात येऊन सात महिन्यापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर भारताची एकूण 22 लाख 71 हजार 34 रुग्णसंख्या झाली असून सध्या इतके 6 लाख 39 हजार 929 रुग्ण उपचार घेत आहेत तर 45 हजार 257 नागरिक या आजाराने मृत पावले आहेत. महाराष्ट्रात 5 लाख 24 हजार 513 रुग्ण संख्या झाली असून सध्या 1लाख 47 हजार 735 रुग्ण उपचार घेत आहेत तर 18 हजार 50 नागरिक या आजाराने मृत पावले आहेत. सध्या अशी परिस्थिती आहे. दिवसागणिक संपूर्ण देशात आणि राज्यात रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा खंबीरपणे या सगळ्या संकटात पाय रोवून उभी राहिली असून रोज रुग्णांना उपचार करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहे त्याचेच फलित म्हणजे संपूर्ण देशातून 15 लाख 83 हजार 489 रुग्ण आजच्या घडीला उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. या आजारात बरे होण्याचा वेग जरी चांगला असला तरी संपूर्ण जग या आजाराविरोधात लढणारी लस बाजारात कधी येणार याची सर्वच जण वाट पाहत होते. कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत जगाच्या क्रमवारीत भारताचा तिसरा तर रशियाचा चौथा क्रमांक लागतो. कोरोनाच्या आजाराने रशिया देशाला पण छळले होते. तेथील एकूण रुग्णसंख्या 8 लाख 97 हजार 599 असून 15 हजार 131 नागरिकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. आज त्याच देशाने लस निर्माण केल्याचे जाहीर केले आहे.


एक इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रशिया देशाचे अध्यक्ष पुतीन यांनी लस निर्मितीमध्ये असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले असून अशा पद्धतीची लस निर्माण करणे ही गौरवाची बाब असून लवकरच संशोधन संस्था या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करेल अशी अशा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी ही लस योग्य पद्धतीने काम करीत असून त्याची उपयुक्तता तपासण्यात आली आहे, आणि यामुळे चांगल्या पद्धतीची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे सगळे निकषही पाळण्यात आले आहे. त्याचवेळी पुतीन यांनी असेही सांगितले की माझ्या एका मुलीने ही लस घेली असून ती व्यस्थित आहे. या लसीची निर्मिती गामालेया संशोधन संस्था आणि संरक्षण मंत्रालय रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या लशींची नोंदणी करण्यात आली आहे. लसीची मानवी चाचणी 18 जूनला सुरु करण्यात आली असून त्यात 38 नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. त्या सगळ्या नागरिकांना रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे.


कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, महासंचालक, डॉ शेखर मांडे सांगतात की, सांगतात की, " अशा स्वरुपाच्या बातम्या येत आहेत. मात्र त्याचा डेटा पाहण्याची गरज आहे. विज्ञान जगतासमोर त्यांनी त्यांचा काहीच डेटा ठेवल्याचे माझ्या तरी नजरेत आलेलं नाही. त्यामुळे या विषयवार काही सांगणे योग्य ठरणार नाही. कारण अशावेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे असते. कोणताच डेटा नाही आणि त्यावर भाष्य कशाच्या आधारवर करायचे. माझ्या माहितीप्रमाणे जगतील चार कंपन्यांनी त्यांचा डेटा विज्ञान जगतासमोर ठेवला आहे, त्यापैकी चीन, ऑक्सफर्ड, फायझर आणि एक आहे. त्यांच्या मानवी चाचण्या दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात आहेत त्यांची लस डिसेंबर महिन्याच्या आधी काही येत नाही. त्यासाठी त्यांना नवीन वर्ष उजडणार आहे. रशियाच्या या लसीबद्दल आताच काही मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही."


भारतातही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने भारत बायोटेक कंपनी सोबत करार केला असून त्यांच्या या 'कोव्हॅक्स' या लसीच्या मानवी चाचण्याला परवानगी दिली आहे. या हैद्राबाद स्थित कंपनीने ही लस पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. संपूर्ण देशात विविध संस्थांमध्ये मानवी चाचण्या करुन त्याचे एकत्रित विश्लेषण करून लवकरात ही लस बाजारात यावी म्हणून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेत अशा पद्धतीने फास्ट-ट्रॅक ट्रायल घेण्यात येणार आहे. या लसीची मानवी चाचण्या करण्याकरिता देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. या मध्ये विशेष म्हणजे एक संस्था महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. या संस्थेचे नाव गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असे आहे. लस बनविण्याकरिता किंवा त्यावरील क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर मानवी चाचण्या करणे हा खरा तर महत्वाचा टप्पा मनाला जातो. कारण त्या चाचण्यांचा मानवी शरीरावर कशापद्धतीने परिणाम होतो. त्या चाचण्यांचे काय निकाल येतात यावरच त्या लसीचे यश अवलंबून असते. या चाचण्या ह्या 2-3 टप्प्यात केल्या जातात.


मला वाटत त्यांनी ही लस बनवण्याकरता ज्या 'डेटा' चा वापर केला आहे तो एकदा बघण्याची गरज आहे. इतक्या लवकर लस येते आणि ती खरी कितपत फायदेशीर ठरते हे बघावे लागेल. कारण नुसती लस बाजारात येऊन फायदा नाही त्या लसीमुळे शरीरात ज्या काही अँटीबॉडीज (रोगप्रतिकारशक्ती बहाल करणाऱ्या पेशी) निर्माण होणार आहे. त्या किती काळ शरीरात टिकून राहतात या दृष्टीने आपल्याला या लसीकडे पाहावे लागणार आहे. थोडी शंका घ्यायला वाव आहे, परंतु जर खरंच त्या लसीचा फायदा होणार असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे." असे, डॉ अविनाश सुपे सांगतात. डॉ सुपे हे मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आहेत.


येत्या काळात अनेक जगभरातील आणखी काही कंपनी कोरोनाविरोधात नवीन औषध आणल्याचा दावा करतील. याचा अर्थ असा आहे की, काही महिन्यात या आजार विरोधात औषध किंवा लस निर्माण होणार आहे, निश्चित. ही बाब सगळ्या जगातील लोकांसाठी आशादायक आहे. या आजरावर जगभरात प्रथम अमेरिकेतली माॅडर्ना कंपनी, फायझर कंपनी, ऑक्सफर्ड विद्यापीठ, चीनमधील सिनोफार्मा कंपनीने आणि अन्य देशातील काही कंपनीने लस बनवून मानवी चाचण्या करण्यास सुरुवात केली असून त्या सुद्धा आता दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.


पुणे येथील के इ एम रुग्णालयातील श्वसनविकारतज्ञ डॉ स्वप्नील कुलकर्णी, सांगतात की, "जर लस बाजारात आली असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र काही काळ तेथील लोकांवर वापरल्यावर काय निकाल येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण इतर ज्या लस शेवटच्या टप्प्यात त्यांचे सुरुवातीपासून अपडेट मिळत होते. मात्र रशियाची ही लस ज्या वेगात बाजारात आली आहे. त्यामुळे त्याच्या उपयुक्तेबाबत थोडी अजून वाट बघावी लागणार आहे. कोरोनाविरोधी लस बाजारात येणे ही सर्वांसाठीच फायदेशीर गोष्टी आहे. मात्र एखादी लास बजारात येणेसाठी ज्या काही काठिण्य पातळीतून जाणे अपेक्षित असते त्या ह्या लसीने पातळी पार केली असेल तर उत्तमच आहे. कारण एखादी लस येते म्हणजे त्या लसीच्या निकालातून फार लोकांच्या अपेक्षा असतात.


एकंदरच बाजारात केवळ लस येऊन चालत नाही तर त्या लशीमुळे किती नागरिकांना फायदा होतो आहे ते पण बघणे गरजेचे आहे. रशिया देशाने लस काढण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविला असला तरी त्या लशीची उपयुक्तता बाजारात आल्यावरच निश्चित होईल. जगभरातील वैज्ञानिक या लशीबाबत काय मत व्यक्त करतात ते पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे फक्त लस आली आहे म्हणून हुरळून जाण्यापेक्षा त्याच्याबद्दलची आणखी माहिती वैज्ञानिक खुलासे होणे बाकी आहे एवढं मात्र निश्चित.


राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य, डॉ शशांक जोशी, सांगतात की, " मला आशा आहे की अशा स्वरुपाच्या लसीमधून काही तरी चांगले निर्माण होण्याची शक्यता आहे. या लसीचे रशियामध्ये काय निकाल येत आहेत ते बघूच आणि जर निकाल चांगले असतील तर चांगलीच गोष्ट आहे. रशिया आणि चीनमध्ये भरपूर थंडी असते आणि त्याच्याकडे फ्लूचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे त्यांचं हा आजार सुरु झाल्यापासून ह्या  विषयावार काम चालू होतंच. कारण जगाच्या पाठीवर वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्यामध्ये अमेरिका आणि ब्रिटिश तज्ञाचा हातखंडा आहे. तसे रशियाच्या देशाबाबत नाही. मात्र तरीही त्यांनी  विक्रमी वेळेत ही लस बाजारात आणली याचं आश्चर्य आणि कौतुक दोन्ही आहे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग