आजपर्यंत कोरोना काळात तरुणांच्या संख्येत लहान मुलांना कोरोनाची लागण फारशी होत नसल्याचे दिसत असले तरी ज्या मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा काही मुलांमध्ये कोरोनाचे उपचार सुरु असताना असाध्य आणि दुर्मिळ अशा पीआयएमएस (पीडियाट्रिक इंफ्लेमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम) आजाराची लागण झाल्याचे दिसत आहे. ह्या आजारांवर डॉक्टर उपचार करीत असले तरी अशा पद्धतीचा आजार ओळखणे हे वैद्यकीय तज्ज्ञांसमोर मोठे आव्हान आहे.अनेक वेळा ह्या आजाराचे वेळेत निदान न झाल्याने हे मुलांच्या जीवावर बेतू शकत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. ह्या दुर्मिळ आजारामुळे लहान मुलांच्या अवयवांवर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसत असून अशा मुलांना अत्यावश्यक उपचाराची गरज असून अनेक वेळा या मुलांना अतिदक्षता विभागात ठेवूनच उपचार केले जातात. या आजारातून बरे होण्याकरिता 10-15 दिवसाचा कालावधी लागत असून वेळेत उपचार करणे महत्वाचे ठरत आहे. त्यामुळे यापुढे पालकांनी या कोरोना काळात लहान मुलांना तापासहित अन्य काही आजाराची लक्षणे आढळल्यास ती अंगावर न काढता, किंवा घरगुती उपचार न करता जवळच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावे. हा आजार दुर्मिळ असल्याने त्याचे सखोल संशोधन होण्याचे हे हेतूने या आजराबाबतीचे सर्व निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला दिली आहे.


मुंबईतील परळ भागात असणारे बाई जेरबाई वाडिया लहान मुलांचे हॉस्पिटल या दुर्मिळआजारावर सध्या काम करत असून तेथे आतापर्यंत या आजराचे 21 रुग्ण आढळून आले आहे. तसेच शहरातील इतर काही खासगी रुग्णालयातही असे कमी संख्येत रुग्ण आढळून आले आहे. वाडिया हॉस्पिटलचे विशेष म्हणजे या रुग्णालयात सर्वसाधारणपणे 15 वर्षापर्यंतच्या मुलांवर उपचार केले जातात मुलांसाठी स्वतंत्र असे रुग्णालय असून खासगी रुग्णालयाच्या तुलनेत माफक दरात या रुग्णालयात उपचार केले जातात. त्यामुळे बहुतांश पालक लहान मुलांच्या उपचारासाठी या रुग्णलयात मुलांना घेऊन येत असतात. आतापर्यंत दोन मुलांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाला कोरोना आणि आधीपासून कॅन्सरचा आजार होता, तर दुसरं मुलं या आजाराने अतिगंभीर होऊन रुग्णलयात दाखल झालं होत.


या आजारात विशेष म्हणजे सर्व लहान मुले हे कोरोना आजाराशी संबंधित असेच आहे. यामध्ये 7 जणांना कोरोना होता. तर अंदाजे 10 मुलांची अँटीबॉडीज चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोना या आजाराच्या विरोधात लढण्यासाठी असणारी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली होती म्हणजे त्यांना ह्या आजाराचा संसर्ग होऊन गेला तरीही त्यांना कळलंही नाही. मात्र अनेक गंभीर लक्षणे दिसायला लागली म्हणून रुग्णालयात उपचार घेण्याकरिता आले होते. तर दोन मुलांना हा आजार झाला आहे, त्यांच्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ह्या आजाराचं आणि कोरोनाशी जवळचे नाते आहे. त्यामुळे थेट कोरोना चाचणी पॉजिटिव्ह जरी नसली तरी तपासाणी दरम्यान कोरोनाचं हे नाते उलगडण्यात या रुग्णलायतील डॉक्टरांना यश आले आहे. सध्या रुग्णालयात 3-4 मुले या आजारांवर उपचार सुरु असून बाकी सर्व मुले उपचार घेऊन बरी होऊन घरी गेली आहेत. या आजराचा सर्वात तरुण रुग्ण हा 10 महिन्याचा असून ते वर्षे वयोगटातील मुले आहे, अन्यथा या आजराशी बाधित बहुतांश मुले ही 5-7 या वयोगटातील आहेत.


या आजारात मुलांना कोरोना चाचणी पॉजिटीव्ह येण्या व्यतिरिक्त, जी काही मुले आहेत त्यांना 3-4 दिवस भयंकर ताप येत राहणे, जुलाब, उलट्या, डोळे लाल होणे आणि पोटात दुखत राहणे, तोंड येणे - खाण्यास अडचण निर्माण होणे, शरीरावर पुरळ (रॅशेस) येणे, हाता-पायांवर सूज येण्यासारखी लक्षणे दिसून आली आहेत.


या रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ शंकुतला प्रभू यांनी सांगितले की, " या आजराचं विशेष म्हणजे योग्य वेळी निदान करणे आणि उपचार देणे, यामुळे मुले बरी होत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. बहुतांश या आजाराची मुले एप्रिल-मे च्या दरम्यान निदान झालेली आहेत. या आजराचे निदान वेळेवर करण्यासाठी काही चाचण्या आणि तज्ञ डॉक्टरांची गरज असते. जर अशा रुग्णांना वेळेवर उपचार नाही मिळाले तर ते दगावण्याची शक्यता नाकारत येत नाही. आमच्याकडे जे एक मुल ह्या आजाराने दगावले आहे. ते अनेक दिवस बाहेर विविध उपचार करत बसले आणि अतिगंभीर झाले तेव्हा आमच्याकडे आले. दुसऱ्या मुलाला कॅन्सर होता त्याची प्रकृती कोरोना आणि या आजाराने अधिक खालावली होती आणि त्याचा मृत्यू झाला. बाकी सर्व रुग्णांना आम्हाला बरे करण्यात यश आले आहे. अजूनही 4 मुले रुग्णलयालात आहे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिरआहे. या आजरात सगळ्या मुलांना ऑक्सिजनची गरज भासते तर 10-12 मुलांना अतिदक्षता विभागात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. तर काही मुलांना वॉर्डमध्येच उपचार दिले गेले आहेत. "


डॉ प्रभू पुढे असेही सांगतात की, " या आजाराचे विशेष म्हणजे या आजराचा थेट मुलांच्या अवयवांवर हल्ला होतो, यामध्ये महत्वाचे म्हणजे फुफ्फुस, हृदय, लिव्हर यांचा सहभाग आहे. याकरिता आमचे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अशा मुलांवर उपचार करत आहे. काही वेळा या मुलांच्या शरीरातील आतील अवयवांवर सूज येणे आणि ती कमी करण्यासाठी त्यांना स्टिरॉइड (उत्तजेक), इम्युनोग्लोबलीन सारखी आणि अन्य औषधे डॉक्टर रुग्णांना देऊन बरे करत आहेत. हा आजर बरा होणार आहे मात्र याकरिता पालकांनी लक्षणे ओळखून डॉक्टरांना वेळेतच दाखविले पाहिजे. यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही मात्र दक्ष राहण्याची गरज आहे. आमचे स्वतंत्र लहान मुलांचे रुग्णालय असल्यामुळे आमच्याकडे अशा आजाराची रुग्ण संख्या अधिक आहे. परदेशातही अशा स्वरूपाच्या काही केसेस दिसल्याचे आढळून आले आहे. मुंबईतील अन्य रुग्णलयात दोन-तीन केसेस असतील. ह्या आजरासंदर्भातील सर्व माहिती माहिती आम्ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला दिली आहे. कारण अन्य ठिकाणी अशा काही केसेस असतील तर त्या वर संशोधन केले जाऊ शकते की अशा प्रकारचा आजार मुलांना का होत आहे."


या कोरोना आजाराच्या पार्शवभूमीवर राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल तयार करत असते. त्यामध्ये ते वयोगटानुसार किती रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे याचे विश्लेषण करत असते. 30 जुलैच्या या अहवालानुसार 3 लाख 90 हजार 586 रुग्णांची आकडेवारी घेऊन अहवाल बनविण्यात आला आहे. त्यामध्ये आतांपर्यत 10 वर्षापर्यंतच्या 15 हजार 501 मुलांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे नमूद करण्यात आले आहे म्हणजे एकूण रुग्ण संख्येच्या 3.97 टक्के इतक्या या वयोगटातील मुलांना हा आजार आतपर्यंत झाला आहे. तर 11-20 वयोगटातील 27 हजार 136 जणांना या आजराची लागण झाली असून 6.9 टक्के त्याचे प्रमाण आहे.


तर या रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ मिनी बोधनवाला यांनी सांगितले की, " गेल्या चार महिन्यात आमच्या रुग्णालयात 110 पेक्षा जास्त कोरोना बाधित मुलांवर उपचार करण्यात आले आहे. या आजारांवर उपचार करताना हा एक नवीन असा दुर्मिळ आजार आम्हाला दिसून आला आहे. आमचे डॉक्टर त्यावर व्यवस्थित उपचार करीत असून या आजरातील बहुतांश मुलांना बरे करण्यात आमच्या डॉक्टरनं यश आले आहे. "


वाडिया रुग्णालय प्रमाणेच हा आजार अन्य रुग्णायालातही आढळला आहे. मात्र राज्यात आणि देशाच्या इतर भागात जर अशा प्रकारच्या आजाराचे रुग्ण सापडत असतील तर ह्या आजारांवर जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी अशा आजाराबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. अशा आजारावर मात करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा असे रुग्ण वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेतील. त्यामुळे ह्या कोरोना विरोधात लढायचं असेल तर गाफील राहून चालणार नाही विशेष करून लहान मुलांची काळजी घेणे हे आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग