गेले आठ महिने तरुण वर्गासोबत शाळेतील मुलांचा मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेटवरील स्क्रीन टाइम सगळ्यांचाच वाढला आहे, हे आता नव्यानेो कुणी सांगण्याची गरज नाही. मात्र वाढलेल्या स्क्रीन टाइम मुळे डोळ्यांच्या तक्रारीत कमालीची वाढ झाली आहे. तर अनेकांना तक्रारी असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाच्या आधीच्या काळातील आणि त्यानंतरच्या कालावधीतील मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेटवरील स्क्रीन टाइम यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. अनेकवेळा डॉक्टर सल्ला द्यायचे जास्त वेळ 'स्क्रीन' वर घालवू नका डोळे खराब होतील. मात्र आता स्क्रीनवर टाइम घालविणे दैनंदिन नव्या जीवन शैलीचा भाग झाला आहे. कारण कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे बहुतांश 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेवर आधारित घरून लॅपटॉप, कॉम्प्युटर वर काम करू लागले तर शाळेच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती तशाच स्वरूपाची होती. त्यामुळे आता या इतक्या मोठ्या काळात स्क्रीनवर राहणे व्यसन नसून कामाचा भाग झाल्याने त्याचे दुष्परिणाम हळू हळू सर्वच वयोगटात दिसू लागले आहेत.


कोरोनाचा हा काळ असल्याने बऱ्याच लोकांना घरी बसावे लागले होते जे काही काम होते ते घरी बसून करणे अपेक्षित होते. ते करताना मोठ्या प्रमाणावर घरातील बहुतांश सदस्यांकडून लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर होत होता. काही ज्यांना काम नाही ते त्याच्यावर वेळा घालवायचा म्हणून करमणुकीचे साधन म्हणून पाहत होते, तर काहीसाठीं शाळेचा अभ्यास ऑफिस मधील कामे यासाठी त्याचा वापर होत होता. सुरवातीच्या काळात थोड्या प्रमाणात असणारा वापर नंतरच्या कालावधीत मात्र वाढला. झूम वर मिटिंग, कॉन्फरेन्स असे प्रयोग यशस्वी होत आहे म्हटल्यावर विविध अॅपची नवीन निर्मिती झाली वेळ वाढत गेला आणि स्क्रीन टाइम साहजिचकच वाढला. अशा या कोरोनामय परिस्थितीत काम होत आहे म्हटल्यावर अनेकांनी हीच पद्धत वापरून कामे करण्यास सुरुवात केली आहे. सध्या बऱ्यापैकी गोष्टी अनलॉक झाल्या असल्या तरी मुलांच्या शाळा आणि आय टी कंपन्यांचे आद्यपही घरूनच सुरु आहे. काही व्यक्तीं तर इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा अतिरेक व्हावा इतक्या प्रमाणात वापर करीत आहे.


सर जे जे समूह रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सक विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनी सांगतिले की, " नक्कीच गेल्या काही महिन्यात बहुतांशच्या आयुष्यात स्क्रीन टाइम वाढला आहे आणि त्याचे दुष्परिणाम आता डोळ्यावर जाणवू लागले आहेत. यासंदर्भातील बऱ्याच तक्रारी गेले अनेक दिवस येत आहे. यामध्ये सर्वच वयोगटांचा समावेश आहे. ज्यावेळी आपण संगणक किंवा मोबाईल, टॅबलेट वर काम करतो, त्यावेळी या सर्व उपकरणांमधून डोळ्यामध्ये प्रकाश पडतो. ह्या उपकरणातील प्रकाशामुळे डोळ्याच्या बाहुल्या आकुंचन पावतात, त्यामुळे डोळ्यातील स्नायूमध्ये स्पासम होऊन विविध तक्रारींची सुरुवात होते . डोळे जळजळणे, दुखणे अशा व्याधी सुरु होतात. त्यामुळे काही वेळ काम केल्यानंतर लगेच डोळ्याचा थकवा जाणवायला सुरवात होते. या विषयवार अनेक वेळा आम्ही संवाद साधत असतो. खूप वेळा अनेकजण तास अन तास संगणकावर काम करत असतात यावेळी आपण डोळ्याची उघड झाप पण कमी प्रमाणात करतो. यामुळे 'ड्राय' होण्याची तक्रारी सुरु होतात. तसेच सतत चष्म्याचे नंबर बदलणे आणि अचानक लांब पाहताना नजर स्थिर न होणे अशा स्वरूपाची समस्या निर्माण होते. काही वेळ काम काम केल्यानंतर तास दोन तासाने डोळ्यांना विश्रांती देणे गरजेचे असते. हाताचे दोन्ही तळवे काही मिनिटांकरिता डोळ्यावर ठेवावेत, त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो."


या सर्व प्रक्रियेत, डोळ्यांवर निष्कारण ताण पडून डोळ्याचे विकार बळवत असून त्यातील एक म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम (Computer vision syndrome) कोरोनाच्या आजार नंतर आता डोळ्याच्या व्याधींमध्ये वाढ होताना सर्वत्रच दिसत आहे. काही जण घराच्या घरी उपाय करीत आहे तर काही जणांना तज्ञांकडे जाण्याची वेळ आली आहे.


एप्रिल 18 ला डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहूं नका ह्या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, डोळ्यांची निगा कशी राखावी यावर आजपर्यंत अनेक तज्ज्ञ मंडळींनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेच . मात्र कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लॉक डाउनच्या या काळात एकदंरच देशभरात 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेवर आधारित बरेच लोकं घरून काम करीत आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप, मोबाईल मीटिंग याचा वापर वाढला आहे. बरं हा प्रकार फक्त काम करण्याऱ्या लोकांपर्यंत सीमित नसून ज्या लोकांना घरात काही काम नाही आणि सक्तीने घरी बसावं लागलेले लहानग्यांपासून ते वरिष्ठ नागरिकापर्यंत बरेच जण या अत्याधुनिक सर्व साधनांचा वापर आपला वेळ घालविण्याकरीता करीत आहे. यामुळे या साधनांचा अतिरेकी वापर होत असून लोकांना विशेष करून डोळ्याचे आजार जडण्याची शक्यात नाकारत येत नाही. याबरोबर काही लोकांना मानेचे आणि कंबरेचे आजारही भेडसावू शकतात याकरिता नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना पश्चात ही लोकांना आजार होऊ शकतात हे नागरिकांनी वेळीच ओळखले पाहिजे.


कोरोनाचे प्रमाण सध्या कमी असले तरी दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यापुढे स्क्रीन टाइम कशा पद्धतीने कमी करता येईल याचा विचार नागरिकांनी केला पाहिजे. डोळा हा अतिशय नाजूक अवयव आहे त्याची जास्तीत-जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्यांच्या तक्रारी उद्भवल्यास घरच्या घरी उपचार करण्यापेक्षा तज्ञांना दाखवून घ्या. कोरोनाचे वर्तन पाहता काही महिने अजून तरी नागरिकांना घरूनच काम करावे लागणार आहे. शाळा अजून तरी दोन -तीन महिने उघडणार नाही , तेच धोरण कॉलेजच्या बाबतीत आहे. त्यामुळे स्क्रीन टाईमच्या डोळ्यावरील हल्ल्यांपासून वाचायचं असेल तर लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा कामापुरता वापर करावा आणि तास- दीड तासाने काही वेळा पुरती विश्रांती घेणे गरजेचे आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग