संपूर्ण जग गेली सहा महिने कोरोनाच्या या महामारीपासून झगडत आहे. उपलब्ध असलेल्या औषधाचा वापर करून रुग्णांना बरे करण्यात यश येत आहे तर काही जणांचा या आजारामुळे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे फक्त वयस्कर नाही तर अनेक तरुणांचा या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसापर्यंत वैद्यकीय विश्वात अशी खात्रीलायक कुठलीच उपचार पद्धती नाही जी कोरोनाचा नायनाट करू शकेल. जगातील डॉक्टरांनी विविध औषध वेगवेगळ्या प्रमाणात घेऊन संशोधन आणि विकास करून काही औषधांची उपचार पद्धती तयार करून तिचा रुग्णांवर वापर करीत आहेत. काही प्रमाणात या प्रचलित असणाऱ्या औषधांना प्रतिसाद मिळत आहेत तर काही उपचारपद्धतीतून बाद करण्याचे संकेत नियामक संस्थांकडून देण्यात येत आहेत. अनेक कंपन्या या आजारावरील लस करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, सध्या तरी सर्वच कंपन्या या लस बनविण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे दावे करीत आहे. त्यातच ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या 'लसीचे' निकाल चांगले असल्याची बातमी माध्यमांध्ये येऊन धडकली आहे. चातक पक्षी जशी पावसाची वाट बघत असतो त्याप्रमाणे अख्ख विश्व सध्या कोरोना आजाराला गुणकारी ठरणाऱ्या 'लस' ची वाट पाहत आहे.
अर्ध्या वर्षापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर भारताची एकूण 11 लाख 55 हजार 191 रुग्णसंख्या झाली असून सध्या इतके 4 लाख 2 हजार 529 रुग्ण उपचार घेत आहेत तर 28 हजार 084 नागरिक या आजाराने मृत पावले आहेत. महाराष्ट्रात 3 लाख 18 हजार 695 रुग्णसंख्या झाली असून सध्या इतके 1 लाख 31 हजार 636 रुग्ण उपचार घेत आहेत तर 12 हजार 30 नागरिक या आजाराने मृत पावले आहेत. सध्या अशी परिसथिती आहे. दिवसागणिक संपूर्ण देशात रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा खंबीरपणे या सगळ्या संकटात पाय रोवून उभी राहिली असून रोज रुग्णांना उपचार करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहे त्याचेच फलित म्हणजे संपूर्ण देशातून 7 लाख 24 हजार 577 रुग्ण आजच्या घडीला उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत.
सोमवारी ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. विद्यापीठामार्फत कोरोना लस शेकडो लोकांमध्ये या विषाणूविरोधात अँटीबॉडीज किंवा प्रतिकारकशक्ती निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. मानवी चाचण्यांचे निकाल उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. या लशीमुळे मानवी शरीरात किती अँटीबॉडीज तयार होतोत याचे निकाल नुकतेच हाती आले आहे. अजूनही काही देशातील लोकांवर या लशींचे प्रयोग सुरु आहेत. या लशींच्या या निकालामुळे वैद्यकीय क्षेत्रात आशेचा किरण निर्माण झाला आहे. या संसर्गजन्य आजराविरोधात लस येणं अत्यंत महत्वाचे आहे. जगभरात या आजरामुळे 6 लाख 13 हजार 600 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 1 कोटी 48 लाखापेक्षा जास्त रुग्ण आतापर्यंत झाले आहेत. प्रत्येक देश या आजारविरोधात औषध किंवा लस काढण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहे. मात्र लस काढणे तशी मोठी आणि खर्चिक प्रक्रिया आहे. या लशींचे निर्णय चांगले असले तरी ती बाजारात येण्यास आणखी काही महिन्यांची वाट नक्कीच पाहावी लागणार आहे.
पुणे येथील के इ एम रुग्णालयातील श्वसनविकार रोगतज्ञ डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात की, 'सध्या आहे त्या औषधांवर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र अजूनही कुठली लस या आजाराविरोधात विकसित झाली नाही. मात्र नुकतेच ऑक्सफर्ड विद्यापीठाने लसीच्या संदर्भात काही दिलासादायक निकाल जाही केले आहे. ज्याची सध्या वैद्यकीय वर्तुळात चर्चा आहे, ज्या पद्धतीने निकाल असण्याचे दवे केले जात आहे ते खरे मानले तर नक्कीच हा एक आशेचा किरण म्हणावा लागेल. कारण सध्या ह्या आजाराच्या उपचारांवर आम्ही सध्या काम आहोत. पण हा आजारच होऊ नये याकरीता लस येणे ही काळाची गरज आहे. ज्या पद्धतीने माध्यमांमध्ये या लसीची माहिती आली आहे त्यामध्ये फारशे गंभीर दुष्परिणाम नाही असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ही लस बाजारात कधी उपलब्ध होते त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आपल्या देशातील एक लस विकसित होत आहे, त्याची आम्ही डॉक्टरमंडळी सगळेच वाट पाहत आहोत'.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने भारत बायोटेक कंपनी सोबत करार केला असून त्यांच्या या 'कोव्हॅक्स' या लसीच्या मानवी चाचण्याला परवानगी दिली आहे. या हैद्राबाद स्थित कंपनीने ही लस पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. संपूर्ण देशात विविध संस्थांमध्ये मानवी चाचण्या करून त्याचे एकत्रित विश्लेषण करून लवकरात ही लस बाजारात यावी म्हणून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेत अशा पद्धतीने फास्ट-ट्रॅक ट्रायल घेण्यात येणार आहे. या लसीची मानवी चाचण्या करण्याकरिता देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. या मध्ये विशेष म्हणजे एक संस्था महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. या संस्थेचे नाव गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असे आहे. लस बनविण्याकरिता किंवा त्यावरील क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर मानवी चाचण्या करणे हा खरा तर महत्वाचा टप्पा मनाला जातो. कारण त्या चाचण्यांचा मानवी शरीरावर कशापद्धतीने परिणाम होतो. त्या चाचण्यांचे काय निकाल येतात यावरच त्या लसीचे यश अवलंबून असते. या चाचण्या ह्या 2-3टप्प्यात केल्या जातात.
राज्य शासनाच्या मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे सांगतात की, 'प्राथमिक दृष्ट्या या लसीचे चांगले निकाल दिसत आहेत. त्यांनी याकरता फास्ट-ट्रॅक ट्रायल घेतली आहे ही खर्च समाधानाची बाब आहे. या लसीमुळे संसर्ग रोखण्यास मदत होऊ शकते. मात्र लस बाजरात उपलब्ध होण्याकरिता नक्कीच नवीन वर्षाची वाट पाहावी लागेल. त्यानंतर विशेष म्हणजे ही लस शरीरात टोचल्यानंतर किती काळ यामुळे निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज टिकतात हा एक महत्वाचा भाग आहे. परंतु एकूणच सगळं चित्र समाधानकारक आहे'.
येत्या काळात अनेक जगभरातील आणखी काही कंपनी कोरोनाविरोधात नवीन औषध आणल्याचा दावा करतील. याचा अर्थ असा आहे की, काही महिन्यात या आजार विरोधात औषध किंवा लस निर्माण होणार आहे, निश्चित. ही बाब सगळ्या जगातील लोकांसाठी आशादायक आहे. या आजरावर जगभरात प्रथम अमेरिकेतल्या मॉडर्ना कंपनीने लस बनवून मानवी चाचण्या करण्यास सुरुवात केली असून त्या सुद्धा आता अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. तर रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने सुद्धा कोरोना आजारावर लस बनविल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या आहेत. त्यामुळे एकंदरच ज्या शेवटच्या आशेवर सर्वच वैद्यकीय जगताची भिस्त आहे ती लस लवकरच बाजारात येण्याच्या प्रक्रियेला निश्चित सुरूवात झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?
- BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
- BLOG | कोरोनामय 'डायबेटिस'
- BLOG | संपता संपेना... कोरोनाकाळ
- BLOG | कोरोनाची वक्रदृष्टी पुरुषांवर अधिक!
- BLOG | व्यर्थ न हो बलिदान...!