>> संतोष आंधळे


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चितच राज्यात सगळ्या ठिकाणी चांगले आहे, यामध्ये कुणाचेही दुमत नसावे. राज्यातील डॉक्टर्सना रुग्णांना बरे करण्यात यश येतंय ही समाधानाची बाब आहेच. मात्र कळीचा मुद्दा जो होता तो म्हणजे या आजाराने ग्रस्त मृतांचा आकडा वाढत आहे त्याला आळा कसा घालता येईल यावर सध्याच्या प्रचलित उपाय योजना सोबत आणखी नवीन काही करता येतील का यावर आरोग्य यंत्रणेने अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्या प्रगत देशांमध्ये जी उपचारपद्धती आहे त्या स्वरूपाचे उपचार आपल्याकडेही सुरु आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर 3.68 टक्के इतका आहे. राज्यातील गेली तीन दिवसाची या आजराने मृत झालेल्यांची आकडेवारी पहिली तर ती अडीचशेच्या वरच आहे. त्यामुळे ही आकडेवारी कमी केली तर आपण या साथीला आळा घातलाय असे म्हणू शकू. आपल्या डॉक्टरांना काही गंभीर रुग्णांना बरे करण्यात यश मिळत आहे मात्र तरीही काही रुग्णांनाचा मृत्यू होतच आहे. त्याकरिता राज्याने आता मृत्यू दर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.


या महाभयंकर आजारामुळे आतापर्यंत राज्यात 13 हजार 132 जणांचा बळी घेण्यात आला आहे. तसेच आजपर्यंत 1 लाख 99  हजार 968 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 1 लाख 44 हजार 18 रुग्ण राज्याच्या विविध भागात उपचार घेत आहेत. संपूर्ण देशात जास्त मृत्यूचा आकडा हा महाराष्ट्रातीलच आहे. तर सध्या देशात एकूण 31 हजार 358 नागरिक मृत्यमुखी पडले आहेत. सध्या आपल्याकडे या आजरात गंभीर असताना जे औषध उपयुक्त असे आहे ते रेमेडीसीवर आणि टॉसिलिजुम्याप रुग्णांना दिले जात आहे. प्लास्मा थेरपीचा वापर केला जात आहे. रुग्ण संख्या वाढून नये म्हणून स्थानिक पातळीवर टाळेबंदी करण्यात येत आहे. या आजराचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये म्हणून लॉकडाउन ठेऊन काही गोष्टीसांठी शिथिलता देण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक जितके उपाय करता येतील तेवढे उपाय प्रशासन करीत आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून राज्य शासनाने विशेष कोरोना कृती दलाची स्थापना केली आहे. त्याच स्वरूपाचे दल जिल्हास्तरावर कार्यान्वित करण्यात आले आहे.


शुक्रवारी, 24 जुलैला, कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणे करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दर देखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व चर्चा केली. , याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.


मुख्यमंत्री म्हणाले की, मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसुत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहे. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणे देखील तितकेच महत्वाचे आहे.


राज्यातील विशेष कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी या बैठकीला उपस्थित होते, त्यांनी एबीपी माझा ऑनलाईन शी बोलताना सांगितले की, "ज्या काही योग्य उपचार पद्धती सध्या उपलब्ध आहेत त्या ग्रामीण भागातील शेवटच्या रुग्णाला मिळण्यासाठी एकत्रिपणे काम केले पाहिजे यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी सगळे प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावेळी कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टरांशी संवाद ठेवून प्रत्येक रुग्णांची सर्वागीण काळजी घेणे. तसेच रेमेडीसीवर आणि टॉसिलिजुम्याप योग्य रुग्णांना योग्य वेळी देणे. तसेच स्थानिक जिल्हा पातळीवरील कोरोना कृती दलाच्या डॉक्टरांनी, राज्यातील विशेष कोरोना कृती दलाच्या संपर्कात राहून काही अडचण असल्यास सवांद साधून रुग्णांना उपचार देणे. त्याचप्रमाणे केवळ ऍलोपॅथी नव्हे तर अन्य पॅथीचा योग्य पद्धतीने कोरोनाच्या उपचारात वापर करणे अशा विविध विषयवार यावेळी चर्चा झाली आहे."


कोरोनाकाळात केल्याला कामामुळे धारावी मॉडेलचे जागतिक स्तरावर नाव गेले आहे. जास्तीत जास्त चाचण्या करून रुग्ण शोधून काढणे आणि उपचार देणे यामुळे बऱ्यापैकी रुग्ण संख्या आटोक्यात आण्यात यश मिळाले होते. त्या धर्तीवर आता राज्यातील काही जिल्ह्यात या मॉडेलचा वापर करता येईल का यांचा विचार केले गेला पाहिजे. ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेने आरोग्याच्या सुविधा कमी आहे त्या कशा पद्धतीने वाढविताला येतील यासाठी नियोजनबद्ध आरोग्य व्यवस्थापनाची गरज आहे. लक्षणंविरहित रुग्णांनी बेड अडवून ठेवू नये, अशा सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.


कोरोना मृत्यू दर कमी करण्यासाठी, मृत्यू विश्लेषण समितीच्या शिफारशीं विचारात घेतल्या पाहिजे. कारण आता मृत्यू दर शून्य करण्याच्या दृष्टीने उचलले पाऊल फार महत्वाचे आणि या कोरोनाच्या लढाईतील निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी कोरोना मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी आरोग्य सुविधा सर्व सामान्यांपर्यंत कशा पद्धतीने पोचविता येतील यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची गरज आहे. कारण पुण्यासारख्या शहरात आजही काही लोकांना बेड्स मिळत असल्याच्या तक्रारी आढळून येत आहे. सर्वानी म्हणजे नागरिकांनी आणि प्रशासनाने एकत्रितरित्या येऊन आणि एकात्मिक उपचार पद्धतीचा वापर केल्यास राज्यातील मृत्यू दर म्हणजे 'मिशन झिरो' ही संकल्पना सत्यात उतरण्यास फार वेळ लागणार नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग