कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्य शासनाने कठोर निर्बंध लावले जे अपेक्षित होते. मिनी लॉकडाऊन न करता विकेंड लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाचे दिवसाला 50 हजारापेक्षा नवीन रुग्ण सापडणाऱ्या राज्यात सर्वच जण कोरोनाच्या दहशतीखाली राहून आपले दैनंदिन कामकाज करीत आहेत. काही निर्बंधांमुळे कामकाजाची पद्धत बदलली आहे पण त्याशिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊन नकोय मग सध्या जे निर्बंध काही महिनाभरासाठी घालून दिले आहेत त्याच्यासोबत आता आपण जगायला शिकले पाहिजे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली असून आता नागरिकांनी कसं वागायचं याचे सल्ले अनेकांनी आजवर दिले मात्र ते काही नागरिकांनी न ऐकल्यामुळे आजची ही स्थिती राज्यावर ओढवली आहे. राज्य एका भयाण संकटातून जात असताना नागरिकांनी ह्या रोगट वातावरणात कसे वागले पाहिजे ही आता सांगण्याची वेळ नाही. कारण त्या गोष्टी सांगून आता त्याचा पार चोथा झालाय, आता वेळ आहे सध्या उद्भवलेल्या परिस्थितीचा धीराने सामना करायची. पाणी बरेच पुलाखालून वाहून गेले आहे. या कठीण काळात जे कोरोनाबाधित झाले आहेत त्यांचे कुटुंब मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशावेळी त्यांना कोविडच्या अनुषंगाने असणारा सुरक्षित वावर ठेऊन त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. त्या कुटुंबियांना या काळात मानसिक आधाराची गरज असते. सध्या शासनाने जे निर्बंध लावले आहेत, त्यामागे काहीतरी साधक विचार आहे हे समजून या पुढे वागले पाहिजे.            


चेस द व्हायरस पासून सुरु झालेला प्रवास आता ब्रेक द चेन पर्यंत येऊन पोहोचला आहे. या वर्षभराच्या प्रवासात प्रशासनाने अनेक जटील प्रसंगाचा मुकाबला करत नवनवीन गोष्टींचा, पर्यायांचा वापर करत या आरोग्याच्या आणीबाणीच्या उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना केला आहे. कोरोनाच्या या विषाणूंचा फैलाव ज्या पद्धतीने होत आहे त्या पद्धतीने अजून त्यांच्यावर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे सुरूच आहे. या विषाणूच्या आजाराबाबत अनेक गोष्टीची माहिती शोध घेण्याचे काम सुरूच आहे. त्यात या विषाणूच्या जनुकीय बदलांचे पुरावे समोर येत आहेत. जनुकीय बदल झालेला विषाणू हा अधिक घातक की सौम्य यावर अजून तज्ञांचे एकमत नाही. या वैश्विक महामारीच्या काळात आहे त्या ज्ञानाच्या आधारावर नागरिकांना मदत कशी करता येईल यासाठी शास्त्रज्ञ, डॉक्टर हे दिवसरात्र झटत आहेत. संशोधन ही निरंतर प्रक्रिया आहे, ती कायम सुरु असते नवनवीन गोष्टी त्यांना त्यांच्या संशोधनाच्या प्रवासात हाती लागत असतात त्याप्रमाणे त्यांचे मत तयार करून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांना मार्गदर्शन करत असतात. सामान्य माणसांना ज्या मार्गदर्शक सूचना मिळत असतात त्यामागे अनेकवेळा शास्त्रीय अभ्यास असतो काही ठोकताळे असतात. शासनाला मनाला वाटले म्हणून सूचना जारी केल्या जात नाही विशेषतः जागतिक आरोग्याच्या समस्यांच्या काळात. काही प्रशासकीय नियोजनात प्रशासन चूक असेल या गोष्टी नाकारता येत नाही त्या ठिकाणी त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, आवश्यक, योग्य ते बदल सुचविले पाहिजे, आणि नाही जर बदल घडले तर टीका करायचा अधिकार आहे. मात्र प्रत्येकवेळी व्यवस्थेवर टीका करायची हे योग्य नाही त्यामुळे या व्यवस्थेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्याचे खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज वर्षभर अत्यावश्यक सेवेत काम करणारे सर्वजण कोरोनाच्या संसर्गाचा धोका होऊ शकतो हे माहित असून सुद्धा जिद्दीने या काळात काम करत आहे, त्यांचे कौतुक करायलाच हवे. 


याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आणि के ई एम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता  डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले की " सध्याच्या परिस्थितीत राज्यात सरसकट लॉकडाऊन हा काही पर्याय होऊ शकत नाही. आपल्या आरोग्य यंत्रणेला रुग्णांवर उपचार करण्यात चांगले यश प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत आहे. राज्यात केवळ मानवी संपर्कामुळे या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसतंय. साथीच्या या आजारात गर्दी झाल्यामुळे या आजाराचा फैलाव होत आहे. त्यामुळे या आजारात विषाणूच्या संपर्काची साखळी तुटणे गरजेचे आहे त्यामुळे शासनाने असे  निर्बंध आणले आहे, त्यामुळे ही मानवी साखळी तुटण्यास मदत होईल. नागरिकांनी हे निर्बंध व्यवस्थित पाळल्यास 15 दिवसात आपल्याला याचा फरक दिसून येईल अशी मला खात्री आहे. आरोग्याच्या अनुषंगाने परिस्थिती चांगली नाही अशा काळात सुरक्षित वावर ठेवत प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. आपल्यामुळे समाजात कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे." 


रविवारी, कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी मंत्रिमंडळाने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल.  हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले. यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी  ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल. या निर्णयामुळे सरसकट लॉकडाऊन जरी केले नसले तरी गर्दी टाळण्यावर जितके निर्बंध लादता येतील त्या सर्व गोष्टी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. नागरिकांनी विकेंड लॉकडाऊन करून काय फायदा होणार, इतर राज्यात कोरोना वाढ होत नाही मग महाराष्ट्रातच का होते, या विषयावर चर्चा न करून आहे ते वास्तव स्वीकारून आपल्या आचरणात कसे अंगिकारता येतील याचा विचार केला पाहिजे. कारण जे काही निर्बंध लादण्यात आले आहे त्याबाबत राज्यातील वैद्यकीय तज्ञांचा जो राज्यासाठी टास्क फोर्स बनविला आहे त्यावर या संदर्भात चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे याची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांचा विचार करून हे निर्णय घेण्यात येत असतात.       


एप्रिल 2 ला ' तूर्तास मिनी लॉकडाऊन ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आणि दररोज नवीन उचांक गाठला जात आहे.  लॉकडाऊनची चर्चा गेली अनेक दिवस राज्यात सुरु आहे. कारण मंत्री मंडळातील काही सदस्यांनी याबाबत आपले मत व्यक्त करून इशारा वजा संकेत यापूर्वीच दिले होते. मात्र त्यानंतर काही राजकीय पुढाऱ्यांनी लॉकडाऊनमुळे लहान उद्योगधंदयांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसले कामगार - मजूर वर्गाचे हाल होऊ शकतात असे सूचक व्यक्त करून या संभाव्य लॉकडाउनला विरोध दर्शवला होता. त्यानंतर लॉकडाऊन न करता कठोर निर्बंध करण्याबाबत सूर आळविण्यात आला. अनेक वेळा गर्भित इशारे देऊनही रस्त्यांवरील गर्दी काही कमी होत नव्हती. अनेक जण तर सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून आपले दैनंदिन व्यवहार करीत आहेत. परंतु रुग्णसंख्या इतकी वाढली आहे कि काही दिवस रुग्णसंख्या अशीच वाढत  राहिली तर परिस्थिती हाताबाहेर निघून जाईल हे सांगण्यासाठी आता कुण्या तज्ञांची गरज नाही. असं मत व्यक्त करण्यात आलं होतं. 
 
शासनाने निर्बंध लावताना स्पष्ट केले आहे की आपल्याला मानवी साखळी तोडून मानवी संपर्क जितका कमी होईल त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे या निर्बंधांमुळे नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. कारण नागरिकांनी गर्दी टाळली तर गर्दी कमी होणार आहे. मग ती बाजारपेठातील असो, वा रस्त्यावरची वर्दळ जेवढी अनाठायी गर्दी टाळता येईल तेवढी टाळण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पहिली लाट ज्या पद्धतीने डिसेंबर - जानेवारी महिन्यात यश मिळविले होते त्याप्रमाणे दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. उद्याचा आरोग्यदायी महाराष्ट्रात घडविण्यासाठी आजच काही चांगले बदल घडवावे लागणार आहे. जर मानवी साखळी तुटून या साथीला आळा बसणार असेल तर सगळ्यांनी शासनाने घालून दिलेलं हे निर्बंध पाळण्यासाठी कटिबद्ध राहण्याची गरज आहे.  विशेष म्हणजे  ज्यातील सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संस्थांनी आणि  नागरिकांनी  समाजहिताचा विचार  करून या सध्या राज्यावर आलेल्या दुसऱ्या लाटेचा एकत्रपणे येऊन  मुकाबला केल्यास खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना बोलता येईल महाराष्ट्र थांबला नाही... थांबणार नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग : 


BLOG | मुंबईचा 'कोरोना'!


BLOG | संसर्ग रोखणे : आव्हान


BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा ....


BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना


BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क


BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा


BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय..


सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ


BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!


BLOG | आम्ही बिनधास्त काम करू 


दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना


BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा


BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची


BLOG | सह्याद्रीच्या मदतीला देवभूमी?


BLOG | 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान


BLOG | पांगळी मुंबई कुणाला आवडेल?