एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

BLOG : शाहिर अमर शेख आठवताना...

संयुक्त महाराष्ट्रासाठीची दिल्लीतली जाहीर सभा संपल्यानंतर आचार्य अत्रे अमर शेख यांना म्हणाले होते की, शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर  'शाब्बास शाहिर' अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं....अमरशेख धर्माने मुस्लीम पण त्यांनी ना कधी जात बघितली, ना कधी धर्म बघितला. आयुष्याची सुरुवात पाणक्या, गाडीचा क्लिनर नंतर गिरणी कामगार म्हणून, पुढे गिरणी कामगारांचा पुढारी म्हणून आणि पहाडी आवाजाच्या देणगीमुळे ते महाराष्ट्रात प्रसिद्ध तर झालेच पण लोकप्रियही झाले. शेख आडनावाच्या शाहिराची ही रसरशीत चित्तरकथा .... 

'महाराष्ट्र शाहिर' म्हणून विख्यात असलेले अमर शेख विस्मृतीत जाणं हा कृतघ्नपणा ठरेल. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत सामान्य मराठी जनतेचा त्याग हा तसा सगळयात मोठा आहे. आचार्य अत्रे, डांगे, एस. एम. जोशी, उद्धवराव, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील अशा थोर नेत्यांच्या घणाघातामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचली हे खरे असले तरी हे वातावरण तयार करण्यात शाहिर अमर शेख यांचे फार मोठे योगदान आहे. अमर शेख यांच्या बरोबरीने त्यांचे सहकारी आत्माराम पाटलांसह सर्वच शाहिरांनी यात मोलाचे काम केलेलं.  

सद्यकाळात कुणास खरी वाटणार नाही अशी अमर शेखांची दास्तान आहे. त्या काळी ग्रामीण भागात वीज नव्हती. साहजिकच माईक नव्हते. तरी देखील लाख-लाख लोकांच्या सभा फळ्यावर कुठे तरी खडूने जाहिरात करून जमत होत्या. या प्रचंड सभांचा प्रारंभ अमर शेख यांच्या शाहिरीने व्हायचा. जे कुणी सभेचे दिग्गज वक्ते असत ते रात्री कधीतरी उशिरा पोहोचत. कारण त्या काळात दहा वाजेपर्यंतच सभा आटोपली पाहिजे, असा नियम नव्हता. एकेका रात्री चार-चार सभा असत आणि सर्व सभा मागे-पुढे होत. अमर शेख यांनी आपल्या पहाडी आवाजाने सभा सुरू करून द्यायची आणि अत्रे, डांगे, एस. एम, उद्धवराव, क्रांतिसिंह हे पांडव सभेला पोहोचले की अमर शेख यांनी पुढच्या सभेला जायचे.

सभांची संख्या आणि रोजचे रुटीन पाहू जाता दुसरा एखादा शाहिर रक्त ओकला असता. या सभांना फारसा जामानिमा नसे. व्यासपीठावर तीन-चार कंदील असत. गावात पेट्रोमॅक्स असली तरी ती काँग्रेसवाल्याकडे असे. त्यामुळे ती मिळायची नाही आणि मग कंदिलावर सभा संपन्न व्हायची. सभेच्या शेवटच्या माणसाला व्यासपीठावरील माणसं दिसायचीच नाहीत. पण अमर शेख यांचा पहाडी आवाज शेवटपर्यंत पोहोचायचा. आसमंतात  सर्वत्र निरव शांतता असायची आणि डफावर थाप पडली की, अमर शेख यांच्या मुखातून ते धगधगते शब्द निखारा होऊन बाहेर पडायचे.

जनतेच्या सत्तेची ज्योत जागती 
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती
गोव्याच्या फिरंग्याला चारूनी खडे
माय मराठी बोली चालली पुढे 
एक भाषकांची होय संगती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती..’
अमर शेखपाठोपाठ आत्माराम पाटील हातात डफ घ्यायचे आणि त्यांच्या शाहिरीने एक जोश निर्माण व्हायचा..
‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय सरकारा
खुशाल कोंबडं झाकून धरा..’

महाराष्ट्र अक्षरश: पेटून उठलेला होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी जे काय हवं ते करायची तयारी मराठी माणसानं दाखवलेली होती आणि मग या शाहिरांच्या तोंडून ते शब्द लोक अक्षरश: झेलत होते.

बेल्लारी बेळगांव| 
पंढरी पारगाव। 
बोरी उंबरगाव । 
राहुरी जळगाव। 
सिन्नरी ठाणगांव। 
परभणी नांदगाव। 
व-हाडी वडगांव। 
शिरीचा बस्तार। 
भंडारा चांदा। 
सातारा सांगली। 
कारवार डांग। 
अन् मुंबई माऊली।
जागृत झालाय दख्खनपुरा.. खुशाल कोंबडं झाकून धरा..
सारी सभा या शाहिरांच्या आवाक्यात यायची. 

मुख्य व्यक्त्यांना सभेला यायला दोन दोन-तीन तीन तास उशीर व्हायचा आणि एवढा वेळ सभेला मंत्रमुग्ध करून ठेवणे हे सोपे काम नव्हते.  हे बुलंद आवाजाचे काम होते आणि हे शाहिर रक्ताचं पाणी करून दोन दोन-तीन तीन तास आपल्या ताब्यात सभा ठेवत होते.  त्यांचा डफ, त्यांचे तुणतुणे, त्यांची ढोलकी नि त्यांच्या पोवाड्यांची उत्तुंग गायकी! याने सारी सभा मोहरून जात होती. संयुक्त महाराष्ट्राचं वातावरण तयार करण्यात या लोकशाहिरांचे योगदान फार फार मोठे आहे.

संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश कोणी आणला त्यावर पुढे वाद झाला. पण तो मराठी जनतेने आणला. आचार्य अत्रे यांच्या वाणीने आणि 'मराठा' तील लेखणीने आणला. याचबरोबर महाराष्ट्रातील या दमदार शाहिरांनी छत्रपतींच्या काळातील शाहिरीचे अस्त्र अमोघ शस्त्रासारखं या चळवळीत वापरलं. संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीची जनमानसाची उत्कट इच्छा निर्मिती करण्याची जबाबदारी या शाहिरांनी पार पाडली, असा इतिहास महाराष्ट्राला लिहावाच लागला. असे असूनही या शाहिरांना काहीही मिळालेले नाही.  कोणतेही मानधन त्यांनी घेतलेले नाही. प्रवास खर्च कोणी दिला असेल तर ठीक पण एसटीची लाल गाडी आणि साध्या युनियनची उपलब्ध असतील ती वाहने यातून प्रवास करून सारा महाराष्ट्र पिंजून काढणारे हे शाहीर आणि त्यांचे नायक शाहीर अमर शेख यांना विसरणे अपराध ठरेल. 
 
संयुक्त महाराष्ट्रातील लढयाचे दोन-तीन मोठे टप्पे होते. त्यापैकी प्रतापगडचा मोर्चा हा एक टप्पा होता. मुंबई महापालिकेच्या निवडणुका समितीने जिंकणे हा मोठा टप्पा होता. त्याचप्रमाणे दिल्लीवर धडकलेला समितीचा विराट मोर्चा हा देखील फार मोठा टप्पा मानला जातो. दिल्लीच्या या मोर्चात अग्रभागी एक ट्रक होता. त्या ट्रकवर उभं राहून शाहीर अमर शेख यांची डफावर थाप पडली ती सकाळी दहा वाजता. मोर्चा दुपारी चार वाजेपर्यंत चालला. दहा ते चार असे सहा तास शाहिर अमर शेख गात होते. दिल्लीच्या रस्त्यावरील सरदारजीसह बाकी अन्य भाषिक मंडळी तोंडात बोटं घालून या शाहिराकडे पाहत होते. 
गगनभेदी स्वर होते ते!

अमर शेख यांचा आवाज दिल्ली भेदून जात होता. एका पाठोपाठ एक पोवाडे, गीते ते गात होते. 'जाग मराठा.. आम जमाना बदलेगा..' त्या रणरणत्या उन्हांत इतक्या वेळासाठी त्वेषाने गाताना अन्य कुठला शाहीर श्रमाने धराशायी झाला असता. अमर शेख यांच्यासोबत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे असायचे. त्यांचा उल्लेख न करणं अत्यंत कृतघ्नपणा होईल.  अण्णा भाऊंनी गीतं लिहायची आणि अमर शेख यांनी ती गायची असा जणू दस्तूरच होऊन गेला होता.  'माझ्या जिवाची होतीया काहिली' ही अण्णाभाऊंनी लिहिलेली छक्कड लावणी अमर शेख यांनी गावागावात पोहोचवली.

"या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची
मढयावर पडावी मूठभर माती, तशी गत झाली आमची
ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाऱ्यांची, मरणाऱ्याची, शेंडीची, दाढीची
हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची
बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी, हिरव्या माडीची
पैदास इथं भलतीच चोरांची, ऐतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची,
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, पर्वा केली नाही उन्हाची थंडीची, पावसाची,
पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची
त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची
बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एकभाषिक राज्याची
चकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली बिनीवरची
कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची
उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष
गोळी डमडमची छातीवर साहिली,
माझ्या जिवाची होतीया काहिली..
त्याचवेळी कवी नारायण सुर्वे यांची एक कविता अमर शेख यांच्या गायकीच्या माध्यमातून
 लोकांच्या मनात रूजली, ती कविता होती - 
"डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरिस राबून मी मरावं किती?
कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?.. "

दिल्लीचा मोर्चा संपल्यानंतर जाहीर सभा झाली. तेव्हा आचार्य अत्रे अमर शेख यांना म्हणाले, शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर 'शाब्बास शाहीर' अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं.

अमर शेख हे नुसतेच शाहिर नव्हते तर ते गीतकारही होते. 'अमर गीत', धरती माता, कलश, हे त्यांचे काव्यसंग्रह त्यांच्यातील साम्यवादी कवीची साक्ष पटवायला पुरेसे आहेत. 'कलश' या काव्यसंग्रहाला आचार्य अत्रे यांनी साठ पानांची प्रस्तावना लिहिली आणि 'कलश' चे महत्त्व त्यामुळे मराठी मनात घराघरात पोहोचले. याच 'कलश' मध्ये अमर शेख यांनी कोकिळच्या संगीतावर एक कविता लिहिली आहे. जगाला या कोकिळ आवाजाची मोहिनी अनेक वर्षे आहे. पण साम्यवादी कवीला या संगीतापेक्षाही गरीब माणसाच्या पोटातील भूक अस्वस्थ करीत आहे आणि म्हणून अमर शेख लिहून जातात..

कोकीळं गाऊ नको तव गीत
जाळीत सुटले मानवी हृदया..
जे भेसूर संगीत 
भूक येई?पायात माझी बघ
होई जीवाची तगमग तगमग
काय मला तारील तुझे संगीत
कोकीळं गाऊ नको तव गीत.....

शेख अमर / अमर शेख हे त्यांचे टोपण नाव होते. त्यांची कारकिर्द 20 ऑक्टोबर 1996 ते 29 ऑगस्ट 1969 इतकी राहिली. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुंभेफळ या गावी अमर शेख यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षी ते आईसोबत बार्शी येथे आजोळी गेले आणि तिथून पुढे त्यांची कारकीर्द बार्शीत बहरली. गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता.
 
गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचे ‘अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते 1930 - 32 च्या सुमारास सामील झाले. पुढे 1947 साली ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. 

स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला.  त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. 

कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते.ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र.के. अत्रे, मं.वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना  'महाराष्ट्राचा मायकोव्हस्की' म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर! कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.

'कलश' आणि 'धरतीमाता' हे त्यांचे काव्यसंग्रह, 'अमरगीत' हा गीतसंग्रह आणि 'पहिला बळी' हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. 'युगदीप' व 'वख्त की आवाज' ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. 'प्रपंच' आणि 'महात्मा ज्योतिबा फुले' ह्या चित्रपटांतून तसेच 'झगडा' या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. 'महात्मा फुले' हा चित्रपट तर आचार्य अत्रे यांचीच निर्मिती होय. अत्रे तेव्हा म्हणाले होते, अमर शेख म्हणजे धग, रग, आग यांची बेरीज होय.... आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला.त्यांच्या मरणोपरांत लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्धिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ 'शाहीर अमर शेख' अध्यासन सुरू करण्यात आले हीच काय ती अल्पशा समाधानाची बाब होय! 

या महान शाहिराची आज जयंती आहे. सद्यकाळात मुसलमान असणं हे घाऊकदृष्ट्या तिरस्काराची आणि हेटाळणीची बाब होऊन बसली आहे, शिवाय मुसलमान म्हणजे देशद्रोहीच असला पाहिजे अशी विखारी समीकरणे जाणीवपूर्वक लोकांच्या मनात दृढ केली जाताहेत. त्यामुळेच एके काळी अमर शेख नावाच्या मुस्लिम शाहिराने रक्ताचे पाणी करून विद्रोहाचा आवाज बुलंद केला होता हे हेतुतः मांडावे लागते. शाहीर अमर शेख यांना त्रिवार अभिवादन.....

(फेसबुक पोस्टवरून साभार)

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahayuti Ministers in New Government : श्रीरंग बारणे ते नरेश म्हस्के...महायुतीत कुणाकुणाला मंत्रिपद?ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 08 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar MLAs Absent in Meeting : पुन्हा धक्कातंत्र? अजित पवार यांच्या बैठकीला आमदारांची दांडी!Navneet Rana Ravi Rana : राणा दाम्पत्याला दिल्लीतून बोलावणं, भाजप नेत्यांनी धाडला आदेश! ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
Embed widget