एक्स्प्लोर
जनसंघर्ष-सरकारशी आणि स्वतःशी!
सरकारच्याच काही धोरणांमुळे राज्यातील राजकारणाच्या मरगळलेल्या पाटा पिचमध्ये ताजेपणा आलाय. आता या ताजेपणाचा फायदा घेण्यासाठी आपल्याकडील सर्व दारूगोळा घेऊन सरकारवर तुटून पडलं पाहिजे, हे राज्यातील काँग्रेस नेत्यांना सत्ता जाऊन चार वर्ष होत असताना तरी कळालं. हे कळलेलं वळवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे राज्यात नुकतीच पार पडलेली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा.
सत्ता मिळवायची असेल तर लोकांना समर्थ पर्याय दिला पाहिजे. पूर्वपुण्याई, शेवटच्या टप्प्यातली धावपळ, दिल्लीश्वरांची जादू या सर्व गोष्टी नेहमीच उपयोगाला येतील असे नाही. मोदी-शाहांचा भाजप सर्वशक्तीनिशी ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी जंग-जंग पछाडत असताना आपण गाफील राहता कामा नये. सरकारच्याच काही धोरणांमुळे राज्यातील राजकारणाच्या मरगळलेल्या पाटा पिचमध्ये ताजेपणा आलाय. आता या ताजेपणाचा फायदा घेण्यासाठी आपल्याकडील सर्व दारूगोळा घेऊन सरकारवर तुटून पडलं पाहिजे, हे राज्यातील काँग्रेस नेत्यांना सत्ता जाऊन चार वर्ष होत असताना तरी कळालं. हे कळलेलं वळवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे राज्यात नुकतीच पार पडलेली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा.
या यात्रेचा पहिला टप्पा होता पश्चिम महाराष्ट्र. कोल्हापूरहून यात्रा सुरू झाली. सतेज पाटील यांनी सुरुवातच दणक्यात केली. दक्षिण कोल्हापूरची जागा सतेज पाटील यांनी मागितली जिथे राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक खासदार आहेत. उमेदवार कोणीही द्या ती जागा निवडून आणतो, अशी घोषणा करून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली. जनसंघर्ष यात्रेची सुरुवात झाली होती या पार्श्वभूमीवर की राष्ट्रवादीने लोकसभा आणि विधान सभेसाठी काँग्रेसकडे 50-50 जागा मागितल्या. पण जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसने जागोजागी आघाडी घेत 2019 निवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केले.
जनसंघर्ष यात्रेने काय साधलं?
जनसंघर्ष यात्रा 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर कोल्हापूर, सांगली, सातारा ,सोलापूर, पुणे ह्या जिल्ह्यात गेली. यात्रेच्या सुरुवातीपासून नेत्यांमध्ये उत्साह होता. मल्लिकार्जुन खरगे यांनी कोल्हापुरात स्पष्ट केलं की नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपआपसातले वाद मिटवून एकत्र काम केलं पाहिजे. यात्रेत अशोक चव्हाण- पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील-बाळासाहेब थोरात, कल्लपाण्णा आवाडे- जयवंतराव आवळे, विश्वजित कदम-विशाल पाटील आजवर नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड असलेले नेते एकत्र आले. तालुका, जिल्हा पातळीवर पक्षाला आलेली मरगळ झटकल्याच चित्र होत. रस्त्यात यात्रा जिथून गेली जागोजागी कार्यकर्ते उत्साहात दिसले, स्वागत केलं. अनेक गावांत नेत्यांनी यावं, बसमधून फिरावं आमदारांचा आग्रह होता. ते ही ज्येष्ठ नेत्यांनी केल्यामुळे एक पद्धतीने आमदारांनी शक्तीप्रदर्शन केलं. कधी नव्हे ते नेते चहाच्या टपरीवर चहा पिताना, शेतात जेवताना दिसले. आपल्या कार्यकर्त्यांबरोबर जनतेबरोबर आपलं पद विसरून मिसळताना दिसले हे सकारात्मक चित्र होत.
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतून नेमकं काय निसटलं?
काँग्रेसने यात्रेचा कार्यक्रम कागदावर व्यवस्थित आखला पण राबवताना अनेक अडचणी होत्या. विशेषतः दिवसाची सुरुवात वेळीच करणं. सकाळी आठ किंवा नऊला प्रवासाला सुरुवात करायचं ठरवलं तरी अनेक नेते वेळेत तयार होत नसल्याच्या तक्रारी होत्या. काही ठिकाणी आमदार स्वतःच्या मतदार संघात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जास्त वेळ रॅली करत होते, सभा लांबल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी पुढच्या सभेसाठी उशीर होत होता. मग नेते सभा वाटून घेत हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील हे पुढे जाऊन तिथली सभा सांभाळून घेत, सभेची सांगता मग अशोक चव्हाण यांच्या भाषणाने व्हायची. पण अनेकदा दिलेल्या वेळेपेक्षा दोन-तीन तास सभा उशिराने सुरू व्हायच्या. शहरात लोक घरी गेल्यावर राजकीय सभा ऐकतात त्यामुळे रात्री साठे आठला सभा हे नॉर्मल मुंबईसारख्या शहरात आहे. पण गावात लोक साडे आठ वाजता जेवून घरी झोपण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे सभा नियोजन, दिलेली सभेची वेळ पाळण्यात काँग्रेस नियोजन कमी पडल.
भाषण
जनसंघर्ष यात्रेच्या सुरुवातीला काँग्रेसचे सर्वच नेते सर्वच विषयांवर बोलत होते. मुद्देसूद सरकारच्या धोरणांवर घणाघात करण्यापेक्षा मुळमुळीत भाषण होत होती. त्यामुळे सभा लांबायच्या. अखेरीस कोण कोणत्या सभेत कोणते मुद्दे मांडणार हे नेत्यांमध्ये ठरले. देशपातळीवरील मुद्दे पृथ्वीराज चव्हाणांकडे, तर सनातन संस्था, शहरी नक्षल या मुद्द्यांवर विरोधी पक्ष नेते विखे पाटील सुरुवातीपासून टिकून होते. अशोक चव्हाण शेतकरी कर्जमाफी अशा विषयांबरोबर त्या दिवशीची महत्वाची घडामोड यावर भाषणातून टीका करत होते. मोठी मोठी भाषण कमी करण्यात आली. नेत्यांना सांगावं लागलं इतक्या वेळेत इतकीच भाषण करा, काही ठिकाणी वेळ संपला की घंटी मारून आठवण पण करून देण्यात आली, याचा फायदा शेवटच्या सभेत झालं की सर्व नेत्यांनी मुद्देसूद आटोपशीर भाषण केली.
लोकांना तीच काँग्रेसी भाषेतील भाषण अपील होताना दिसत नव्हती. राफेल डीलसारखा मुद्दा इचलकरंजी किंवा म्हसवड सारख्या ठिकाणी लोकांना कसा समजणार? जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने काय झालं हे पाणी न मिळणाऱ्या मतदारसंघात सांगून लोकांची सहानुभूती मिळत नाही. रत्नाकर महाजन आणि सचिन सावंत यांच्यासारखे अभ्यासू आणि कमी शब्दात उत्तम टीका करणारे प्रवक्ते असूनही त्यांचा वापर झाला नाही. आणि किमान भाषणाबाबत कमी शब्दात नेमकी कोणते मुद्दे प्रभावीपणे कसे मांडायचे. ह्यात या दोघांचा हतखंड असताना त्यांच्या या क्षमतेचा वापर करून घेतला नाही.
आमदारांनी आपल्या भाषणात हे स्पष्ट बोलून दाखवल की सभा होतात पण निवडणुकीच्या वेळी आपलीच लोक पायात पाय घालतात. त्यामुळे एकत्र आले पाहिजे. आता टाळ्या वाजवून काही होणार नाही. भाषणात देखील हर्षवर्धन पाटील, विजय वडदेतीवर, सतेज पाटील, जयकुमार गोरे यांनी चांगली दणदणीत भाषण केली ज्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद होता. लोकांचा भाषणाला प्रतिसाद मिळाला म्हणून विखे पाटील, अशोक चव्हाण यांनी सभेत लोकांना प्रश्न विचारायला, हात वरून करून उत्तर द्यायला सुरुवात केली. ह्याचा फायदा झाला.
विशेष बाब
अनेक ठिकाणी सभा चांगल्या झाल्या. विश्वजित कदम यांनी शक्तिप्रदर्शन करत मोठी बाईक रॅली काढली, इचलकरंजीत पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचं जंगी स्वागत ,सभा झाली. पण कराड जिथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा ठेवली त्या नाट्यगृहात पाचशेच्या आसपास लोक जमली होती. एकत्र सभा खुल्या मैदानात न घेता सभागृहात जाई, जिथे 800 लोक येऊ शकतील. ते सभागृह पण पूर्ण भरलं नव्हतं. आणि सभाही उशिरा झाली. त्यामुळे कराडमध्ये पक्ष मजबूत झाला पाहिजे. विलास काका उंडाळकर यांच्यासारखा जुने काँग्रेस नेते पक्षात आले पाहिजे, त्यांच्याशी जुळवून घेतलं पाहिजे असे संकेत पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
इंदापूर जागा आणि बारामती
या यात्रेत लक्ष लागून होत इंदापूर या मतदारसंघात काँग्रेस काय करणार? हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील दोघांनी या मतदारसंघावर आपला क्लेम टाकला. इथे सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी जय्यत तयारी करत शक्तिप्रदर्शन केलं. तब्बल चार तास नेते याच मतदारसंघात होते. सर्व नेत्यांनी आपल्या भाषणात हर्षवर्धन पाटील हेच निवडणूक लढवणार अस भाष्य केले. आणि अशोक चव्हाण यांनी पण या मतदार संघाबाबत शरद पवार आणि राहुल गांधी यांच्याशी मी स्वतः बोलणार अस स्पष्ट केलं. आघाडीची चर्चा सुरू व्हायच्या आधीच काँग्रेस विवादित मतदारसंघात आक्रमक पवित्रा घेऊन राष्ट्रवादीवर दबाव वाढवत असल्याचं स्पष्ट झालं. आघाडीत बिघाडी होणारी महत्वाची जागा म्हणजे इंदापूर असताना काँग्रेसच आक्रमक होणं, अजित पवार याबाबत कसे react करतात याकडे आता लक्ष आहे. तसंच शरद पवार आणि विखे पाटील यांचं वैर जुनं आहे. बारामतीमध्ये जनसंघर्ष यात्रा पोहोचल्यावर विखे पाटील याबी चक्क बुलेट सफारी केली. पवारांना जणू तुमच्या घरात येऊ आव्हान दिल्याचा एक इशारा.
प्रदेशाध्यक्ष -अशोक चव्हाण
काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर नारायण राणे यांनी टीका केली. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हरलेल्या निवडणुका, राष्ट्रवादी आक्रमक होत असताना विधान परिषद निवडणूक, लोकसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव यामुळे अशोक चव्हाण यांच्याबाबत पक्षात नाराजीची कुजबुज होती. नांदेड महापालिका जिंकून अशोक चव्हाण यांनी गड राखला. मोहन प्रकाश प्रभारी बदलल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे आले आणि प्रदेशध्यापदी अशोक चव्हाण बदलणार का हा प्रश्न होता. पण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढायला देऊन अशोक चव्हाण यांना पक्षाने पाठबळ दिलं. आणि या यात्रेत 2019 निवडणूक अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार हे अधोरेखित झालं. यात्रेत केलेलं नेतृत्व, प्रत्येक सभेत शेवटचं भाषण चव्हाण यांचं. पक्षाच्या इतर लोकांनी सगळे मुद्दे मांडल्यावर विशेष काही मुद्दे उरत नसताना पण केलेली बँटिंग. यात्रा नीट चालू आहे का, मीडियामध्ये येणारं वार्तांकन, कुठे कमी पडतो अजून काय करता येईल, पक्षातील नेत्यांना सांभाळून घेण्याची तयारी यात्रेत स्पष्ट दिसून आली. पक्षश्रेष्ठीना यात्रेला बोलवून संघटनेतील नेते एकत्र ,एका मंचावर येत आहेत हे दाखवलं. उमेदवारी जाहीर करून आमदारांना आत्मविश्वास दिला. आघाडीची चर्चा सुरू होण्याआधी उमेदवारी घोषित करून राष्ट्रवादीवर काँग्रेस दबाव टाकू शकते हे दाखवलं.
जनसंघर्ष यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात आली. गेली पंधरा वर्षे जिल्ह्यातील राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू, एकमेकांच तोंड न पाहणारे नेते एकाच मंचावर येऊन गळ्यात गळे घालताना दिसले आणि एका दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली. अरे ही यात्रा तर तंटामुक्ती यात्रा आहे आणि जनसंघर्ष यात्रा ही जनतेसाठी कमी पण काँग्रेस जनांना संघर्ष करायला शिकवणारी ठरली.
काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार
पलूस कडेगाव - विश्वजित कदम ( सद्य आमदार)
जत - विक्रम सावंत (उमेदवारी)
इचलकरंजी- प्रकाश आवाडे (उमेदवारी)
पंढरपूर - भारत भालके ( सद्य आमदार)
इंदापूर- हर्षवर्धन पाटील (उमेदवारी)
भोर- संग्राम थोपटे( सद्य आमदार)
म्हसवड - जयकुमार गोरे ( सद्य आमदार)
अक्कलकोट- सिद्धराम मेहेत्रे ( सद्य आमदार)
सोलापूर- प्रणिती शिंदे ( सद्य आमदार)
शिरोळ- गणपत पाटील ( अप्रत्यक्ष सूचित)
हातकणंगले- राजू आवळे ( उमेदवारी)
विटा- सदाशिव पाटील (उमेदवारी)
पुणे कंटोंटमेंट - रमेश बागवे ( उमेदवारी)
कोल्हापूर- सतेज पाटील दक्षिण कोल्हापूर जागा मागितली सद्य राष्ट्रवादीचा खासदार आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement