एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

हिंदुस्थान का दिल देखो... निवडणुकीच्या निमित्ताने मध्य प्रदेशच्या अंतरंगाचा शोध...

ग्वाल्हेरच्या रस्त्याला लागलो आणि पुन्हा एकदा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील रस्त्यांची तुलना सुरू झाली. पुन्हा एकदा यासाठी की भोपाळला उतरल्या उतरल्या इथले मोठे, स्वच्छ, सुंदर रस्ते, कडेला असलेली मोठ मोठी झाडं, नकळतपणे डोळ्यात भरत होती. महाराष्ट्रातील रस्त्यांचा आणि पुण्याच्या वाहतुकीचा अनुभव असलेल्याला मध्य प्रदेशातील या रस्त्यांच अप्रुप वाटल्याशिवाय रहात नाही.

>> मंदार गोंजारी, एबीपी  माझा

भोपाळमधील रिविएरा टाऊन या सोसायटीमध्ये प्रज्ञा सिंग यांचा बंगला आहे. आम्ही सकाळी तीथं पोहचलो तेव्हा घराबाहेर मोठी वर्दळ दिसली. त्या गर्दीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्यांचा समावेश होता. सगळेच न बोलावता स्वत: हून आले होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे विवेकानंद उजळंबकर आणि त्यांचे मराठवाड्यातून आलेले सहकारी तीथं भेटले. इथं येऊन आपण एक कर्तव्य पार पाडत आहोत अशी त्यांची भावना होती. आम्ही प्रचार करण्यासाठी इथं आलो आहोत, असं जो तो सांगत होता. पण त्यांचं इथं येणं प्राचारापेक्षा प्रतिक्रियात्मक वाटत होतं. अशा लोकांची जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी माध्यमांच्या प्रतिनधींची होती.

प्रज्ञा सिंग बाहेर कधी येणार हे कोणालाच माहित नसल्याने न्यूज चॅनलच्या रिपोर्टर-कॅमेरामनना घरासमोर घुटमळणाऱ्या या लोकांची मुलाखत घेऊन वेळ मारुन न्यावी लागत होती. दीड-दोन तास आम्ही प्रज्ञा सिंग यांच्या घरासमोर थांबलो. प्रज्ञा सिंग यांच्या आतल्या गोटातील काहींशी यावेळी बोलता आलं. ज्योतिषाचा व्यवसाय करणारे भारत भूषण जोशी त्यापैकी एक. प्रज्ञा सिंग यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे हे नेते प्रचाराकडे पाठ फिरवून होते. केंद्रातून एखादा वरिष्ठ नेता आला की भाजपचे भोपाळमधील नेते तोंडदेखलं हजर राहायचे. प्रज्ञा सिंग याही या भाजप नेत्यांना प्रचारात बोलावत नव्हत्या. भारत भूषण जोशी यांना याबद्दल छेडलं असता त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांचा उद्धार करायला सुरुवात केली. पण प्रज्ञा सिंग यांना निवडून आणण्याची जबाबदारी संपूर्ण परिवाराची असल्याच सांगत ते निर्धास्त होते. स्वत: प्रज्ञा सिंग तर त्याहून अधिक निर्धास्त होत्या.

सलग तीस वर्ष भोपाळमधून भाजपचा खासदार निवडून येत असल्यानं त्यांच्यामधे हा निर्धास्तपणा आला असावा. यावेळी भोपाळची लढत इतकी प्रतिष्ठेची होऊन देखील प्रज्ञा सिंग यांच्या संपूर्ण प्रचारामधे हा निर्धास्तपणा पहायला मिळाला. सकाळी उशीरा सुरू होणारा त्यांचा प्रचार दुपारी विश्रांतीसाठी थांबायचा. उन उतरायला लागलं की पुन्हा प्रचाराला सुरुवात व्हायची. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अत्याचारामुळे आपल्याला पायऱ्या चढता - उतरताना त्रास होतो, असा दावा प्रज्ञा सिंग करतात. त्यामुळे पायऱ्यांपर्यंत स्वत: चालत येणाऱ्या प्रज्ञा सिंग यांना पायऱ्या चढता-उतरताना मात्र आधार घ्यावा लागतो. प्रचारादरम्यान मोटर सायकलच्या पाठिमागे बसून भोपाळच्या शक्य तेवढ्या भागात जाण्याचा प्रज्ञा सिंग यांनी प्रयत्न केला.

प्रज्ञा सिंग यांच्या घरासमोर उभं राहिलो असताना आदल्या दिवशी पाहिलेल्या कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांच्या प्रचाराची आठवण झाली. भोपाळमधील लाल घाटी भागात दिग्विजयसिंह यांची पदयात्रा सुरू असताना आम्ही तीथं पोहचलो होतो. सत्तरीतले दिग्विजयसिंह फीट असल्यानं भराभर चालत होते. पदयात्रा कुठल्या रस्त्यानं जाणार, कुठल्या चौकात कोण कार्यकर्ते त्यांचं स्वागत करणार, कुठल्या ठिकाणी सभा होणार याचं काटेकोर नियोजन दिग्विजयसिंह यांच्या प्रचारात पहायला मिळत होतं.

दिग्विजयसिंह आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते जीवाचं रान करत होते. पण एकप्रकारची अस्वस्थता त्यांच्यामध्ये जाणवत होती. जीव ओतून प्रचार करणाऱ्या अनुभवी दिग्विजयसिंहांची अस्वस्थता आणि विरोधात लढणाऱ्या नवख्या प्रज्ञा सिंग यांचा निर्धास्तपणा भोपाळच्या लढतीच वास्तव सांगत होता. मात्र भोपाळबरोबरच मध्य प्रदेशातील इतर लोकसभा मतदारसंघ कव्हर करायचे असल्यानं आम्हाला निर्धास्त होऊन चालणार नव्हतं. भोपाळहून ग्वाल्हेरला जाण्यासाठी आम्हाला प्रज्ञा सिंग यांच्या घरासमोरुन निघावं लागलं.

दुपार झाली होती आणि भोपाळपासून ग्वाल्हेर हे अंतर चारशे किलोमीटरपेक्षा जास्त होतं. शिवाय मधे गुणा-शिवपुरी हा ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मतदारसंघही कव्हर करायचा होता. ग्वाल्हेरच्या रस्त्याला लागलो आणि पुन्हा एकदा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील रस्त्यांची तुलना सुरू झाली. पुन्हा एकदा यासाठी की भोपाळला उतरल्या उतरल्या इथले मोठे, स्वच्छ, सुंदर रस्ते, कडेला असलेली मोठ मोठी झाडं, नकळतपणे डोळ्यात भरत होती. महाराष्ट्रातील रस्त्यांचा आणि पुण्याच्या वाहतुकीचा अनुभव असलेल्याला मध्य प्रदेशातील या रस्त्यांच अप्रुप वाटल्याशिवाय रहात नाही. शिवराजसिंह चौहान यांच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत मध्य प्रदेशातील रस्ते अमुलाग्र बदलले. 1993 ते 2003 अशी सलग दहा वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या दिग्विजयसिंहांची आणि कॉंग्रेसची 2003 ला रस्ते आणि विजेच्या मुद्द्यावर अक्षरशः धुळधाण उडाली. त्यानंतर पंधरा वर्षं सत्तेचा वनवास भोगलेली कॉंग्रेस आत्ता कशीबशी सत्तेवर आलीय.

हिंदुस्थान का दिल देखो... निवडणुकीच्या निमित्ताने मध्य प्रदेशच्या अंतरंगाचा शोध...

दिग्विजयसिंहांच्या विरोधकांकडून त्यांच्या त्या दहा वर्षांची अजुनही मतदारांना भीती दाखवली जाते. ग्वाल्हेरच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. मोठ्या - रुंद, खड्डे नसलेल्या रस्त्यांना सर्विस रोडची जोड होती. सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा सोडल्या तर मध्यप्रदेशचा बहुतांश भाग पठारी आहे. दोन्ही बाजूला असलेल्या सपाट काळ्याभोर रस्त्याच्या मधून आमचा प्रवास सुरु होता. शेकडो मैल पसरलेली काळी कुळकुळीत सपाट जमीन पिकांची कापणी झाल्यामुळे उघडी पडली होती. गहू, सरसों म्हणजे मोहरी आणि डाळींसाठी मध्य भारत ओळखला जातो. मात्र काळी - सुपीक जमीन आणि पाणी उपलब्ध असतानाही नगदी पिकांचा अभाव जाणवत होता. इथले शेतकरी ऊस का पिकवत नाहीत याची चौकशी केली असता इथं साखर कारखाने होते पण ते बंद पडल्यान शेतकऱ्यांनी ऊस पिकवणं काही वर्षांपूर्वी बंद केल्याच समजलं. रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या, गंजलेल्या अनेक कंपन्यांचे सांगाडे नजरेस पडत होते. मध्य प्रदेशात उद्योग उभारणीसाठी प्रयत्न झाले नाहीत असं नाही पण अनेक उद्योग आंदोलनं आणि नको त्या कारणांनी इथं मूळ धरू शकले नाहीत. सिमेंटच्या - गुळगुळीत रस्त्यावरुन जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी घरं मात्र मातीची, अर्धी कच्ची होती...

संध्याकाळ होत असताना आम्ही ईसागढ या गुना लोकसभा मतदारसंघातील गावात पोहचलो. ज्योतिरादित्य सिंधियांची या गावात सभा होणार होती. काही मिनिटातचं सांधियांच्या गाड्यांचा ताफा आवाज करत गावात आला. चौराह्यावर स्वागतासाठी जमलेल्या लोकांनी महाराज सिंधिया जिंदाबाद म्हणून घोषणा दिल्या आणि ज्योतिरादित्य सिंधियांच्या गळ्यात हार घातला. गाडी पुढं निघाली. पुढच्या चौकात माधवराव सिंधियांच्या पुतळ्याला वंदन करून ज्योतिरादित्य थेट सभेच्या स्टेजवर पोहचले. स्टेजवर एकही खुर्ची नव्हती. सगळे नेते ज्योतिरादित्य सिंधियांच्या भोवती जमा झाले. सिंधियांनी समोर जमलेल्या गर्दीला नमस्कार केला आणि शेजारी जमलेल्या नेत्यांना एक एक करून भाषण करण्याच्या सूचना केल्या. उभ्या उभ्याच सिंधियांच्या सभेला सुरुवात झाली. भाषण करणारे काय बोलतायत यापेक्षा सिंधियांना बघण्यात लोकांना रस होता. महाराज आपल्या गावात आपल्याला भेटायला आलेत यांचं मोठं अप्रुप लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

सिंधियांची राजधानी ग्वाल्हेर. पण राजघराण्यातील व्यक्तींची निवडणूक लढविण्यासाठी ग्वाल्हेरपेक्षा गुना या ग्रामीण लोकसभा मतदारसंघाला पसंती राहिलीय. ज्योतिरादित्य सिंधियांच्या आजी विजयाराजे सिंधिया या पहिल्यांदा खासदार बनल्या त्या गुना लोकसभा मतदारसंघातून. त्यांच्यानंतर माधवराव सिंधिया आणि आता ज्योतिरादित्य सिंधिया गुना मधून निवडून जातात. सिंधियांचं ग्वाल्हेरच साम्राज्य मध्य प्रदेशातील मोठ्या भागावर पसरलं होतं. पण लोकशाहीत आता ते गुना लोकसभा मतदारसंघापूरतं मर्यादित राहिलय. बऱ्याच नेत्यांची भाषणं झाल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधियांनी माईक स्वत:कडे घेऊन भाषण करायला सुरुवात केली. भाषणात सगळा जोर मोदी आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीका करण्याकडे आणि स्वत केलेल्या कामांची माहिती देण्याकडे होता.

त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवाराचा सिंधियांनी साधा उल्लेखही केला नाही. मै मेरी प्रजासे मिलने नही, मेरे परिवारसे मिलने आया हूं असं म्हणत ज्योतिरादित्य सिंधियांनी भाषण संपवलं आणि समोरच्या गर्दीने पुन्हा एकदा सिंधिया महाराज की जय म्हणून गलका केला. स्टेजवरुन ज्योतिरादित्य सिंधिया थेट गाडीत जाऊन बसले आणि पुढच्या सभेसाठी रवाना झाले. रात्रीचे नऊ वाजले होते आणि ईसागढमधून ग्वाल्हेर बरंच दूर होतं. त्यामुळे आम्हीही लगेच निघालो. मध्य प्रदेशातून प्रवास करताना एक गोष्ट लक्षात येत होती ती म्हणजे इथे शाकाहारी हॉटेल्सचा सुकाळ असला तरी नॉनव्हेज हॉटेलचा बोर्ड शोधावा लागत होता. आश्चर्य वाटेल पण भोपाळ ते ग्वाल्हेरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना आम्हाला नॉनव्हेजच एकही हॉटेल दिसलं नव्हतं. रात्री अकरा वाजता ग्वाल्हेरपासून 60- 70 किलोमीटर अलिकडे बलराम राठोड का शुद्ध शाकाहारी भोजनालय या नावाचा बोर्ड पाहून थांबलो. हा एक मोठ्ठा ढाबा होता. बाहेर शुद्ध शाकाहारीचा बोर्ड होता पण आतमध्ये शाकाहारी बरोबरच मांसाहारी जेवणावरही लोक ताव मारत होते. जेवण झाल्यावर ढाब्याच्या मालकाला त्याबद्दल विचारलं तर तो म्हणाला यहाँ लोग खातें तो है मगर दिखाना नही चाहते.... त्याच्या या उत्तराने हसू आलं. बलराम राठोडचा निरोप घेऊन निघालो आणि ग्वाल्हेरला पोहचलो.

हिंदुस्थान का दिल देखो... निवडणुकीच्या निमित्ताने मध्य प्रदेशच्या अंतरंगाचा शोध...

ग्वाल्हेरमधून भाजपने विवेक शेजवलकर यांना लोकसभेची उमेदवारी दिलीय. विवेक शेजवलकर हे गेली दहा वर्षं ग्वाल्हेरचे महापौर आहेत. त्यांचे वडील नारायण शेजवलकर हे दोनदा लोकसभेचे तर एकदा राज्य सभेचे खासदार होते. इंदौरमधून भाजपच्या सुमित्रा महाजन गेली अनेक वर्षं निवडून येतायत. मध्य प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापला आणि वाढवला तो महाराष्ट्रातून इथं आलेल्यांनी. तीच बाब जनसंघ आणि भाजपच्या बाबतीतही. इंदुरमधे 3 लाख मराठी मतदार आहेत, तर ग्वाल्हेरमध्ये 50 हजार. त्यामुळे ही शहरं मराठी भाषिकांचे आणि पर्यायानं भाजपचे बालेकिल्ले बनलीत. सकाळी ग्वाल्हेरच्या भाजप कार्यालयात गेलो. हिंदी भाषिक अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी तीथं होते. पण कार्यालयाच नियंत्रण होतं ते पवन गणपुले या मराठी माणसाकडं. महाराष्ट्रातून आलोय हे कळल्यावर गणपुले मराठीत बोलायला लागले. त्यांच्याकडून ग्वाल्हेरमधील मराठी मंडळाच्या नितीन वाळिंबेंचा नंबर मिळाला. वाळिंबेंना भेटायला घरी गेलो. वाळिंबेंच्या घरावरील पाटी मात्र वालम्बे अशी होती. शिंदेंचे जसे सिंधिया झाले तशीच इतर मराठीजणांची नावं देखील मध्य प्रदेशात बदलली.

सकाळी ग्वाल्हेरच्या एका मोठ्या उद्यानात मराठी लोकांसोबत एक कार्यक्रम करायचं ठरलं. इथला बहुतांश मराठी माणूस हा भाजपचा पाठिराखा आहे हे माहिती होतं. पण सकाळी जेव्हा उद्यानात पोहचलो तेव्हा भाजपचे बिल्ले आणि उपरणे घालून आलेले मराठीजण पाहून गंमत वाटली. कार्यक्रम सुरू झाल्यावर त्यांनी आम्ही भाजपला मतदान करणार असल्याचं सांगायला सुरुवात केली. पहिली फेरी संपल्यानंतर त्यांना भोपाळमधील प्रज्ञा सिंग आणि त्यांनी केलेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. अनेकांनी उत्तर देणं टाळलं, काहींनी प्रज्ञा सिंग निर्दोष असल्याच सांगितलं तर खुप थोड्यांनी प्रज्ञा सिंग यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं. आमचा हा कार्यक्रम मराठीत सुरु होता. त्यामुळे तो उद्यानात फिरायला आलेल्या हिंदी भाषिक लोकांना समजत नव्हता. पण सगळे माजप समर्थक एकत्र आल्याच त्यांच्या ध्यानात आलं आणि उद्यानातील कॉंग्रेस समर्थक असलेल्यांनी कार्यक्रमात उडी घेतली.

भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशा वादाला पुढं मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असं वळण लागायला लागलं. मात्र त्यातून ग्वाल्हेरच्या राजकारणावर असलेल्या मराठी पकडीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. तेथून भाजपचे उमेदवार विवेक शेजवलकर यांच्या वाड्यावर आम्ही पोहचलो. शेजवलकरांच्या घराचं स्वरुप त्यांनी अजुनही वाड्यासारख ठेवलंय. मराठीपण जपणं राजकारणात गरजेचं वाटत असावं कदाचित. शेजवलकरांना तुम्ही कोणत्या मुद्यावर निवडणूक लढवत आहात असं विचारलं असता त्यांनी महापौर म्हणून केलेल्या कामांपेक्षा मोदींवर बोलायला सुरुवात केली. शेजवलकरांनंतर कॉंग्रेस उमेदवार अशोक सिंह यांच्या बंगल्यावर पोहचलो. बंगल्यासमोर ठोकलेल्या तंबूत लेंगा शर्ट घातलेल्या आणि गळ्यात पांढरं उपरण ज्याला गमछा म्हणतात अडकवलेल्यांची गर्दी होती. स्वत: अशोक सिंह देखील त्याच वेषात होते. त्यांना तुम्ही कोणत्या मुद्यावर निवडणूक लढवत आहात असं विचारलं असता त्यांनी देखील मोदींवर बोलायला सुरुवात केली. अर्थात उलट पद्धतीनं.

अशोक सिंह यांच्या निवडणूक फ्लेक्सवर ज्योतिरादित्य सिंधियांचा फोटो मोठा करून वापरण्यात आला होता. सिंधियांमुळे मराठी मतं मिळतील या आशेने. पण ग्वाल्हेरमधील मराठी लोक आणि सिंधियांमध्ये एक अंडरस्टन्डींग आहे. माधवराव आणि त्यांच्यानंतर ज्योतिरादित्य कॉंग्रेसमधून निवडणूक लढवताना गुना मतदारसंघाची निवड करतात. त्यामुळे ग्वाल्हेरमधील मराठी लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे भाजपच्या मागे उभा राहता येतं. पण 1984 ला ग्वाल्हेरमधून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात काँग्रेसने माधवराव सिंधियांना मैदानात उतरवले. त्यावेळी मात्र ग्वाल्हेरमधील मराठी लोक आणि एकूणच जनता माधवराव सिंधियांच्या मागे उभा राहिली आणि वाजपेयींचा पराभव झाला. त्यानंतर माधवराव आणि पुढं ज्योतिरादित्य सिंधियांनी गुना मतदारसंघाची निवड केली आणि एखादा अपवाद वगळता ग्वाल्हेर भाजपकडे गेलं ते आजतागायत. त्यानंतर ग्वाल्हेरचा प्रसिद्ध जय विलास पॅलेस बघण्यासाठी निघालो. सतराव्या आणि अठराव्या शतकात मराठ्यांनी उत्तर भारतात गाजवलेल्या वर्चस्वाचं सर्वात मोठं प्रतिक म्हणजे हा जय विलास पॅलेस. ग्वाल्हेर बरोबर शेजारच्या इंदौरवर देखील होळकरांच राज्य आणि राजवाडा होता. अजुनही तो आहे. पण् या जय विलास पॅलेसवरुन सिंधियांच्या संस्थानाची संपन्नता अक्षरशः ओंघळताना दिसते. सिंधियांच्या खाजगी मालकीचा हा पॅलेस बघण्यासाठी एका व्यक्तीला दीडशे रुपये तिकीट आहे. बाकी हा पॅलेस वर्नण करण्याचा नाही तर बघण्याचा विषय आहे. सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेडच्या पाटिलकीपासून सुरु झालेला शिंदे घराण्याचा प्रवास उत्तर भारतातील एका बलाढ्य आणि संपन्न साम्राज्यापर्यंत पोहचला. अर्थात ब्रिटिश साम्राज्यात संस्थान टिकवून ठेवण्यासाठी अनेक तडजोडीही त्यांनी केल्या.

ग्वाल्हेरला लागूनच मुरैना आणि भींड हे जिल्हे आणि त्याच नावाचे लोकसभा मतदारसंघ आहेत. दोन्ही जिल्हे चंबळच्या खोऱ्यातील आणि त्यामुळे डाकू आणि डकैतीसाठी ओळखले जाणारे. खरं तर दोन हजार सात-आठच्या सुमारास चंबळच्या खोऱ्यातील सगळे डाकू संपले. बरेचसे मारले गेले तर उरलेल्यांनी शरणागती पत्करली. बॅंडीट क्वीन सिनेमा आणि फुलनदेवीच्या हत्येनंतर हिंदी न्यूज चॅनलसाठी हा आवडता विषय बनला. त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीतून पोलिस अधिकाऱ्यांमधे डाकूंची शिकार करण्याची स्पर्धा लागली. चंबळच्या बीहडांमधे फिरुन फिरौती वसूल करण्यापेक्षा सरळ राजकारणात करियर करण्याचा फुलनदेवीने दाखवलेला मार्ग अनेकांना सोईचा वाटला की काय माहित नाही पण् चंबळच्या खोऱ्यातून डाकू संपले. वर्षानुवर्षे या भागात डाकू निर्माण होण्यासाठी इथली भौगोलिक परिस्थिती जशी कारणीभूत होती तशीच उत्तर भारतातील भ्रष्ट आणि कणाहिन व्यवस्था देखील जबाबदार होती. स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर देखील कायद्याचं राज्य चंबळच्या या खोऱ्याला कधी मानवलं नाही.

पोलिस आणि व्यवस्थेच्या विरोधात जाणाऱ्याना इथं बागी म्हणजे बंडखोर म्हटलं गेलं. या बागींना समाजमान्यता होती. अनेकांची इमेज रॉबिनहूड सारखी होती किंवा त्यांनी ती जाणीवपूर्वक बनवली होती. बागी बनलेल्यांसाठी चंबळच्या खोऱ्यातील बीहड हे सुरक्षित घर होतं. हे बागी किंवा डाकू ठाकूर, गुर्जर, ब्राम्हण, दलित अशा सर्व समाजातील होते. मध्य प्रदेशातील महूजवळ उगम पावणारी चंबळ नदी आधी राजस्थानात प्रवेश करते. तेथुन पुन्हा मध्य प्रदेशात येते आणि पुढं उत्तर प्रदेशात जाते. तीन राज्यात चंबळच खोरं आणि पर्यायाने डाकू देखील पसरले होते. चंबळ नदीच्या काठावरील भाग हा मऊ मातीचा आहे. वर्षानुवर्षे वाहणाऱ्या चंबळच्या पाण्यामुळे या मातीतून दगडाचे बारीक कन वेगळे झाले आणि उरलेल्या मातीच्या टेकड्या तयार होत गेल्या. पाण्याच्या प्रवाहासारख्याच या टेकड्याही वेड्यावाकड्या आकाराच्या बनल्या. हेच ते बीहड. लांबून बघीतल्यावर हे बीहड म्हणजे एकामागोमाग एक असलेल्या मातीच्या टेकड्या वाटतात.... पण नाही...आतामधे त्यांचं अक्षरशः जाळं पसरलेलं असतं. भुलभुलय्यासारखी परिस्थिती असते. नवीन माणसाला आतमध्ये जाणं आणि गेल्यास बाहेर येणं अवघड. आपल्याकडं महादेवाच्या डोंगररांगांमध्ये देखील असा प्रकार पहायला मिळतो.

सातारा जिल्ह्यातील फलटण आणि शिखर शिंगणापूर भागातील अशा भौगोलिक परिस्थितीचा उपयोग संताजी धनाजी यांनी अतिशय खुबीनं केला होता. मराठेशाहीच्या पडत्या काळात औरंगजेबाच्या विरोधात लढणाऱ्या मराठ्यांच्या सैन्याचा तळ याच भागात होता. इथूनच संताजी मराठी सैन्य घेऊन औरंगजेबाच्या सैन्यावर हल्ले करायचे आणि पुन्हा या डोंगरांमध्ये गायब व्हायचे. लाखोंच्या संख्येने असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने टेकड्यांच्या जाळ्यामधे जाऊन मराठ्यांच्या सैनावर चाल करण्याच धाडस कधीच केलं नाही. त्यामुळेच कठीण परिस्थितीत देखील मराठे तरले. बंडखोर स्वभावाच्या संताजी घोरपडेंनी त्यांच्या शेवटच्या काळात याच भागात आसरा घेतला होता आणि इथंच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. फलटहून दहिवडीला जाताना मोगराळे घाट लागतो. या घाटात थांबून पाहिलं असता तो परिसर दिसतो.

हिंदुस्थान का दिल देखो... निवडणुकीच्या निमित्ताने मध्य प्रदेशच्या अंतरंगाचा शोध... ग्वाल्हेरहून 40-50 किलोमीटर अंतरावर मुरैना आहे. पण दोन शहरांमधे कमालीचा फरक आहे. मुरैनामधे प्रवेश करताच एक प्रकारचा रखरखीतपणा जाणवायला लागतो. ग्वाल्हेरचा सौम्यपणा आणि सुंदरता शोधायला गेल्यास हमखास निराशा मिळेल. मुरैनातील वातावरणात जसा रखरखीतपणात आहे तसाच तो लोकांच्या चालण्याबोलण्यात देखील आहे. चंबळच्या खोऱ्यात जाण्याआधी मुरैनातील पत्रकारांना भेटायचं होतं. अवधेश धंडोतीया हे मुरैनातील जेष्ठ पत्रकार. त्यांच्या कार्यालयात गेलो तर तीथ वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आणखी काही पत्रकार भेटले. बोलता बोलता मी ग्वाल्हेर आणि मुरैनामधे विकासाच्या बाबतीत जाणवलेला फरक बोलून दाखवला.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, इंदौर, भोपाळ या शहरांसारखा आपलाही विकास होईल या अपेक्षेने मुरैना आणि बाकी मतदारसंघही भाजपच्या मागे उभे राहिले. 2009 ला इथून भाजपचे नरेंद्र सिंग तोमर विजयी झाले. पण 2014 च्या निवडणुकीत तोमरांनी मुरैना सोडून शेजारच्या ग्वाल्हेरमधून निवडणूक लडवली आणि विजयी झाले. त्यांच्याजागी मुरैनात उभा राहिलेला भाजपचा उमेदवारही निवडणूक जिंकला. आता पुन्हा नरेंद्र सिंह तोमरांना मुरैनातून भाजपने उमेदवारी दिली. पाच वर्षात खासदारबद्दल तयार झालेल्या नाराजीला दूर करण्यासाठी. मुरैनातील लोक संगीतखुर्चीच्या या खेळाला कंटाळलेत असं अवधेश धंडोतीया म्हणाले. नरेंद्रसिंह तोमरांसाठी त्याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा होती. शहांनी सभेत मुरैनातील लोकांना विकासकामे न झाल्याबद्दल नाराज असलात तरी मोदींसाठी तोमर यांना मतं द्या असं आवाहन केलं. खरं तर उत्तर भारतात मतदान होतंय ते उमेदवार पाहून नाही तर त्या पक्षाचं नेतृत्व पाहून. आणि त्यामधे मोदी निर्विवादपणे राहूल गांधींवर भारी पडतायत. भाजपमधील अनेक उमेदवारांचे मतदारसंघ बदलण्यात आलेत. विनोद त्रिपाठी आणि श्याम मोहन दंडोतीया हे दोन पत्रकार आमच्यासोबत चंबळच्या खोऱ्यात बीहडांमधे यायला तयार झाले. पण त्याआधी जेवणाची वेळ झाली असल्यानं त्यांनी मुरैनातील 'शुक्ला जी का हॉटेल' या नावाच्या हॉटेलमध्ये जेवण्याचा सल्ला दिला. बहोत बढिया, देसी शुद्ध भोज मिलता है असं ते म्हणाले. शुक्ला जींच्या हॉटेल समोर पोहचलो पण हॉटेलच्या भोवतीची अवस्था पाहून आत जावं की नको असं वाटायला लागलं. हॉटेल चांगलंच जुनं होतं. आतमधे गेलो आणि 80-90 च्या दशकात प्रवेश केल्यासारखं वाटलं. खरं तर सगळं मुरैनाच काळाच्या 20-25 वर्षं मागं राहिल्यासारखं वाटत होतं. पण शुक्लाजींच्या हॉटेलमध्ये आम्ही जे जेवण केलं ते मध्य प्रदेशच्या दहा दिवसांच्या वास्तव्यातील सर्वात रुचकर जेवण होतं. दाल आणि मिस्सी रोटी आम्ही मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी खाल्ली. पण शुक्लाजींच्या हॉटेलची सर कुठेच आली नाही. घट्ट तुरडाळीला दिलेला मिरचीचा तडका आणि सोबत बेसन आणि गव्हाचं पीठ एकत्र करुन त्यामध्ये जीरे घालून केलेली मीस्सी रोटी. आपल्या थालपीठासारख्या दिसणाऱ्या मिस्सीला भरपूर देशी तुप लावलेलं. तीथे तुप लावण्याला घी चपडके असं म्हणतात. आमच्याबरोबर मुरैनातले अनेक पोलीस अधिकारीही या हॉटेलमध्ये जेवत होते. तीघे भरपेट जेवल्यावर बिल झालं अवघं तीनशे दोन रुपये. बिल घेऊन पैसे द्यायला काउंटरवर गेलो तर मालक हसत हसत म्हणाला आपका तो तीनसौ दो हुआ है... मी चपापलो आणि त्याला म्हटलं आपका क्या इरादा है तर तो हसायला लागला. म्हणाला तीनसौ दो यहॉं का बहोत पसंदीदा नंबर है. मी पण त्याला हसून दाद दिली.

आता आम्ही चंबळकडे निघालो. मुरैनापासून 25-30 किमी अंतर कापल्यावर चंबळ नदी दिसायला लागली. विस्तीर्ण पसरलेलं पात्र आणि भोवताली तेच ते बहुचर्चित बीहड. बीहडांच्या मधूनच चंबळ वाहत राहते. चंबळ नदीचा अलिकडचा काठ हा मध्य प्रदेशात तर पलिकडचा काठ हा राजस्थानात. नदीवरचा पूल पार करुन राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात प्रवेश केला. रस्ता सोडून गाडी डाव्या बाजूला वळवली आणि एका गावाच्या दिशेनं निघालो. दहा मिनिटात एका गावात पोहचलो. रस्त्याच्या कडेला एका टपरीवजा दुकानात गावातील मंडळी बसली होती. चुनाव कैसा चल रहा है असं विचारल्यावर ' ठीक है' असं त्रोटक उत्तर मिळालं. पण हळूहळू मंडळी खुलायला लागली. " यहांपर कोई आता ही नही है. प्रचारके दौरानभी कोई नही आया. डाकू तो यहांसे कबके खतम हो गये लेकीन अभी भी यहांपर आनेको लोग कतराते हैं" गावातील एका जेष्ठानं व्यथा बोलून दाखवली. पण तरीही काही वर्षांपूर्वी गावात आलेल्या वीजेमुळ आम्ही समाधानी असल्याचं अनेकांनी बोलून दाखवलं. तापमान 47 डिग्री होतं. त्यामुळे सारखी तहान लागत होती. गावात कोणाकडच फ्रीज नव्हता. पण एकजण थर्माकॉलच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन आला. आमची तहान भागली. या पाण्याचे पैसे घ्यायला तो तयार नव्हता. सोबतच्या पंकज त्रिपाठींनी बळेबळे त्याच्या खिशात नोट सारली.

हिंदुस्थान का दिल देखो... निवडणुकीच्या निमित्ताने मध्य प्रदेशच्या अंतरंगाचा शोध...

गाडी पुन्हा उलटी वळवून चंबळवरचा पूल पार केला आणि मुरैना जिल्ह्यातील बीहडांमधे लपलेल्या गावांकडं निघालो. बहुचर्चित पान सिंग तोमरच गाव जवळच होतं. पण आता गावात त्याच्या कुटुंबातील कुणी राहत नाही. गावात लहान मुलं खेळताना दिसली पण मोठं कोणी नजरेस पडत नव्हतं. चंबळच्या या खोऱ्यात कसलाच उद्योग नसल्यानं इथले तरुण मोठ्या ट्रकवरती ड्रायव्हर म्हणून काम करतात. देशभरात फिरणारे ट्रक मग ते कुठल्याही राज्यातील असोत त्यावर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्यांमध्ये इथल्या तरुणांची संख्या मोठी आहे. आता इथं डाकू उरले नसले तरी अवैध शस्त्रांची निर्मिती करुन ती विकण्याचा धंदाही इथं बऱ्यापैकी चालतो. पण चंबळमधे आता नवा व्यवसाय सुरु झालाय तो म्हणजे पर्यटनाचा. गावातून नदीच्या पात्रातून जाणाऱ्या रस्त्यावर चंबळ पर्यटन म्हणून बोर्ड लागला होता.

चंबळच्या पात्रात वनविभाकडून बोटिंगची सुविधा सुरु करण्यात आलीय. चंबळ नदीत मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या घडियाल म्हणजे सूसर पाहण्यासाठी देखील लोकांना आकर्षित केलं जातंय. मध्य प्रदेश आणि पलीकडच्या राजस्थानातील गावकऱ्यांना यातून थोडेफार पैसे मिळू लागलेत. आग्र्याहून आलेले तीन युवक चंबळच्या पात्रात भेटले . त्यातला एकजण फोटोग्राफी करत होता. सिनेमात जे चंबळ त्यांनी पाहिलं होतं ते प्रत्यक्षात कसं दिसतं ते बघायला आणि कॅमेरात कैद करायला ते आले होते. शिवाय काही कुटुंबही इथं फिरायला आलेली दिसली. या पर्यटकांमुळे चंबळच्या पात्रात बोटिंगची सुविधा देणाऱ्या वनविभागालाही स्थानिकांची मदत घ्यावी लागते . शेजारच्या गावातील दिनेश नावाचा पन्नाशीचा माणूस वनविभागाकडे मदतनीस म्हणून कामाला होता. त्याची मुलाखत आम्ही घेतली. घामेजलो होतो आणि पुन्हा तहान लागली होती. ते ओळखून दिनेशजींनी विचारलं " पाणी पीओगे क्या ..." आम्ही हो म्हटल्यावर त्यांनी भांड घेऊन वाहत्या चंबळमध्ये बुडवलं आणि भरून आमच्यासमोर ठेवलं. कुठलीही प्रक्रिया न केलेलं, न गाळलेलं पाणी पिण्यासाठी समोर ठेवण्यात आलं होतं. आमच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून ते म्हणाले " पी लो ... स्वच्छ है ".

महूजवळ उगम पावणारी चंबळ राजस्थानात जाऊन पुन्हा मध्यप्रदेशमध्ये प्रवेश करते पण तरीही या नदीत कुठलंही प्रदुषित पाणी सोडलं जात नाही. कारण चंबळच्या काठावर एकही उद्योग ज्याला आपण इंडस्ट्री म्हणतो उभा राहिलेला नाही. त्याचबरोबर कोणतं मोठं शहरही चंबळच्या किनाऱ्यावर नाही. महाभारतात चर्मावती या नावाने चंबळचा उल्लेख आहे. त्या आख्यायिकेनुसार आर्य राजांनी यज्ञात दिलेल्या पशुबळींमुळे चंबळला रक्ताची नदी म्हटलं गेलंय. अलीकडच्या काळात तर चंबळ सतत लाल होत राहिली. पण डाकूंचा बिमोड झाल्यापासून चंबळचा हा लाल रंग निवळलाय. दिनेशजींनी समोर ठेवलेलं चंबळची पाणी आम्ही भरपूर प्यायलो. त्यानंतर दिनेशजी हसत म्हणाले " अब जरा संभलके रेहना , चंबलका पाणी पिनेसे आदमी बागी बन जाता है. " मी म्हटलं " देखते है " आणि आम्ही चंबळमधून निघालो. प्रचाराचे शेवटचे दोन-तीन दिवस भोपाळमध्ये थांबावं लागणार होतं. दिग्विजयसिंह आणि प्रज्ञा सिंह यांच्या प्रचाराला देशभरातून त्यांचे पाठीराखे येत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड चार-पाच दिवस भोपाळमध्ये डेरा टाकून होते. आरपीआय खरात गटाचे सचिन खरातही शेवटच्या दोन दिवसात दिग्विजयसिंहांसाठी प्रचाराला आले होते. प्रज्ञा सिंहांच्या प्रचारातही पुणे आणि आळंदीतून आलेले लोक भेटले . हे सगळे ते मानत असलेल्या विचारसरणीबद्दलची बांधिलकी म्हणून भोपाळला प्रचारात आले होते. पण त्यांच्या प्रचार करण्याचा दोन्ही उमेदवारांना फायदा होतोय असं वाटलं नाही . कारण बाहेरची व्यक्ती स्थानिक मतदारांशी जोडली जोडली जाण तसं कठीणच. मालेगाव बॉंब स्फोटाबाबद्दल निर्णय न्यायालयात होणं अजून बाकी आहे. परंतु भोपाळमध्ये जो कोणी विजयी होईल तो मालेगाव प्रकरणात आपणच बरोबर होतो हे जोरजोराने सांगणार हे उघड आहे. त्यामुळे भोपाळच्या या निवडणुकीचे आयामच बदलून गेलेत. पण भोपाळमधील स्थानिक मात्र एवढ्या खोलात जाऊन विचार करत नाहीत. मोदी हवेत की मोदी नकोत अशी त्यांची सरळ विभागणी आहे. मात्र भाजप आणि एकूणच परिवासरासाठी प्रज्ञा सिंह निवडून येणं प्रतिष्ठेचा मुद्दा बनल्यानं दिल्लीतून आलेले अनेक नेते भोपाळमध्ये ठाण मांडून होते.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धेंचा त्यामध्ये समावेश होता. सहस्र्बुद्धे यांची मुलाखत करताना त्यांना भाजपचे स्थानिक नेते नाराज असल्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले नाराज होते हे खरंय पण आता त्यांची नाराजी दूर करण्यात आलीय. दुपारच्या वेळी प्रज्ञा सिंग भाजपच्या कार्यालयात थांबल्या असताना भाजपचे स्थानिक नेते नावासाठी म्हणून तिथं येऊन जात होते. त्यांना आलेलं बघून प्रज्ञा सिंग यांचे समर्थक नाकं मुरडत होते. प्रज्ञा सिंह यांच्यासाठी अमित शाहांनी रोड शो केला पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र सभा घेतली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रज्ञा सिंग यांनी बुलेटवर मागे बसून प्रचाराला सुरुवात केली. वेगवेगळ्या भागात, कॉलनीजमध्ये त्यांची बाईक रॅली सुरु होती . गाडीच्या पाठीमागे बसलेल्या प्रज्ञा सिंग लोकांकडे बघून हात हलवत होत्या. अनेक ठिकाणी त्यांना तसाच प्रतिसाद लोकांकडून मिळत होता. एका गल्लीत मोटारसायकल रॅलीचा वेग थोडासा कमी झाल्यावर प्रज्ञा सिंग यांची मुलाखत करायचं ठरवलं. प्रचाराला काही तास उरलेले असताना तुम्ही सगळ्या मतदारांपर्यंत पोहचल्या आहेत का असं त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या भोपालके लोग मुझे शुरसे जाणते है और मैने जादासे जादा लोगोंसे मिलनेकी कोशिश की है. त्यानंतर स्थानिक भाजप नेते प्रचारात दिसत नसल्याबद्दल त्यांना विचारलं तर वो अपने अपने क्षेत्रोमे काम कर रहे है असं उत्तर त्यांना दिलं. पुढचा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल विचारल्यावर प्रज्ञा सिंग यांनी अभी प्रचारके दौरान इतना नही बोल सकती म्हणून मोटसायकल पुढं घ्यायचा आदेश दिला. या निवडणुकीत प्रज्ञा सिंग हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचार करत असल्या तरी त्यांचं निवडून येणं हिंदुत्वाबरोबरच मोदींच्या लाटेवर अवलंबून आहे.

साध्वी प्रज्ञा सिंग निवडून येणं हिंदुत्ववाद्यांना आवश्यक वाटतं . पण प्रज्ञा सिंग यांचं हिंदुत्व जसच्या तसं तुम्हाला मान्य आहे का या प्रश्नावर ते देखील गप्प होतात. दिग्विजय सिंह यांनी जेव्हा निवडणूक लढवायचं जाहीर केलं तेव्हा त्यांच्या विरोधात भाजपमधून शिवराजसिंह चौहान आणि उमा भरती यांच्या नावाची चर्चा झाली. पण त्या दोघांनीही नकार दिल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रज्ञा सिंह यांचं नाव पुढं करण्यात आलं. त्यामुळे भाजपच्या या नेत्यांची गोची झाली आणि दिग्विजयसिंहासाठी देखील निवडणूक अवघड बनली. एरवी आपल्या वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेणारे दिग्विजयसिंह या प्रचारात मात्र तोलून-मापून बोलत होते. एका न्यूज चॅनेलला एकदाच मुलाखत द्यायचं त्याचं धोरण होतं. प्रज्ञा सिंह यांच्याबद्दल बोलणं ते टाळत होते. प्रचारादरम्यान रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडत होते. विकासाच्या मुद्द्यावर त्यांचा भर होता. पण ही निवडणूक मतांच्या ध्रुवीकारणावर लढली जाणार हे स्पष्ट झाल्यावर दिग्विजयसिंहांनीही प्रचारात भगव्या रंगाचा वापर सुरु केला. कॉम्प्युटर बाबा या आचरट नावाच्या साधूचे तेवढेच आचरट प्रकार दिग्विजयसिंहाच्या प्रचारात पाहायला मिळाले. गोलाकार रिंगणात धुनी पेटवून हा बाबा काहीतरी चाळे करायचा. काही महिन्यांपूर्वीपर्यंत हा बाबा शिवराजसिंह चौहान सरकारमध्ये मंत्रिपदाचा दर्जा उपभोगत होता. दिग्विजयसिहांना मुलाखतीदरम्यान त्याबद्दल विचारलं असता त्यांनी मै कहा कुछ कर रहा हू आप ही उसे भगवा रंग दे रहे है असं म्हटलं. हिंदू कार्ड खेळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो चालणार नाही याची दिग्विजयसिहांना कल्पना असल्याने दिग्विजयसिंह वेगवेगळ्या समाजानं आपल्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न करत राहिले. भोपाळमधील साडेतीन-चार लाख मुस्लीम मतांवर तर त्यांची सर्वाधिक भिस्त राहिली.

पुरोगामी विचारांच्या लोकांना दिग्विजयसिंह निवडून येणं खूप गरजेचं वाटतं. हिंदुत्व मानणाऱ्या पण प्रज्ञा सिंगबद्दल नाराजी असणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विभागणी करण्याला हे लोक आक्षेप घेतात. निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली जावी अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र दिग्विजयसिंग यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मध्यप्रदेशचा खरंच विकास झाला का या प्रश्नांच प्रामाणिक उत्तर शोधण्याचं धाडस त्यापैकी खूप कमीजण करतात. काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेश , राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेस सत्तेवर आली ती स्थानिक प्रश्नांमुळे आणि खासकरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे. पण लोकसभेचा प्रचार भाजपने ज्या मुद्द्यांवर नेऊन ठेवलाय त्या मुद्द्यांवर भाजपला तोंड देणं या राज्यांमध्ये काँग्रेसला जड जातंय. खरं तर मतदार अनेक पातळ्यांवर विभागलेला असतो. पण या निवडणुकीत शहरी मतदार आणि ग्रामीणमतदारांमध्ये उभी फूट पाहायला मिळतेय. एकाला महत्वाचे वाटणारे मुद्दे दुसऱ्याला पटत नाहीयेत. भोपाळमध्ये अर्थातच दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे होत राहिले. आम्ही अनेक ठिकाणी भोपाळच्या सामान्य नागरिकांना काय वाटतं याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. भोपाळला झीलों का शहर अर्थात सीटी ऑफ लेक्स म्हटलं जातं. कारण भोपाळ शहराच्या आतमध्ये अनेक मोठमोठे तलाव आहेत. त्यातील बडा तालाब या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तलावाचं क्षेत्रफळ तर चोवीस किलोमीटर वर्ग एवढं आहे. नजर पोहचेल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी. एवढंच काय तलावात काही बेटंही आहेत. शहराच्या मधोमध असलेला समुद्रच जणू. या बडा तालाबला तेवढ्याच सुदंर पद्धतीनं सजवण्यात आलंय. तलावाच्या शहराकडच्या भागाला आधीपासूनच दगडी तटबंदी होती. ती वाढवून सिमेंटचे कठडे करण्यात आलेत. त्यापैकी एका दगडी बुरुजावर ज्याच्या नावावरून शहराला भोपाळ हे नाव मिळालं त्या भोज राजाचा मोठ्ठा पुतळा आहे. एका बाजूला चौपाटी आहे आणि तिथून जवळच बोटिंगची व्यवस्था आहे. लहान मोठ्या सगळ्या बोटींची सोया आहे. संध्याकाळी तलावाच्या भोवताली केलेल्या रोषणाईमुळे बडा तालाबचं पाणी रंगीत बनतं. भोपाळचा माणूस या सगळ्याचा सहकुटुंब आनंद घेण्यासाठी संध्याकाळी चौपाटीवर येतो. पर्यटकांची संख्याही बऱ्यापैकी असते. त्यामुळे बोटिंगचा आनंद घेताना भोपळवासी निवडणुकीबद्दल मोकळेपणानं बोलतील असं अपेक्षित होतं आणि झालंही तसेच एका क्रूझवर बसून आमची सफर सुरु झाली . थोडा वेळ गेला आणि लोकांशी बोलायला मी सुरुवात केली.

प्रज्ञा सिंग किंवा दिग्विजयसिंग यापैकी कोणावरही अधिक बोलायला भोपाळचे नागरिक तयार नव्हते. त्यांचा एकच धोशा होता तो म्हणजे देश के लिये मोदी जरुरी है. किस कारण जरुरी है असं विचारल्यावर देशकी सुरक्षा के लिये जरुरी है असं उत्तर मिळत होतं. संपूर्ण भोपाळमध्ये कमी-अधिक प्रमाणात अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. खरं तर उत्तर भारतातील मतदारांना मोदींपेक्षा हिंदुत्व अधिक प्रिय आहे . मोदी तर पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेत . पण त्याही आधी 30-30 वर्ष भोपाळ, इंदुर, ग्वाल्हेर या प्रमुख शहरांमध्ये आणि इतरही अनेक ठिकाणी भाजपचे खासदार निवडून येतायत.

वर्षनुवर्षे मुरलेल्या हिंदुत्वाला मोदींमुळे फोडणी मिळालीय इतकंच. मुळात आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या परंपरा टिकायच्या असतील तर भाजपचं हवा असा प्रचार त्या पक्षाचे नेते करतात. उत्तर भारतात रोजच्या जगण्यात या प्रथा-परंपररांच प्राबल्य असल्यानं त्याला प्रतिसादही मिळतो. उत्तर भारतात अनेक शहरांमध्ये मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ध्रुवीकरण करणं आणखी सोपं जातं. आशिया खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठी मशिद भोपाळमध्ये आहे. भोपाळ आणि उत्तर भारतातील इतर शहरांमध्ये मुस्लीम सशकांचं वर्चस्व राहिलंय इतिहासाचा तो धागा सोडून देण्यास दोन्ही बाजूचे लोक तयार नाहीत. जातीवर आधारित राजकारणाला हिंदुत्व गिळंकृत करतं तर हिंदुत्वाच्या राजकारणाला छेद देण्यासाठी जातीच्या राजकारणाचा आधार घेतला जातो. उत्तर भारतात हे चक्र गेली 35-40 वर्ष सुरुय. अर्थात जातीवर आणि धर्मावर आधारित राजकारण इतर राज्यांमध्येही केलं जातंच पण त्याच प्रमाण उत्तर भारतात सर्वात अधिक आहे.

मध्य प्रदेशात विंध्य पर्वतरांगा आणि सातपुडा पर्वतरांगा आहेत. या दोन पर्वतरांगा भारताची स्थूलमानाने भौगोलिक आणि सांस्कृतिक विभागणी करतात. पूर्वी या पर्वतरांगांच्या उत्तरकडच्या प्रदेशला आर्यवर्त म्हटलं गेलं तर दक्षिणेकडच्या दख्खनच्या पठारी प्रदेशात द्रविड अस्मिता जोपासली गेली. तरीही भारत एक देश म्हणून ओळखला गेला. स्वातंत्र्यानंतरही उत्तरेच राजकारण आणि दक्षिणेच राजकारण पूर्णपणे वेगळं राहिलं. तरीही भारत एकच राहिला. तो का एक राहिला याचा विचार करण्याची ही वेळ आहे.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lok Sabha Result 2024: महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Mumbai Stone Pelting: पवईत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीस जखमी
पवईत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीस जखमी
Miss You First Look  : सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट; माधवन म्हणाला, चॉकलेट बॉय इज बॅक
सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट; माधवन म्हणाला, चॉकलेट बॉय इज बॅक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Powai News : पवई भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक, पोलिस जखमी : ABP MajhaVinod Tawde Meet J P Nadda : विनोद तावडे भाजप अध्यक्ष नड्डांच्या निवासस्थानीMaharashtra Monsoon : मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन : हवामान विभागNCP Meeting : राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Lok Sabha Result 2024: महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Mumbai Stone Pelting: पवईत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीस जखमी
पवईत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीस जखमी
Miss You First Look  : सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट; माधवन म्हणाला, चॉकलेट बॉय इज बॅक
सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट; माधवन म्हणाला, चॉकलेट बॉय इज बॅक
Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचाच बोलबाला; 9 पैकी 6 जागांवर विजय खेचून आणला!
राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचाच बोलबाला; 9 पैकी 6 जागांवर विजय खेचून आणला!
मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Kiran Mane Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे किरण मानेंना दोन मिस्ड कॉल, फोन न उचलल्याने मेसेज, म्हणाले...
उद्धव ठाकरे यांचे किरण मानेंना दोन मिस्ड कॉल, फोन न उचलल्याने मेसेज, म्हणाले...
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
Embed widget