BLOG : प. बंगालमध्ये ‘ऑपरेशन कमळ’, भाजपचा कल्पनाविलास!
Blog : मिथुन चक्रवर्ती हे मूळचे कोलकात्याचे. कोणीही गॉडफादर नसताना हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन स्टारपद मिळवलं. अभिनयासाठी राष्ट्रीय पारितोषिके पटकावलीत आणि आता हेच मिथुन चक्रवर्ती प. बंगालमध्ये भाजपचा चेहरा बनू पाहात आहेत. प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू इच्छित होते. पण मिथुन यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली. निवडणुकीत भाजप सत्ता मिळवण्यापासून कोसो दूर राहिली आणि ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष 200 च्या वर जागा घेऊन सत्तेवर आला.
ममता सत्तेवर आल्यापासून रोज प. बंगालमध्ये कोणता ना कोणता वाद उद्भवू लागला आहे. भाजप कार्यालय, कार्यकर्त्यांवर हल्ले असोत, मुख्यमंत्री-राज्यपाल वाद असोत वा तृणमूलच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी असोत. भाजप आणि तृणमूलमध्ये रस्त्यावर मारामारीची दृश्य नेहमी दिसतात. मिथुन चक्रवर्ती आता सक्रिय राजकारणात उतरले असून प. बंगालमध्ये भाजपला ताकद मिळवून देण्याची तयारी करू लागलेत. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी तृणमूलचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असून 21 आमदार थेट त्यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य करीत खळबळ माजवून दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप प. बंगालमध्येही 'ऑपरेशन कमळ' राबवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
2013 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. ममतांनी त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. 2016 ला त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते भाजपचे स्टार प्रचारक होते. मात्र निवडणुकीत भाजपचे फक्त 77 आमदार निवडून आले आणि मिथुन चक्रवर्ती यांनी कोलकात्याकडे पाठ फिरवली. आता पुन्हा ते सक्रिय झालेत आणि 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एवढंच नव्हे तर विधानसभा निवडणुकीसाठीही ते कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत आहेत आणि त्यामुळे त्यांनी तृणमूलचे 38 खासदार भाजपच्या संपर्कात तर 21 आमदार थेट त्यांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं आहे.
पण, प. बंगालमध्ये 'ऑपरेशन कमळ' राबवणे वाटते तितके सोपे नाही. याची अनेक कारणे आहेत. सगळ्यात पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजे तृणमूलचे संख्याबळ. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी-शाहांच्या जोडीला टक्कर देऊन ममतांनी तृणमूलचे 213 आमदार निवडून आणले होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण नंतर त्यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला. ममतांचं सरकार आल्यानंतर भाजपच्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोपासून अनेकांनी भाजपची साथ सोडली आणि ममतांच्या तृणमूलमध्ये सामील झाले. बाबुल सुप्रियो यांनी मंत्रीपदासह खासदारकीचाही राजीनामा दिला होता. सत्तेत असलेला पक्ष आणि केंद्रातील मंत्रीपद सोडून ममतांच्या सोबत जाण्याचे धाडस बाबुल सुप्रियोंनी दाखवले. ममतांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवले आणि आमदार केले. केवळ त्यांनाच नव्हे तर भाजपमधून आलेल्या नेत्यांनाही त्यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवून दिला होता. त्यामुळे तृणमूलच्या आमदारांची संख्या 215 वर पोहोचली. तर भाजपच्या आमदारांची संख्या कमी होऊन 75 वर आली.
आता विचार करूया ऑपरेशन कमळचा. प. बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण जागा आहे 294. त्यापैकी 215 आमदार आहेत तृणमूलचे तर भाजपचे आमदार आहेत 75. बहुमताचा आकडा आहे 148. असे असताना तृणमूलचे 38 आमदार जरी भाजपसोबत गेले तरी त्यांची संख्या 113 होते. तृणमूलचे 38 आमदार गेले तरी ममतांकडे 177 आमदार उरतात जे बहुमतापेक्षा खूप जास्त आहेत. जर भाजपला ऑपरेशन कमळ राबवायचे असेल तर ममतांचे आणखी 30-32 आमदार फोडावे लागतील. जे सध्या तरी शक्य दिसत नाही. ममतांच्या मंत्रिमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जीवर शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप असून ते अटकेत आहेत. त्यांच्या घरी 50 कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम सापडली आहे. जनता नाराज होऊ नये म्हणून ममतांनी पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिमंडळातून डच्चू देत पक्षाच्या पदांवरूनही काढलंय. पार्थ यांचे समर्थक आमदार नाराज असून ते ममतांची साथ सोडतील असे म्हटले जात आहे.