BLOG | उर्मिलाचा अनोखा प्रवास, राष्ट्रसेवा दल ते शिवसेना
चित्रपटासोबतच तिनं समाजकारणावरही चर्चा केली होती. अर्थात याला कारण होतं तिचं सेवादलातलं योगदान.
वर्ष 1994
रामगोपाल वर्मानं रंगीला चित्रपट तयार केला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अंधेरी पश्चिम येथील उर्मिलाच्या घरी तिला भेटण्याची आणि तिच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. तिला भेटायला जाण्यापूर्वी प्रख्यात स्वर्गीय फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी तिचे केलेल विशेष फोटोशूट पाहिलेले होते. तिने चित्रपटासाठी केलेल्या अंगप्रदर्शनाबाबत तिला प्रश्न विचारण्याचे ठरवले होते. मात्र मुलाखत घेत असताना तिचे आई-वडिल दोघेही तेथे उपस्थित असल्यानं ‘तो’ प्रश्न कसा विचारायचा हे सुचत नव्हतं. आडवळणानं मी त्या प्रश्नावर जाण्याचा विचार करीत असतानाच उर्मिलानंच म्हटलं, तुला जे विचारायचं ते विचार. तेव्हाच जाणवलं होतं की हे पाणी काही वेगळंच आहे. त्यावेळी चित्रपटासोबतच तिनं समाजकारणावरही चर्चा केली होती. अर्थात याला कारण होतं तिचं सेवादलातलं योगदान. उर्मिलाची सतत भेट होत होती आणि विविध विषयांवर गप्पाही होत. पण त्यात कधी राजकारण आलं नव्हतं. आणि उर्मिलानंही कधीही कुठल्याही राजकीय बाबीवर वक्तव्य केलं नव्हतं.
कट टू
मे 2019
उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसकनं उर्मिलाला लोकसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उतरवलं. अभिनेता गोविंदानं जसं भाजपचे वरिष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला तसाच ‘चमत्कार’ उर्मिला करील असं त्यांना वाटत होतं. मनसेनंही उर्मिलाला मदत करण्याच ठरवलं होतं. अभिनेत्री ते राजकीय आखाडा असा प्रवास करणाऱ्या उर्मिलानं ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत गप्पा मारल्या आणि राजकीय विचार मांडले होते. राजकारणाचा अनुभव नसताना थेट निवडणूक लढवण्याबाबत उर्मिलानं भाजपवर टीका करीत गेल्या पाच वर्षात देशात सूडाचं, द्वेषाचं वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं होतं. लोकशाहीच्या विरोधात घडत असल्यानं त्याविरोधात आता उभं राहिलं नाही तर पुढं उशीर होईल असं वाटल्यानं निवडणुकीत उतरल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस व्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणारा पक्ष असल्याचंही तिनं म्हटलं होतं.
उर्मिलाचा राजकारणातील आदर्श माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत. मात्र उर्मिलाची राजकारणातील महिलांशी मैत्री किंवा जवळीक नाही. निवडणुकीत पराभव झाला तरी राजकारण सोडणार नाही असं तिनं स्पष्ट करून भाजपच्या नाकी नऊ आणेन असं म्हटलं होतं. उर्मिलाचे वडील राष्ट्रसेवा दलाशी संबंधित होते. तसेच उर्मिलानेही सेवा दलाचे काम केले आहे. उर्मिलाचे वाचन चांगले असून वक्तृत्वही चांगले आहे. त्यामुळे ती राजकारणात कायम राहील असं वाटत होतं. पण पराभवानंतर तिनं काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर टीका करीत काँग्रेसला लगेचच रामराम केला. मात्र सेवादलाच्या माध्यमातनं तिनं आपलं काम सुरु ठेवलं होतं.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतनं बॉलिवूडवर टीका केली तेव्हा एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ बोलताना तिनं कंगनावर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. तिला रुदाली म्हणूनही हिणवलं होतं. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड प्रशंसाही केली होती. त्यानंतर उर्मिलाचं नाव चर्चेत आलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिनं भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड तोंडसुख घेतलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. उर्मिलाचं भाजपवर सतत टीकास्र सोडणं, कंगनाला सडेतोड उत्तर देणं आगामी काळात फायद्याचं होईल या हेतुनं राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेनं उर्मिलाला विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला. खरे तर तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. पण ‘माझा कट्टा’वर उर्मिलानं कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिल्यानंच शिवसेनेनं तिच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राज्यपालांनी अजूनही आमदारांची यादी मंजूर केलेली नाही.
आणि आज 1 डिसेंबर 2020
काँग्रेसची साथ सोडलेल्या उर्मिलानं मातोश्रीवर जाऊन सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला नमन केलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांच्याकडून हातात शिवबंधन बांधून घेतलं. त्यानंतक लगेचच तिनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पण अनेक प्रश्नांची उत्तर अनुत्तरीत ठेऊन तिनं त्या प्रश्नांची उत्तर नंतर देऊ असं म्हटलं. सेक्युलर म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं नाही. मी हिंदू आहे आणि अहिंसक हिंदुत्वाचा मार्ग अवलंबणे मला योग्य वाटतं असं म्हणणाऱ्या उर्मिलाचा सेक्युलर राष्ट्र सेवा दल ते हिंदुत्ववादी शिवसेना असा अनोखा प्रवास झाला असून आता तिनं तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. यात ती किती आणि कशी यशस्वी होते ते आगामी काळात दिसेलच. मात्र उर्मिलाच्या या नव्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.
चंद्रकांत शिंदे यांचे अन्य ब्लॉग :