BLOG | लॉकडाऊन आणि मारी बिस्किटावरची भोकं
काही गोष्टी करण्यासाठी लॉकडाऊन होण्याआधी आपल्याकडे वेळ नव्हता, आता आहे, भविष्यात असेल की नाही याची माहिती नाही. त्यामुळे लॉकडाऊन आधी किती आणि काय काय करायचं होतं तुम्हाला? हे आठवा आणि ते करण्याचा प्रयत्न करा.
>> आशिष काटकर
माझी पोस्ट वाचण्यासाठी तुमच्याकडे मुबलक वेळ असेलच... मारी बिस्किटावरची भोकं आणि कंगव्याची दातं मोजूनही वेळ उरला असेल तर किंवा फरसाणमधले पोहे, शेंगदाणे, शेव, कडीपत्ता हे सगळं वेगवेगळं करुन निवांतपणे प्रत्येक पदार्थ चघळूनही वेळ जात नसेल तर ही पोस्ट नक्की वाचा. किंबहुना हा खटाटोप लॉकडाऊनमुळं रिकामटेकडे झालेल्यांसाठीच आहे. काहींना रिकामटेकडे हा शब्द कदाचित खटकेलही. मात्र त्यापेक्षा तीव्र आणि प्रखर शब्द सूचत नसल्यानं रिकामटेकडा या शब्दावरच समाधान मानून घ्या. कोरोनामुळं भारताचा इटली आणि स्पेन होऊ नये म्हणून मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि 130 कोटी भारतीयांपैकी 129 कोटी 99 लाख जनतेला कामधंद्याशिवाय घरात बसून रहावं लागतंय. आता झोपेसाठी 8 ते 9 तास आणि झोप पूर्ण झाल्यानंतरही अंथरुणावर लोळण्यासाठी एखादा तास सोडला तर उर्वरीत 13 ते 14 तासांचं काय करायचं असा प्रश्न अनेकांना सतावतोय.
मात्र 'वेळ कसा घालवायचा?' हा प्रश्न असूच कसा शकतो, असा प्रश्न मला पडलाय. जरा लॉकडाऊनपूर्वीचे दिवस आठवून पाहा आणि प्रामाणिकपणे स्वतःला विचारा. किती आणि काय काय करायचं होतं तुम्हाला? कुणाला वर्कआऊट करायचं होतं, कुणाला योगासनं शिकायची होती, मात्र वेळ नव्हता. अनेकांची पुस्तकांची यादी तयार होती, मात्र वाचायला वेळ नव्हता. मित्रांकडून घेतलेल्या पिक्चरमुळं पेन ड्राईव्ह फुल झाला होता, मात्र बघायला वेळ नव्हता. आई, वडील, बायको, मुलं यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या होत्या, मात्र सबब तीच... वेळ नव्हता.... घरात बसून यापैकी काय करणं शक्य नाही आहे?
एकीकडे कोरोना नावाच्या संकटाशी लढताना सरकार, अधिकारी आणि सगळ्या यंत्रणांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु असताना तुम्ही विचारताय वेळ कसा घालवायचा? शाळा किंवा कॉलेजमध्ये अर्थशास्त्रात कॉपी करुन पास झाला नसाल तर कोरोनामुळं किती मोठं आर्थिक संकट उभं ठाकणार आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. जिथं सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळण्याची मारामार तिथं तुम किस झाडी की पत्ती? वेळ जात नाही म्हणताय ना.... मग कवटीखाली शाबूत असलेल्या 100 ग्रॅमचा मेंदू वापरा आणि व्यवस्थित विचार करा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता, ज्या उद्योगधंद्यामुळं तुमचं आणि तुमच्या कुटुंबांचं पोट भरतंय ते सगळं कोरोनामुळं डेंजर झोनमध्ये तर आलं नाही ना? लॉकडाऊननंतर तुमच्या हातातलं काम शाबूत राहणार आहे का? आणि जर शाबूत राहिलं तर होणारी कमाई तेवढीच राहणार आहे का? भरपूर वेळ आहे ना तुमच्याकडे...? मग केलात का या सगळ्या गोष्टींचा विचार?
सगळं काही संपलं... आता दात पोखरुन जगावं लागणार... कोरोनानं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं... एवढा टोकाचा विचार करुन नैराश्याच्या गर्तेत जाण्याची गरज नाही. मात्र वास्तवाचं भान ठेवत संभाव्य परिस्थितीचा चोहोबाजूंनी विचार करुन काळाची पावलं ओळखणं गरजेचं आहे. कारण आता वेळ आहे, पण नंतर वेळ निघून गेलेली असेल. तज्ज्ञांशी संवाद साधा. चार जाणत्या माणसांशी बोला. तुमचं अर्थकारण अवलंबून असणाऱ्या गोष्टींचं भवितव्य काय असेल याचा अंदाज घ्या. सध्या वेळ आहे तर 'प्लान-बी' तयार करुन ठेवा
इतिहास साक्षीदार आहे. जो संकटातही संधी शोधतो त्याचेच दिवस येतात. गेल्या विधानसभा निवडणुकांत झालेल्या मुसाळधार पावसामुळं राज ठाकरेंनी त्यांची पहिली प्रचारसभा रद्द केली. मात्र तशाच मुसळधार पावसात शरद पवारांनी जोरदार भाषण ठोकलं आणि तेच भाषण गेमचेंजर ठरलं. कोरोनामुळं ओढवलेल्या संकटातही संधी शोधता येऊ शकते. इथं सकारात्मक संधी अभिप्रेत आहे. नाही तर मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन मास्क, सॅनिटायझरचा काळाबाजार करणारे पायलीचे पन्नास आहेत.
मोठी संकंटे माणसाला त्याचं मूळ रुप दाखवतात. मृत्यू समीप आल्यानंतर भल्याभल्यांना त्यांच्या आयुष्याच्या खऱ्या उद्देशाचा साक्षात्कार होतो. आणि इथे संपूर्ण मानवजातीवर जीवघेण्या कोरोनाचं संकट घोंगावत असताना काही जणांना वेळ कसा घालवू असा बालिश प्रश्न कसा पडू शकतो? बरं..लॉकडाऊनमुळं काही जणं एवढी बैचेन झाली की त्यांनी थाळीनादाच्या नावाखाली गोंगाट घातला आणि दीवे पेटवण्याच्या नावाखाली होळी साजरी केली. खरं तर राष्ट्रीय एकात्मतेसाठी दोन्ही गोष्टींचं नियोजन केलं होतं. मात्र थाळीऐवजी काही जणांनी हातात जे सापडलं ते वाजवलं आणि भारतमाता बहीरी झाली. काही अतिशहाण्यांच्या या निर्लज्जणामुळं संपूर्ण भारताची छी-थू झाली.
आतापर्यंत आपण ज्या निवांतपणाच्या शोधात होतो तो लॉकडाऊनच्या सक्तीमुळं मिळालाय. असंही आपण ऑफिसमधल्या कामाचं टेन्शन, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आशा-आकांक्षाच्या ओझ्याखाली पुरते दबले गेलो आहोत. थोडसं ते ओझं बाजूला ठेवून स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहा. स्वतःचाच शोध घेण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्हाला तुम्हीच सापडाल तेव्हा मात्र मारी बिस्किटावरची भोकं मोजण्यासारख्या फुटकळ गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ नसेल...