एक्स्प्लोर
कांती शाह नावाचं कल्ट
काही लोकांना असा प्रश्न पडू शकतो की एड वुडचा कोणी भारतीय वारसदार असेलच की ज्याने सतत वर्षानुवर्षं वाईट चित्रपट काढले असतील. तर या प्रश्नाच एक निर्विवाद उत्तर आहे कांती शाह.

एड्वर्ड डेविस उर्फ 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुडमधला निर्माता आणि दिग्दर्शक. साठ आणि सत्तरच्या दशकात याने परग्रहवासीयांची आक्रमण, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. हॉलिवुडमध्ये गोल्डन टर्की अवॉर्ड्स नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे. तर या गोल्डन टर्की अवॉर्डने एड वुड ला 'सर्वकालीन वाईट दिग्दर्शक' या पुरस्काराने सम्मानित केले. हा पुरस्कार घ्यायला एड वुड मात्र हजर राहू नाही शकला. कारण काही वर्षापूर्वीच अती मद्यपानाने तो मरण पावला होता.
काही लोकांना असा प्रश्न पडू शकतो की एड वुडचा कोणी भारतीय वारसदार असेलच की ज्याने सतत वर्षानुवर्षं वाईट चित्रपट काढले असतील. तर या प्रश्नाच एक निर्विवाद उत्तर आहे कांती शाह. एड वुड प्रमाणेच कांती शाह हा मुळीच प्रसिद्धीच्या झोतात नाही. पण त्याने त्याच्याच दाव्याप्रमाणे तब्बल नव्वद चित्रपटांची लेखन-निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. अनेक प्रेक्षकांना कांती शाह माहीत आहे तो त्याच्या कल्ट क्लासिक 'गुन्डा' या फिल्ममुळे. 'Its so bad that it's good' या सिंड्रोममुळे ह्या चित्रपटाला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तिला विनोदाची झालर येते म्हणतात.
अतिशय वाईट संवाद, भडक अभिनय, विनोदी रेप सीन्स, व अतिशय वाईट तांत्रीक बाजू असते तेंव्हा 'गुन्डा' सारखा चित्रपट तैयार होतो. आज IMBD सारख्या वेबसाइटवर गुन्डाच मानांकन रणबीरच्या 'रॉकस्टार', विद्या बालनच्या 'द डर्टी पिक्चर', आणि चक्क 'शोले' पेक्षा पण जास्त आहे.खरतर 'गुन्डा'चा दिग्दर्शक हीच कांती शाहची ओळख करुन देणं म्हणजे त्याच्यावर अन्याय होईल. डाकू मुन्नीबाई, गरम, कांती शाह के अंगुर, लोहा, शीला की जवानी या सेमी पोर्न चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक म्हणून तो सिंगल-स्क्रीन चित्रपटाच्या बाजारात प्रसिद्ध आहे. विक्रमादित्य मोट्वानेच्या गाजलेल्या 'उडान' या चित्रपटात 'कांती शाह के अंगुर' या चित्रपटाचा वारंवार उल्लेख होतो. 'उडान' मधला टीनएजर नायक आणि त्याचे मित्र यांच्या लैंगिक जाणिवांचा तो चित्रपट एक अविभाज्य हिस्सा असतो .
छोट्या आणि सेमी-अर्बन भागात कांती शाहच्या चित्रपटाना लाखोंचा चाहता वर्ग आहे. त्याचे चित्रपट काही सोशल मेसेज द्यायच्या फंदात पडत नाहीत. जे जे म्हणून या छोट्या शहरातल्या प्रेक्षकाना हवे आहे ते ते कांती शाह आपल्या फिल्म्स मधून देतो. त्याच्या सिनेमांवर अश्लिलतेचे आरोप केले जातात. पण कांती शाह कडे या टीकेवर एक बिनतोड युक्तिवाद आहे. कांती शाहच्या मते, "जेंव्हा महेश भट्टसारखी मंडळी बिपाशा किंवा मल्लिका सारख्यांना घेऊन असे चित्रपट काढतात ज्यात हॉट सीन्सचा भडिमार असतो तेंव्हा त्यांच्या चित्रपटाना कोणी अश्लील म्हणत नाही आणि मी माझ्या 'टार्गेट ऑडियेन्स'ला जे पाहिजे ते देतो तर माझ्यावर अश्लिलतेचे आरोप होतात." काय चुकीचं बोलतो तो?
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात. कांती शाहला तुम्ही यशस्वी मानत असाल तर त्याच्या यशामागे पण एक स्त्री आहे. सपना तन्वीर. कांती शाहची बायको. पण ती कांती शाहच्या नुसते पाठीमागे उभी राहून थांबली नाही तर त्याच्या चित्रपटांमध्ये तिने कॅमेऱ्यासमोर पण भरपूर 'योगदान' दिले आहे. कांती शाहच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली आहे. तिचा स्वतःचा असा एक फॅन बेस आहे.
कांती शाहने त्याच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत धर्मेन्द्र, मिथून, गोविंदा, मनिषा कोइराला अशा ए ग्रेड अभिनेत्यांसोबत पण काम केल आहे. बी ग्रेड चित्रपटात काम करणारे हे मोठे अभिनेते हा स्वतंत्र लेखांचा विषय. राजेश खन्नाने आपल्या पडत्या काळात 'वफा' नावाचा एक तद्दन ब ग्रेड चित्रपट केला होता. त्यात त्याने केलेले काही सीन्स पाहून त्याच्या चाहत्यांवर वीज पडेल. तीच गोष्ट उर्वशी ढोलकिया या बिग बॉसच्या विजेतीची.
बी ग्रेड चित्रपट हे माझ्यासारख्या छोट्या शहरातून आलेल्या लोकांच्या अनुभव विश्वाचा अविभाज्य हिस्सा. हा विषय तसा टॅबू म्हणून गणला गेला असल्याने चार लोकात या विषयावर बोलता येत नाही. पण बोलता येत नाही म्हणून या विषयाच महत्त्व कमी होत नाही. कांती शाह हा माणूस त्यामुळे माझ्याच नव्हे तर लाखो लोकांच्या अनुभव विश्वाचा हिस्सा आहे. कुठलाही आव ना आणता त्याने एक प्रकारे चित्रपट सृष्टीशी आपले इमान राखले. आपल्या प्रेक्षकांशी एकनिष्ठ राहून त्याना इमान इतबारे हवे ते दिले. भले या माणसाने शोले किंवा दो बिघा जमीन बनवला नसेल पण आपल्याशी एकनिष्ठ प्रेक्षकाला काय हवे आहे हे त्याला पक्के माहीत आहे आणि कुठलाही अपराधगंड न बाळगता तो त्याला जे पाहिजे ते देतो.
काळ बदलत आहे. चित्रपट सृष्टीची गणितपण बदलत चालली आहेत. मल्टीप्लेक्स संस्कृतीने सर्व समीकरणं बदलून टाकली आहेत. त्याचा फटका कांती शाहला पण बसला आहे. डिजिटल क्रांतीच्या या काळात कांती शाह सारख्या एकांड्या शिलेदाराला निभाव धरण अवघड होत जाणार आहे. कदाचित पुढच्या पाच वर्षात कांती शाह व्यवसायिकदृष्टया नामशेष पण झाला असेल. पण त्याची लेगसी कायम राहणार आहे.
कांती शाह आणि एड वुड सारखी लोक आपण त्याना कितीही हसत असलो तरी चित्रपट बनवल्याशिवाय राहू शकत नाहीत. त्यांचं चित्रपट बनवण्यावर अतोनात प्रेम असतं. कारण ते त्याशिवाय दुसर काही करु पण शकत नाहीत. भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा पहिल्या मानाच्या प्रभावळीत कांती शाह सारख्याला जागा नसेल पण सर्वात शेवटच्या रांगेत तरी हजारी मनसबदार म्हणून एक मानाचे पान त्याच्यासाठी नक्कीच राखून ठेवलेल असेल.
अमोल उदगीरकर
View More
Advertisement
Advertisement





















