BLOG | अभिनयातले सम्राट 'अशोक'!
शक्तिमानसोबत लक्ष्या आणि अशोक सराफ यांचे सिनेमे पाहात 90 च्या दशकात वाढलेली आमची पिढी. जगात चांगलं काय आणि वाईट काय? हे आत्मसात करत स्वतःमध्ये संस्कार मुरवण्याच्या वयात अशोक सराफ नावाच्या माणसाचे आमच्यावर अनंत उपकार आहे. या माणसानं तमाम महाराष्ट्राला कठीण काळात हसायला शिकवलं. तेव्हा ना इंटरनेट होतं, ना मोबाईल होते. कलर टीव्ही तर सोडाच पण साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीसुद्धा दहा घरं सोडून एक असायचा. केबल चॅनेलही नव्हतं. शेणा मातीच्या हातांनी उन्हात राबणाऱ्या लोकांच्या आयुष्यात तेव्हा काहीच नसायचं. जेमतेम पिकायचं, बीटी बियाणं शेतात येण्याच्या आधीचे हे दिवस होते. या अशा काळात आपल्या जगण्याच्या चिंतेव्यतिरिक्त गावातल्या साध्याभोळ्या लोकांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे दोन तास अशोक सराफ यांच्यामुळेच मिळायचे. तेव्हा ग्रामीण महाराष्ट्राला दोनच माणसं माहित होती. लक्ष्या आणि अशोक सराफ.
सिनेमा हे माध्यम तेव्हा आजच्यासारखं सहज उपलब्ध नव्हतं. त्यासाठी आठवडाभर वाट पाहावी लागायची. दर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी 4 वाजता शेतातली कामं संपवून लोक भराभरा घराकडे निघायचे. हातातली कामं टाकून लोक तेव्हा टीव्हीसमोर बसायचे. महाराष्ट्रातल्या गावागावात शेणामातीनं सारवलेली छोटी छोटी घरं माणसांच्या गर्दीनं गजबजून जायची. असे दाटीवाटीनं मांडी न हलवता पायाला मुंग्या येईस्तोवर अशोक सराफ यांचे किती सिनेमे बघितले असतील याची गणतीच नाही. 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातला धनंजय माने, 'धुमधडाका' सिनेमातलं 'व्याख्खी व्याख्या व्याख्यू', 'घनचक्कर' सिनेमातला सायकलींचं पंक्चर काढणारा माणकू, 'गुपचूप गुपचूप' सिनेमातला प्रोफोसर ढोण, अरे किती बहुरुपी आहे हा माणूस. 'एक डाव भूताचा' मधला खंडूजी फर्जंद आणि 'भूताचा भाऊ' सिनेमातलं भूत किती हवहवसं वाटतं आपल्याला. किती अनंत भूमिका जगलाय हा माणूस तरी इतका साधेपणा आजपर्यंत टीकून आहे. त्यांचा हाच साधेपणा, सहजपणा त्यांच्या अभिनयातही आहे आणि म्हणून अशोक सराफ सगळ्यांना आपल्यातले वाटतात. उभा महाराष्ट्र या नटसम्राट अशोकावर प्रेम करतो ते यामुळेच.
मामांनी महाराष्ट्राला हसवता हसवता किती तरी वेळा रडवलंय. 'चौकट राजा'मधला त्यांनी साकारलेला गणा बघून डोळ्यात टचकन पाणी येतं. चौकट राजा सिनेमात अशोक मामा आणि सुलभा देशपांडेंच्या संवादांवर उभा महाराष्ट्र रडायचा. 'खरा वारसदार' सिनेमातली गतिमंद व्यक्तीच्या भूमिकेला किती कंगोरे आहेत. 'भस्म' चित्रपटात अशोक मामांनी जो अभिनय केलाय त्याची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. पण असे रोल मामांच्या वाट्याला खूप कमी आले. कलाकाराची पारख त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून होते. अशोकमामांच्या खलभूमिका धडकी भरवणाऱ्या असत. 'वजिर' सिनेमात साकारलेला पुढारी त्यापैकीच एक. हा सिनेमा बघताना कायम वाटत राहतं, "हे नक्की अशोक सराफच आहेत ना?" 'पंढरीची वारी' चित्रपटातही त्यांनी तसाच खलनायक साकारला. 'अरे संसार संसार' सिनेमातली नकारात्मक भूमिकाही तितकीच गाजली. प्रत्येक सिनेमातून वेगळं काहीतरी करण्याचा आणि प्रेक्षकांना आनंद देण्याचा प्रयत्न अशोक सराफ आजतागायत करायत.
आज काल विनोदी कार्यक्रमांचे विनोद बघून नाही तर कलाकारांची विनोद निर्मितीसाठीची अगतिकता बघून हसायला येतं. फार काही होत नाही म्हणून स्वतःच्या अश्लिल विनोदांना ब्लॅक कॉमेडी असं गोंडस नाव देऊन प्रेक्षकांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न कलाकार करतात. अशा विनोदी महाभागांनी अशोक सराफ, रंजना आणि निळू फुले या त्रयींचा 'बिनकामाचा नवरा' हा सिनेमा एकदा अभ्यास म्हणून बघावा. या तीन महान कलाकारांनी मराठी सिनेसृष्टीला अजरामर कलाकृती दिल्या. निळू फुलेंसोबत अशोक मामांचा आणखी एक मास्टरपीस म्हणजे 'गल्ली ते दिल्ली' नावाचा सिनेमा. 'बायको असावी अशी' सिनेमा तर कमाल होता. तेव्हा सिनेमाचे लेखकही तसेच असायचे म्हणा आणि ते साकारणारे कलाकारही. गावखेड्यातल्या लोकांना अशोक मामा आपलेसे वाटायचे. कारण त्यांचा अस्सल ग्रामीण पेहराव, विनोदी संवादांना उत्तम टायमिंगची साथ असायची. अशोक मामांनी अधूनमधून हिंदी सिनेमांमध्येही भरपूर काम केलं. छोट्या पडद्यावर 'हम पांच' सारखी सीरियल आजही अनेकांची फेव्हरेट आहे. वयाची सत्तरी ओलांडून गेल्यावरही ते आज त्याच दमानं काम करतात. त्यांच्यासोबत करीयर सुरू झालेले अनेक जण प्रसिद्धीझोतात आले पण अशोक मामांसारखं प्रेम आणि आदर निदान मराठी सिनेक्षेत्रात ना कुणाला मिळालंय ना मिळेल. ना मारधाड, ना अश्लिलता, ना द्विअर्थी विनोद तरीही लोक तासंतास टीव्हीसमोरून हटत नव्हते. आजच्या टीव्ही आणि सिनेमाच्या जगात मनोरंजनाचे बदलेले ठोकताळे बघून हा महान नट सहसा या सगळ्या दिखाव्यात दिसत नसावा. पण काळ कितीही बदलला तरी अशोक सराफांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यांच्या डायलॉगवर होणारे मिम्स त्यांंच्या डान्सस्टेप्सचे वायरल होणारे व्हिडिओ अधून मधून आपल्याला हसवत असतात. मराठीतले ते एकमेव सदासर्वकाळ सुपरस्टार आहे आणि कायम राहतील. आयत्या घरात घरोबा सिनेमातला शेवटचा सीन हृदयस्पर्शी आहे. हातातली छत्री गोल गोल फिरवत जाणाऱ्या अशोक मामांकडे सचिन बोट दाखवत म्हणतो.
"बघितलंस मधुरा, सर्वांच्या आयुष्यात आनंद वाटून जगातला सर्वात मोठा श्रीमंत चाललाय!" खरंय, आज अशोक सराफांसारखा श्रीमंत माणूस शोधूनही सापडणार नाही. ते आहेतच सम्राट अशोक.
मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.