BLOG : चार्ली आणि धर्मराज
BLOG : '777 चार्ली' हा सिनेमा एक माणूस होण्याचा दीर्घ प्रवास आहे. माणसं हल्ली माणसासारखी वागत नाही. अशावेळी मुके प्राणी माणुसकी जीवंत ठेवतात, मी तर म्हणेन ते माणसात नसलेल्यांना माणूस बनवतात. आयुष्याचा अर्थ हरवून बसलेल्या धर्मा (रक्षित शेट्टी)च्या आयुष्यात चार्ली ही लॅब्रेडॉर जातीची डॉगी आल्यानंतर त्याचं आयुष्य कसं पालटतं याची सुंदर कविता म्हणजे '777 चार्ली' हा चित्रपट. खरंतर मी श्वानप्रेमी नाही, मला घरात कुत्रा पाळणं ही संकल्पनाच आवडत नव्हती. त्यातही मुंबईसारख्या शहरात जिथे लोकांना स्वतःसाठी वेळ नाही, राहायला जागा नाही तिथे कुत्र्यांचे लाड करणारे लोक बघितले की वाटायचं, हे एकतर प्रचंड श्रीमंत लोक असावेत आणि दुसरं म्हणजे रिकामटेकडे असावेत. माझ्या या वाक्यात काही अंशी सत्य असलं तरी जिव्हाळा आणि ऋणानुबंध नावाची एक गोष्ट असते, जी वरकरणी आपल्याला दिसत नाही. हे मला चार्लीची कथा बघितल्यावर कळलं.
कथेचा आशय हा सिनेमाचा आत्मा असतो. अत्यंत साधा विषय आणि साधी कथा तुम्ही कशी मांडता यावर कलाकृती चांगली वाईट ठरते. अत्यंत चांगले विषय अत्यंत वाईट पद्धतीनं मांडल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. पण '777 चार्ली' सिनेमाची कथा किरणराज यांनी स्वतः लिहिली असल्यानं आणि दिग्दर्शकही तोच असल्यानं ती अधिक प्रभावी झाली आहे. कुठलाही अतिरेक न करता अत्यंत साध्या सोप्या जगण्यातलं सौंदर्य आणि श्वानाभोवती फिरणारं जग हे प्रत्येक प्रेक्षकाला आपलं वाटतं, भलेही तो माझ्यासारखा श्वानप्रेमी नसेल. अत्यंत व्यवहारी असलेल्या जगात एखादा सिनेमा बघता बघता टचकन तुमच्या डोळ्यांच्या कडा पानावत असतील तर ती एक हजार कोटी कमावलेल्या सिनेमापेक्षाही मोठी पावती असेल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी '777 चार्ली' बघितला तेव्हा त्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाही. खळखळून हसवणारा चार्ली चाप्लिन आपण बघितला, पण हा 777 चार्ली तुम्हाला ढसाढसा रडवतो.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर एक धार्मिक संस्कार असतो. दैनंदिन जगण्यात माणूसकीनं जगणं ही शिकवण प्रत्येक धर्माची आहे. आपले धर्मग्रंथ आणि पुराणकथांचा थेट संबंध आपल्या आयुष्यात किती खोलवर झालाय हे सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेलच. भूतदया ही तर धर्माची सर्वात मोठी शिकवण आहे. '777 चार्ली' सिनेमाची स्क्रिप्ट लिहिताना लेखक दिग्दर्शक किरणराज यांनी महाभारतातल्या एका कथेचा आधार घेतलाय. अर्थात सिनेमाच्या कथेचा महाभारतातल्या या कथेशी कुठलाही ओढूनताणून संबंध दाखवण्याचा मोह दिग्दर्शकानं टाळलाय. महाभारतात राजा युधिष्ठिर यांची धर्मराज युधिष्ठिर होण्याची कथा तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हा सिनेमा जास्त रिलेट कराल. सिनेमातल्या नायकाचं नाव धर्मा आहे, ते यावरूनच. तुम्हाला महाभारतातली ती कथा मी सांगतो. अर्थात कथा जरा दीर्घ आहे.
कुरूक्षेत्रावर कौरवांचा पराभव केल्यानंतर राजा युधिष्ठिरानं सगळं काही मिळवल्यानंतर राजपाट आणि सुखाचं आयुष्य त्यागून स्वर्गाची वाट धरली. युधिष्ठिराच्या या निर्णयात भीम, अर्जुन, नकूल, सहदेव या चारही बंधूंनी साथ दिली. त्यांनीही इंद्रप्रस्थ राज्याचा त्याग करून युधिष्ठिरासोबत प्रवास सुरू केला. सोबत द्रौपदीही निघाली. पाच पांडव आणि दौपदी स्वर्गाची वाट चालू लागले. या सहा जणांसोबत एक सातवा मेंबरही त्यांच्या प्रवासात होता, तो म्हणजे राजा युधिष्ठिराचा अत्यंत निष्ठावान कुत्रा.
स्वर्गाच्या वाटेवर या सातही जणांना हिमालय सर करायचा होता. हिमालय सर करताना सहदेव एका खोल दरीत कोसळला. भीमानं युधिष्ठिराला याचं कारण विचारलं, तर युधिष्ठिर म्हणाला, “सहदेवाला स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार होता. अहंकाराला स्वर्गात स्थान नाही.”
नकुलही असाच खोल दरीत कोसळला. भीमानं पुन्हा युधिष्ठिराला विचारलं, त्यावर युधिष्ठीर म्हणाला “नकुल स्वस्तुतीमध्ये मग्न असायचा, तो स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा. मी किती सुंदर आहे, हे तो दिवसभरात अनेकवेळा बोलून दाखवायचा. अशा स्वस्तुती करणाऱ्यांची स्वर्गात जागा नाही.”
थोडं पुढे गेल्यावर अर्जुन खाली कोसळला, याचं कारण अर्जुनाला अती आत्मविश्वासानं ग्रासलं होतं. मी काहीही करु शकतो, मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे हा फाजील आत्मविश्वास असल्यानं अर्जुनालाही स्वर्गात स्थान नव्हतं. अर्जुन खाली कोसळल्यानंतर दौपदीही खोल दरीत कोसळली. भीमानं द्रौपदीच्या खाली पडण्याचं कारण विचारलं, त्यावर युधिष्ठिर म्हणाला “दौपदीचं अर्जुनावर सर्वाधिक प्रेम होतं, त्याची ओढ होती. एखाद्या वस्तू वा व्यक्तीविषयी ओढ असणाऱ्याला स्वर्गात प्रवेश नाही.”
आता उरले फक्त युधिष्ठिर, भीम आणि कुत्रा. थोडं पुढे गेल्यावर भीमही कोसळला. कारण भीम हा स्वतःला पराक्रमी मुष्ठीयोद्धा समजत होता. आपल्या शक्तीचा तो दिखाऊपणा करत होता. तसंच आयुष्यभर तो आवश्यकतेपेक्षा जास्त भोजन करायचा. त्यामुळे दिखाऊपणा आणि गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा वापर करणाऱ्यांनाही स्वर्गात स्थान नव्हतं. आता युधिष्ठिर आणि त्यांचा निष्ठावान कुत्रा स्वर्गाच्या दारात पोहोचले. सर्व परीक्षांमध्ये उत्तिर्ण झालेल्या युधिष्ठिराचं इंद्रदेवानं स्वागत केलं पण स्वर्गात श्वानाला स्थान नाही, त्यामुळे त्याचा त्याग केला तरच स्वर्गात स्थान मिळेल अशी अट इंद्रानं युधिष्ठिराला घातली. त्यावर युधिष्ठिर म्हणाला, “हा फक्त श्वान नाहीय, हा माझा सच्चा साथिदार आहे. जीवनात कितीही संकटं आली तरी या श्वानानं माझी साथ कधीच सोडली नाही. या प्रवासात माझे भाऊ आणि पत्नी मला सोडून गेले. मात्र हा श्वान या क्षणापर्यंत माझ्यासोबत होता. जर हा प्रामाणिक श्वान त्याचं आयुष्य माझ्यावर खर्ची करतोय तर मी त्याला सोडून स्वर्गात का जाऊ? याच श्वानानं माझ्यावर विनाशर्त प्रेम केलं. स्वर्गाच्या सुखापेक्षा या श्वानाची साथ सोडण्याचं दुःख जास्त असेल. त्यामुळे मी स्वर्गाचा त्याग करतोय.” असं म्हणत युधिष्ठिर आपल्या श्वानासोबत परत फिरले. त्यावेळी इंद्रदेवानं युधिष्ठिराला थांबवलं. ज्या श्वानासाठी युधिष्ठिर इंद्राशी लढला, ते श्वान साक्षात धर्मदेवता होती. आपले एक एक भाऊ सोडून जात असताना युधिष्ठिर स्थितप्रज्ञासारखा पुढे जात होता. पण जेव्हा श्वानाची वेळ आली तेव्हा मात्र त्यानं स्वर्गाऐवजी श्वानाची निवड केली. त्यामुळेच युधिष्ठिराला धर्मराज युधिष्ठिर म्हटलं जातं.
महाभारतातल्या युधिष्ठिरासारखंच सिनेमाचा नायक धर्माचं आयुष्य आहे. या सिनेमातल्या नायकाचं नाव धर्मा का आहे? याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. धर्मराज युधिष्ठिरासारखेच चढ उतार धर्माच्या आयुष्यात येतात. त्याचेही आप्तेष्ट अपघातानं दूर गेले आहेत. त्या धक्क्यातून सावरत सावरत आणि जगण्याचा संघर्ष करत त्याचं मन वाळवंटासारखं शुष्क बनलंय. अत्यंत अस्ताव्यस्त गोडाऊनवजा घरात राहणारा धर्मा फक्त चार्ली चाप्लिनचे सिनेमे बघतो. पण चुकूनही तो कधी हसत नाही. धर्मा दोन्ही वेळेला फक्त इडली खाऊन जगतो. यावरून त्याचं आयुष्य किती बेचव झालंय याची कल्पना करा. मग धर्माच्या आयुष्यात लॅब्रेडॉर जातीची पपी येते. घर, इडली, नोकरी आणि सिगरेट एवढंच आयुष्य असलेला धर्मा कधीही माणसांत मिसळत नाही, पण ही पपी त्याला लळा लावते. धर्मा तिचं नाव ठेवतो 'चार्ली'. धर्माच्या आयुष्यात चार्ली आल्यानंतर तो बदलतो. पण चार्ली आणि धर्माच्या आयुष्यात अजून बरंच काही घडायचं बाकी असतं. चार्लीला कॅन्सरचं निदान होतं. धर्माला पुन्हा एकदा आपलं कोणीतरी दूर जाणार ही भावनाच असह्य होते. चार्लीच्या आयुष्याचे काही दिवसच शिल्लक असल्यानं त्याला मनासारखं जगता यावं यासाठी सुरू होतो एक प्रवास. एक असा प्रवास जो आपल्याला एंटरटेन्मेंटच्या जगातून इमोशन्सच्या जगात घेऊन जातो. सिनेमाचा नायक रक्षित शेट्टीचे (धर्मा) अत्यंत मोजके संवाद आहेत. पण सिनेमाची खरी नायिका आहे चार्ली. धर्मा आणि चार्लीमधला निःशब्द संवाद हा अत्यंत देखणा आहे. सिनेमाला भाषेची सीमा नसते, ती अनुभवायची गोष्ट आहे.
लॅब्रेडॉर ही जात मुळात कॅनडासारख्या थंड बर्फाळ भागातली. चार्लीला बर्फात खेळायला आवडतं त्यामुळे त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी जय विरूसारखं चार्लीला बुलेटवर बसवत धर्मा राईडला निघतो. कर्नाटकपासून सुरू झालेला हा प्रवास गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हिमाचलपर्यंत पोहोचतो. जिथे माणूस स्वतःच्या इच्छा मारून आला दिवस ढकलत असतो. तिथे धर्मा एका श्वानाच्या प्रेमापोटी भ्रमंतीवर निघतो. मी नेहमी म्हणतो, प्रवास हा तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. धर्मालाही हा प्रवास भरभरून देतो. माणसांचे स्वभाव, प्रदेशांनुसार उद्भवणाऱ्या समस्या, जगण्यातला संघर्ष हा सगळा चांगला वाईट अनुभव घेत धर्मा प्रेक्षकांनाही जगण्याची नवी दृष्टी देतो. अत्यंत छोटे छोट्या प्रसंगांमधून कुठलाही संवाद नसताना धर्मा आणि चार्ली यांचं नातं नव्यानं उलगडत जातं. उत्कृष्ट छायाचित्रण, सोबत अप्रतिम संगीत, गाणि आणि संवाद. हिंदीतलं डबिंग इतकं उत्तम केलंय की हा कन्नड सिनेमा आहे हे तुम्ही विसरुन जाल. फार स्पॉईलर न देता प्रत्येकानं हा सिनेमा जगून घ्यावा. अनेक सुंदर प्रसंगांचं वर्णन करणं मी टाळतो. डोळ्यांच्या पापण्या ओल्या होत, समोरची स्क्रीन असंख्य वेळा धूसर होते.
हिमाचलमधला हिमालयाची पर्वतरांग म्हणजे आपल्या भारतीयांसाठी स्वर्गच आहे. या स्वर्गाच्या दारापर्यंत धर्माचा आपल्या श्वानासाठी केलेला हा प्रवास महाभारतल्या धर्मराजाच्या आयुष्यातला एक अध्याय असावा इतका सुंदर हा सिनेमा आहे. खरंतर सिनेमा जिथे संपतो तिथे आपला माणूस होण्याचा प्रवास सुरू होतो.
टॉम हँकच्या ‘फॉरेस्ट गम्प’ सिनेमानं अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली. हॉलिवुडमधल्या सर्वाधिक लोकप्रिय सिनेमांमध्ये 'फॉरेस्ट गम्प' गणला जातो. '777 चार्ली' हा मला त्यापेक्षाही दर्जेदार वाटतो, कारण हा आपला सिनेमा आहे. आपल्या मातीतला आपल्या भावभावना अधिक उत्कटतेनं आपल्यापर्यंत पोहोचवणारा सिनेमा आहे. हा सिनेमा कदाचित 100 – 200 कोटी कमावणार नाही. त्याला पुरस्कार वगैरे मिळतील की नाही माहित नाही. पण कन्नड सिनेमाच्या इतिहासात नव्हे तर भारतीय सिनेमाच्या इतिहासात '777 चार्ली' या सिनेमाची अजरामर सिनेकृती म्हणून नोंद होईल.
(777 चार्ली सध्या थीएटरमध्ये आहे, हिंदीतही उपलब्ध असल्यानं हा विलक्षण अनुभव घ्या)