एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BLOG | पुन्हा एकदा शेतकरी चळवळीची पांगापांग!

16 जूनला राजू शेट्टी आमदारकी स्वीकारण्यासाठी बारामतीच्या गोविंदबागेत आले तेव्हा स्वतः शरद पवारांनी त्यांना सगळा परिसर फिरुन दाखवला. जेवायला आमरसाचा बेत केला. मला मात्र प्रश्न पडला की राजू शेट्टींना गोविंद बागेतील आमरस खाताना, बारामतीच्या वेशीवर 8 नोव्हेंबर 2011 ला एका झाडाखाली बसून खाल्लेल्या ठेचा-भाकरीची चव आठवली असेल का?

बारामती जसजशी जवळ येत होती तसा जमाव आणखीनच वाढत चालला होता. पंढरपूरहून चालत निघालेले राजू शेट्टी बारामतीच्या वेशीपर्यंत पोहोचेपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यातील हजारो शेतकरी पोरं त्यांना येऊन मिळाली होती. दुपारच्या जेवणासाठी बारामतीच्या वेशीवर असलेल्या एका वस्तीवर राजू शेट्टी थांबले. झाडाखाली अंथरलेल्या घोंगड्यावर बसले आणि समोर मिरचीचा ठेचा भाकरी आणि भाजी ठेवण्यात आली. आजूबाजूलाही गर्दी जमली होती. शेट्टींचं ही पदयात्रा कव्हर करणाऱ्या पत्रकारांनी भारावून जाऊन त्यांच्या या साधेपणाचं रिपोर्टिंग सुरु केलं. शेतकऱ्यांचा हा नेता शेतकऱ्यांमध्ये बसून त्यांच्यासारखंच जेवतोय म्हणून माध्यमांकडून कौतुक सुरु झालं. जेवण करुन शेट्टी उठले आणि पदयात्रा पुढे सुरु झाली. बारामतीत शारदा प्रांगणाच्या मैदानावर या पदयात्रेची जाहीर सभेने सांगता होणार होती. सभा सुरु झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका-एका नेत्याची भाषणं सुरु झाली. शेवटी शेट्टी भाषणाला उभे राहिले. ऊसाला 2350 भाव मिळावा ही मागणी करताना त्यांनी साखर सम्राटांना आणि त्यांच्या नेत्यांना उभं आडवं घेतलं. समोर जमलेला जमाव टाळ्या-शिट्ट्या वाजवून शेट्टींच्या वक्त्यव्यांना दाद देत होता. बराच वेळ चाललेलं भाषण चाललं आणि ते संपवता संपवता शेट्टींनी घोषणा केली की, जोपर्यंत सरकार ऊसाला 2350 चा दर घोषित करत नाही तोपर्यंत मी इथंच आमरण उपोषण करायचं ठरवलंय. समोरचा जमाव शेट्टींच्या या घोषणेनं आणखीनच चेकाळला. पण तारांबळ उडाली ती पोलिसांची. कोणतीही पूर्वकल्पना न देता हजारो शेतकऱ्यांसह बसल्या जागी उपोषण सुरु झाल्यानं पोलीस गांगरुन गेले. शेट्टींना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण शेट्टी आंदोलनावर ठाम राहिले. स्वाभिमानीच्या बारामती परिसरातील हितचिंतकांनी लगेच समोर जमलेल्या हजारो लोकांसाठी जेवणाची तयारी सुरु केली. लग्नात भट्ट्या पेटवून आचारी जेवण बनवतात तसं जेवण तयार करण्यात आलं. जेवण करुन हे आंदोलक शेतकरी मैदानातच निजले तर राजू शेट्टी समोरच्या भाषणाच्या स्टेजवरच आडवे झाले. आंदोलन मोडायचा अखेरचा प्रयत्न म्हणून रात्री उशिरा बारामती पोलीस राजू शेट्टींना ताब्यात घेण्यासाठी आले. पण मैदानातच झोपलेल्या आंदोलकांना पोलीस आल्याचं कळताच ते उठून उभे राहिले आणि एकच गोंधळ सुरु झाला . शेतकऱ्यांचा एकूण अवतार पाहून शेट्टींना ताब्यात घेण्यासाठी आलेले पोलीस त्यांच्या जवळही पोहोचू शकले नाहीत आणि मैदानातूनच हात हलवत परत गेले. हा दिवस होता 8 नोव्हेंबर 2011. शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या राजू शेट्टींना त्यादिवशी शारदा प्रांगणाच्या मैदानात उघड्यावर न जेवता देखील तृप्ततेने झोप लागली.

राजू शेट्टींचं उपोषण जसजसं पुढं सरकू लागलं तसा आघाडी सरकारवर दबाव वाढू लागला. दुसरीकडे शेट्टींनी बारामतीच्या गुहेत शिरुन शड्डू ठोकल्यानं पवार विरोधकांना बारामतीत येऊन बोलण्यासाठी स्टेज मिळालं होतं. त्यावेळी विरोधात असलेले शिवसेना, भाजप, मनसे या पक्षांचे राज्य स्तरावरचे नेते राजू शेट्टींना पाठिंबा देण्यासाठी बारामतीला येऊ लागले आणि शेट्टींच्या स्टेजवरुन पवारांवर टीका करु लागले. एरवी बारामतीत सभा घेण्यासाठी बिचकणाऱ्या विरोधकांना शेट्टींमुळे संधी मिळाली होती. राजू शेट्टींचं आंदोलन जेवढे दिवस चाललं तेवढे दिवस विरोधी पक्षातले नेते बारामतीत येऊन भाषण ठोकण्याचा आंनद घेत होते. सर्वच मीडियाने हे आंदोलन उचलून धरल्यानं ते राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास वेळ लागणार नव्हता. राजू शेट्टींचं आंदोलन सुरु असलेल्या शारदा प्रांगणातून न्यूज चॅनेल्सनी ओबी व्हॅन्सच्या सहाय्याने या आंदोलनाचा आंखो देखा हाल दाखवणं सुरु केलं होतं. शेट्टींचं वजन दिवसागणिक कमी होत होतं. या सगळ्यामुळं आघाडी सरकार दबावाखाली आलं आणि चर्चेला तयार झालं. पुण्यातील साखर संकुलात सरकारचे प्रतिनिधी आणि आंदोलकांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक ठरली. बारामतीत राजू शेट्टींचं लाईव्ह उपोषण सुरु होतं तर तिकडं पुण्यातील बैठकीची प्रत्येक अपडेट न्यूज चॅनेलवर झळकत होती. अखेर सरकारने राजू शेट्टींच्या मागण्या मान्य केल्या. राजू शेट्टींच्या पुण्यात बैठकीला आलेल्या सहकाऱ्यांनी न्यूज चॅनेलसमोर हे जाहीर केलं आणि बारामतीत शारदा प्रांगणात मुक्काम ठोकून असलेल्या जमावानं एकच जल्लोष केला. शेट्टींचं हे आंदोलन ऊसाला 2350 रुपये मिळवून देण्यात यशस्वी तर ठरलंच पण त्यानं बारामतीची निवड करुन महाराष्ट्रातील साखर सम्राटांच्या गंडस्थळावरच हल्ला चढवला होता.

या आंदोलनाच्या यशानंतर राजू शेट्टी आणि त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणखीनच आक्रमक झाले. राजू शेट्टींचं सयंमी नेतृत्त्व आणि त्याला सदाभाऊ खोतांच्या तिखट जाळ वक्तृत्वाची जोड यामुळे राजू शेट्टींचं आंदोलन फक्त ग्रामीण भागातच नाही तर टीव्ही आणि न्यूज पेपरमुळे शहरातही लोकप्रिय झालं. त्यातूनच स्वाभिमानीनं पुढं पुणे आणि इतर शहरात विद्यार्थी आघाडी वगैरे उघडून हात पाय पसरण्याचा प्रयत्न केला. पुढच्या वर्षी गळीत हंगाम सुरु होताच राजू शेट्टींनी ऊसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा अशी मागणी करत पुन्हा आंदोलनाची घोषणा केली. त्यावर्षी शेट्टींनी आंदोलनासाठी निवड केली ती बारामतीला लागूनच असलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूरची. इंदापूरचे आंदोलन मात्र बारामतीसारखं उपोषणाच्या शांततेच्या मार्गानं जाणार नव्हतं तर हिंसेचा आगडोंब उसळणारं होतं. कित्येक दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटेनच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक, जाळपोळ असे प्रकार पुणे-सोलापूर हायवेवर सुरु होते. त्यामध्ये संघटनेचा एक कार्यकर्ता दुर्दैवानं मृत्युमुखी देखील पडला. वाढता हिंसाचार पाहून पोलिसांनी राजू शेट्टींना इंदापूरमध्ये अटक करुन पुण्यातील येरवडा कारागृहात हलवलं. त्या वर्षीही राजू शेट्टी आणि त्यांची संघटना शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दर मिळवून देण्यात यशस्वी ठरले. एन दिवाळीत इंदापूरचे हे आंदोलनं सुरु असल्यानं शहरी भागातील लोकांची सहानुभूतीही त्यांना मिळाली. या आंदोलनादरम्यान सदाभाऊ खोतांकडून शरद पवारांच्या कुटुंबाबद्दल कमरेखाली वार करणारी टीका करण्यात आली. सलग दोन वर्ष बारामती परिसरात सुरु असलेल्या आंदोलनामुळं आधीच चिडलेले अजित पवार आणि शरद पवार त्यामुळं जास्तच संतप्त झाले. बारामतीजवळच्या एका सभेत बोलताना शरद पवारांनी शेट्टी कोल्हापूरच्या कल्लप्पा आवाडे किंवा विनय कोरेंच्या कारखान्यासमोर आंदोलन करण्याऐवजी आमच्याच दारासमोर येऊन आंदोलन का करतात असा प्रश्न विचारात शेट्टींवर जातीय वार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि अठरापगड जातीचा शेतकरी शेट्टींच्या मागे ठामपणे उभा राहिला. वातावरण शमवण्यासाठी दिवाळीच्या दिवशीच राजू शेट्टींना जामीन मंजूर झाला आणि येरवडा कारागृहातून त्यांची सुटका झाली.

सलग दोन वर्ष आंदोलनाला मिळालेल्या यशामुळं राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आणि त्यांनी पुढच्या वर्षी आंदोलनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडची निवड केली. 2013चं हे आंदोलनही इंदापूरप्रमाणेच कमालीचं हिंसक ठरलं आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचा दरही मिळवून देणारं ठरलं. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे हिरो तर बनलेच पण शहरातील लोकही शेतकऱ्यांनी प्रस्थापितांविरुद्ध चालवलेल्या या चळवळीकडं उत्सुकतेनं पाहू लागले. शहरातील काही डॉक्टर, वकील वगैरे मंडळीही आकर्षणापोटी राजू शेट्टींशी जोडली गेली. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेसाठी आंदोलन करणारा कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील एक पोरगा इथपासून सुरु झालेला राजू शेट्टींचा राजकीय प्रवास चढत्या भाजणीचा राहिला होता. जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि सलग दोनवेळा खासदार हे सगळं शेट्टींना पाठीशी जात, पैसा किंवा कुठलाही राजकीय वारसा नसताना मिळालं होतं, ते फक्त शेतकऱ्यांच्या प्रेम आणि विश्वासामुळं. राजू शेट्टी शेकऱ्यांच्या उसाला आणि दुधाला दर मिळवून द्यायचे आणि त्याबदल्यात शेतकरी शेट्टींना न मागता सगळं द्यायचे . पण शेतकरी फक्त संघटनेला मदत करुनच थांबले नाहीत तर आपला नेताही इतर आमदार-खासदारांप्रमाणे मोठ्या गाडीतून फिरला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी वर्गणी काढून शेट्टींनी फॉर्च्युनर किंवा अशीच कोणती गाडी भेट दिली. पुढं सदाभाऊ खोतांनाही तशीच दानत दाखवत मोठी गाडी वर्गणी काढून शेतकऱ्यांनी भेट दिली. जयसिंगपूरची ऊस परिषद असेल किंवा आणखी कोणती सभा वर्गणीचं आवाहन झाल्यावर सभेला आलेला शेतकरी स्वाभिमानीच्या झोळीत त्याला जेवढं शक्य आहे तेवढं दान टाकत होता. ऊसाला चांगला दर मिळवून देणाऱ्या शेट्टी आणि सदाभाऊ या जोडीसाठी शेतकरी खुशीनं स्वतःच्या खिशात हात घालत होता.

ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानीनं चांगलंच बाळसं धरलं आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देऊन विदर्भातही हात पाय पसरण्याचे प्रयत्न सुरु केले. स्वाभिमानीच्या आंदोलनाला येणारा शेतकरी स्वतःच्या घरुन जेवण बांधून घेऊन येत होता किंवा बाहेर जेवायची वेळ आली तर स्वतःच्या पैशाने जेवत होता. समाजातील इतर कोणत्याही क्षेत्रात यावेळी चळवळींचं अस्तित्त्व उरलं नव्हतं. सांस्कृतिक, साहित्यिक, चित्रपट, नाट्य, शिक्षण, कामगार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील चळवळींनी जागतिकीकरणानंतर माना टाकल्या असताना राजू शेट्टींची शेतकऱ्यांना सोबत घेऊन उभारलेली ही चळवळ सगळ्यांच्या नजरेत भरत होती.

पण नजरेत भरणाऱ्या या चळवळीला इथूनच नजर लागण्यास सुरुवात झाली. पुढील वर्षी म्हणजे 2014 साली आलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजप-शिवसेनेनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी पायघड्या अंथरल्या. इथून स्वाभिमानी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या राजकारणात उतरली आणि तिचं चळवळ हे रुप विरत जाऊन राजकीय पक्षाचं प्राक्तन तिच्या वाट्याला यायला लागलं. भाजप-सेना युतीनं राजू शेट्टींसाठी हातकणंगले मतदारसंघ तर सोडलाच त्याचबरोबर माढा या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लोकसभा मतदारसंघातून सदाभाऊ खोतांना उमेदवारी दिली. त्यावेळच्या प्रबळ मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटलांना सदाभाऊंनी चांगलंच झुंजवलं. एका साखर सम्राटाविरुद्ध ऊस आंदोलकांची ही निवडणूक त्या भागातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सदाभाऊंसाठी तिथल्या शेतकऱ्यांनी जीवाचं रान केलं. वेळ पडली तेव्हा स्वतःच्या पैशांनी सदाभाऊंना घालायला चांगली कपडेही घेऊन दिली. त्या निवडणुकीत सदाभाऊंचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत ग्रामीण भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीविरुद्ध वातावरण तयार करण्यात स्वाभिमानीचा मोठा वाटा होता. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानाला मिळालेल्या भरघोस मतांमुळं काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीला सेना भाजपनं सोलापूर जिल्ह्यात करमाळा आणि पंढरपूर या दोन जागा सोडल्या. इतक्या संघर्षानंतर मिळालेली ही संधी स्वाभिमानीसाठी खपणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला मिळेल अशी सगळ्यांना अशा होती. पण स्वाभिमानाने करमाळ्याची उमेदवारी दिली ती संजय शिंदें यांना तर पंढरपूरची प्रशांत परिचारक यांना. दोघेही साखर कारखानदार. ज्यांच्याविरुद्ध आंदोलन करुन लाठ्याकाठ्या खाल्ल्या त्यांचा प्रचार कसा करायचा असा प्रश्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पडला आणि आंदोलनाने बांधलेली कार्यकर्त्यांची मोट सुटायला सुरुवात झाली. संजय शिंदे आणि आणि परिचारक या दोघांचाही पराभव झाला पण त्यांना तिकीट देताना पैसे घेतल्याची चर्चा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडूनच सुरु झाली.

या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी भाजपला जाणवणारी शेतकरी नेत्याची उणीव भरुन काढण्यासाठी सदाभाऊंना हाताशी धरलं. तोपर्यंत विरोधक बनलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून शेतीच्या प्रश्नांवर फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न होऊ लागला. तेव्हा विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या सदाभाऊंना पुढं करायचं फडणवीसांनी ठरवलं . फडणवीसांच्या या राजकारणामुळं स्वाभिमानीत मात्र उभी फूट पडली. एका ताटात जेवणारे, एकत्र लाठ्याकाठ्या खाल्लेले राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची जोडी इथं फुटली. सदाभाऊ भाजपचे आमदार आणि पुढं फडणवीस सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री बनले. इकडे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी राजू शेट्टींनी त्यावेळच्या राज्य आणि केंद्र सरकाराच्या विरुद्ध आंदोलनांचा सपाटा लावला. शेट्टींच्या आक्रमकतेला वेसण घालण्यासाठी फडणवीसांनी सदाभाऊंना पुढं केलं आणि शेट्टी आणि खोतांमधील संघर्षाला वैयक्तिक वैराचं स्वरुप प्राप्त झालं. सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर तालुक्यातील आपल्या गावी दोन अडीच एकरांमध्ये शेती करणाऱ्या सदाभाऊंचा इस्लामपूरमध्ये टुमदार बांगला उभा राहिला. बंगल्यासमोर सदाभाऊंच्या मुलांची लग्न झोकात झाली. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस त्या लग्नाला लावाजम्यानिशी आले. सदाभाऊंसाठी रक्ताचं पाणी करणारा, माढा लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी दिवसरात्र प्रचार करणारा स्वाभिमानाचा कार्यकर्ता त्यामुळं चिडला आणि हिरमुसला देखील. आंदोलक म्हणून कुठल्याही गावात ज्यांचं स्वागत व्हायचं त्या सदाभाऊंना पोलीस बंदोबस्त असताना देखील गावांमध्ये जाणं त्यामुळं अवघड बनलं. सदाभाऊंनी स्वतःची संघटना काढली खरी पण त्यात राम नव्हता. सदाभाऊंवर दगाबाजीचा आरोप झाला. तर आम्ही लाठ्याकाठ्या किती दिवस खायच्या? किती दिवस झोपडीत राहायचं असा सदाभाऊंच्या जवळ असणाऱ्यांचा सवाल होता. प्रत्येक चळवळीत हा असा टप्पा येतच असतो. स्वाभिमानीसाठी तो सदाभाऊंच्या रुपाने आला.

दुसरीकडे राजू शेट्टींचं केंद्र सरकारच्या शेती धोरणांच्या विरोधात मध्य प्रदेश, गुजरात अशा आणि वेगवगेळ्या राज्यांमध्ये जाऊन आंदोलनं करणं सुरु होतं. खासदार असल्यानं शेतकरी नेता म्हणून देशपातळीवर त्यांची ओळख निर्माण झाली पण त्या नादात मतदारसंघाकडं मात्र त्यांचं दुर्लक्ष झालं. निवडणुकीवेळी शेट्टींनी यूपीएसोबत आघाडी केली खरी पण भाषणाच्या ओघात एका समाजाबद्दल त्यांच्याकाडून झालेलं वक्तव्यही त्यांना नुकसान करणारं ठरलं आणि उरलेली कसर सैन्याच्या जोरावर देशभक्तीची लाट स्वतःच्या पाठीमागं उभी करण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपने भरुन काढली. त्या लाटेत राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेच्या धैर्यशील मानेंकडून पराभूत झाले. दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणाऱ्या धैर्यशील मानेंच्या आई निवेदिता मानेंचा राजू शेट्टींनी पराभव केला होता. पण त्याच राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करताच राजू शेट्टींचा पराभव झाला. साखर कारखानदारांशी असं जुळवून घेणं त्यांच्या पराभवामागचं एक कारण ठरल्याचंही बोललं गेलं.

त्यानंतर वर्षभर राजू शेट्टी शांत राहिले. स्वाभिमानीला राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेची एक जागा देण्याचं निवडणुकीसाठी आघाडी होताना ठरलं होतं. त्यामुळं स्वाभिमानीकडून ही आमदारकी कोणाला मिळणार याची चर्चा माध्यमातून सुरु झाली. संघटनेतील काहींची नावं बातम्यांमधून घेतली जाऊ लागली असतानाच राजू शेट्टी स्वतःच राष्ट्रवादीची आमदारकी घेऊन मोकळे झाले. त्यासाठी बारामतीला जाऊन गोविंदबागेची पायधूळ झाडण्याची तयारी त्यांनी ठेवली. खरंतर राजू शेट्टींनी आतापर्यंत कधी भाजप-सेनेशी तर कधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळतं घेऊन स्वतःच राजकारण रेटलंय. शरद पवारांशीही त्यांचे व्यक्तिगत संबंध चांगलेच राहिलेत. पण ते करताना शेट्टी त्यांचं स्वतःच आणि चळवळीचं वेगळं अस्तित्व कायम राखण्यात यशस्वी ठरत होते. पण आत्ता त्यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसची आमदारकी शेतकरी नेता म्हणून त्यांचं वेगळं अस्तित्त्व कायम ठेवेल का हा प्रश्न आहे. शरद पवारांना बेंबीच्या देठापासून विरोध करणारे पुढे बाजू बदलून त्यांच्या पाठीमागं जाऊन उभे राहिल्याचं अनेकांच्या बाबतीत पाहायला मिळालंय. पवारच नाही तर इतर पक्षांमध्येही विरोधकांना स्वतःकडे खेचून संमिलीकरणाची प्रक्रिया करुन शांत केलं जातं. कोणी याला वाघाची शेळी करणं म्हणतं तर कोणी आणखी काही. अशाप्रकारे वाघाची शेळी झालेल्यांची यादी फक्त राजकीय क्षेत्रात नाही. साहित्य, कला, संस्कृती, समाजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जे सुरुवातीला क्रांतिकारकांच्या आवेशात वावरले, त्यांनी पुढं प्रस्थापितांच्या कळपात जाणं पसंत केल्याचं ठायी ठायी दिसून येतं. आता त्यामध्ये राजू शेट्टींची भर पडणार आहे का की स्वतःच आणि शेतकरी संघटनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी खेळलेली ती चतुर खेळी आहे हा ज्याच्या त्याच्या या गोष्टींकडं बघण्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे.

खरंतर कुठल्याही चळवळीची इतिश्री होण्यात वेगळं असं काहीच नाही. तसं होण्याने काहीजण भावनिक होतात, काहीजण हळहळतात तर काहीजण चुकचुकतात. पण ती अटळ अशी घटना आहे. त्या इतिश्रीतूनच नव्या आंदोलनाचा श्रीगणेशा होत असतो. कदाचित नवा राजू शेट्टी तयार होण्याची सुरुवात यापासूनच होईल.

16 जूनला राजू शेट्टी आमदारकी स्वीकारण्यासाठी बारामतीच्या गोविंदबागेत आले तेव्हा स्वतः शरद पवारांनी त्यांना सगळा परिसर फिरुन दाखवला. जेवायला आमरसाचा बेत केला. मला मात्र प्रश्न पडला की राजू शेट्टींना गोविंद बागेतील आमरस खाताना, बारामतीच्या वेशीवर 8 नोव्हेंबर 2011 ला एका झाडाखाली बसून खाल्लेल्या ठेचा-भाकरीची चव आठवली असेल का?

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसाराTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 Noon

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget