एक्स्प्लोर
जिभेचे चोचले - सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला
सीएसटी स्टेशनवरुन बाहेर पडल्यावर फक्त रस्ता क्रॉस केल्यावर एका गल्लीच्या तोंडाशी दिवसाच्या कोणत्याही वेळेला कायम गर्दीच दिसेल तशी गर्दी दिसली की बिनधास्त आत शिरायचं कारण ती गर्दी पंचम पुरीवालाचीच असते.
खरा खवय्या कोणता असा प्रश्न केला तर आपण काय काय निकष लावू बरं. माझ्या मते चवदार पदार्थ खाण्यासाठी कुठेही पोहोचणारा, स्वच्छता, हायजिन याचा उगीच बाऊ न करता शहरांमध्ये, हायवेंवर असं कुठेही दडलेल्या जबरदस्त चवी शोधणारा तो खरा खवय्या. मात्र, दरवेळी चांगला एम्बियन्स, चकाचक रेस्टॉरन्ट आणि मग तिथे हायफाय शेफच्या हातचे पदार्थ खाणारे माझ्या दृष्टीने खरे खवय्ये नाहीत. मुंबई तर अशा गल्लीबोळातल्या स्वर्गीय चवींसाठी खऱ्या अर्थानं प्रसिद्ध आहे.
इथे मुंबईमध्ये पदार्थांच्या चवी, ती तयार करण्याची अनोखी पद्धत याबरोबरच महत्त्व आहे ते परंपरेला. या परंपरा एक तर वर्षानुवर्ष जपल्या गेलेल्या खाद्यसंस्कृतीच्या असतात किंवा मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात चाकरमान्यांचा आधार ठरलेल्या खाद्यभांडार किंवा उपहारगृहांच्या. १०० वर्ष जुनी इराण्याची हॉटेलं आजही तशीच दिमाखानं लोकांना चवदार पदार्थांचा पाहुणचार करताना दिसतात. दादर भागातही अशीच पिढ्यानपिढ्या चालत आलेले मराठी उपहारगृहं, अशाच मुंबईच्या परंपरेत नाव कोरलं गेलेलं आणि अजुनही खऱ्या अर्थाने भूक भागवणारं फोर्टचं ठिकाण आहे ‘पंचम पुरीवाला’
सीएसटी स्टेशनवरुन बाहेर पडल्यावर फक्त रस्ता क्रॉस केल्यावर एका गल्लीच्या तोंडाशी दिवसाच्या कोणत्याही वेळेला कायम गर्दीच दिसेल तशी गर्दी दिसली की बिनधास्त आत शिरायचं कारण ती गर्दी पंचम पुरीवालाचीच असते. दुपारच्या वेळी तर चांगलीच गर्दी असते इथे आणि त्याचं कारण अतिशय कमी किमतीत पोटभर आणि अत्यंत चविष्ट खाद्यपदार्थ. त्यामुळे इथे केवळ सोय म्हणून पोट भरण्यासाठी येणारे अगदी कामगार, विद्यार्थी, आसपासच्या ऑफिसेसमध्ये दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारीही मोठ्या संख्येनी येतात, तर दुसरीकडे खास पंचम पुरीवालातील मसाला पुरी आणि बटाटा भोपळ्याच्या भाजीचा आस्वाद घेण्यासाठी मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन येणारे खवय्येही इथे मोठ्या संख्येनी हजेरी लावतात. त्यामुळे सगळ्यांसाठी असलेली अशी ही जागा पंचम पुरीवाला.
खरं तर फोर्ट भागातल्या इतर प्रसिद्ध इमारतींइतकाच या पंचम पुरीवालाचा इतिहास रंजक आहे. जसं थेट समुद्रकिनाऱ्यावर दिमाखात उभ्या असलेल्या गेट वे ऑफ इंडियाहूनही जुनं आहे त्याच्या पुढे असलेलं ताज हॉटेल. अगदी तसंच उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून गौरवल्या जाणाऱ्या अतिशय देखण्या अशा सीएसटी स्टेशनपेक्षाही जुना आहे तो पंचम पुरीवाला. साधारण १६८ ते १७० वर्ष जुनं हे भोजनालय, सीएसटी स्टेशन जेव्हा बांधूनही झालं नव्हतं तेव्हापासून आमचं पंचम पुरीवाला लोकांची भूक भागवतं असा दावा या छोटयाशा भोजनालयाचे चालक करतात.
पंचम पुरीवाला किती जुना आहे हे सांगण्यासाठी त्याची तुलना जरी ताज हॉटेलशी केली तरी या जागेत कुठलंही सौदर्य किंवा सजावट नाही. एक छोटासा दुकानाचा गाळा एवढंच काय ते पंचम पुरीवाला रेस्टॉरन्ट. त्या गाळ्यातच लाकडी गच्ची तयार करुन वरतीही बसण्यासाठी टेबलं मांडलीत, त्यामुळे खालचे आणि वरचे असे सगळे टेबलं मिळून केवळ सात आठ टेबलं आहेत पंचम पुरीवालामध्ये. ही टेबलं, खुर्च्या, थाळ्या, चमचे सगळं अगदी साधं. काही भाज्या तर वाटी किंवा बाऊल ऐवजी थेट द्रोणातही दिल्या जातात. असा हा फक्त या बसा पोटभर जेवा असा पंचम पुरीवालाचा थाट.
अर्थात पंचम पुरीवालाचं महत्त्व तिथल्या बैठक व्यवस्थेवर किंवा जागेवर नाहीतर पहिला घास पोटात गेल्यावर कळतं. कारण पुऱ्या आणि पुऱ्यांबरोबरच्या भाज्या याच्याचसाठी पंचम पुरीवालावर जीव टाकणारे कितीतरी खवय्ये आहेत. पंचम पुरीवाला हे नाव ऐकल्यावर पहिल्यांदा आपल्या मनात येतं की इथे अनेक प्रकारच्या पुऱ्या मिळत असतील, तर तसं मुळीच नाही. इथे जाऊ आणि पुऱ्यांचे दहाबारा प्रकार खाऊ असा विचार करुन जर तुम्ही पंचम पुरीवाला गाठलं, तर तसं काही नक्कीच मिळणार नाही, अर्थात तिथे जे काही पदार्थ मिळतात त्या चवी चाखल्यावर कुणाचीच निराशा होणार नाही याची मात्र कुणीही खात्री देईल. इथे प्रामुख्याने फक्त तीन प्रकारच्या पुऱ्या मिळतात साध्या पुऱ्या, मसाला पुऱ्या आणि हिरव्या पुऱ्या. त्यातल्या साध्या पुऱ्या या कायम गरमागरमचं मिळतात आणि त्यांची रंगत आणखीच वाढते ती त्याच्याबरोबरच्या भाजी किंवा इतर पदार्थामुळे. म्हणजे छोले, पुरीघ्या,किंवा आलु गोबी, आलु पालक, पनीर, किंवा अगदी कढी घ्या, या चवदार पदार्थांच्या जोडीने त्या गोल गरगरीत आणि थोडयाशा कुरकुरीत साध्या पुऱ्या खाव्यात तर पंचम पुरीवालाच्याच.
पण खऱ्या अर्थाने इथला सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ जर कुठला असेल तर त्या आहेत मसाला पुरी नावाच्या पुऱ्या. कचोरी आणि साधी पुरी यांच्या मधला असा हा पदार्थ. डाळीचं सारण भरलेल्या या तिखट पुऱ्या खायला खरी झुंबड उडते पंचम पुरीवालामध्ये. या मसाला पुऱ्याही हव्या त्या भाजीबरोबर खाण्याचा पर्याय सर्वच खवय्यांना आवडतो. तिसऱ्या प्रकारच्या हिरव्या पुऱ्या म्हणजे पालकाच्या पुऱ्या, हा पर्याय मात्र लोकांना तुलनेनी कमी आवडतो, त्याला मुख्य कारण अर्थातच मसाला पुऱ्यांची जिभेवर रेंगाळणारी चव. पण पंचम पुरीवालाच्या भटारखान्यातले सगळे चवदार पदार्थ थोडेथोडे चाखायचे असतील तर मात्र पंचम पुरीवालाकडल्या थाळीला पर्यांय नाही. त्यांच्या पंचम स्पेशल थाळीत तर पाच प्रकारच्या भाज्या,मसाला पुऱ्या कढी, पुलाव, ताक असं सगळं चाखायला मिळतं. बरं दुपारच्यावेळी कामातून वेळ काढून पंचम पुरीवाला गाठल्यावर १४० रुपयात भरपेट जेवण मिळत असेल तर नुसत्या पुऱ्या खाण्यापेक्षा पोटभर जेवणावर ताव मारणं लोक पसंत करतात, त्यामुळे निदान दुपारच्या वेळात तरी त्यांची थाळी खाण्यासाठी अक्षरश: रांगा लागतात. तसंही पंचम पुरीवालाकडे मेनू कार्डात भाताचे विविध प्रकारही असले तरी थाळीच जास्त लोकप्रिय असल्याने एक तर आवडीची भाजी आणि पुरी किंवा थाळी हेच यांच्याकडे जास्त खपतं.
एक गोष्ट नक्की आहे की बाहेर जेवायला जाणं, वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणं, शेफ्सने केलेले प्रयोग चवीचवीने चाखणं, लोकांच्या या आवडीनिवडीचा अंदाज आल्यामुळे शहरांमध्ये वेगवेगळ्या थीमची रेस्टॉरन्ट्सही आली आहेत. असं सगळं असताना कुठलाही दिखावा किंवा बडेजाव न करता केवळ चवदार अन्न भुकेल्या पोटांना अतिशय रास्त किमतीत पुरवणारा पंचम पुरीवाला खरंच वेगळा ठरतो आणि या नाविन्यपूर्ण रेस्टॉरन्टच्या स्पर्धेत टिकूनही राहतो.
संबंधित ब्लॉग :
जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी – ‘द जे’
जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29
जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री
जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना
जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्टअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement