Asha Bhosle : दैवी देणगी लाभलेल्या मंगेशकर कुटुंबातलं तिसरं रत्न आशा भोसले!
Asha Bhosle : तरूण आहे रात्र अजुनी... हे गाणं ऐकल्यानंतर हा चिरतरुण, मखमली आवाज कुणाचा, असा प्रश्न जर कुणी विचारला तरी सर्वांच्या भुवया खरोखरच उंचावतील. प्रश्न विचारणारा बावळट तर नाही ना, अशा दृष्टीनं त्याच्याकडं पाहिलं जाईल. कारण हा प्रश्न म्हणजे सूर, स्वर आणि संगीताचा अपमान ठरेल. 1942 मध्ये 'चाल चाल नवं बाळ' पासून सुरू केलेली गाण्यांची मैफल तब्बल सात दशके सुरेल ठेवणाऱ्या या आहेत आशा भोसले.
सूर, ताल, लय यांची दैवी देणगी लाभलेल्या मंगेशकर कुटुंबातलं हे तिसरं रत्न. दैवानं सुरांची देणगी दिली खरी पण सोबत अमाप कष्टही दिले.
आशाताईंनी 'भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले', हे गीत गायलंय. खरं तर हे गीत त्यांच्या आयुष्यासाठी तंतोतंत लागू होतंय. त्यांना अनेक खस्ता खायला लागल्या. पण त्याचा त्यांनी ना कधी बाऊ केला, का चेहऱ्यावरील हास्य ढळू दिलं. किंबहुना त्यांनी दु:खालाच सुख मानलं. म्हणूनच गुगलवर सर्च करूनही आशाताईंचा नाराज, चिंताग्रस्त किंवा रागावलेला फोटो सापडत नाही. यातच त्यांचं व्यक्तिमत्व आणि यश सामावलंय.
वास्तविक आशाताईंनी गायकीच्या क्षेत्रात पाऊल टाकलं ते वर्ष होतं 1943 मध्ये. त्याकाळात गीता दत्त, शमशाद बेगम आणि घरातून खुद्द लताबाई असे दिग्गज या क्षेत्रात पाय रोवून उभे होते. असं असताना आशाताईंनी कुणाचीही कॉपी न करता स्वत:चं अस्तित्व दाखवून दिलं. हे जेवढ्या सहजतेनं लिहिलं गेलं तेवढं सोपं नाही. मात्र, आशाताईंना स्वत:ला सिद्ध केलं आहे.
'चांदणे शिंपित जाशी', 'रंग रंग रंगीला रे', 'एका तळ्यात होती', 'आईये मेहेरबाँ', अशी आशाताईंची गाणी ऐकली की मन कसं प्रसन्न होतं. गाणं मग ते सुगम असो वा शास्त्रीय सुरावटीचं, नाट्यगीत असो किंवा नाचायला लावणारं, मराठी असो की मल्याळम, तेलुगू किंवा तमिळ, पंजाबी वा बंगाली अथवा अन्य कोणत्याही भाषेतलं असो!
आशाताई गातात ते जणू आपल्याच मातृभाषेत असल्याप्रमाणं. इतका त्या गाण्यांच्या ओळी, शब्दांचा आणि त्यांच्या भावार्थाचा अभ्यास करतात. त्यांच्या आवाजात वैविध्य आहे. म्हणूनच 'झुकु झुकु झुकु झुकु आगीन गाडी', 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए', 'इना मीना डिका', 'जय शारदे वागेश्वरी', 'ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा ना घबराईए', 'मांग के साथ तुम्हारा', 'ऋतू हिरवा ऋतू बरवा', 'आजा आजा मै हू प्यार तेरा', 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है', 'जाईये आप कहा जायेंगे', 'भवरा बडा नादान है', 'दम मारो दम' अशी बालगीतापासून अगदी कॅब्रेपर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांना त्या योग्य न्याय देऊ शकल्या. आशाताईंचा आवाज व्हर्सेटाईल आहे, याला आणखी काय पुरावा हवा? त्यामुळेच आशाताईंच्या फॅनना वयाचं बंधन नाही. अगदी परदेशी गायकांसोबतही त्या गायल्या आहेत. तरीही 90व्या वर्षीही त्यांच्या आवाजाची मोहिनी तरुणाईला साद घालतेय, याहून मोठा पुरस्कार तो कोणता?
2013 मधील ही गोष्ट. निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या यातना भोगत होता. याची जाणीव झाली आणि आशाताईंनी स्वत:हून मदतीचा हात पुढे केला. अशा या संवेदनशील महाराष्ट्र कन्येचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारने 24 मार्च रोजी गौरवण्यात आलं. याहून आनंदाचा क्षण कोणता असू शकतो? अशा या लाडक्या महाराष्ट्रकन्येस उत्तम आयुष्यासाठी सूरमयी शुभेच्छा..!