एक्स्प्लोर
मिशन दक्षिण आफ्रिका
कोहलीच्या कॅप्टन्सीची पहिली खऱ्या अर्थाने 'टेस्ट' ही आताच्या कसोटी मालिकेत होईल. यजमानांच्या टीमचा विचार केला तर स्टेन, मॉर्कल, रबाडा, फिलँडर अशी वेगवान चौकडी त्यांच्याकडे आहे. स्टेन त्याच्या नावाप्रमाणे धडाडणाऱ्या स्टेनगन फॉर्ममध्ये नसला तरी तोही वर्ल्ड क्लास बॉलर आहे. 'फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट' असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं.
विराटसेनेच्या 2018 मधील पहिल्या क्रिकेट वॉरला अर्थात दक्षिण आफ्रिकन सफारीला आता सुरुवात होते आहे. गेल्या वर्षभरात विराटच्या टीम इंडियाने जवळपास प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला लोळवलं आहे. यातील बहुतेक मालिका या भारतातच होत्या, हे जरी मान्य केलं असलं, तरी यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे दादा संघ होते, त्या तुलनेत भारतीय संघ काही प्रमाणात अननुभवी होता, म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली नवीन टीम आकार घेत होती, त्यामुळे सरलेल्या वर्षातील परफॉर्मन्ससाठी टीमचं कौतुक करायला हवं.
आता लक्ष्य आहे ते उसळत्या खेळपट्ट्यांवर आफ्रिकन आर्मीशी दोन हात करण्याचं. याआधीच्या साधारण पाच ते सहा कसोटी मालिकांमध्ये भारताला आफ्रिकन भूमीवर कसोटी मालिका विजयाची किमया साधता आलेली नाही. किंबहुना वाखाणण्यासारखी कामगिरीही फार कमी वेळा झाली आहे.
एका कसोटीची सल तर अजूनही मनात आहे, 1996 च्या दौऱ्यात दरबानला 100 आणि 66 धावांत भारतीय टीमचं पॅकअप आफ्रिकेने केलं होतं, ही जखम अजूनही ओली आहे. त्यावेळी डोनाल्ड अँड कंपनीसमोर राहुल द्रविड वगळता भारतीय फलंदाजांची पळापळ झाली होती. बाऊन्सी विकेट आणि दर्जेदार वेगवान गोलंदाजांसमोर उडालेली ती दाणादाण आजही मनाला टोचणी देतेय. मात्र गेल्या 22 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आधी गांगुली नंतर धोनी आणि आता विराट कोहलीने टीम इंडियाला फक्त नवा चेहराच नव्हे तर नवा अॅटिट्यूडही दिला आहे. 'अरे ला कारे'करण्याची केवळ हिंमतच नव्हे तर ताकदही आता टीम इंडियाला या तिन्ही कॅप्टन्सनी दिली आहे.
आता सूत्र विराटच्या हाती आहेत. प्लेअर म्हणून त्याच्या कन्सिस्टंसीबद्दल वेगळं काही लिहिण्याची गरज नाही. सध्या जगात जे महान खेळाडू आहेत, म्हणजे एबी डिविलियर्स, ज्यो रुट, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन यांची नावं त्यात सर्वात आघाडीवर आहेत. या सर्वांच्या बरोबरीने विचार केल्यास कोहलीचं सातत्य अमेझिंग आहे. त्यापैकी डिविलियर्स वगळता तिघेही आपापल्या टीमचे कॅप्टन आहेत. तसाच कोहलीही धोनीनंतर संघनायक झाला आहे. त्यामुळे या वर्ल्ड क्लास खेळाडूंसोबत त्याची तुलना होत राहणारच. असो.
कोहलीच्या कॅप्टन्सीची पहिली खऱ्या अर्थाने 'टेस्ट' ही आताच्या कसोटी मालिकेत होईल. यजमानांच्या टीमचा विचार केला तर स्टेन, मॉर्कल, रबाडा, फिलँडर अशी वेगवान चौकडी त्यांच्याकडे आहे. स्टेन त्याच्या नावाप्रमाणे धडाडणाऱ्या स्टेनगन फॉर्ममध्ये नसला तरी तोही वर्ल्ड क्लास बॉलर आहे. 'फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट' असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं. स्टेनबाबत आपण ती गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एक गोष्ट मात्र आहे की, आताच्या टीममध्ये अटॅकिंग प्लेअर्स आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे केवळ अटॅकिंग स्ट्रोक्स नाहीत, तर अटॅकिंग माईंडसेटही आहे. म्हणजे वेगवान माऱ्याला घाबरुन बचावात्मक न खेळता त्यावर प्रतिहल्ला चढवणारे.
मागे एकदा मॅथ्यू हेडन एका मुलाखतीत म्हणाला होता, ऑस्ट्रेलिया आणि इतर संघ यात फरक हा आहे की, अन्य संघ समोरच्या टीमच्या बेस्ट बॉलरला रिस्पेक्ट देत असतात, तर आम्ही मात्र त्यांच्या बेस्ट बॉलरवर सुरुवातीपासूनच अटॅक करतो, त्याला सायकॉलॉजिकली डॅमेज केला की अर्ध काम फत्ते होतं, हा ऑस्ट्रेलियन माईंडसेट आहे, जो घेऊन स्टीव्ह वॉची टीम सलग १६ कसोटी जिंकली. तोच अॅटिट्यूड असलेले प्लेअर्स आता आपल्याकडे आहेत. ज्यात स्वत: कॅप्टन कोहली. राहुल, धवन, रोहित, पंड्या अशी फळी आहे. मुरली विजयकडेदेखील मोठे फटके आहेत, हे त्याने आयपीएलमध्ये सिद्ध केलं आहे. पुजारासारखा हा खंबीर खांब भारताकडे आहे. तोही उत्तम फॉर्मात आहे. माझ्या मते हार्दिक पंड्या या मालिकेत आपल्यासाठी क्रुशल रोल प्ले करु शकतो. त्याच्याकडे फिअरलेस अॅटिट्यूड आहे. मोठे फटके आहेत. मुख्य म्हणजे कॅप्टनचा त्याच्यावर विश्वास आहे.
आतापर्यंतच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यांमध्ये भारताकडे त्याच्यासारखा यंग ऑलराऊंडर नव्हता आणि फॉरेन पीचेसवर खेळताना नंबर सिक्स प्लेअर फार महत्त्वाचा असतो, माझ्या मते थर्ड सीमर आणि आक्रमक बॅट्समन म्हणून हार्दिक पंड्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये विचार व्हावा. म्हणजे धवन, रोहित, राहुलपैकी दोघे, तिसऱ्या नंबरवर पुजारा, चौथा कोहली, तर पाच आणि सहा नंबरसाठी रहाणे, रोहित आणि पंड्या यामधले दोघे. त्यात रहाणे वाईस कॅप्टन आणि परदेशी खेळपट्ट्यांवर त्याचा देखणा परफॉर्मन्स त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये नक्कीच कौल मिळवून देईल. रोहित आणि पंड्या यांच्यात सहाव्या नंबरसाठी खरी स्पर्धा आहे. विकेटकीपर साहानंतर चार बॉलर्स ज्यामध्ये खेळपट्टीनुसार दोन की एक फिरकी गोलंदाज हे ठरेल. तसंच कोहलीचा आतापर्यंतचा कॅप्टन्सी रेकॉर्ड पाहता तो पाच स्पेशालिस्ट बॉलर्स घेऊन खेळणंच पसंत करतो, यावेळी तो काय करतो पाहणं इंटरेस्टिंग आहे. की फॅक्टर अर्थातच खेळपट्टी. केपटाऊनची विकेट पाहूनच तो कॉल घेतला जाईल.
आपल्या भात्यात शमी, यादव, भुवनेश्वर, ईशांत, बुमराह असे पाच खणखणीत वेगवान ऑप्शन्स आहेत. म्हणजे सिलेक्शनसाठी खऱ्या अर्थाने प्लेझंट हेडेक आहे. शमीचा नॅचरल स्विंग, भुवनेश्वरची अचूक लाईन अँड लेंथ, यादवचा पेस, ईशांतला उंचीमुळे मिळणारा नॅचरल बाऊन्स तर बुमराहचा अफलातून यॉर्कर, स्लोअर वन. या वैशिष्ट्यांमुळे भारतीय माऱ्यात तिखटपणासोबत वैविध्यही आहे. खेळपट्टीच्या रुपानुसार, यातले तिघे खेळतील असा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांपैकी अमला हा आपल्या बॉलिंगवर नेहमीच ताव मारत भरपूर धावांनी पोट भरत आला आहे. आपल्या मालिका विजयाचा उपवास सोडायचा असेल तर अमला या मालिकेत धावांसाठी उपाशी राहणं गरजेचं आहे. त्यासोबत डी कॉक, डिविलियर्स, ड्यु प्लेसी हे थ्री 'डी'जही डोकेदुखी ठरु शकतात.
डिविलियर्स एका सेशनमध्ये किंवा काही ओव्हर्समध्ये वादळी खेळी करत सामन्याचा नूर पालटू शकतो, हे आपण याआधी अनेकदा बघितलं आहे, पण तो सध्या दुखापतीतून कमबॅक करतोय. जानेवारी 2016 नंतर पहिल्यांदाच तो कसोटीच्या मैदानात आत्ता उतरला तो झिम्बाब्वेविरुद्ध. हाताचं कोपर तसंच खांद्याच्या दुखापतीने त्याला टेस्ट क्रिकेटला गेला काळ मुकावं लागलं होतं. हा फॅक्टर त्याच्या कमबॅकमध्ये अतिशय महत्त्वाचा असेल. बवुमा याच्यावरही लक्ष ठेवायला हवं. त्याने गेल्या मोसमात ऑस्ट्रेलियाविरुद्ध काही मोक्याच्या क्षणी उत्तम इनिंग्ज करत आपली चुणूक दाखवली आहे.
एकूणात दोन्ही टीमचा विचार केल्यास बॅलन्स टीम आहेत. मालिका चुरशीची व्हायला हरकत नाही, निकाल मात्र आपल्या बाजूने लागायला हवा. त्यात आलेली बातमी म्हणजे आफ्रिकेतील दुष्काळामुळे पाण्याच्या वापरावर असलेले निर्बंध आणि त्यामुळे खेळपट्टी पुरेशी वेगवान बनवता आलेली नाही, ही क्युरेटरनी व्यक्त केलेली खंत. ही गोष्ट भारताच्या पथ्यावरच पडेल. दक्षिण आफ्रिकेतला हा दुष्काळ भारताच्या मालिका विजयाचा दुष्काळ संपवायला मदत करु शकतो. बघूया इंतजार की घडिया खत्म हो रही है.... सब दिल थाम के बैठिये.... ऑल द बेस्ट टीम इंडिया फॉर विनिंग.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement