BLOG : टी-ट्वेन्टीत इंग्लंडच ‘साहेब’!
क्रिकेटच्या इन्स्टंट फॉरमॅटमध्ये अर्थात टी-ट्वेन्टीच्या विश्वविजेतेपदावर इंग्लंडने पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली. इंग्लिश आर्मीने याआधी २०१० मध्ये हा किताब आपल्या नावावर केला होता. यानंतर तब्बल १२ वर्षांनी त्यांनी ती किमया साधली. गेल्या काही वर्षांमधली इंग्लंडची मर्यादित षटकांच्या सामन्यांमधील कामगिरी कमाल राहिलीय.
त्यांनी २०१९ च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये बाजी मारली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत त्यांनी किवी टीमला धूळ चारलेली. त्या विजयात आणि आजच्या विजयात समान दुवा होता तो बेन स्टोक्स. त्याने त्यावेळी केलेल्या ९८ चेंडूंमधील ८४ धावांची झंझावाती खेळीने सामना फिरवलेला. त्याच स्टोक्सने आजच्या सामन्यातही ४९ चेंडूंमध्ये नाबाद ५२ धावांची खेळी करत टीमला टी-ट्वेन्टी चॅम्पियन बनवलं. तुमच्या संघात जेन्युईन ऑलराऊंडर असणं किती मोलाचं असतं हे या उदाहरणावरुन दिसतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अष्टपैलूंची काही खणखणीत उदाहरणं या क्षणी समोर येतायत. कपिल देव, इम्रान खान, इयान बॉथम, जॅक कॅलिस, लान्स क्लुझनर याच पंक्तीतलं दमदार आणि दखल घ्यायला लावणारं नाव म्हणजे बेन स्टोक्स. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तितकंच मोलाचं योगदान तो देत असतो. मोक्याच्या क्षणी विकेट काढून देणं आणि मोक्याच्या क्षणी धावाही करणं हा डबल रोल तो लीलया पार पाडतो. स्टोक्ससाठी या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपची इनिंग जास्त सुखावणारी अशासाठी आहे की, २०१६ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये त्याच्या गोलंदाजीवर ब्रॅथवेटने चार षटकार ठोकत इंग्लंडच्या तोंडून विजयाचा घास काढलेला. स्टोक्सला तेव्हा १९ धावा डिफेंड करता आल्या नव्हत्या.
ती जखम स्टोक्सच्या मनात नक्की भळभळत असणार. या विजयाने त्यावर केवळ फुंकरच घातली गेली नाही तर मलमपट्टीही झाली.
या फायनलचा विचार करायचा झाल्यास इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानसाठी विजेतेपदाकडे जायच्या दरवाज्याला पहिल्याच इनिंगमध्ये घट्ट कडी लावलेली. फलंदाजांनी त्याला कुलूप घातलं आणि चषकावर ताबा मिळवला.
अगदी पहिल्या ओव्हरपासून इंग्लंडने सामन्यावरची ग्रिप सुटू दिली नाही. उपांत्य फेरीतही त्यांनी भारतीय फलंदाजीला असंच जखडून ठेवलेलं. ज्यामध्ये वेगवान गोलंदाजांचा वाटा आहेच, शिवाय आदिल रशीदचाही रोल फार क्रुशल आहे. आदिल रशीदच्या चेंडूची लेंथ सेमी फायनल आणि फायनलमध्ये दोन्हीत फार कमाल होती. हल्लीचे फिरकी गोलंदाज टी-ट्वेन्टी किंवा वनडेत जी गोष्ट फार करताना दिसत नाहीत ती रशीदने हटकून केली. ती म्हणजे चेंडूला उंची देणं. यातच त्याने गेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवला आणि आज हॅरिसला फसवलं. तो मनगटी फिरकी गोलंदाज आहे. त्याला टर्नही मिळत होता. शिवाय ऑसी खेळपट्ट्यांवरच्या बाऊन्सचाही त्याने कल्पक वापर केला. युवा गोलंदाज सॅम करनचंही कौतुक करावं लागेल. डावखुरे वेगवान गोलंदाज संघाच्या कामगिरीत किती निर्णायक ठरतात हे पुन्हा एकदा दिसून आलंय. करनने चेंडूचा टप्पा, दिशा अप्रतिम ठेवला. त्याला स्विंगही उत्तम मिळाला.
इंग्लंड टीमचा विचार केल्यास त्यांची टीम अधिक परिपूर्ण होती. फलंदाजी, गोलंदाजीत चांगला समतोल त्यांच्याकडे होता.
खास करुन सेमी फायनल आणि फायनलच्या नॉक आऊट मॅचबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी होमवर्क खूप उत्तम केलं होतं. कोणत्या फलंदाजाला कोणत्या लेंथवर बॉल टाकायचे. हे फार महत्त्वाचं असतं. त्यांनी याचा बारकाईने अभ्यास केला होता. तसंच बटलरच्या नेतृत्वातही ती चुणूक दिसली. म्हणजे सेमी फायनलमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजीला यायच्या आत त्याने रशीदच्या ओव्हर्स संपवलेल्या. डावखुऱ्या पंतसाठी आत येणारा रशीदचा चेंडू खेळणं हे तुलनेने सोपं होतं. तो रशीदवर हल्ला करु शकला असता, बटलरने ती वेळच येऊ दिली नाही. तर, इथेही त्याने उत्तम बोलिंग चेंजेस केले. करन, वोक्स आणि स्टोक्सनंतर त्याने रशीदला आणलं. इंग्लंडकडे गोलंदाजीत इतकं वैविध्य आहे, इतके पर्याय उपलब्ध आहेत की कर्णधाराचं काम त्यामुळे सोपं होतं.
याउलट पाक टीम फलंदाजीत रिझवान, बाबरवर ओव्हर डिपेंडेबल वाटली. तीच बाब गोलंदाजीत शाहीन शाह आफ्रिदीबाबत जाणवली. कारण १३८ च्या आसपासचं लक्ष्य असेल तर तुम्हाला सुरुवातीला प्रतिस्पर्धी फलंदाजीला सुरुंग लावायलाच हवेत. तसं हेल्सला आफ्रिदीने माघारी पाठवलेलं. पण, अशा वेळी दोन ते तीन विकेट्स लागोपाठ मिळणं गरजेचं होतं. ते काही झालं नाही. शिवाय इंग्लंडची बॅटिंग डेप्थ इतकी कमाल आहे की, अगदी आठव्या-नवव्या नंबरवर येणारा जॉर्डनही फटाकेबाजी करु शकतो. लक्ष्य फारच कमी असल्याने इंग्लंडच्या फलंदाजीचा म्हणावा तसा कसच लागला नाही. मधल्या काही विकेट्स गेल्यानंतर स्टोक्सने आक्रमण आणि बचावाचा उत्तम मिलाफ साधत संघाला जिंकून दिलं. मोठ्या प्लेअरची हीच निशाणी आहे. जे मोठ्या मॅचमध्ये परफॉर्मन्स उंचावतात. त्याच्यासारखे अनुभवी मॅचविनर अखेरपर्यंत नाबाद राहणं हे समोरच्या सहकारी फलंदाजामध्ये ऑक्सिजन भरण्याचं काम करत असतात. इथे लक्ष्यही तुटपुंज असल्याने फार ऑक्सिजनची गरज लागलीच नाही.
या कामगिरीनंतर वनडे पाठोपाठ टी-ट्वेन्टी विजेतेपदाचा मुकुटही इंग्लंड आपल्या शिरपेचात दिमाखात मिरवणार आहे. परिपूर्ण संघाची बांधणी, डावपेचांची उत्तम आखणी आणि तितकीच प्रभावी अंमलबजावणी यांचा संगम झाला अन् इंग्लंडला त्याचं फळ विजेतेपदाच्या रुपात मिळालं.