एक्स्प्लोर

प्रिय मराठयांनो...

प्रिय मराठयांनो, माझं गाव कोपर्डी. माझं नाव…… जे तुमच्या मुलीचं असेल ते. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. तुम्ही एकदिलाने लाखोंच्या संख्येने शांतपणे आणि शिस्तीत मोर्चा कसा काढतात हे जगाला दाखवून दिलं. एकत्र यायला कुठल्या नेत्याची गरज नाही हे सिध्द केलं. मला तुमचा अभिमान आहे. कारण मी पण मराठा आहे. पण स्वातंत्र्य मिळण्याआधी जो महाराष्ट्रात राहणारा तो मराठा असं समजायचे लोक. मराठा ही फक्त जात नाही. समाज नाही. साम्राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. अटकेपार झेंडे लावणारे मराठे. जातीपातीच्या भानगडीत न पडता शिवाजी महाराजांच्या नावाने जीव ओवाळून टाकायला तयार असणारे मराठे. मराठा तितुका मेळवावा असं अभिमानाने वाटावं असे एकदिल आणि एकजीव मराठे.

पण हे कौतुक करायचे दिवस आहेत? उस पिकवणारा शेतकरी कधी उसतोड कामगार झाला हे आपलं आपल्याला तरी कळलं का? सगळ्या गावाने ज्याच्यावर अवलंबून रहावं असा कुणबी अचानक सगळ्या जगावर अवलंबून असल्यासारखा का वागतोय? गावगाड्याला धीर देणारा मराठा आत्महत्या का करतोय? लोकांच्या चुका आहेत पण आपल्याही काही चुका झाल्याच ना.

आज लोकांच्या भीतीने घराचा उंबरठा न ओलांडणारी लेक कालपर्यंत उंबऱ्याआड का होती? आपणच अडवून ठेवलं होतं तिला. आपण भावकीला बांध ओलांडू द्यायचा नाही म्हणून अडून बसलो. लोक देशाची सीमा ओलांडून जात होते. नवे नवे देश पहात होते. बारीक विचार केला तर आज फक्त आपणच जाती आणि मातीला चिकटून बसलोय. ह्या जातीचा आणि मातीचा अभिमान सोडला पाहिजे आपल्याला. खरंच आपल्याला काय दिलं या जातीने? अभिमान. इतिहास. पण या इतिहासाच्या ओझ्याखाली आपण एवढे द्बलोय की आपण आपल्या हजारो भावांवर दरवर्षी विष पिऊन जीव द्यायची वेळ आलीय हे पण मान्य करायला तयार नाही. आपल्याला अभिमान पाहिजे फक्त शिवाजी महाराजांचा. ज्यांनी जात मानली नाही. प्रत्येक जातीचा माणूस त्यांच्या दरबारात होता. सेवेत होता. प्रेमात होता. विचार करा महाराज जर फक्त मराठ्यांनी युध्द लढायचं असं ठरवून युध्द लढले असते तर काय झालं असतं? मुसलमान, ब्राम्हण, न्हावी, धनगर, माळी ….मला सांगा कुठली जात शिवाजी महाराजांच्या मदतीला आली नाही? महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक जातीने शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला साकार करण्यात मदत केली. आणि जेंव्हा गुन्हा झाला तेंव्हा महाराजांनी त्याची जात बघितली नाही. त्याला तटस्थपणे शिक्षा दिली. मग आपण एका गुन्हेगाराच्या जातीत का अडकलोय? या देशात यापुढे कुठल्याच जातीचा, कुठल्याच धर्माचा कुठलाच हरामखोर बलात्कार करू शकणार नाही असा मोर्चा आपण का नाही काढायचा? जातीला भीती दाखवायची नाही. गुन्हेगारांना भीती दाखवायचीय गरज आहे. आणि महाराष्ट्रात तरी आपण मराठे मोठे भाऊ म्हणून हे नक्कीच करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक किंवा अहिल्याबाई होळकर. नकळत एका जातीत गुंतले. गुंतवले गेले. त्यांना आपल्याला जातीच्या चौकटीतून मुक्त करायचंय. आणि हो शिवाजी महाराजांना त्याच मार्गावर नेऊ नका. सध्या जातीपाती पलीकडे जयंती साजरी केला जाणारा हा एकमेव मराठी माणूस आहे याची जाणीव ठेवा. देव सुद्धा जातीपातीत वाटले गेलेत. फक्त शिवाजी महाराज उरलेत. जे अजूनही सगळ्यांचे आहेत. त्यांच्यासाठी. त्यांची शप्पथ आहे तुम्हाला.

मला सांगा मराठा जातीच्या नावाने राजकारण करणारा कोण अॅट्रॉसिटीबद्दल उघडपणे बोलतोय? मग तुमचा आयुष्यात कधी अॅट्रॉसिटीशी संबंध आलेला नसताना कशाला विषय काढता? अन्याय झाला तर किती संख्येने तुम्ही एकत्र येऊ शकता हे लक्षात आलं आता. पुन्हा पुन्हा हे दाखवून द्यायचं का? कुणी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला तर पुन्हा एकत्र येऊ असेच शांतपणे. पण आता ती गरज आहे का? अॅट्रॉसिटीला एवढा विरोध एकट्याच जातीने का करायचा? एकाच जातीला भीती आहे असं दाखवून द्यायचंय का? मग? खरंतर आता दाखवून द्यायचं की आपण मोठे भाऊ आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता बघून मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलेले शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आठवा. तुम्ही प्रोत्साहन देणारे आहात. चिथावणी देणारे नाही. तुम्हाला अॅट्रॉसिटी नाही, महाराष्ट्रातला जातीयवाद संपवायचा आहे. शपथ घ्या. आवळा दाखवून कोहळा काढणाऱ्या भुरट्या लोकांच्या सभेला गर्दी करणारे आपण उरलो नाही. आता आपण आरक्षणाच्या नावाने वर्षानुवर्ष मूर्ख बनणारे लोक नाही. इतर जातींना धाक दाखवण्यासाठी आपण एकत्र आलो नव्हतो आणि इथून पुढेही यायचं नाही. आपल्या नावाने, आपल्या महाराजांच्या नावाने राजकारण करणारे आणि सगळ्याच पक्षात असलेले कावळे हुसकवायला आपण जमलोय. जमणार आहोत. आता कुठल्याच पक्षाने कुठल्याच जातीचा आणि शिवाजी महाराजांचा फायदा घ्यायचा नाही. महाराज कुणाच्या घरची मालकी नाही. महाराज महाराष्ट्राचे आहेत. देशाचे आहेत. जगातले सगळ्यात थोर योद्धे आहेत. आणि या भूतलावर असे निर्व्यसनी, चारित्र्यवान आणि सगळ्या जातींना आणि धर्मांना सोबत घेऊन लढलेले राजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे सुद्धा झाले नाही. महाराज फक्त मराठ्यांचे नव्हते. स्वराज्याचे होते. आणि आपण मराठे म्हणजे जात नाही महाराष्ट्र आहोत. भारतात राहणारा प्रत्येकजण भारतीय आहे आणि महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण मराठा आहे. शिवरायांचा भक्त आहे.

जात म्हणून जमलेल्या मराठयांनो, कळकळीची विनंती आहे आता स्वप्नात रमायचं नाही. भुरट्या लोकांच्या दरबारात जमायचं नाही. शेतातल्या बांधात अडकायचं नाही. आता जगाच्या सीमेचा विचार करायचा. काळी आई म्हणून मातीला चिटकून बसायचं नाही. मातीत काहीच येत नाही हाती. मातीत फक्त मातीच होते आता. इथून पुढ पेरते व्हा हा मंत्र विसरून जायचा. आता कर्ते व्हायचं. ज्याला शेती करायची त्याला करुद्या. पिकवू द्या. घाम गाळू द्या. इथून पुढ जातीला नाही शेतीला आरक्षण पाहिजे. शेती करणाऱ्याला मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातला एकतरी पोरगा नौकरीत पाहिजे. नाहीतर खा म्हणावं ढेकळं. मराठा राजकारणामुळे गरीब शेतकरी बदनाम झाला. हा जातीचा नाही शेतीचा प्रश्न आहे. सवलत झेड पी आणि ग्रामपंचायतीत वर्षानुवर्ष खुर्च्या उबवणाऱ्या मुजोरांना कशाला पाहिजे? गरज आहे ती कोरडवाहू शेतकऱ्याला. अल्पभूधारक शेतकऱ्याला. जात कोणतीपण असो शेतकऱ्याला आरक्षण द्या म्हणून मागणी करा. आरक्षण लोकांचं पोट भरणाऱ्याला मिळालं पाहिजे. शहरातल्या झोपडीवर डिश अँटेना दिसतो. गावात पक्षाचे झेंडे दिसतात. हा फरक आधी संपला पाहिजे. मोर्चात घरच्या भाकरी बांधून येणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगात बळ कसं येईल हा महत्वाचा प्रश्न आहे. संख्याबळ महत्वाचं नाही. मोर्चात येणाऱ्या मजुराच्या आर्थिक ताकदीचा प्रश्न महत्वाचा आहे जातीच्या ताकदीपेक्षा. एकच प्रश्न विचारू? बलात्कारामुळे एवढे लाखो लोक जमताय तुम्ही. माझे शेतकरी बांधव आत्महत्या करतात तेंव्हा का एकत्र येत नाही? इथून पुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असं काहीतरी करा आता एकत्र येऊन. एवढ नक्कीच करा. तरुणपणीच विधवेचं जीवन जगायची वेळ आलेल्या आपल्या बहिणींसाठी एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येक जातीत जातीच्या नावाने आग लावणारे हरामखोर नेते आहेत. त्यांच्या भल्यासाठी वेळ घालवू नका. अॅट्रॉसिटी पेक्षा आपल्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचा प्रश्न जास्त मोठा आहे. त्यात लक्ष घाला. हात जोडून विनंती करते, माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायला माझा एखादा मराठी भाऊ जेलमध्ये गेला हे मला कधीच आवडणार नाही. माझा एखादा भाऊ पोलीस ऑफिसर झाला तर मला जास्त अभिमान वाटेल. माझा प्रत्येक भाऊ कायद्याचा रक्षक झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे. मोर्चातून काही घडलं पाहिजे ना? मग हे घडवा. एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची सोय करा. शेतकऱ्याला आरक्षण मिळवून द्या. शेतीतून, मातीतून जन्मलेले अधिकारी घडू द्या. बलात्काराएवढीच शेतकरी आत्महत्येची पण तळमळ वाटू द्या. एकाही मराठा नेत्याने आपल्या शाळेत, कॉलेजमध्ये शेतकऱ्याच्या मुलाला मोफत शिक्षणाची घोषणा केली नाही. एकाही मराठा नेत्याच्या साखर कारखान्यात मराठा जातीच्या उसाला जास्त भाव नाही. एकाही मराठा नेत्याच्या पक्षात मराठा तरुणाला विधानसभेत सोडा नगरसेवक म्हणून फुकट उमेदवारी नाही. एकही मराठा नेता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकांसाठी काही चांगली योजना घेऊन येत नाही. मग काय करायचं? गप्प बसायचं? नाही. आधी जातीच्या नावाने बोंब मारणाऱ्या लोकांपेक्षा शेतीच्या नावाने एक होणारी माणसं बघायची. टाटा सफारी, स्कॉर्पिओ किंवा बुलेटच्या मागे नंबर प्लेटवर धुळीत माखलेले महाराज शोधायचे. नंबरप्लेटसोबत मालक पण घासून पुसून साफ करायचा. शोधायचा नवीन मावळा. ज्याच्या नंबरप्लेटवर नाही हृदयात शिवाजी महाराज आहेत. जो जातीसाठी नाही देशाच्या मातीसाठी शिवाजी महाराज मानतो. मला तर आज राजकारणात असा एकपण नेता दिसत नाही. एकपण पक्ष दिसत नाही. पण तुम्ही महाराष्ट्र धर्म म्हणून असेच एकत्र राहिला तर यांच्यातल्या एखाद्याला अक्कल येईल. पुन्हा महाराजांच्या मनातलं स्वराज्य येईल. महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र पहायचा असेल तर आधी सगळ्या जातीला बरोबर घेऊन चालायला शिकलं पाहिजे.

लक्षात ठेवा. इथून पुढे मोर्चा मराठ्यांचा पाहिजे. पण धर्म पाहिजे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठा आहे ही भावना पुन्हा निर्माण झाली पाहिजे. कारण माझ्या शिवाजी महाराजांचं कौतुक कशामुळे आहे? ‘तर महाराष्ट्र धर्म राहिला काही. तुम्हा कारणे.’ माझ्या शिवाजी महाराजांच्या मनात होतं तसं सुराज्य पाहिजे. माझ्या जिजाऊच्या स्वप्नातला महाराष्ट्र पाहिजे. शेतकऱ्यासाठीची महात्मा फुलेंची तळमळ आठवा, आंबेडकरांचे शेतकऱ्यासाठीचे विचार वाचा, शरद जोशींचे प्रयत्न आठवा, आज मराठा नसलेले किती लोक शेतकऱ्यासाठी त्याने आत्महत्या करू नये म्हणून काम करतात त्याचा विचार करा. आता तुम्ही सुरुवात चांगली केलीय. आदर्श घालून दिलाय. मी कारण झाले. पण पुन्हा कोपर्डीची आठवण नको. कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक नराधमाची दातखीळ बसली पाहिजे. कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक मराठ्याने सांगितलं पाहिजे ही महाराष्ट्रातली मुलीवरच्या अत्याचाराची शेवटची घटना. यानंतर पुन्हा कुठल्या हलकट कुत्र्यांची मुलींकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. कारण एक मराठा म्हणजे फक्त एक लाख मराठा नाही. एक मराठा म्हणजे एक महाराष्ट्र. माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र.

इथून पुढे प्रत्येक मोर्चात नगर, खैरलांजी, दिल्ली, मुंबई प्रत्येक मुलीवर झालेल्या अन्यायाचा निषेध झाला पाहिजे. माझ्या शिवाजी महाराजांची शप्पथ आहे तुम्हाला. मी आपण मराठा असं म्हणतेय कारण मी मराठा ही जात मानत नाही. मराठा हे साम्राज्य मानते. जो शिवाजी महाराजांना मानतो तो मराठा. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा. जय हिंद!

( लेखक अरविंद जगताप यांच्या वेबसाईटची लिंक : http://www.arvindjagtap.com/ )
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget