BLOG : शिवसेनेचे लक्ष पंतप्रधानपदाकडे?
BLOG : दोन दिवसांपूर्वी गोव्यातील प्रचारसभेत बोलताना शिवेसना नेते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, शिवसेना यापुढे प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढवेल. विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूका आम्ही लढवणार आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज जाणवत आहे. महाराष्ट्राचे मॉडल आम्ही प्रत्येक राज्यात नेणार आहोत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे देशात टॉप फाईव्हमध्ये आहेत. हेच गुड गव्हर्नन्स मॉडेल आम्ही सर्वच राज्यात नेणार आहोत. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष म्हणजेच शिवसेना अशी आमची ओळख आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारचं वक्तव्य केले. संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना 2024 च्या लोकसभा निवडणुका लढेल.
सध्या देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गोव्यात एकाच दिवसात म्हणजेच आजच मतदान संपणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या निवडणुका म्हणजे मिनी लोकसभेच्या निवडणुका म्हटले जातेय. सर्वच पक्षांचे लक्ष उत्तर प्रदेशवर आहे. शिवसेनेही मागील वेळेप्रमाणेच यावेळेसही उत्तर प्रदेशवर जास्त लक्ष दिलेले आहे. गोवा, उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला किती यश मिळते ते 10 मार्चला समजेलच. पण शिवसेना आता देशव्य़ापी मोहिम हाती घेणार असल्याचं आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून सूचित होतंय.
लोकसभेत स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं तर केवळ एक राज्य नव्हे तर संपूर्ण भारतभरात स्वतःचे स्थान तयार करणे आवश्यक असते. शिवसेना महाराष्ट्रात चांगलीच रुजलेली आहे. केवळ मुंबई, कोकणच नव्हे तर मराठवाडा, विदर्भातही शिवसेनेचा बऱ्यापैकी जम आहे. 1967 साली स्थापन झालेल्या शिवसेनेला राज्यभरातील तळागाळात रुजण्यासाठी जवळ जवळ चार दशके लागली. मराठी माणसाच्या हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली. हटाव लुंगी बजाव पुंगी म्हणत शिवसेनेने सुरुवातीला दक्षिण भारतीय लोकांविरोधात मोहीम सुरु केली. त्यात चांगले यश मिळाले. त्यानंतर उत्तर भारतीयांविरोधात शिवसेनेने मोहीम सुरु केली. पण मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर परप्रांतीयांविरोधात शिवसेना मवाळ झाली.
आदित्य ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा गुंड प्रवृत्तीचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात केली. आदित्य ठाकरे यांनी एकदा बोलताना शिवसेनेत आता सुशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर असल्याने शिवसेनेची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे म्हटले होते. आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे शिवसेनेचा चेहरा मोहरा काही प्रमाणात बदलण्यात यश आले. पण शिवसेनेची राडा संस्कृती पूर्णपणे संपुष्टात आली नाही. 1993 च्या मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे हिंदूंचे संरक्षक म्हणून पुढे आले. खरे तर तेव्हाच त्यांना देशभरात फिरून शिवसेना वाढवता आली असती. पण काही कारणांमुळे त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रापुरते स्वतःला मर्यादित ठेवले. तेव्हाच जर बाळासाहेब देशभर फिरले असते तर शिवसेना राष्ट्रीय पातळीवरील महत्वाचा पक्ष ठरला असता. मात्र शिवसेनेची प्रादेशिक पक्ष हीच ओळख कायम राहिली. मात्र आता शिवसेनेने देशभरात जाण्याचे ठरवले आहे.
अगदी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, चंद्राबाबू नायडूंसह अनेकांनी देशभरात जाण्याचा विचार केला होता. पण आपले राज्य कायम ठेऊन जेवढे शक्य होईल तेवढेच त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वबळावर ते त्यांच्या राज्यात सत्तेवर येऊ शकले. शिवसेनेला मात्र हे शक्य झाले नाही. देशभरात शिवसेनेची परप्रांतीयांविरोधातली इमेज आजही पुसली गेलेली नाही. त्यामुळेच शिवसेनेने अन्य राज्यात निवडणुका लढवल्या पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता आदित्य ठाकरे देशभरात जाण्याची तयारी करीत असले तरी शिवसेना आपली हे सगळ्या राज्यातील जनतेवर बिंबवण्याचे मोठे काम त्यांना करावे लागणार आहे.
मात्र आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा प्रवास सोपा नाही. प्रत्येक राज्याची स्वतःची अस्मिता आहे. काँग्रेस आणि भाजप ज्याप्रमाणे देशभरात पोहोचला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची फौज जशी आहे तशी फौज आदित्य ठाकरे यांना तयार करावी लागणार आहे. यासाठी मराठी भाषिकांचे तारणहार अशी त्यांची इमेज पुसून प्रत्येक राज्यातील अस्मितेला गोंजारणारी इमेज तयार करावी लागणार आहे. त्या-त्या राज्यात कार्यकर्ते तयार करून शिवसेनेविषयी प्रेम निर्माण करावे लागणार आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे जास्तीत जास्त खासदार निवडून आणावे लागतील त्याचप्रमाणे अन्य राज्यांमध्येही शिवसेनेला मोठ्या संख्येने खासदार निवडून आणावे लागतील. आणि यासाठी त्यांना काँग्रेस, भाजपसोबतच त्या-त्या राज्यातील वलिष्ठ स्थानिक पक्षांशी टक्कर घ्यावी लागणार आहे. जर यात शिवसेना यशस्वी झाली तर जास्त खासदार असलेला पक्ष शिवसेना होऊ शकेल. आणि आदित्य ठाकरे यांना पंतप्रधानपदी बसवण्याचे संजय राऊत यांचे स्वप्न सत्यात येऊ शकेल. हा प्रवास एक-दोन वर्षात होणारा नाही. याला वेळ लागेल. पण शिवसेनेने याची सुरुवात केली हे चांगले केले असे म्हणावे लागेल.