BLOG | 'ती'चा अखेरचा प्रवासही वेदनादायी!
काही दिवस जातील... मेणबत्त्या घेऊन मोर्चे निघतील... लोक हळहळ व्यक्त करतील...त्यानंतर कुटुंब व्यतिरिक्त कोणाच्याही ती लक्षात राहणार नाही...
शेवटी एकदा मुलीचा चेहराही पाहू नाही शकले... ना विधींनुसार तिला निरोप देऊ शकले... इतकं निष्ठुर प्रशासन कसं असू शकतं??? इतकं निष्ठुर कोणी असूच कसं शकतं??? इतका दबाव असतो का प्रशासनावर???
घटना 14 सप्टेंबर ची... 19-20 वर्षांची ही निर्भया... निर्भयाच्या नावाखाली किती जणींचा जीव जाणार आहे अजून??? भयाच्या छायेत अजून किती दिवस जगायचं या निर्भयांनी??? आणि तरीही निर्भया... का म्हणून???
तिचीच ओढणी गळ्यात ओढून तिला शेतात खेचलं... ती ओरडूही शकली नाही...
अगदी काही फुटांवर असणाऱ्या आईलाही आवाज ऐकू गेला नाही...
पोलिसांत नोंद काय तर छेडछाड...
गँगरेप नुसती छेडछाड कशी असू शकेल???
आई नावं सांगत होती आरोपींची पण तरीही गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ.
आम्ही लढायला समर्थ आहोत
पाठीवरती हाथ ठेवुनी फक्त लढ म्हणा...
हा पाठीचा कणाही नाही ठेवला तिचा...
हाडं खिळखिळी करून टाकली...
चुकून वाचली तर बोलू नये म्हणून जीभ कापली...
त्यातही आरोप प्रत्यारोप...
जीभ कापली??
कापली नाही तुटली???
अरे पण वेदना त्याच आहेत ना...
बोलू नये म्हणून जीभ कापली... वेदना समजा...
नाही कापली तरी तिच्यावरचे अत्याचार इतके निर्दयी होते की जिभही तुटली.
काय सोसलं असेल तिने.
फक्त ऐकलं तरी अंगावर काटा येतो.
प्रतिक्रिया काय... या सगळ्या हैवानांचं हैद्राबाद स्टाईलने एन्काऊंटर व्हायला हवं. तिथल्या पोलिसांनी योग्य न्याय केला. हैदराबाद प्रकरणात काय झालं... पोलिसांनी वाटेतच आरोपींचं एन्काऊंटर केलं. वाह... पण बहिणीचा काहीच पत्ता नाही, फोन बंद लागल्यावर जेव्हा घरचे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला जातात, तेव्हा ती आमची हद्द येत नाही. तुमची बहीण कदाचित कोणासोबत तरी पळून गेली असेल! असं उत्तर देणारेही इथलेच पोलीस होते.
जाऊद्या... या हैदराबाद एन्काऊंटर नंतर तिथे काय परिस्थिती आहे??? मुली सुरक्षित आहेत??? पोलीस सक्षम आहेत??? गुन्हेगारांमध्ये पोलिसांची, प्रशासनाची भीती निर्माण झाली??? बलात्कारासारखे गुन्हे कमी झाले??? काय हैदराबाद-हैदराबाद लावलंय???
ते ही जाऊद्या... काही दिवस जातील... मेणबत्त्या घेऊन मोर्चे निघतील... लोक हळहळ व्यक्त करतील... त्यानंतर कुटुंब व्यतिरिक्त कोणाच्याही ती लक्षात राहणार नाही... काही दिवसांनी पुन्हा अशी घटना घडेल... पुन्हा सगळे पेटून उठतील... उन्नाव, कोपर्डी, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, हाथरस, यामध्ये अजून शहरं जोडली जातील...
आपला फोकस आपण हलू नाही द्यायचा. आपण बॉलिवूडवरच लक्ष ठेऊ... याचं उत्तर प्रदेशात आता भव्य फिल्मसिटी उभी करायचीए आपल्याला. तशी घोषणाही केलीये इथल्या मुख्यमंत्र्यांनी.
कोणी स्वतः आत्महत्या करून जीवन संपवतं... हे वाईटच... पण हा आत्महत्येचा विषय इथपासून तिथपर्यंत न्यायला स्थानिक पोलीस, परराज्यातले पोलीस, ईडी, एनसीबी सगळे लावले जातात... आणि गँगरेप??? गँगरेप तर आहे... कोणाचा??? एका खालच्या जातीच्या मुलीचा... इतकंच.