(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Papamochani Ekadashi 2024 : पंचक कालाच्या सावलीत साजरी होणार पापमोचनी एकादशी; जाणून घ्या पूजा, मुहूर्त आण व्रताचं महत्त्व
Papamochani Ekadashi 2024 : पापमोचनी एकादशीला भगवान विष्णुची पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते तसेच घरात पैशांची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे.
Papamochani Ekadashi 2024 : हिंदू धर्मग्रंथात पापमोचनी एकादशीला (Papamochani Ekadashi) फार महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. पापमोचनी एकादशीला भगवान विष्णुची पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते तसेच घरात पैशांची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात पंचक काळ अशुभ मानला जातो. अशा वेळी पापमोचनी एकादशीची पूजा कधी करावी? आणि त्याचा शुभमुहूर्त काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
पापमोचनी एकादशी यावर्षी 5 एप्रिल रोजी आहे.या दिवसापासून सकाळी 07.12 पासून पंचक कालावधी सुरू होणार आहे. शास्त्रानुसार पंचक काळात शुभ कार्य केले नसले तरी पंचक काळात भगवान विष्णूच्या उपासनेवर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे एकादशीच्या पूजेवर पंचक कालाच्या अशुभ संयोगाचाही परिणाम होणार नाही.
पापमोचनी एकादशी पूजेचा मुहूर्त (Papamochani Ekadashi 2024 Muhurth)
पापमोचनी एकादशी 4 एप्रिल रोजी दुपारी 04:14 वाजता सुरू होत असून ही तिथी 5 एप्रिल रोजी दुपारी 01:28 वाजता समाप्त होईल. 5 एप्रिल रोजी सकाळी 07:41 ते 10:49 पर्यंत भगवान विष्णूच्या पूजेची वेळ असणार आहे.
अनेक शुभ योगायोग
यावर्षी पापमोचनी एकादशीला अनेक शुभ संयोग घडत आहेत. या योगांमध्ये भगवान विष्णूची पूजा केल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच एकादशी तिथीला रुद्राभिषेक करण्याचा दुर्मिळ योगायोग निर्माण होत आहे. या योगामध्ये भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्यास घरात सुख-समृद्धी येते. भगवान विष्णुला तुळशीचे पाने, फुले, चंदन अर्पण करावे. उदबत्ती आणि नैवेद्य अर्पण करा. यानंतर विष्णुस्तोत्राचे पठण करावे.
पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व (Papamochani Ekadashi 2024 Importance)
पौराणिक मान्यतेनुसरा, पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून व्रत केल्यास आपल्या आयुष्यातील सर्व दु:ख आणि दोष दूर होतात. पापमोचनी एकादशीला श्री हरी विष्णूच्या पूजेमध्ये मूर्ती, फुले, हार, नारळ, सुपारी, डाळिंब, आवळा, लवंग, मनुका, इतर हंगामी फळे, धूप, गंगाजल, पिवळी फुले, पिवळे चंदन आणि पिवळी मिठाई यांचा समावेश करावा. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :