Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला 'या' रंगाचे वस्त्र परिधान करून शंकराची पूजा करा! महादेव होतील प्रसन्न, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या पूजेत रंगांची विशेष काळजी घेतली जाते. या दिवशी ठराविक रंगांचे कपडे घालून पूजा करून भगवान शंकराचा आशीर्वाद घेतला जातो. त्याबद्दल जाणून घ्या.
Mahashivratri 2023 : महाशिवरात्री हा हिंदूंचा सर्वात मोठा सण असून शिवभक्तांमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला साजरी केली जात आहे. महाशिवरात्री हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीचे व्रत केल्यास अविवाहित तरुणींचे लग्न लवकर होते. तर विवाहित महिला पतीच्या सुखी आयुष्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करतात.
महाशिवरात्रीच्या पूजेत रंगांची विशेष काळजी
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. असे म्हटले जाते की भगवान शिव अतिशय भोळे आहे, ते केवळ नि:स्वार्थ भक्तीने लगेच प्रसन्न होतात, परंतु महाशिवरात्रीचा एक सण असा आहे, ज्याचे नियम बाकीच्या दिवसातील पूजेपेक्षा थोडे वेगळे आहेत. महाशिवरात्रीच्या पूजेत रंगांची विशेष काळजी घेतली जाते. या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो? तसेच या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावे? हे जाणून घ्या
या रंगाचे कपडे घालून पूजा करावी
धार्मिक मान्यतेनुसार, हिरवा रंग हा भगवान शंकराचा आवडता रंग मानला जातो. महाशिवरात्रीच्या पूजेत रंगांची विशेष काळजी घेतली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. भगवान शंकरांना बेलपत्र, भांग आणि धोतरा अतिशय प्रिय असून त्यांचा रंगही हिरवा आहे. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी हिरवे कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी काळा रंग परिधान करू नये. भगवान शंकरांना काळा रंग अजिबात आवडत नाही. या दिवशी महिलांनी काळ्या बांगड्या आणि टिकली लावू नयेत. असे म्हटले जाते.
हिरव्या रंगाचे कपडे नसतील तर...
धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी हिरव्या रंगाची सुती वस्त्रे परिधान करून भगवान शंकराची पूजा करावी. जर तुमच्याकडे हिरवे कपडे नसतील तर तुम्ही लाल, पांढरे, पिवळे किंवा केशरी रंगाचे कपडे देखील घालू शकता. महिलांनी या दिवशी या रंगाची बांगडी आणि टिकली लावावी. पूजेत परिधान केलेले हे कपडे धुऊन स्वच्छ असावेत हे लक्षात ठेवले पाहिजे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या