Pandharpur : विठुराया गेले सुट्टीवर; एक महिना देवाचा पत्ता 'मुक्काम पोस्ट विष्णूपद'
Pandharpur : 28 युगांपासून कर कटेवर ठेऊन विटेवर उभे असलेले श्री विठूराय दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णूपद मंदिरात वास्तव्यास जातात.
Pandharpur : आपण जर विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला येत असाल तर लक्षात ठेवा, विठुराया सध्या मार्गशीर्ष महिनाभर मुक्कामाला विष्णुपद येथे आहे. खरं तर व्यस्त दैनंदिनीतील थकवा घालवण्यासाठी सर्वचजण विश्रांतीसाठी निसर्गरम्य ठिकाणाच्या शोधात असतात, हीच अवस्था देवाची देखील होत असेल. त्यामुळेच सध्या विठुराया चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहेत. गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही पाळली जाते.
चंद्रभागेच्या तिरी देव सुट्टीवर
मार्गशीर्ष महिना हे देवाचा विश्रांती काळ असून चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर देव सुट्टीसाठी येत असतो. आषाढी यात्रेनंतरचा चातुर्मास आणि नंतर आलेली कार्तिकी यात्रा यामुळे शिणलेला विठुराया मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतीक्षेत असतो आणि हेमंत ऋतूचे वेध लागताच देवालाही विष्णुपदावर येण्याची ओढ सुरु होते.
मार्गशीर्ष वद्य अमावास्येला देवाची घरवापसी
पंढरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर हे विष्णुपद नावाचं असेच एक निसर्गरम्य ठिकाण आहे . विठ्ठल मंदिराकडून गोपाळपुराला येताना रस्त्यापासून आतल्या बाजूला दाट झाडीत चंद्रभागा तीरावरील या मंदिराला बहुसंख्य पर्यटक हे नदीमार्गे होडीतून येतात. गेली शेकडो वर्षांपासून दरवर्षी कार्तिक वद्य अमावास्येला विठुराया येथे सुट्टीवर येतात आणि तब्बल महिनाभर विश्रांती घेऊन मार्गशीर्ष वद्य अमावास्येला पुन्हा वाजत गाजत मंदिराकडे परततात .
काय आहे विष्णूपद मंदिराचा इतिहास?
देवाचे प्रिय भक्त संत ज्ञानेश्वर यांनी संजीवनी समाधी घेतल्यावर दुःखी झालेले विठुराया अज्ञातवासात गेल्याची आख्यायिका वारकरी संप्रदायात सांगितली जाते. हे अज्ञातवासाचे ठिकाण म्हणजे विष्णुपद होय. याच ठिकाणी पूर्वी देवाने बालगोपालांच्या सोबत गोपाळकाला केल्याच्या खुणा येथील दगडावर उमटल्याने हे मंदिर येथे उभारण्यात आलं आहे.
हे मंदिर इ. स. 1640 साली धामणगावकर बुवा यांनी बांधलं असून या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे पूर्णतः काळ्या पाषाणातील आहे. चारी बाजूला मोकळ्या कमानी आणि मध्यभागी भगवान श्रीविष्णूंचे जवळपास तीन-साडेतीन फुटांचे पाऊल आहे. याठिकाणी देव, गोपालक आणि आपल्या गाईंसमवेत येऊन क्रीडा करीत असल्याच्या आख्यायिका असून येथील दगडावर अनेक ठिकाणी गाईच्या आणि गोपालकांच्या पायाच्या आकाराच्या खुणा दगडात तयार झालेल्या आहेत. मध्यभागी देवाचे समचरण, बासरी, काठी आणि गोपाळकाल्याच्या भांड्याच्या खुणा दगडात दिसतात.
देवाला खऱ्या अर्थाने या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात शांती आणि समाधान मिळत असल्यानेच देव अशा निवांतस्थळी सुट्टीवर येत असावेत . मात्र भाविक आणि पर्यटक देवाला एकटे सोडायला तयार नसल्यानेच महिनाभर विठ्ठल मंदिराप्रमाणेच विष्णुपदावरही देवाला भक्तांच्या गर्दीला सामोरे जावेच लागते.
हेही वाचा: