Kartik Month 2023: कार्तिक महिना सुरू; या पवित्र महिन्यात 'ही' कामं केल्याने होईल भरभराट
Kartik Month 2023: कार्तिक महिना अतिशय शुभ मानला जातो, या महिन्यात पवित्र नदीत स्नान करून, दानधर्म करून आणि तुळशीची पूजा करून लक्ष्मीची प्राप्ती होते. कार्तिक महिन्याचं महत्त्व आणि उपाय जाणून घेऊया.
Kartik Month 2023: अश्विन महिन्यानंतर कार्तिक (Kartik) महिना सुरू होतो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. कार्तिक महिन्यात स्नान, दान आणि उपवास केल्याने सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. या महिन्यात भगवान शिव, विष्णू, कार्तिकेय आणि तुळशीची पूजा करण्याची परंपरा आहे.
शाश्वत पुण्य प्राप्तीसाठी या महिन्यात देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. 2023 मध्ये कार्तिक महिना नेमका कधी सुरू होतो? त्याचं महत्त्व काय? आणि या महिन्यात काय करावं आणि काय करू नये? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कार्तिक महिना 2023 कधीपासून सुरू? (Kartik Month 2023 Start Date)
यावर्षी 29 ऑक्टोबर 2023 पासून कार्तिक महिना सुरू झाला आहे. 27 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिक पौर्णिमेला कार्तिक महिना संपेल. कार्तिक महिना हा पूजा-पाठ करण्याचा आणि व्रताचा महिना आहे, या महिन्यात देवाची आराधना आणि पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
कार्तिक महिन्यात स्नानाचं महत्त्व (Kartik Month Significance)
मासनं कार्तिकः श्रेष्ठो देवना मधुसूदन ।
तीर्थ नारायणाख्यां हि त्रितायम दुर्लभम् कलौ ।
अर्थ - स्कंद पुराणात लिहिलेल्या या श्लोकानुसार भगवान विष्णू आणि विष्णूतीर्थाप्रमाणे कार्तिक महिनाही महान आणि दुर्मिळ आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महादेवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला आणि भगवान विष्णूने मत्स्य अवतार धारण केला. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू मत्स्य अवतारात पाण्यात राहतात. अशा स्थितीत या महिन्यात सूर्योदयापूर्वी नदी किंवा तलावात स्नान केल्याने व्यक्ती पापमुक्त होतो. कार्तिक महिन्यात गंगेत स्नान करण्यासाठी देव स्वतः पृथ्वीवर येतात असं म्हणतात.
कार्तिक महिन्यात काय करावं? (Kartik Month Do's)
- कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीच्या पाण्यात स्नान करावं. याद्वारे मोक्ष प्राप्त होतो आणि पापं धुतली जातात.
- सकाळी तुळशीची काही पानं पाण्यासोबत रिकाम्या पोटी खा. यामुळे वर्षभर आजारांपासून आराम मिळतो, असं मानलं जातं.
- कार्तिक महिन्यात तुळशीखाली दिवा लावा आणि रोज तुळशीची पूजा करा, यामुळे धनलक्ष्मी प्रसन्न होते.
- कार्तिक महिन्यात अन्न, लोकरीचे कपडे, तीळ, दिवा, आवळा इत्यादी दान केल्याने लक्ष्मीची कृपा होते.
- या महिन्यात मुळा, कंद, गाजर, रताळं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. यामुळे व्यक्ती निरोगी राहते.
कार्तिक महिन्यात काय करू नये? (Kartik Month Dont's)
- कार्तिक महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होते. दोन बदलत्या ऋतूंमधील काळामुळे या दिवसांत आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू लागतात. अशा स्थितीत कार्तिक महिन्यात वांगी, ताक, कारलं, दही, जिरे, सोयाबीन आणि कडधान्यं खाऊ नयेत.
- कार्तिक महिन्यात श्री हरी पाण्यात राहतात, त्यामुळे चुकूनही मासे किंवा इतर प्रकारच्या तामसिक पदार्थांचं सेवन करू नका.
- जर तुम्ही कार्तिक महिन्यात दह्याचं सेवन केलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक स्थितीसाठी फायदेशीर ठरणार नाही. कार्तिक महिन्यात दही खाणं मुलांसाठीही अशुभ मानलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope: दिवाळीनंतर ‘या’ राशींना अच्छे दिन; शनिच्या कृपेने होऊ शकतो प्रचंड धनलाभ