(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jagannath Rath Yatra 2024 : आज जगन्नाथ रथयात्रेचा तिसरा दिवस; जगन्नाथ पुरी मंदिरातील 'ही' 10 रहस्य तुम्हालाही अचंबित करतील
Jagannath Rath Yatra 2024 : ओडिसामध्ये दरवर्षी भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघते. या रथयात्रेत भगवान जगन्नाथांसोबत (श्रीकृष्ण) त्यांचा भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांचाही रथ असतो. जगन्नाथपुरी या तीर्थक्षेत्राबद्दल अनेक रहस्य आहेत, याबद्दलच आज जाणून घेऊया.
Jagannath Rath Yatra 2024 : ओडिसातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जगन्नाथ पुरी येथे दरवर्षी भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढली जाते. यंदा 7 जुलैपासून रथयात्रा काढण्यात सुरू झाली आहे. पंचांगानुसार, ही जगप्रसिद्ध रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते. भगवान जगन्नाथ आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह शहराचा दौरा करत असताना, आपल्या मावशीच्या घरी, गुंडीचा मंदिराकडे देखील जातात. तब्बल 10 दिवस ही रथयात्रा (Jagannath Rath Yatra 2024) चालते. या जगन्नाथ पुरी मंदिराशी आणि रथयात्रेशी संबंधित काही खास आणि मनोरंजक गोष्टी, रहस्य आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
मूर्तीला हात, पाय आणि पंजे नाहीत
हे विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि मोठा भाऊ बलराम यांच्या मूर्तींना हात, पाय किंवा पंजे नाहीत. यामागे एक पौराणिक कथा आहे की, प्राचीन काळी या मूर्ती बनवण्याचे काम विश्वकर्मा करत होते. मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत कोणीही त्यांच्या खोलीत प्रवेश करणार नाही, अशी त्यांची अट होती. पण तरीही राजाने आपल्या खोलीचं दार उघडलं तेव्हा विश्वकर्माजींनी मूर्ती बनवणं अर्धवट सोडलं. तेव्हापासून ही शिल्पं अपूर्ण राहून आजतागायत पूर्ण झालेली नाहीत. तेव्हापासून या तिन्ही मूर्तींना हात, पाय आणि पंजे नाहीत.
असे आहेत रथयात्रेतील रथ
भगवान जगन्नाथाच्या यात्रेसाठीचे रथही विशेष आहेत. हे कडुलिंबाच्या रसापासून बनवले जातात. दरवर्षी बसंतपंचमीपासून रथयात्रेची तयारी सुरू होते. विशेष म्हणजे ते बनवताना कोणत्याही धातूचा वापर केला जात नाही. रथासाठी लाकूड मिळवण्यासाठी मजबूत आणि स्वच्छ वृक्ष पारखला जातो.
जगन्नाथांचा रथ आहे खास
जगन्नाथाचा रथ 16 चाकांचा असून त्यात 332 लाकडाचा वापर करण्यात आला आहे, त्याची उंची 45 फूट आहे. जगन्नाथांच्या रथाचा रंग लाल आणि पिवळा आहे. अक्षय्य तृतीयेपासून रथ बांधणीचं काम सुरू होतं. त्यांचा रथ इतर दोन रथांपेक्षा आकाराने मोठा आहे. त्यांच्या रथावर हनुमान आणि भगवान नरसिंहाचं प्रतिक कोरलेलं असून हा रथ यात्रेत मागच्या बाजूला राहतो.
बलरामाच्या रथाचं वैशिष्ट्य
बलराम हे जगन्नाथांचे थोरले बंधू असून थोरले असल्याने ते सर्वांचं नेतृत्व करतात. त्यांचा रथ सर्वात पुढे असतो. त्यांच्या रथाची उंची 44 फूट आहे. या रथात निळ्या रंगाचा वापर ठळकपणे करण्यात येतो.
बहीण सुभद्रेचा रथ
कृष्ण आणि बलरामांची प्रिय बहीण सुभद्रा हिचा रथ दोन्ही भावांच्या संरक्षणाखाली राहतो. म्हणजे सुभद्रेचा रथ दोन रथांच्या मध्ये फिरतो. त्याची उंची 43 फूट असून रथ सजवण्यासाठी प्रामुख्याने काळ्या रंगाचा वापर केला जातो.
मूर्तीमध्ये आहेत देवांच्या अस्थी
या मूर्ती इंद्रद्युम्न राजाने बांधल्याचं पुराणात सांगितलं आहे. ते भगवान विष्णूचे परम भक्त होते. असं मानलं जातं की, देव या राजाच्या स्वप्नात प्रकट झाला आणि त्याला मूर्ती बनवण्याची आज्ञा दिली. स्वप्नात त्याला श्रीकृष्ण नदीत बुडाल्याचं दिसतं आणि त्याच्या शोकात बलराम आणि सुभद्राही नदीत बुडाल्याचं म्हटलं गेलं. ते गेल्यानंतर त्यांच्या अस्थी नदीत पडून होत्या. देवाच्या आदेशानुसार, राजाने तिघांच्या अस्थी नदीतून गोळा केल्या आणि मूर्ती बनवताना प्रत्येक मूर्तीमध्ये त्यांच्या त्यांच्या अस्थीचा एक छोटा भाग ठेवला. जगन्नाथाचं मंदिर सुमारे 1000 वर्षांपूर्वी बांधलं गेलं आणि तेव्हापासून दर 14 वर्षांनी येथील मूर्ती बदलल्या जातात.
रथ ओढल्याने हे पुण्य प्राप्त होतं
भगवान जगन्नाथाचा रथ जो कोणी ओढतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, म्हणजेच याच जन्मात त्याला मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रथ ओढण्यासाठी लोकांमध्ये मोठा उत्साह असतो.
मंदिरावरील झेंडा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो
जगन्नाथ मंदिराला चार धामांमध्ये देखील स्थान आहे. या मंदिरावर फडकणारा ध्वज हा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो.
दररोज बदलला जातो ध्वज
भारतातील कोणत्याही मंदिराचा ध्वज रोज बदलला जात नाही. परंतु जगन्नाथपुरीचं मंदिर हे एकमेव मंदिर आहे ज्याचा ध्वज दररोज बदलला जातो. दररोज एका पुजाऱ्याला उंच घुमटावर चढून ध्वज बदलावा लागतो. एक दिवसही ध्वज न बदलल्यास 18 वर्षं मंदिर बंद राहील, अशी जगन्नाथपुरी मंदिराची श्रद्धा आहे.
मंदिरावर कधीही पक्षी उडताना दिसत नाही
रहस्यांनी भरलेल्या या मंदिराबद्दल असंही म्हटलं जातं की, या मंदिरावर कधीही पक्षी उडताना दिसत नाही. त्यावरून कोणतं विमानही जाऊ शकत नाही. एका विशिष्ट प्रकारच्या चुंबकीय शक्तीमुळे हे घडत असल्याचं म्हटलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :