Hindu Ritual : ...म्हणून लग्नानंतर स्त्रिया बांगड्या घालतात? धार्मिक सोबतच वैज्ञानिक कारणही जाणून घ्या
Hindu Ritual : विवाहानंतर महिलांच्या हातात बांगड्या असणे हा 16 श्रृंगारांचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याला केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक महत्त्वही जोडले गेले आहे, जाणून घ्या
Hindu Ritual : हिंदू धर्मात (Hindu Rituals) विवाहित महिलांच्या (Married Woman) श्रृंगाराला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात लग्नानंतर असे काही श्रृंगार सांगितले आहेत, ज्यांच्यामुळे स्त्रिया विवाहित असल्याचा पुरावा तर मिळतोच, पण त्याला धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वही जोडले जाते.
हे विवाहित स्त्रियांचे महत्वाचे श्रृंगार
हातात बांगड्या सोबत कपाळी लाल कुंकू, पायात पैंजण, जोडवी आणि मंगळसूत्र घालणे हे विवाहित स्त्रियांचे महत्वाचे श्रृंगार आहेत. हातात बांगड्या घालण्याची परंपरा वैदिक काळापासून सुरू आहे. त्याचा पुरावा हिंदू देवींच्या मूर्तींमध्ये बांगड्या परिधान केलेल्या चित्रातून मिळतो. पण तुम्हाला माहित आहे का की हातात बांगड्या घालणे हे केवळ श्रृंगाराशी संबंधित नाही, तर त्याबद्दल धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक महत्व सांगण्यात आले आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून असे म्हणतात की, बांगड्याच्या आवाजाने अनेक अडथळे दूर होतात आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते, विज्ञानाने त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत.
बांगड्या घालण्याचे धार्मिक महत्त्व
मुली आणि महिला दोन्ही हातात बांगड्या घालतात. मात्र धार्मिक दृष्टिकोनातून महिलांनी हातात बांगड्या घालणे आवश्यक मानले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांनी बांगड्या घातल्याने पतीचे वय वाढते. 16 श्रृंगारामधील हे एक आवश्यक श्रृंगार मानले जाते. यामुळेच दुर्गादेवीला दिल्या जाणाऱ्या नैवेद्यात बांगड्या आवर्जून असतात. ज्योतिष शास्त्रानुसार हिरव्या बांगड्या दान केल्याने बुध ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विवाहित महिलांना पुण्य प्राप्त होते. तर दुसरीकडे वास्तुशास्त्रानुसार बांगड्या वाजवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून बांगड्या घालण्याचे फायदे
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, ज्या महिला हातात बांगड्या घालतात, त्यांचे आरोग्य चांगले राहते. कारण बांगड्या घातल्याने श्वसन आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात. बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते, त्यामुळे महिलांना कमी थकवा जाणवतो. विज्ञानानुसार मनगटाच्या खालपासून ते 6 इंचापर्यंत एक्यूप्रेशर पॉइंट असतात. त्यांच्यावरील दबावामुळे शरीर निरोगी राहते. अशा वेळी महिला हातात बांगड्या घालून उत्साही राहतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या