Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! लाडक्या गणरायाच्या मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त नेमका कधी? वाचा पूजा, विधी आणि महत्त्व
Ganesh Chaturthi 2025 : हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवसापासून गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात होते.

Ganesh Chaturthi 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्सव सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं जातं. गणेश चतुर्थीचा उत्सव जसजसा जवळ येतोय. तशी बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता वाढत चालली आहे. गणपतीच्या उत्सवात बाप्पा 10 दिवसांसाठी घरी येतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय करुन जातात. मात्र, यंदा गणेश चतुर्थी नेमकी कधी? आणि मूर्ती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता? तसेच, पूजा पद्धत आणि विधी तिथीबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
गणेश चतुर्थी 2025 (Ganeshotsav 2025 Date)
हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवसापासून गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात होते. तर, अनंत चतुर्दशीला बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन करुन बाप्पाला निरोप दिला जातो.
यंदाचा गणेशोत्सव 27 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होणार आहे. तर 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असेल.
गणेश चतुर्थी 2025 शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2025 Shubh Muhurta)
पंचांगानुसार, गणेश चतुर्थीचं आगमन भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला होते. त्यानुसार, 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी ही तिथी सुरु होईल. तर, दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजून 44 मिनिटांपर्यंत असणार आहे. मात्र, उदयतिथीनुसार, 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जाईल.
गणेश चतुर्थी 2025 पूजा विधी (Ganesh Chaturthi 2025 Puja Vidhi)
गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करताना तसेच पूजा करताना काही गोष्टींचं नीट पालन करणं गरजेचं आहे. या दिवशी सर्वप्रथम पहाटे लवकरच उठावे. त्यानंतर, स्नान करावे. देव्हारा स्वच्छ करुन बाप्पाची पूजा करावी. यानंतर शुभ मुहूर्तावर घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक पाट स्थापित करुन आणि त्यावर पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड पसरवून, त्यावर बाप्पाची मूर्ती ठेवावी. त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ श्रीगणेशाची आरती करुन बाप्पाला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवावा आणि शेवटच्या दिवशी श्रद्धेने त्याचा निरोप घ्यावा आणि मूर्तीचं विसर्जन करावं.
गणेश चतुर्थी महत्त्व
गणेशोत्सवाच्या दिवशी गणरायाची विधीवत पूजा केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते. घरात सुख-समृद्धीचं आगमन होतं. बाप्पा लाडक्या भक्तांना आशीर्वाद देतात. तसेच, श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, शांति आणि समृद्धी नांदते, घराची भरभराट होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















