Amit Shah : युवकांसह महिलांनी सहकारात सहभागी व्हावं, सहकार भारतीय अर्थव्यवस्थेचा अनिवार्य भाग : अमित शाह
सहकार क्षेत्रात (cooperative sector) युवा आणि महिलांचा विशेष सहभाग असेल तर सहकार क्षेत्राची अधिक जोमाने आगेकूच होईल असे मत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केलं.
Amit Shah : सहकार क्षेत्रात (cooperative sector) युवा आणि महिलांचा विशेष सहभाग असेल तर सहकार क्षेत्राची अधिक जोमाने आगेकूच होईल असे मत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केलं. कोणत्याही उपक्रमात जर आपण कालानुरुप बदल आणला नाही, तर तो कालबाह्य ठरतो. सहकार क्षेत्राने आजच्या गरजेनुसार स्वतःला मजबूत बनवून पुन्हा एकदा सर्वांचा विश्वास संपादन करण्याची वेळ आली असल्याचे शाह म्हणाले.अमित शाह यांनी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित राज्यांच्या सहकार मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनाला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. या संमेलनाला सहकार राज्य मंत्री बी. एल. वर्मा, 21 राज्यांचे सहकार मंत्री, 2 केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
सहकार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अनिवार्य भाग
भारताच्या अर्थकारणात सहकाराचं योगदान मोठा अभिमान वाटावं असं राहिलं आहे. आमचा प्रयत्न आहे की पुढील शंभर वर्षांत सहकार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अनिवार्य भाग व्हावा असेही शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नात सहकाराचं मोठं योगदान राहावं असेही ते म्हणाले. सहकार क्षेत्रात आपल्याला धोरणात्मक एकवाक्यता आपलीशी करावी लागेल. प्रत्येक राज्याचा सहकार विभाग एकाच मार्गावर आणि एकच विषय घेऊन पुढे जाईल. देशाच्या प्रत्येक राज्यात सहकार चळवळ एक-समान रुपानं सुरु राहील, असा आपला प्रयत्न असायला हवा. ज्या राज्यांमध्ये उपक्रम मंदावले आहेत, अथवा बंद आहेत, त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये गती आणण्याचे प्रयत्न करायला हवेत असेही शाह म्हणाले. त्यासाठी आपल्याला एक नवीन सहकार धोरण आवश्यक असल्याचे अमित शाह म्हणाले.
सहकार धोरण तयार करण्यासाठी समिती गठित
सहकार हे असं एकमेव क्षेत्र आहे, ज्यामध्ये कमीत कमी गुंतवणुकीने देखील अनेक लोक एकत्र येऊन मोठं योगदान देऊ शकतात. गुजरातमध्ये अमुल हे याचं उत्तम उदाहरण असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. अशा प्रकारे सर्वांगीण विकासाचा विचार करण्यासाठी सहकार धोरण तयार करायला एक समिती गठित केली आहे. ज्यामध्ये सर्व राज्यांचं प्रतिनिधित्व आहे. सहकार क्षेत्रात उत्तम काम करणारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू या समितीचे अध्यक्ष असल्याचे अमित शाह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: