(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wheat Production : वाढत्या तापमानामुळं गहू उत्पादक शेतकरी चिंतेत; 'या' राज्यात तापमानात 10 अंश सेल्सिअसची वाढ
देशातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. याचा शेती पिकांना फटका बसत आहे.
Wheat Production : देशातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा मोठा फटका राज्यात खरीप हंगामातील (Kharif season) पिकांना बसला होता. पूर, पाऊस आणि दुष्काळामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता रब्बी पिकांना (Rabi Crop) देखील या बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. सध्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं गव्हाच्या पिकाला या वाढत्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. देशातील काही राज्यात तापमानात 10 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.
रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता
गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळं गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. अशातच निर्यातीमुळे गहू आणि पिठाचे भाव वाढले आहेत. अशातच तापमानात पुन्हा वाढ होत आहे. यामुळं गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामात राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये शेतकऱ्यांची लाखो रुपयांची पिके उद्ध्वस्त झाली होती.आता रब्बी हंगामातील पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. पिके वाचवण्यासाठी काय व्यवस्था करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
तापमानात 10 अंश सेल्सिअसची वाढ
फेब्रुवारी महिन्यात हवामान अधिक थंड राहते. गेल्या काही दिवसांपासून थंड असलेलं वातावरण गहू पिकासाठी योग्य असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं गहू उत्पादक शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. वाढणारी उष्णता गव्हाच्या पिकासाठी धोकादायक आहे. वाढत्या उष्णतेमुळं गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंडसह इतर राज्यांमध्ये तापमानात 10 अंश सेल्सिअसपर्यंतची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी जिथे किमान तापमान 3 ते 4 अंश सेल्सिअस होते. आता ते 14 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान झालं आहे. देशात मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी झाली आहे. त्यामुळं गव्हाच्या उत्पादनात मोटी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, उष्णतेची लाट कायम राहिल्यास गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
12 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज
मागील वर्षी गव्हाच्या उत्पादनाबाबत केंद्र सरकारच्या नोंदी समोर आल्या होत्या. रशिया-युक्रेन युद्ध आणि उष्णतेची लाट हे गव्हाचे उत्पादन कमी होण्याचे प्रमुख कारण मानले जाते. उष्णतेच्या लाटेचा गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. 15 डिसेंबरपर्यंत देशात 180 लाख टन गहू आणि 111 लाख टन तांदूळ उपलब्ध होता. चालू हंगामात रब्बी पिकांच्या क्षेत्रात झपाट्यानं वाढ झाली आहे. 3.25 कोटी हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्य आहेत. या हंगामात 112 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते 50 लाख टन अधिक असेल. गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होण्याची तीन कारणे आहेत. लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे, दुसरे म्हणजे आत्तापर्यंत हवामान योग्य आहे, आणि नवीन वाणांमुळे गव्हाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: