जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्रीपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी बिकट परिस्थितीतील अनेक आठवणींना उजाळा दिला.
मुंबई : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न झाला. या विस्तारात महायुतीच्या 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यात 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच मतदारसंघात गेले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, सरकारच्यावतीने नव्या मंत्र्यांना दालनाचे व बंगल्यांचे वाटप करण्यात आलं आहे. त्यावरुन, आता राजी नाराजी सुरू असून अनेक मंत्रीमहोदयांनी आपला कार्यभारही स्वीकारला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला. कधी काळी ज्या मंत्रालयात अगरबत्ती आणि कॅलेंडर विकायचं काम केलं, त्याच मंत्रालयात आज मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्याचे त्यांनी म्हटले. प्रताप सरनाईक यांना राज्य सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची (Mantralay) जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्रीपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी बिकट परिस्थितीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. घरची परिस्थिती बिकट असल्याने याच मंत्रालयामध्ये मी कधीकाळी अगरबत्ती आणि कॅलेंडर विकायला येत होतो. आज या मंत्रालयात मंत्री म्हणून कार्यभार स्विकारल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला, तसेच जुने दिवसांतील संघर्षही माध्यमांसमोर व्यक्त केला. अगरबत्ती विकण्यापासून ते अंडा बुर्जीची गाडी चालवली, रिक्षा चालवली, त्यानंतर उद्योजक झालो आणि आज मंत्री म्हणून मंत्रालयात बसलो आहे, असे त्यांनी म्हटले.
मंत्रालयात आज पहिली आढावा बैठक घेतली आणि सर्व बदल्या ऑनलाइन करण्याचा पहिला निर्णय घेतला. मुंबईतील रस्त्यावरचा ताण कमी करण्यासाठी रोपवे टॅक्सी सुरु केली पाहिजे तसा विचार करतोय. कंत्राटी वाहन चालक आणि इतर कर्मचारी यांचाही प्रश्न आहे, यावरतीही विचार करतोय. अपघात नेमका कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे होतो की, आणखी काही कारण आहे यावरती ही कारणमीमांसा केली जाईल. ठाण्याचा विकास हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. त्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांनाच मिळाल पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंसोबत बंडात सहभागी
दरम्यान, प्रताप सरनाईक हे ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात गत महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचा ससेमिरा होता. तर, 2014 मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. एमएमआरडीएला 350 ते 500 सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुप या कंपनीला मिळालं होतं. या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. मात्र, एकनाथ शिंदेंसोबत बंडात सहभागी झाल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार