(Source: ECI/ABP News/ABP Majha)
fertilizers price : रासायनिक खतांच्या वाढत्या किंमतीबाबत सरकारनं हस्तक्षेप करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा किसान सभेचा इशारा
सध्या देशात रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारनं याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे.
price Rise in fertilizers : युक्रेन आणि रशिया या दोन देशात सध्या युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम इतरही देशांवर होत असल्याचे दिसत आहे. या युद्धामुळं रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. युद्ध असेच सुरु राहिले तर खतांचे भाव आवाक्याबाहेर जातील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं याबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे. वाढत्या खतांच्या किंमतीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचं किसान सभेनं म्हटले आहे.
दिवसेंदिवस शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे. अशातच खतांच्या किंमती वाढत आहेत. शेतीमालाच्या उत्पादनावरही याचा अत्यंत विपरीत परिणाम होईल. केंद्र व राज्य सरकारने ही बाब लक्षात घेता याबाबत तातडीने हस्तक्षेप करावा व वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय योजना कराव्यात. रासायनिक खतांच्या कच्च्या मालाची आयात सुलभ होईल यासाठी प्रयत्न करावेत. प्रसंगी अनुदान वाढवावे. विविध कर कमी करावेत. खतांचे दर कोणत्याही परिस्थितीत कमी करावेत अशी मागणी किसान सभेने केली आहे.
केंद्र व राज्य सरकारने याबाबत उपाय योजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही नागपूर येथे संपन्न झालेल्या किसान सभेच्या राज्य बैठकीमध्ये देण्यात आला आहे. नागपूर येथे संपन्न झालेल्या या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. खतांच्या वाढत्या किंमती, अतिरिक्त ऊस, पीक विमा, वीज, जमीन, पेंशन, घरकुल व रेशनच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा झाली. या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीनं मुख्यमंत्री, कृषीमंत्री, आदिवासी विकास मंत्री व महसूल मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असून, या सर्व प्रश्नांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. चर्चेतून प्रश्न न सुटल्यास संपूर्ण तयारीनिशी प्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीमध्ये याबाबतचे सविस्तर नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देखील किसान सभेच्या वतीनं देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या:
- तुम्हीही PM Kisan Yojana चे लाभार्थी आहात, मग लवकर करा ई-केवायसी; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
- Solapur Latest News : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असलेल्या सांगोल्यातून डाळिंब हद्दपार होण्याची वेळ