Dheeraj Kumar : 75 ते 100 मिलीमिटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, कृषी आयुक्त धीरज कुमार यांचं शेतकऱ्यांना आवाहन
खरीप हंगाम 2022 मध्ये किमान 75 ते 100 मीमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे.
![Dheeraj Kumar : 75 ते 100 मिलीमिटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, कृषी आयुक्त धीरज कुमार यांचं शेतकऱ्यांना आवाहन Soybean should be sown only after 75 to 100 mm of rain, Agriculture Commissioner Dheeraj Kumar appeals to farmers Dheeraj Kumar : 75 ते 100 मिलीमिटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, कृषी आयुक्त धीरज कुमार यांचं शेतकऱ्यांना आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/334f15280c78b55a5fe2842ed4d56d90_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dheeraj Kumar : सध्या सर्वांनाचं मान्सूनचे वेध लागले आहे. राज्यातील शेतकरी खरीपाची पेरणी करण्यासाठी सज्ज झाले आहे. राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी देखील लावली आहे. पुढच्या 24 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत. अशातच खरीप हंगाम 2022 मध्ये किमान 75 ते 100 मीमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेलं चांगलं सोयाबीनचं बियाणे वापरावं असेही ते म्हणालेत.
जमिनीत चांगली ओल झाल्यावर म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. प्रती हेक्टरी बियाणे प्रमाण 75 किलो ग्रॅमवरून 50 ते 55 किलोग्रॅमवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे असे आवाहन धीरज कुमार यांनी केलं आहे. पेरणीपूर्वी बियाणास बीजप्रक्रिया करणे उपयुक्त ठरते. प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे. त्यानंतरच त्याची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अडकलेली मान्सूनची गाडी रूळावर आली असून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. काही तासांतच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. काल (गुरुवारी) राज्यातील अनेक भागांत पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांत पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यातही पावसाची हजेरी दिसून आली. मुंबईत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, गोरेगाव, कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व सरींमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)