soybean crop : गोगलगायीनंतर आता सोयाबीनवर एलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव, कसा कराल प्रतिबंध?
मराठवाड्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडं शंखी गोगलगायीमुळं सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असतानाच आता दुसरीकडं सोयाबीनवर एलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे.
Soybean Crop : दरवर्षी मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाचे (soybean crop) उत्पादन घेतले जाते. मात्र, हे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी तर कधी पिकांवर पडणाऱ्या विविध रोगांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यंदाही मराठवाड्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनवर दुहेरी संकट आलं आहे. एकीकडं शंखी गोगलगायीमुळं सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असतानाच आता दुसरीकडं सोयाबीन पिकावर एलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड आदी जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगायी आणि एलो मोझॅक व्हायरसचे दुहेरी संकट आलं आहे. शंखी गोगलगायी आख्ख पीक खाऊन टाकत आहेत. तर दुसरीकडं एलो मोझॅक व्हायरसमुळं सोयाबीनचे पिकं पिवळे पडून पूर्णपणे जळून जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. नेमका हा घातक एलो मोझॅक व्हायरस आहेत तरी काय? त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय काय करायला हवेत? याबाबतची माहिती परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी दिली आहे.
डॉ. दिगंबर पटाईत
एलो मोझॅक व्हायरस पांढरी माशी किडीमार्फत पसरला
आपल्याकडे सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. सुरुवातीच्या पावसाच्या कालावधीमध्ये सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पिवळेपणा दिसून आला. त्याला बरेच शेतकरी त्याला सोयाबीनचा एलो मोझॅक व्हायरस असल्याचे म्हटलं. परंतू अति पावसामुळं सोयाबीन पिवळे पडले होते. मात्र, आता सोयाबीनवर पिवळेपणा पडत आहे, तो प्रकार हा एलो मोझॅक व्हायरसचा असल्याची माहिती कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी दिली. यामध्ये पानावर हिरवे पिवळे चट्टे दिसत आहेत. हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग रस शोशन करणाऱ्या पांढरी माशी किडीमार्फत पसरला जातो. यामध्ये साधा मोझॅक हा एक प्रकार आहे. यामध्ये पाने पिवळी पडत नाही तर पाने आखुडली जातात. पाने हिरवीच राहतात, हा रोग मावा किडीमुळं प्रसारीत होतो.
प्रतिबंध काय कराल
एलो मोझॅक व्हायरस हा पांढरी माशी किडीमार्फत पसरला जातो. तर साधा मोझॅक हा मावा किडीमुळं प्रसारीत होतो. हे दोन्हीही रस शोसन करणाऱ्या किडी आहेत. एकदा हा रोग आली की त्याचे नियंत्रण आपण करु शकत नाही. त्यामुळं हा रोग येऊ नये म्हणून, आपल्याला किडींचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळात जर काही झाडांमध्ये एलो मोझॅक व्हायरस आढळला तर ती झाडे तत्काळ उपटून टाकावीत आणि नष्ट करावीत असे मत कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी व्यक्त केलं. त्यानंतर केंद्रीय सोयाबीन संशोधन इंदौरच्या शिफारशीनुसार, थायामेथोक्सम (Thiamethoxam) 25 टक्के हे किटकनाशक जवळपास 40 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर या किडीचा बंदोबस्त होतो. या रोगापासून प्रसार होत नाही. त्यामुळं बी फवारणी करावी असं आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: