Jalna News : जालन्यातील तिर्थपुरीत बोगस खत विक्रीचा गोरखधंदा उघड, कृषी विभागाची कारवाई
Jalna News : जालन्यात कृषी विभागाच्या (Agriculture Department) पथकाने छापा टाकत बोगस खत विक्रीचा गोरखधंदा उघड केला आहे.
Jalna News : जालना (Jalna) जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे कृषी विभागाच्या (Agriculture Department) पथकाने छापा टाकत बोगस खत विक्रीचा गोरखधंदा उघड केला आहे. शेतात नामांकीत कंपनीच्या रिकाम्या बॅगमध्ये हलक्या दर्जाचे खत टाकून विक्री होत होती. याची माहिती मिळताच पुणे गुण नियंत्रण अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा कृषी विभागाच्या पथकानं संयुक्त कारवाई केली आहे.
या कारवाईत भेसळयुक्त खतांच्या 35 बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. तर नामांकीत कंपन्यांच्या नावाच्या अंदाजे पाच हजार रिकाम्या बॅग जप्त करण्यात आल्या आहेत.
प्रसिद्ध कंपन्यांच्या बॅगमध्ये दर्जाहीन खत टाकून विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील गुणनियंत्रण अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर आणि जालना कृषी विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यादरम्यान 35 पोते भेसळयुक्त खत आणि नामांकित कंपन्यांच्या जवळपास 5000 रिकाम्या बॅग देखील या ठिकाणी आढळून आल्या. हा सर्व माल कृषी विभागानं जप्त केला आहे.
शेतकऱ्यांकडून बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी हालचाली सुरु
पुढच्या काही दिवसात पाऊस (Monsoon) पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीने मशागती पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांकडून बी-बियाणे देखील खरेदी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी गुणवत्ता आणि दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके औषधे खरेदी करावेत, असे आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी
शेतकऱ्यांनी बनावट, भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खरेदी करावेत. पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पीक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी. खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पॉकेट सिलबंद असल्याची खात्री करावी.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी. तसेच सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरी तपासणी करुन पेरणी करावेत. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आत असल्याची खात्री करावी. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोननंबर दिलेले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा, असेही आवाहनही करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: